शोषणाच्या नि देहव्यापाराच्या दलदलीत अडकलेल्या स्त्रियांना काय काय सोसावं लागतं हे मंजू सिंहनी अनुभवलं आहे. यातल्या हरेक स्त्रीला मुक्त होता यावं नि त्यांचा छळवाद संपावा यासाठी त्यांनी आयुष्य वाहिलं आहे. त्यात त्यांना पती अजित सिंह यांची उत्तम साथ मिळाली. मंजू आणि अजित या दांपत्याने आजवर साडेपाच हजार मुलींची सुटका केली आहे. बाराशे मुलींचे यशस्वी पुनर्वसन केले आहे.
1988 साली त्यांनी वेश्यावस्तीतल्या तीन मुली दत्तक घेतल्या आणि आपल्या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. दत्तक देण्यास स्त्रिया कच खाऊ लागल्या तेव्हा त्यांनी ठरवलं की आपण थेट मुलींच्या सुटकेचे उद्दिष्ट ठेवू! त्यांनी तशा पद्धतीने काम करण्याचा एक प्रोटोकॉल ठरवला. छोटेखानी टीम बनवली. त्यांचे काम इतके जबरदस्त होऊ लागले की त्यांचा आपसूक गवगवा होऊ लागला. त्यांनी संस्थेची नोंदणी करून स्वरूप व उद्दिष्टे व्यापक करण्याचे ठरवले. 1993 मध्ये त्यांच्या 'गुड़िया' या एनजीओची अधिकृत नोंदणी झाली.
प्रामुख्याने अल्पवयीन मुलींच्या सुटकेला त्यांनी प्राधान्य दिले. दरम्यान त्यांनी आपलं काम दिल्ली आणि वाराणसीमध्ये सुरू केले. अनेक ठिकाणची ते आधी माहिती घेत, तिथल्या स्त्रियांना विश्वासात घेत. सुटकेसाठी त्यांची इच्छाशक्ती जाणून घेत. कारण काही स्त्रियांना इथून कुठेच जावं वाटत नाही कारण त्या हताश हतबल झालेल्या असतात. ज्या मुली होकार देतील त्यांच्या सुटकेचा प्लॅन आखणे हा पुढचा टप्पा असतो. त्यानंतर ती माहिती पोलिस आणि प्रशासन यंत्रणेस कळवून त्यांचे सहाय्य घ्यावे लागते.
सुटका केल्यावर, महिलांना सुरक्षित ठिकाणी आणले जाते. मात्र अडचणी इथेच संपत नाहीत. त्यांचे पुनर्वसन करणे हे मोठे आव्हान असते. कारण अशा मुली सर्वांनाच आपल्या घरी नकोशा असतात. यांना स्वतःच्या पायावर उभं करताना मोस्टली त्यांची ओळख लपवावी लागते. मात्र चुकून जरी त्यांची ओळख एक्सपोज झाली तर एका सेकंदात त्यांच्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलतो. लोक तिच्याकडे एक फुकट उपभोगाचे साधन म्हणून पाहू लागतात. अशाने ती स्त्री खचून पुन्हा एकदा दलदलीत येते, ते देखील कायमचे! त्यामुळे हा टप्पा सर्वात काळजीपूर्वक हाताळावा लागतो! इथे गुड़ियाचे काम बेस्ट आहे!
तिला ते एका कुटुंबात ठेवतात. तिला नातलग लाभतात. मग तिचे पुनर्वसन होते. त्याचाही फॉलोअप घेतला जातो. तिला लाभलेले आप्तदेखील तिच्याकडे लक्ष ठेवून असतात. वाराणसी हे पवित्र तीर्थक्षेत्र मानले जात असले तरी तिथेही हा व्यवसाय आहेच आणि यात खेचल्या जाणाऱ्या अल्पवयीन मुली आहेतच! 2008 साली गुडियाच्या पुढाकारातून शिवदासपुरच्या बदनाम गल्ल्यांत रेड टाकली गेली तेव्हा एकाच दिवशी 48 अल्पवयीन मुलींची सुटका केली गेली यावरून देशभरात किती मोठ्या प्रमाणात अल्पवयीन मुली यात फसल्या आहेत याचा अंदाज येईल.
सोडवून आणलेल्या प्रत्येक मुलीला मंजूसिंह आईच्या ममतेने जवळ घेतात. तिला मायेची ऊब देतात आणि नवं घर देतात. नवी ओळख देतात. एकेक करत त्यांनी साडेपाच हजार जणींची सुटका केलीय. जोवर श्वास सुरु आहेत तोवर जास्तीत जास्त मुलींची सुटका करायची हे मंजू सिंहच्या जीवनाचे ध्येय आहे. काही ठिकाणी रेड घालताना वा चुकून माहिती लीक झाल्यावर सावध झालेल्या गुंडांनी त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्नही केला आहे. मात्र त्याला भीक न घालता मंजूंचे काम अव्याहत जारी आहे. अर्थातच या सर्व कामात त्यांचे पती अजित सिंह यांची प्रचंड मदत होते याची नोंद घेतली पाहिजे.
शोभिवंत देखणी बाहुली / गुड़िया आपल्यापैकी अनेकांनी पाहिली आहे मात्र समाजातल्या प्रत्येक मुलीस खेळणी खेळायचे भाग्य लाभते का याचे उत्तर नकारार्थी येते! प्रत्येक मुलीला तिचं निरागस बालपण तितक्याच समरसतेने जगण्याचा अधिकार आहे आणि तिला तो मिळवून देण्यासाठी झटणारी मंजू सिंह खऱ्या अर्थाने दुर्गा आहेत. कारण त्या केवळ दुष्ट प्रवृत्तींचा नाश करून थांबत नाहीत तर अनेकींना कठीण परिस्थितीतुन बाहेर पडून दुर्गा बनण्यास प्रोत्साहन देतात. ही गुड़िया केवळ खेळण्यातली नसून तिच्याकडे स्वसंरक्षणाचे कौशल्य आहे नि स्वतःच्या पायावर उभं राहून नवा इतिहास रचण्याची क्षमताही तिच्यात आहे!
मंजू सिंह यांना वंदन!
- समीर गायकवाड
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा