मंगळवार, २८ नोव्हेंबर, २०१७

रेड लाईट डायरीज - 'आज्जी' आणि चाईल्ड सेक्स वर्कर्स !



अलीकडील काळात आपल्याकडील चित्रपटांत वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपटांची निर्मिती होते आहे. हिंदी चित्रपटात कथेची मराठी पार्श्वभूमीही वापरली जातेय. ही दोन्ही वैशिष्ट्ये एकत्र असणारा देवाशीष मखीजा दिग्दर्शित 'अज्जी' (मराठीतलं आजी / आज्जी) हा चित्रपट नुकताच पाहण्यात आला. चित्रपटाची कथा एका अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या घटनेवर आधारित आहे. या बलात्कार पीडित मुलीला कुणी न्याय देऊ शकत नाही आणि ती विवशतेच्या गर्तेत खोल बुडू लागते तेंव्हा अखेरचा न्याय देण्यासाठी तिची आज्जी पुढे सरसावते. ती अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने आरोपीचा सूड उगवते असे या चित्रपटात दाखवले गेलेय. आपल्या आई बाबा व आज्जीसोबत राहणारी दहा वर्षाची मंदा एक निरागस गरीब मुलगी. या आज्जी आणि नातीचा एकमेकीवर प्रचंड जीव असतो. मंदाची आज्जी शिवणकाम करते. तर पुष्कळदा मंदा तिच्यासाठी ब्लाऊज पोहचविण्याचे काम करत असते.

एका धुरकटलेल्या दिवशी अशाच किरकोळ कामासाठी म्हणून मंदा घराबाहेर पडते आणि बेपत्ता होते. आसपास तिचा शोध घेतला जातो पण तिचा पत्ता लागत नाही. इकडे तिकडे धुंडाळताना अखेरीस मध्यरात्रीला ती सापडते. परंतू तिची अवस्था अत्यंत दयनीय झालेली असते. जखमांनी घायाळ झालेल्या अन जबर मानसिक धक्का बसलेल्या अवस्थेत ती आढळते. मंदावर अमानुष बलात्कार झालेला असतो, शिवाय बलात्काऱ्याने तिला जनावरासारखी बेदम मारहाण केलेली असते. मंदाला मोठ्या प्रमाणात ब्लीड होऊ लागते. घरचे लोक हबकून जातात. आपल्या मुलीवर गुदरलेला प्रसंग ध्यानी आल्यावर तिचे कुटुंब कोलमडून पडते. पोलिसी चौकशीचा फार्स सुरु होतो. निर्विकार आणि सराईत थंडपणाने हा तपास होतो. यथावकाश त्यातल्या आरोपीचे नाव निष्पन्न होते. आरोपी एका स्थानिक बड्या हस्तीची बिगडी हुई माजोरडी औलाद व एक कुप्रसिद्ध बिल्डर गुंड असतो. त्याच्यासमोर शांत राहण्यात शहाणपणा आहे हे पोलीस सार्थ पद्धतीने मुलीच्या कुटुंबियांवर बिंबवतात. आपल्या मुलीची दुर्दम्य अवस्था होऊनही तिचे आई-वडील गप्प राहतात. पण तिची आज्जी मात्र सूड घेण्याचे ठरविते. इथून काहीशा उग्र वाटणाऱ्या सूडाचा प्रवास सुरु होतो, जोडीला मंदाची ससेहोलपटही डोळ्यापुढे तरळत राहते. आज्जी  आणि नात हे दुधावरच्या सायीसारखे मायेचे ऊबदार नाते, पण दुखावलेली वाघीण आपलं वय विसरून जसा आक्रमक हल्ला चढवते तसं यातल्या आज्जीचं झालेलं.

'लिटिल रेड रीडिंग हुड' या क्लासिक फेअरी टेलवर या कथेची वीण बेतली आहे. रेड रीडिंग हुड एकदा आपल्या ग्रँडमाला भेटायला म्हणून निघते. रस्त्यात तिला एक लबाड लांडगा भेटतो. गप्पांच्या ओघात तो तिच्याकडून सगळी गुपिते काढून घेतो. हा लांडगा थेट आज्जीच्या घरी पोहचतो. अशी ती कथा होती. यातली आज्जी मात्र ह्या लिंगपिसाट लांडग्याची शिकार करताना अगदी बारकाईने लक्ष ठेवून आपलं काम तमाम करते. ती आपल्या सावजावर लक्ष ठेवते. त्याचं येणं जाणं, कोणत्या लोकांसोबत त्याचं उठणं बसणं आहे, तो काय धंदे करतो, त्याच्या सवयी कशा आहेत यावर ती ध्यान देते. त्याच्यावर नजर राखून असताना त्याचे असलेच विकृत उद्योग आज्जीच्या नजरेस पडतात तेंव्हा ती नखशिखांत हादरून जाते. हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात विकृत बलात्काराचे असे क्रूर, निर्विकार शैलीतले चित्रण पहिल्यांदाच केलं गेलं असावं. या नराधमाला आपण संपवलंच पाहिजे असा निर्धार आज्जी करते. त्याकरिता आपलं मन कठोर व्हावं म्हणून सत्तूर चालवून मांसाचा खिमा करण्यापर्यंत आणि कोंबडीची मान मुरगळण्यापर्यंत ती स्वतःला सराईत कठोर बनवते. कंबरेत काहीशी वाकलेली, अडखळणारी आज्जी आपला सूड कसा पूरा करते हे पडद्यावर बघणे इष्ट. कथेच्या टोकदार परिणामासाठी यातील उग्र दृश्ये काहीशी अनिवार्य होतात. यातली धावळेच्या जबरी संभोगाची दृश्ये किळसवाणी वाटली तर आपल्यातला माणूस जिवंत आहे असे समजायला हरकत नाही आणि जर या दृश्यांनी आपल्या भावना उद्दीपित झाल्या तर आपल्यातही आजवर न पकडला गेलेला अन चित्रपटात दाखवलेल्या पद्धतीने व्यक्त न झालेला एक धावळे जिवंत आहे असे समजावे. या दृश्यांच्या वेळी चित्रपटगृहातील काही प्रेक्षकांच्या अंतरंगातील धावळे जिवंत झाला आणि काही खिदळले, काहींनी गलिच्छ शेरेबाजी करून पांचट विनोद केले, तर काहींनी पुरुषी उन्मादाची बुरशी जिभेवाटे ओकून घेतली. ही बाब काळजावर ओरखडे ओढून गेली..

एका दहा वर्षाच्या निरागस कोवळ्या कळीला एक अधम किती पाशवी पद्धतीने कुस्करतो आणि आपल्या नातीचं दुःख सहन न होणारी अन न्यायाच्या नावावर अवहेलना झेलणारी केसाची चांदी झालेली एक वृद्धा बदल्याचे वर्तुळ कसे पुरे करते याचे विलक्षण तटस्थ पद्धतीने चित्रण आपल्यापुढे येत राहते आणि आपण अस्वस्थ होत राहतो. जोडीला आपल्या भोवतालीच प्रेक्षकातले सभ्य ‘धावळे’ चित्रपटाची 'मजा' घेतात याचा तिटकारा आणणारा अनुभवही येतो. चित्रपट पाहून सर्वसामान्य माणूस नक्कीच थोडाफार अस्वस्थ होईल. माझी अवस्था मात्र अत्यंत वाईट झाली. चित्रपटातील दहा वर्षाच्या मंदावरचे बलात्काराचे दृश्य पाहताना रेड लाईट एरियातल्या पाच वर्षापासून ते पंधरा वर्षापर्यंतच्या लाखो मंदा तरळत होत्या. ह्या मंदांचे आई बाबा कुठे आहेत ? यांच्यावरील अन्यायाच्या सूडाचा प्रवास कधी होणार नाही का ? यांच्यासाठी कोणी शस्त्र हाती घेणारं या जगात आहे का ? आपल्या मुलीच्या, नातीच्या वयाच्या या अश्राप पोरीबाळींच्या कोवळ्या देहाचे लचके तोडण्यासाठी विजारीची झिप खोलणाऱ्या लोकांना कोण आणि कसे आवरणार ? या निष्पाप जीवांच्या देहाचा बाजार बंद व्हावा म्हणून कोणच का पुढे येणार नाही ? पांढरपेशा माणसाला तर ‘आपल्याला काय बुवा त्याचे’ या पलीकडे सुचत नाही आणि जोवर आपल्या घरातल्या कुणावर ती वेळ येत नाही तोवर बाकीचं जग यात दखल देत नाही. मग या मंदा अशाच कुस्करल्या जाणार का ? या प्रश्नांची उत्तरे विचारायची तरी कोणाला ?

चाईल्ड सेक्स वर्कर्सबद्दल लिहावे तितके कमी आहे. काही लोकांना हा खयाली पुलाव वाटू शकतो कारण त्यांच्या डोळ्याला झापडेच तशी लावलेली असतात, ते तरी काय करणार बिचारे ! अवघ्या काहीशे रुपयात ह्या चिमूरडया विकल्या जातात. गरिबीपासून ते अनैतिक संततीपर्यंत अनेक प्रश्नांनी ग्रासलेली लोकं आपल्या पोटच्या गोळ्यांना दलालांच्या हाती सोपवतात. जेंव्हा या मुलींच्या आयुष्याचा नरक होतो तेंव्हा त्यांच्या समवयीन मुली मैत्रिणींसमवेत खेळणी खेळत असतात, आईच्या मांडीवर लडिवाळपणे झोपी जात असतात, ओसरीतल्या अंगणात फेर धरत असतात तर कधी आपल्या वडीलांच्या तर्जनीला धरून फेरफटका मारत असतात. यांना मात्र निर्वस्त्र व्हावं लागतं, जिचं खेळण्याचं बागडण्याचं वय असतं तिच्या निरागस कोवळ्या देहाशी नराधम नरपुंगव अश्लाघ्य खेळ खेळत असतात. या मुली एकदम सुरुवातीला आरडा ओरडा करतात, पण त्यांचा आवाज तो किती अन त्यांचा जोर तो किती असणार ! एका मुठीत त्यांचा कंठ दाबला जातो. या मुलींच्या वाट्याला जे भोग येतात ते जगातल्या कुणा बालिकेच्या नशिबी न येवोत. आजघडीला मेट्रो सिटीजसह देशातील प्रमुख महानगरे व जवळपास प्रत्येक राज्यातील मोठ्या शहरात चाइल्ड सेक्स वर्कर्स आढळतात. संकट काळी या मुलींना लपवणं सोपं जातं. पोटमाळा, लोखंडी संदूका, लाकडी कपाटे, अलमारी, पाण्याच्या टाक्या यात त्यांना दडवले जाते. त्यांच्या हातावर टिकवला जाणारा कमाईतला हिस्सा प्रौढ वेश्येच्या मानाने अर्धाही नसतो, शिवाय त्यांच्या डिमांडही फारशा नसतात, त्यांना मागणीही बऱ्यापैकी असल्याने रिस्क पत्करून पोलीस यंत्रणांना रीतसर मॅनेज करून त्यांना 'ठेवले' जाते.

चाईल्ड सेक्स वर्कर्स म्हणजे बालवेश्यांचा कारभार वाढीस लागण्यात इंटरनेटचा आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा हातभार खूप मोठा आहे. जसजसे इंटरनेटचे जाळे वाढत गेले तसतसा पॉर्नचा विळखा घट्ट होत गेला. विविध कॅटेगरीचे पॉर्न प्रचलित झाले. त्यात चाईल्ड पॉर्नोग्राफीचं वेड वाढत गेलं. त्यातून बालकांचे, बालिकांचे शोषण जोमात आले. त्याची पुढची पायरी म्हणजे लहान मुलींना धंद्यात आणले जाऊ लागले. थायलंड, इंडोनेशियात याने बाळसे धरले आणि जगभरात त्याचा द्रुतगतीने प्रसार झाला. आता आपल्या देशातील छोट्या शहरातही कोडवर्डद्वारे या मुलींचा पुरवठा केला जातो. यातूनच पुढे जाऊन ग्राहकाचे ह्या मुलींमधील स्वारस्य संपू नये म्हणून नवनवे फंडे त्यातून जन्माला आले. त्यापैकीच एक म्हणजे मुलींसाठी ड्रग्जचा वापर. श्रीलंका, म्यानमार, बांग्लादेशमार्गे पश्चिम बंगाल आणि तिथून आपल्या देशातील सर्व मेट्रो शहरातल्या वेश्यावस्तीतही हे खूळ आलंय. छोट्या शहरातही याची 'कीर्ती' पसरली आहे. या प्रकाराला कायद्याच्या चौकटीत अडकवणे कठीण आहे पण मनात आणले तर यासाठी जेलची हवा खाऊ घालता येते. पण मूळ दुखणेच इतके गुंतागुंतीचे आणि जुने होऊन गेलेय की त्याला आता जळवा लागताहेत. पोलिसांनी धाड टाकल्यास काही ठिकाणी अड्डेवाल्या आंटी या मुली आपल्या नातलगाच्या असल्याच्या बतावणी करतात, चिरीमिरी हाती ठेवली जाते. काही दिवस पोरींची अदलाबदली होते, वातावरण शांत झाले की नव्या दमाने मुलींची 'घरवापसी' होते.

यामुळे मुलींचा ठावठिकाणा लागणे गुंतागुंतीचे होऊन जाते. मुली थोड्या जुन्या झाल्या, किंचित मोठ्या झाल्या की त्यांच्या अंगवार विशिष्ट ठिकाणी 'गोलाई' यावी म्हणून त्यांना गोळ्या आणि इंजेक्शन देण्यास सुरुवात होते. यात प्रामुख्याने डेक्सामिथासोन, सायप्रोहेप्टाडीन, प्रेडनीसोलोनचा समावेश होतो. या चिमुरडया मुलींना जो शारीरिक ताण सोसावा लागतो तो वेदनेच्या आणि शब्दाच्या पलीकडचा असतो. या औषधींनी त्यांना तात्पुरता आराम मिळतो, अंगाचा शीणवटा जातो, अंग हलके होते. जोडीला रंगी बेरंगी कपड्यालत्त्याचे अन खेळणीचे आमिष दाखवले जाते. ह्या अल्पवयीन, अज्ञानी अल्पशिक्षित मुलींना टॉनिकच्या गोंडस नावाखाली या गोळ्या हातावर ठेवल्या जातात. गोळ्या खाल्ल्या नाहीत तर त्यांची उपासमार केली जाते. वेळप्रसंगी मारहाण देखील होते. या गोळ्या नेमक्या कशासाठी दिल्या जाताहेत आहेत हे त्या मुलींना सांगितले जात नाही. मुली आधी जबरदस्तीने, मग गरजेपोटी आणि अखेरीस ऍडीक्ट होऊन त्या औषधाच्या आहारी जातात. या औषधामुळे त्यांच्या अंगावर सूज येते, छाती आणि मांड्या फुगीर होतात, चेहऱ्यावरचा कोवळेपणा जाऊन तिथे रासवटपणा येतो. मात्र त्यांच्या हाडांची वेगाने झीज होऊ लागते. अवघ्या वीस वर्षाच्या आयुष्यात त्यांच्या हाडांचा भुगा होऊन जातो. कारण त्यांच्या देहाची गोलाई वेगाने वाढावी म्हणून त्यांना अमानुषपणे व कल्पना न देता जनावरांसाठीचा हेवी डोस दिला जातो. डेक्सामिथेसोन हे स्टिरॉईड ड्रग आहे. मनुष्यासाठी त्याची ५ मिलीग्रामची गोळी येते. ती अनेक (ब्रान्डनेम्सनी) नावांनी आपल्या देशात उपलब्ध आहे. यात व्हेटर्नरीचे (पशुंसाठीचे) डोसेस चाळीस ते शंभर मिलीग्राम पॅकचे असतात. मरतुकडी जनावरे फुगीर दिसावीत, त्यांचे आचळ फुगून यावे म्हणून अनेक अडाणचोट शेतकरी हे औषध त्यांच्या अशक्त / मरणासन्न / विक्रीस काढलेल्या गायी म्हशींना खाऊ घालतात. वास्तवात हा त्या गोळ्यांचा उपयोग नसून साईड इफेक्ट आहे. पण आपल्याकडे इफेक्टपेक्षा साईड इफेक्ट लवकर लोकप्रिय होतात त्याला हा कसा अपवाद राहील ? या चिमुकल्यांना चाळीस एमजीचा डोस दिल्यावर त्यांची अवस्था कशी होत असेल याची कल्पना न केलेली बरी. या मुलींना गोळ्यांच्या सेवनानंतर आपल्याला काय होतेय हे कळतच नाही कारण या गोळीमुळे स्नायू ताठरून जातात आणि अंग ठणकणे, मांड्या भरून येणे, ओटीपोट ताणले जाणे यातले काहीच जाणवत नाही (खरे तर हाही एक साईड इफेक्टच आहे), त्यामुळे धंद्याच्या तक्रारीस जागा राहत नाही. रात्रभरात ती दमून जाऊ नये म्हणून याचा असा पाशवी उपयोग होतो. तिचे अंथरून रक्ताने माखले तरी ‘खेळ’ चालू राहतो ! तिला या दुष्टचक्रातून वाचवायला कुणी मायबाप येत नाहीत नि कुठली आज्जी येत नाही की कुणी भाऊबंदही येत नाहीत. असे काही महिने, वर्षे चालते. पुढे जाऊन एक वेळ अशी येते की ती मुलगी त्या गोळीच्या व्यसनाधीन होते. गोळी खाल्ली नाही तर तिला बेचैनी वाटू लागते ! मग ती स्वतः होऊन गोळी मागू लागते.

चाईल्ड सेक्सवर्कर्सच्या आयुष्यात या गोळ्या अनाहूतपणे आल्या. ही औषधी मूलतः त्वचाविकार, एलर्जी आणि ग्रंथी असंतुलित होण्यावर वापरली जाते पण वरती नमूद केल्याप्रमाणे याला साईड इफेक्ट आहेत. यात ग्रंथी असलेला मांसल भाग सुजत जातो. श्रीलंकेतल्या एका सायकोरेपिस्टने ह्या गोळ्या एका मुलीला खाऊ घातल्या आणि अनाहूतपणे त्यातून एक नवा शोध 'चमडीबजार'च्या हाती आला. बघता बघता याचे लोण पूर्ण दक्षिण आशियायी देशात पसरलेय. या गोळ्या कुठल्याही पशुऔषधी दुकानात मिळतात. मायक्रोग्राम, सायप्रोडेक्स, डेक्साम, डेक्सोना, प्राक्टीन इत्यादी नानाविध ब्रांडनेम्सने त्या आपल्याकडे उपलब्ध आहेत.

या गोळ्या मुलींना खाऊ घालण्याचे प्रयोग जिथे आधी सुरु झाले त्याला आता आठ नऊ वर्षे झालीत. आता खरा आणि मोठा साईडइफेक्ट समोर येतोय. आठ वर्षाची असताना पश्चिमी मिदनापूरच्या झरीनने (नाव बदललेले आहे) या गोळ्या पहिल्यांदा खाल्ल्या. नंतर किती वेळा आणि किती खाल्ल्या हे तिला नेमकं आठवत नाही. पण आता ती अधू झालीय ! तिचे गुडघे पूर्ण ठिसूळ होऊन त्याचा भुगा झालाय. साठीत होणारं ऑस्टिओपोरॅसिस तिला चौदाव्या वर्षी झालेय. आता तर तिच्याकडे 'गिऱ्हाईक'ही येत नाही कारण तिचा देह म्हणजे निव्वळ अस्थिपंजर उरलाय ! हे संकट मोठे आहे, यातून सावरण्यासाठी काही हात पुढे सरसावत असले तरी त्याचे प्रमाण व्यस्त आहे.

या गोळ्यांचे सेवन किती हानिकारक आहे यात गुंतलेल्या अड्डेवाल्या आंटीच्या गळ्यात उतरवणे जिकीरीचे काम आहे पण अशक्य नाही. या मुलींना धंद्यात आणण्यापासून आपण रोखू शकत नसू तर किमान या औषधाच्या वापरापासून तरी त्यांना अडवले पाहिजे. मात्र आपली यंत्रणा फार हुशार आहे, ती कायद्यावर बोट ठेवते. हे काम अन्न आणि औषध विभागाचे आहे की पोलिसांचे यावर आधी कीस पाडला जातो मग दोषी नेमके कोणास ठरवायचे हा प्रॉब्लेम मुद्दाम समोर आणला जातो. गुन्हा नेमका कोणता आणि कोणावर नोंदवायचा याचीच इतकी चालढकल केली जाते की न्याय नको पण डोकेदुखी आवर अशी परिस्थिती येते. चुकून गुन्हानिश्चिती झालीच तर मग गुन्हा कुठल्या ठाण्याच्या एरियात घडला याच्या सीमा ठरवल्या जातात. तोवर एनजीओवाल्याचा 'कंड' जिरलेला असतो. गोळ्या आणणारा औषध दुकानात चिठ्ठी दाखवून गोळ्या घेऊन येतो, गोळ्या आणणारा, विकणारा हे कायद्याच्या कात्रीत अडकत नाहीत. तीच बाब खाऊ घालणाऱ्या व्यक्तीसाठी लागू होते. यामुळे गुन्हेगार निश्चिती होणे महाकठीण होऊन बसते.

कायदा, पोलीस, खटले आणि गुन्हेगार यांचे एकमेकास पूरक असलेले हे वर्तुळ कधी नष्ट होईल याचे उत्तर कोणीच देऊ शकत नाही. आपण आपल्या लहानग्या मुलींना बोर्नव्हीटा देतो, कॅल्शियम देतो आणि त्याचवेळी याच जगाच्या एका अंधारलेल्या कोपऱ्यात त्यांच्या समवयीन मुलींना कुणीएक व्यक्ती नव्हे तर आपल्याच समाजाचा एक हिस्सा विष खाऊ घालत असतो !! कधी तरुण तर कधी प्रौढ तर कधी जरठ पिकलेले पुरुष नागवे होऊन तिच्यावर स्वार झालेले असतात. एका निर्भयासाठी आपण मेणबत्त्या लावून मोर्चा काढू शकतो पण यांचे काय ? 'अज्जी'मधल्या मंदा कदमवर झालेल्या बळजोरीचा हिशोब तिची आज्जी चुकता करते पण यांचा हिशोब आपण कधी करणार आहोत की नाही ? की वेश्या हा घटक आपण कधी माणसात मोजणारच नाही ? या प्रश्नांची उत्तरे देता आली नाहीत तरी चालेल पण प्रत्येक सुज्ञ व संवेदनशील माणसाने हे प्रश्न आपल्या अंतर्मनाला कधी तरी एकांतात नक्की विचारावेत. त्या मुलींच्या जागी आपल्या पोरीबाळी ठेवून बघाव्यात अन काय वाटते याची अनुभूती घ्यावी. रेडलाईट एरियात नित्य नवी दुःखे आहेत, या दुःखांचे चेहरेही बदलते राहतात. इथं निजणाऱ्या देशी ‘बार्बी’ला 'पिरीयड' आला नसला तरी तिच्या डोळ्यातून 'रक्त' वाहत राहते जे बधीर व्यवस्थेला अन आत्ममग्नतेच्या कोषात गुरफटून गेलेल्या संवेदनाहीन समाजाला कधी दिसत नाही असे खेदाने म्हणावे लागते.


- समीर गायकवाड.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा