गुरुवार, १० मार्च, २०१६

मर्मकवी - अशोक नायगावकर !



मोठाल्या मिशांचे नायगावकर आपल्या त्या चिरंतन हास्य मुद्रेत ऐसपैस मांडी घालून बसतात, त्यांच्या उजव्या हातात कवितेचे टिपण वाट बघत असते. मंचावरील निवेदकांनी, संयोजकांनी माईकचा ताबा त्यांच्याकडे दिला की ते थोडे बाह्या सरसावून बसतात आणि मग सुरु होते शब्दांची आतिशबाजी, कोट्यांचे षटकार अन अंगावर न उमटणारे पण मनावर करकचून आसूड ओढणारे शब्दांचे फटके !
एकामागून एक फुलबाज्या उडाव्यात तसे तडतडणारे काव्यात्मक रचना ते लीलया पेश करत जातात. ऐकणाऱ्याच्या कानाखाली जाळ निघावा अशा आशयाच्या कवितांना ते हास्यरसाच्या रुपेरी वर्खात बेमालूमपणे गुंडाळून समोरच्यांना सुपूर्द करतात. मधूनच मिशीवरून हात फिरवत समोरच्या श्रोत्यांकडे मिश्कील नजरेने बघत समोरच्या श्रोत्यांची तल्लीनता किती रंगली आहे याचा अंदाज घेतात. त्यानंतर ते नकळत सभागृह ताब्यात घेतात आणि शब्दांच्या शस्त्राने गुदगुल्या करत करत अंतर्मनावर घावही करून जातात. ते हे कसे आकारास आणतात ते भल्या भल्यानाही उमगत नाही.

नायगावकरांच्या कविता हा निव्वळ टाईमपास समजणारा माणूस मला अजून भेटला नाही कारण नायगावकर जेंव्हा उजव्या हातात टिपण धरून डाव्या हाताच्या पंजाला वरखाली करून, बोटे आवळून, नानाविध हातवारे करून त्यांच्या ढंगदार आवाजाच्या रुबाबदार शैलीत जेंव्हा कविता पेश करतात तेंव्हा ते रोजच्या लढाईत जगण्याचा आनंद गमावून बसलेल्या मराठी मावळ्यांचे आधारवड शेलारमामा झालेले असतात, प्रत्येकाला त्यांचे बोल पटतात, ते हवेहवेसे वाटतात ! ते आपली मते काव्यातून जोरकसपणे मांडतात पण कुणाला दुखावत नाहीत. ते वर्मावर बोट ठेवतात पण कुणाची टिंगल उडवत नाहीत, ते यथेच्च बुकलून काढतात पण त्यात व्यक्ती, रंग, लिंग, जात, धर्म वा पक्ष असली कुठली दुहेरी मापदंडे वापरत नाहीत. नायगावकर म्हणजे हास्यकवीच असं म्हणूनही चालणार नाही, त्यांच्या कविता या विचार करायला भाग पाडणाऱ्या कविता आहेत. 'वाटेवरच्या कविता' या संग्रहातून त्यांनी त्यांच्या सामाजिक आणि कलात्मक अशा दोन्ही अंगांचा समन्वित अन संतुलित परिचय दिला आहे. हास्य व्यंग यांच्या पलिकडे जाणारी त्यांची कविता आपल्याला अंतर्मनाला हेलावून टाकते. त्यांची कविता मर्मावर बोट ठेवून विडंबनाच्या बहारदार वाटेने फुलत जाते, ती कधी चिमटे काढते तर कधी खुमासदार ढंगात कोपरखळ्या काढते. वरवर विनोदाचा बाज धारण करणारी त्यांची कविता वास्तवाचा सत्याचा आरसा समोर धरते, त्यात आपण आपला चेहरा पहिला की मग ओशाळल्यासारखे होऊन जाते...

कवी नायगावकरांचा उल्लेख हास्यकवी अशा त्रोटक शब्दात करणे म्हणजे त्यांच्या काव्यावर अन त्यातल्या आशयावर अन्याय करण्यासारखे आहे. त्यात भक्तीची उत्कट ओढ असणाऱ्या कविताही आहेत अन प्रेम विरहापासून ते दुनियादारीपर्यंतचे रंगही त्यांच्या कवितेत आहेत. राजकारणापासून ते सामाजिक विषमतेपर्यंतचे अनेक विषय त्यांचे काव्याशयात आढळतात. स्त्रीविश्वाच्या संवेदना अन स्वत्वाचा शोध यावरही त्यांच्या कवितातून भाष्य केलेले आहे. त्यापैकीच काहीं निवडक कवितांचा हा धांडोळा ...

कवी अशोक नायगावकर आपल्या रूढ राज्यकर्त्यांविषयी आपले मत मांडताना निर्भीडतेने पण बेफाम न होता संघर्षाची कालातीत बंधने मोडीत काढत ते राज्यकर्त्यांच्या थेट मुळाशी जातात अन आयोनिसंभव अशी त्यांची 'भलावण' करतात. त्यातल्या स्थिरतेचा वेध घेताना ते त्याला दैववादाच्या मिथ्याशी जोडतात.अन अंती लिहितात की धोका देऊन मध्यरात्रीस जेरबंद करावयास येणाऱ्या घोडेस्वारासारखे हे सरकार असतं ! शब्दांची अचूक निवड अन आशयास परिपूर्ती देणारी रचना इथे दिसते -
'अयोनिसंभव असतं सरकार
युगानुयुगे स्थिर
दैवताच्या धाकासारखं
मध्यरात्री शस्त्रबेड्या घेऊन येणार्याड
घोड्याच्या टापांसारखं.'

केवळ शासकच कर्तव्यापासून बेदखल झाले आहेत का जनताही तिच्या नैतिक जबाबदारी पासून ढळली आहे याचा अत्यंत बोचरा परामर्श ते ''टिळक पहाताय ना सारे....' या कवितेत विडंबनाच्या अंगाने घेतात. संपूर्ण देशाचाच सध्या चिखल झालेला आहे, या चिखलातील चिखलफेक पहाणे नको म्हणूनच तुम्ही पाठ फिरवून उभे आहात का चौपाटीवर असं ते विचारतात अन टिळकानाच सावध राहायचा सूचक इशारा ते देतात...वरवरच्या विनोदी बाजाची ही कविता प्रत्येकास विचार करायला भाग पाडते -
'टिळक,तुम्ही चौपाटीवर इथे
कशासाठी उभे आहात ?
अहो, पाणीपुरी भेळपुरी खाणं
हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे
आणि आम्ही तो रोज मिळवणारच.....
तुमचे डोके ठिकाणावर आहे काय टिळक ?
तुम्ही डॉलर मिळवा
लोक बघा किती आनंदात
बिअरच्या ग्लासासारखे फेसाळलेत
तुम्ही स्वदेशी बार टाका, मस्त जगा ..''
हे फटकारे त्यांनी टिळकांचे नाव घेवून सर्वांवरच ओढले आहेत. या कवितेतले टिळक आपल्या अंगावर धावून येतात आणि आपली झाडाझडती घेतात.

आजकालचे शासनकर्ते राज्य करताना कशी मानसिकता ठेवतात याचं अत्यंत रंजक असं चित्र ते भ्रमण करता.. या कवितेत रंगवतात. सत्तेसाठी सर्व हाडवैर विसरून, आपली साभाविक ध्येये विसरून एक भोगीभाव मनी धरून सत्तातूर कोणते सूत्र वापरतात यावर ते रूपक अलंकारातून चिमटे काढतात -
'भ्रमण करता करता
राजज्योतिषी
एका विशिष्ट
भूमीशी येउन थबकले
जिथे
सर्प आणि
मुंगुस
सहकार्याने
सावज पकडताना दिसले.
राजज्योतिषी
सुलतानाला म्हणाला
‘ही भूमी राज्य करणेस सोयीची ठरेल.’

भोवताली अशा प्रकारचे राज्य असेल अन आजूबाजूची सामान्य जनता वर उल्लेखल्याप्रमाणे निद्रिस्त असेल तर प्रतिभावंताने काय भूमिका घ्यावी याचा वेध घेताना ते तथाकथित विद्वानांना देखील आपल्या नायगावकरी शैलीचा प्रसाद देतात -
'सत्यजित रे, थापा
आणि शंकर्या चे बाबा, एकदम गेल्याचं कळलं
आपल्याला असं नेहमीच कुणीकुणी गेल्याचं कळतं
आणि मग नेमकं काय बोलायचं, नेमकं काय वाटतं,
काहीच कळत नाही...'

त्यातूनही कुणा प्रतिभावंताने जर आवाज उठवण्याचा प्रयत्न केलाच तर तो तकलादू असतो पण त्यात लढायचा नुसता देखावा असतो असं ते अगदी मार्मिकतेन स्पष्ट करतात.
'गावावर दिसती ओघळ हे रक्ताचे
मी दार लोटले आतून आयुष्याचे
मी परिस्थितीच्या बेंबीमध्ये बोट घातले नाही | मी लढलो नाही || '
मी परिस्थितीच्या बेंबीत बोटही घातले नाही अन मी लढलोही नाही मी मूक दर्शक होऊन राहिलो या टोकदार शब्दात त्यांची व्यथा व्यक्त होते.

आपल्या कडील वास्तवाचे जसे नायगावकरांना भान आहे तसेच समकालीन जागतिक प्रतिभावंताच्या जगाचीही त्यांना जाण आहे. आपल्याकडे नुसता देखावा केला जातो पण इतरत्र बाह्यजगातले प्रतिभावंत रस्त्यावर येऊन खऱ्या आंदोलकांचे पाईक होतात. मग आपल्याकडे असे का होत नाहीत याची पळवाट शोधणाऱ्या लोकांना ते एक टपली देखील मारतात -
'भडभडा रस्त्यावर येणारे पूर्व युरोपातले
कवी-लेखक-नाटककार
आपण मनातून नुस्ते पहातो. तेव्हा एखाद्या एपिसोडचं शूटींग तर नाही ना
असं म्हणत पुढे सरकतो
कदाचित आपण खूप आध्यात्मिक असतो..'

आसपास इतकं सर्व घडत असताना केवळ मूक दर्शकाची भूमिका घेताना सामान्य माणूस समाजातील इतर घटकांबाबत कस उदासीन दृष्टीकोन ठेवतो याचे भेदक वर्णन ते कार्पेट एरिया या कवितेतून करतात -
'चिमणीला मग बिल्डर बोले
का ग तुझे डोळे ओले
काय सांगू, दादा तुला
माझा घरटा कोणी नेला….

पूर्वी दानाचे महत्व होते
आता मैदानाचे आहे
गुप्तमैदानाचे तर फार आहे
आता सर्वजण
कार्पेट एरिया, कार्पेट एरिया
असे पोरकटपणाने म्हणतात
आणि एफेसाय, एफेसाय करत
फसतात-रुततात....'

अशावेळेस निव्वळ नंदीबैलासारखी भूमिका न घेता मूळ मुद्यावर घाव न घालता तथाकथित प्रतिभावंत काय युक्तिवाद करत बसतात याची उत्तरीय तपासणीच ते करतात. धोतर नेसले तर हवेत उडते, सैरभैर होते घट्ट वस्त्र घातले तर घुसमटते, जीव गुदमरतो आता काय करावे असा गहन प्रश्न विचारवंताला पडतो अशा शेलक्या शब्दात 'स्टेट' या कवितेत त्याची टर उडवतात !
'शासकांनी
खोबरेल तेलाचे न्याय्य वाटप व्हावे म्हणून
सेक्टर सेक्टरमध्ये केंद्रे काढली
दर दिवशी प्रत्येकाने आपले डोके पुढे करायचे
आणि टाळूवर तेल चोपडून घ्यायचे
प्रतिभावंताने
आपले डोके असे खोबरेल तेलासाठी वाकवायचे
म्हणून ठाम नकार दिला,
खंबीर भूमिका घेतली .....'

हा संघर्ष केवळ शहरी भागातच आहे का याचाही ते वेध घेतात. शहरीकरण आणि ग्रामीण जनतेचे विस्थापन यावर ते लिहितात -
'एतद्देशीय विरुद्ध परकीय संस्कृती.
प्रत्यक्ष निर्मिती विरुद्ध दलालांची चलती.
या व्यवस्थेत फोफावलेलं शासनाचं भयाकारी विश्वरूप आणि भयाकूल,शरण ,नाकर्ते झालेले व्यक्तीमन.'

मग या अक्राळविक्राळ शहरीकरणातून तयार होणारे मानवनिर्मित प्रश्न अन त्याचे निसर्गावर होणारे परिणाम यावर भाष्य करतात. आपल्या कळत नकळत ते या कवितेत काळजाला हात घालतात. यावर उपाय काय हे देखील अप्रत्यक्षपणे सुचवतात -
'पारोशाने नदी म्हणाली
किती दिसात गं न्हाले नाही
मरता मरता झाड म्हणाले
दोन थेंब तरी पाणी द्या हो
शाहाणपटीने धारण बांधले
अभियंत्यांना मुता म्हणालो
गाळ म्हणाला धरणाचीया
किती उंचवर बांधू समाधी ?'

हिंसेची अतिरिक्त भीती अन स्वप्नरंजनाऱ्या लोकांच्या कल्पनाविश्वात काय चाललेले असते याचा धांडोळा ते त्याच्या माजघरात उतरून घेतात -
'गळ्याशी नख खुपसून, अंदाज घेत क्रूर पणे त्वचा सोलली जातीये दुधी भोपळ्याची,
सपासप सुरी चालवत कांद्याची कापा काप चालली आहे, डोळ्याची आग आग होतीये,
शहाळ्या-नारळावर कोयत्या ने दरोडा घातला आहे,
हे भाजलं जात आहे वांग, निथळतंय त्वचेतून पाणी, टप टप,
तड ताडल्या मोहोरी, हा खेळ चाललाय फड फडात,
कडीपत्त्याच्या पंखांचा उकळत्या तेलात,
आणि तिखट टाकल जात आहे, भाजीच्या अंगावर डोळ्यात,
धारेवर किसली जात आहे गाजरं.....'

इतकं सर्व आयुष्यभर केवळ तटस्थतेच्या भावनेतून बघत माणसे आयुष्य कसबसं जगतात अन निवृत्तीनंतर त्याचे काय होते यावर त्यांनी अत्यंत खुमासदार पण मार्मिक भाष्य केलं आहे -
'निवृत्त चाकरांचे बघ काय हाल झाले,
काही पिण्यात गेले, काही पुण्यात गेले....'

समाजातील विविध घटकांच्याप्रती असणारी त्यांची जागरूकता स्त्रियांच्या सुखदुःखाचाही कानोसा घेते. समाजात स्त्रियांना मिळणारी दुय्यम वागणूक त्यांना अस्वस्थ करते. आपल्या पायावर उभं राहण्याचे स्वप्न पाहणारी साक्षरतेचे धडे गिरवलेली स्त्रीच्या माथी 'मी स्वखुशीने जाळून घेतेय' असं विषण्ण करणारं वास्तव मारलं जातं हे त्यांना सहन होत नाही -
'आता तिला
सही निशाणी
डाव्या आंगठ्यासाठी
शाई फासावी लागत नाही
आता ती स्वत:च लिहू शकते
घासलेट ओतून घेण्याआधी
'मी स्वखुशीने
जाळून घेतेय ' ..'

याच्या नेमक्या विरुद्ध अंगाचं प्रेमातला रसाळ गोडवा सांगणारं काव्य देखील ते तितक्याच उत्कटतेने लिहितात -
मी म्हणालो बायकोला आजपासून प्रेयसी तू
ती म्हणाली, यापुढे चोरून भेटू ''

स्त्री ही क्षणाची पत्नी तर अनंत काळची माता हा भाव पुढे स्थायी स्वरुपात ते मांडतात. इथे ते काहीसे हळवे झालेलेही दिसतात -
'नाही रानाचा आधार
नाही पायाखाली जोते
काटक्यांच्या शिशिरात
माय चुलीशी खोकते ..'


सामाजिक जाणीवा, नात्यांची तरलता अन सौंदर्यासक्तीबरोबरच स्वत्वाचा शोध घेणारा एक आध्यात्मिक अधिष्टान असणारा कवीही नायगावकरांच्या अंतरंगात दडलेला आहे हे दर्शविणाऱ्या काही कविता त्यांनी लिहिल्या आहेत. केवळ उपरोधबुद्धी, विनोदबुद्धी वा विडंबनाचाच उत्तुंग वारसा त्यांच्या कवितेत आहे असे नव्हे तर ते भक्तिमय जगाचा आध्यात्मिक वेध देखील तितक्याच समरसतेने घेतात -
'पंढरीच्या विठ्ठलाचे मीच केले सांत्वन
मी विटेने अंग त्याचे शेकले कित्येकदा
लाल किल्ल्यातून मी संदेश राष्ट्राला दिला-
-'वेळ पडली लोकहो, झोपेतुनी उठवा मला !'


पांडुरंगा या कवितेत रोजच्या जीवनातील दैन्यावस्थेला त्रासून गेलेला सामान्य माणूस शेवटी विठूचरणी कसा लीन होतो अन काय मागणे मागतो हे त्यांनी अगदी तरलतेने लिहिले आहे -
'उसवली ओवी फाकला अभंग
ऐशी स्थिती झाली पांडुरंगा ||
अगा येथे झाला तुडुंब अंधार
दिवे गेले तेही दिसेचिना ||
पामरांचे जग रोजची भाकरी
आणिक आयुष्य ढकलती ||
विठो, तुझ्या पायी आता
मागे अखेरची भीक
देरे, अशी दे भाकरी
पुन्हा लागो नये भुक'

नायगावकरांच्या एकंदर जीवनाकडे बघण्याच्या दृष्ट्कोनावर भाष्य करायचे झाले अन त्यांच्या समग्र काव्याचे मोजक्या पंक्तीत रसग्रहण करायचे झाल्यास त्यांच्याच शब्दात असं करता येईल -
'मी न केली आरती वा मी न केला उत्सव
मात्र तबकाच्या तळाशी काजळीचा थर झालो
हे दिवे जातात आता चौघड्याच्या मागुती
बंद दारातून पडघम येतसे कानावरी
मी कधी माळेत त्यांच्या गुंफले नाही स्वतःला
ओवले माझे मला मी झाकलेला हार झालो....'

आपल्या जाणीवा प्रामाणिकपणे व्यक्त करणाऱ्या नायगावकरांचा महाराष्ट्राने उचित सन्मान अजूनही केलेला नाही हे देखील एक सत्य आहे. २०१२ मध्ये दापोली येथे झालेल्या १४व्या कोकण मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अशोक नायगावकर यांनी निवड झाली होती. या संमेलनात ते म्हणाले होते, 'महाराष्ट्रात लेखक घडवण्यासाठी पालकांनी पुढाकार घेतला पाहिजे.' उपरोधाच्या माध्यमातून गंभीर समाजचिंतन करणारे कवी अशी त्यांची ओळख आहे. वाचनाने संस्कृती सुधारते, वाचन वाढवा, त्यामुळे तुम्ही समृध्द व्हाल, असे ते म्हणतात.विदेशात विविध ठिकाणी महाराष्ट्र मंडळामध्ये कवितेच्या मैफली त्यांनी केल्या आहेत. लोकसत्ता या वृत्तपत्रात गद्य लिखाणही त्यांनी केले आहे. त्यांच्या कविता सत्यकथा या प्रतिष्ठेच्या प्रकाशनात छापून आल्या होत्या. अशोक नायगांवकर मुख्यत्वे आपल्या मंचीय कवितेमुळे महाराष्ट्राला सुपरिचित आहेत. सध्याच्या हास्यकवितेचे ते अनभिषिक्त सम्राटच आहेत. मराठीतील खुसखुशीत व्यंगकाव्याच्या परंपरेचे सध्याचे ते बिनीचे शिलेदार आहेत. त्यांच्या काव्यमैफ़ली ही एक मेजवानीच असते.हिंदी भाषिक हास्यकवींना जी मान्यता वा प्रतिष्ठा साहित्यिक,सांस्कृतिक वर्तुळात मिळाली आहे तशी मात्र आपल्याकडे नायगावकराना मिळालेली दिसत नाही. मात्र सर्व मराठी रसिक वाचकांनी नायगावकरांच्या कवितांवर भरभरून प्रेम केले आहे अन काळागणिक त्यात वृद्धीच होत आहे .

बालपणी गरीबीमुळे त्यांचे दिवस कष्टाचे होते. अनेक छोटी मोठी त्यांनी अर्थार्जनासाठी केली. या काळात प्र. के. अत्रे, लोहिया, दादासाहेब जगताप अशा अनेक लोकांची भाषणे त्यांनी ऐकली. नायगावकरांनी बी.कॉम. पदवीपर्यंत शिक्षण केले. लग्न झाल्यावर नायगावकर हे करंबेळकर वाडी, गावठाण चेंबूर येथे राहत असत. शिक्षणानंतर त्यांनी बँक ऑफ बरोडा या बँकेत ३१ वर्षे नोकरी केली आणि मग स्वेच्छानिवृत्ती घेतली. ते सतार वादकही आहेत. तसेच त्यांचा अध्यात्माकडे ओढ आहे.

अलंकारित शब्दजडत्वाच्या मोहात न पडता स्वतःला कमी लेखत आपल्याला गवसलेले जीवनाचे मर्म आपल्या कवितेतून उलगडणाऱ्या नायगावकरांचा हास्यकवी असा उल्लेख होण्याऐवजी 'मर्मकवी' असं संबोधन निश्चितच यथार्थ ठरेल !

-समीर गायकवाड.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा