शुक्रवार, २८ ऑक्टोबर, २०१६

कवितेचे बंड - ज्योती लांजेवार


‘घर काळोखात उभे
आत तान्हुला रडतो
देह सजवी माऊली
पान्हा चोळीत गळतो’
स्त्रियांचे नेहमीच शोषण होत गेले पण स्त्रियांनी त्यामुळे आपला स्त्रीत्वाचा धर्म कधीही सोडला नाही. स्त्रियांनी आपल्या अंगभूत कर्तव्यांशी कधी बेईमानी केली नाही, प्रसंगी शील विकले पण आपल्या कर्तव्यांना त्या सन्मुख राहिल्या. मनाला स्पर्श करणाऱ्या मोजक्याच पण हळव्या शब्दात स्त्रीत्वाचे दुःख आणि स्त्रीची कर्तव्य सापेक्षता या कवितेत समोर येते. कवयित्री प्रा. डॉं.ज्योती लांजेवार यांची ही कविता.

मंगळवार, २५ ऑक्टोबर, २०१६

विद्रोही 'फिर्याद' - हिरा बनसोडे


सखी, आज प्रथमच तु माझ्याकडे जेवायला आलीस,
नुसतीच आली नाहीस तर तुझी जात विसरून आलीस.
सहसा बायका परंपरेची विषमता विसरत नाहीत
परंतु तु आभाळाचे मन घेऊन आलीस,
माझ्या वीतभर झोपडीत,
वाटले, जातीयतेचा तु कंठच छेदला आहेस,
माणसाला दुभंगणाऱ्या दऱ्या तु जोडत आली आहेस.
खरेच सखे, फार फार आनंदले मी,
शबरीच्या भोळ्या भक्तीनेच मी तुझे ताट सजविलं,
किती धन्य वाटलं मला !
पण ....पण ताट पाहताच तुझा चेहरा वेडावाकडा झाला,
कुत्सित हसून तु म्हणालीस,
" इश्श ! चटण्या, कोशिंबिरी अशा वाढतात का ?
अजून पान वाढायला तुला येत नाही
खरच, तुमची जात कधीच का सुधारणार नाही ?"
माझा जीव शरमून गेला ....
मघाशी आभाळाला टेकलेले माझे हात
खटकन कुणीतरी छाटल्यासारखे वाटले,
मी गप्प झाले ...
जेवण संपता संपता तु मला पुन्हा विचारलेस,
" हे गं काय ? मागच्या भातावर दही, ताक काहीच कसं नाही ?

बाई गं, त्याशिवाय आमचं नाही हो चालत.......?"
माझं उरलंसुरलं अवसानही गळालं
तुटलेल्या उल्केसारख,
मन खिन्न झालं,सुन्न झालं पण ....
पण दुसऱ्याच क्षणी मन पुन्हा उसळून आलं
पाण्यात दगड मारल्यावर जसा तळाचा गाळ वर येतो,
तसं सारं पुर्वायुष्य हिंदकळून समोर आलं,
" सखे, दही- ताकाच विचारतेस मला ! कसं सांगू गं तुला ?
अगं लहानपणी आम्हाला चहाला सुद्धा दुध मिळत नव्हतं,
तिथं कुठलं दही अन कुठलं ताक ?
लाकडाच्या वखारीतून आणलेल्या टोपलीभर भुश्श्यावर
माझी आई डोळ्यातला धूर सारीत स्वैपाक करायची
मक्याच्या भाकरीवर लसणाची चटणी असायची कधीमधी,
नाहीतर भाकरी कालवणाच्या पाण्यात चुरून खायचो आम्ही,
सखी, श्रीखंड हा शब्द आमच्या डिक्शनरीत नव्हता तेंव्हा,
लोणकढी तुपाचा सुगंध घेतला नव्हता कधी माझ्या नाकाने,
हलवा, बासुंदी चाखली नव्हती कधी या जिभेने,
सखी, तुझी परंपरा तु सोडली नाहीस,
तर तिची पाळेमुळे तुझ्या मनात रुजलेली आहेत
हेच त्रिवार सत्य आहे ....
मैत्रिणी, मागच्या भातावर दही नाही
म्हणून रागावू नको गं .....!
तुला वाढलेल्या ताटात आज पदार्थांचा क्रम चुकला
यात माझा काय दोष, हे मला सांगशील का ?
माझा काय दोष मला सांगशील का ?

कवयित्री हिरा बनसोडे यांची 'फिर्याद' या काव्यसंग्रहातली ही कविता.

शनिवार, २२ ऑक्टोबर, २०१६

ग्लॅमरचा भयाण अंत - परवीन बाबी .....

paraveen babi


१९ जानेवारी २००५. मध्यरात्र उलटून गेलीय. रात्रीचे दोन वाजलेले. जुहू परिसरातल्या इमारतीतले दिवे मालवलेले होते, रस्त्याला किंचित पेंग येत होती. तिथल्याच पाम बीचवरील रिव्हीएरा ह्या बहुमजली

इमारतीतील चौथ्या मजल्यावरील पश्चिमेकडील फ्लॅटमध्ये मात्र लाईट्स चालू होत्या. या फ्लॅटमधील लाईटस मागील पंधराएक वर्षात रात्री क्वचितच बंद व्हायच्या...फ्लॅटच्या दर्शनी हॉलमध्येच 'तिने' आपला बिस्तरा लावला होता. तिच्या समोरच्या भिंतीवर दोन मोठे पोट्रेट होते. उजव्या दिशेला कोपरयातील मेजावर एक कोरा कॅनव्हास होता. या भिंतीलगत आतल्या खोलीत जाण्याची एक चौकट होती, तिच्या डाव्या हाताला एक छोटीशी बेडरूम होती.

शनिवार, १ ऑक्टोबर, २०१६

दोन पावले मागे सरलेला 'वाघ' ...


आज उद्धव ठाकरेंनी केलेले काम संजय राऊत यांनी सामनामधून वेळीच केले असते तर आज ही वेळ शिवसेना पक्षप्रमुखांवर आली नसती..
संजय राऊत यांनी वादग्रस्त व्यंगचित्र छापून आल्यानंतरच्या दुसऱ्या दिवशीची प्रसिध्द केलेली बातमी मराठा समाजाला त्या व्यंगचित्रापेक्षाही क्लेशदायक वाटल्याचे अनेक जणांच्या विचारांतून जाणवले.
सामना / संजय राऊत यांनी माफी मागून जे काम सहज शक्य होते ते त्यांनी केले नाही.