गुरुवार, १५ जून, २०१७

नक्षत्रांचे देणे - आरती प्रभू




आरती प्रभू हे सुप्रसिद्ध लेखक चिंतामण त्र्यंबक खानोलकर यांचे टोपण नाव. आरती प्रभूंची म्हणजे खानोलकरांची काव्यसंपदा त्यांच्या कादंबरी, कथा, नाटक या साहित्य प्रकारांइतकी विशाल विस्तृत नसली तरी तिची नोंद घेतल्याशिवाय मराठी कवितेच्या अभ्यासाची इतिश्री होऊ शकत नाही. ८ मार्च १९३० रोजी वेंगुर्ला तालुक्यातील बागलांची राई या छोट्याशा गावी चिं. त्र्य. खानोलकर यांचा जन्म झाला. वडिलांचे छत्र बालपणीच हरपल्यावर आई हेच त्यांचे सर्वस्व झाले होते. वडिलांच्या मागे किशोरवयीन चिंतामणच्या मातोश्री खानावळ चालवत. त्यातून त्यांचा कसाबसा उदरनिर्वाह होत असे. खानोलकरांचे शिक्षण त्यामुळे फारसे होऊ शकले नव्हते. लहानपणी अंगी असणारी बेफिकिरी आणि त्या छोट्याशा व्यवसायातही असलेली स्पर्धा यामुळे त्यांच्या खानावळीचे बस्तान लवकरच उठले. व्यवसाय मंदावला. धनकोंच्या चकरा सुरु झाल्या, देणी वाढत गेली. घरातील चीजवस्तुंना हात लावायची वेळ आली.अशा रीतीने आयुष्य जगून चालणार नाही हे ते जाणून होते, नोकरी करावी म्हटलं तर शिक्षण खूप काही झालेले नाही. परिणामी इच्छा नसूनही घरातील वस्तू विकून दिवस काढायची वेळ त्यांच्यावर आली. जेंव्हा आर्थिक ओढाताण असह्य झाली तेंव्हा त्यांनी आपली वस्तुस्थिती मधू मंगेश कर्णिकांना कळवली. अशाच एका उनाड दिवशी ते अनाहुतासारखे मुंबईत येऊन धडकले.

आर्थिक ओढगस्तीमुळे जरी खानोलकर त्रस्त झाले होते तरी ते जेंव्हा खानावळीच्या गल्ल्यावर बसत तेंव्हा त्यांना कविता लिहिण्याचा छंद होता. कवितांचा त्यांचा हा भावबंध शाळेत असतानापासूनचा जुना होता. त्यांचे आधीचे लेखन आरती प्रभू या नावाने प्रसिद्ध झाल्याने तेच नाव त्यांनी पुढेही कायम ठेवले. त्यांची पहिली कविता श्री. पू. भागवत यांनी सत्यकथेत छापली होती ती कविता म्हणजे 'शून्य शृंगारते' ही होय. 'मौज'च्या अंकांमध्ये मात्र जेंव्हा त्यांच्या कविता छापून आल्या होत्या तेंव्हा खानोलकर काहीसे बावरून गेले. त्या अवस्थेतच त्यांनी 'ये रे घना, ये रे घना, न्हाउं घाल माझ्या मना...' ही प्रसिद्ध कविता लिहिल्याचं सांगितलं जातं. खानोलकरांना अशी भीतीही वाटायची की अचानक मिळालेल्या या प्रसिद्धीमुळे आपल्या प्रतिभेला ग्रहण तर लागायचे नाही ना ? आपली शब्दसंपदा हातून निसटून जाते की काय असे विचारही तेंव्हा त्यांच्या मनी येऊन गेले पण अभिजात प्रतिभावंत असल्याने तसे काही घडणे शक्यच नव्हते आणि तसे घडलेही नाही. कोकणात नित्यनेमाने चवीने चघळल्या जात असलेल्या भुताखेतांच्या कथा, कोकणातला अद्भुत मनोरम्य निसर्ग, गूढरम्यता, माणसांच्या मनाचा कसून शोध घेणारे हळवे मन यावर लिहिण्याचा त्यांचा जास्त कल असे.

मुंबईच्या यंत्रवत जगण्याला सरावण्यासाठी त्या त्या माणसाची मानसिकता आधी मुंबईच्या वातावरणाशी जुळली पाहिजे अन्यथा तिथल्या घडयाळाच्या काटयाबरहुकुम प्रमाणे चाललेल्या जीवनशैलीशी जुळवून घेणे कठीण जाते. कोकणासारख्या निसर्गरम्य परिसरात वास्तव्य केलेल्या खानोलकरांना मुंबई आपलीशी कधी वाटलीच नाही, त्यांची त्या शहराशी कधी नाळ जुळू शकली नाही. ते देहाने मुंबईत होते पण त्यांचे मन कोकणातच नारळी पोफळींच्या बागेत झुलत असायचे नाही तर तिथली मनोहारी समुद्र किनाऱ्यावरील वाळूत रेघोट्या मारत बसलेलं असायचं. त्यामुळे त्यांच्या बहुतांश कवितांमध्ये निसर्ग मुक्तहस्ते आणि सिद्धतेने चित्रित झालेला दिसून येतो. मौज प्रकाशनने प्रकाशित केलेल्या 'जोगवा'त याची प्रचीती येते. याच दरम्यान त्यांची मुंबई आकाशवाणीतील भाषण विभागात पाडगावकरांचा सहायक म्हणून नेमणूक झाली. पण काही कारणामुळे १९६१ मध्ये त्यांना ही नोकरी सोडावी लागली. त्यानंतर मात्र त्यांनी लेखनासाठी स्वतःला वाहून घेतले. खानोलकर हे अतिशय प्रतिभासंपन्न लेखक, कवी, कादंबरीकार, नाटककार होते. त्यांच्या लेखनाचा झपाटा दांडगा होता. त्यांच्या पुस्तकांच्या प्रकाशनाचा काळ लक्षात घेतला तर त्यांचा वेग किती प्रचंड होता हे सहज लक्षात येते. तरीही त्यांच्या लेखनातील विविधता व दर्जा हा निसंशय बावनकशी होता. घरचे दारिद्र्य, आप्त स्वकीयांचे मृत्यू, घरचे दारचे आजारपण, उपेक्षा, त्यांच्या स्वभावामुळे होत गेलेले गैरसमज, नियतीने त्यांच्याशी केलेले खेळ याची त्यांनी तमा बाळगली नाही. उलट त्यांच्या लेखनात या सर्व घटकांची पारलौकिक छबी पडलेली दिसून येते.

खानोलकरांचे जीवन म्हणजे अद्भुत घटनांच्या चढउतारांचा आलेख होता असे म्हणता येईल. त्यांच्या अंगी असलेल्या विक्षिप्तपणामुळे त्यांचे एखादे कार्य, ध्येय हिरावून घेतले जातेय की काय असं वाटत असतानाच त्यांच्याकडून अभुतपूर्व प्रतिभेचे नवनवोन्मेषकारी प्रकटन होई आणि ते त्यातून तरुन जात. नियतीचा असा पाठशिवणीचा खेळ त्याना अखंडितपणे खेळावा लागला, पण ते त्यात पराभूत झाले की जिंकले हे सांगता येणार नाही परंतु लेखणीच्या आधारे त्यांनी नियतीला चारीमुंड्या चीत केले असेच म्हणावे लागते. इतका त्यांनी नियतीच्या खेळाचा वापर खुबीने आपल्या साहित्यात करून घेतला. श्री. पु. भागवत, मंगेश पाडगांवकर, मधु मंगेश कर्णिक, विजय तेंडुलकर यांच्यासारख्या दिग्गज सारस्वतांनी खानोलकरांच्या प्रतिभेची देणगी ओळखून त्यांना मैत्रीचा आणि मदतीचा हात सदैव पुढे केला. त्यांच्या गीतांना चाली लावण्यासाठी स्वतः हृदयनाथ मंगेशकर पुढे आले आणि या दोन प्रतिभावंताच्या किमयेतून ' ये रे घना ', ' नाही कशी म्हणू तुला ' सारखी गीते अमर झाली. मराठी भावगीतांमध्ये या गीतांना अजूनही अढळस्थान आहे. काही काळापुर्वी आशाताईनी त्यांच्या सुरेल आवाजात याचे निवडक लाइव्ह कार्यक्रम देखील केले होते. १९६२ मध्ये त्यांचा 'दिवेलागण' हा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला तेंव्हा स्मृतीजन्य व्याकुळतेवर मुक्तहस्ताने लिहिणारा कवी अशी त्यांची ख्याती साहित्यिक विश्वात झाली. या भाव व्याकुळतेवर मात करून त्यांच्या कवितेने प्रसन्नतेची शब्दछटा १९७५ मध्ये आलेल्या 'नक्षत्रांचे देणे' मध्ये अंगावर पांघरली. ‘नाही कशी म्हणू तुला, म्हणते रे गीत...." या पंक्ती याचीच तर ग्वाही देतात. नेमक्या आणि नीटस शब्दांनी ते त्यांना काय सूचित करायचे ते अगदी चपखलपणे व्यक्त करत.

खानोलकर कुठेही असले तेरी ते सतत कवितेच्या धुंदीत वावरणारे म्हणून प्रसिद्ध होते. पण त्यांनीच पुढे 'रात्र काळी घागर काळी ' सारखी अप्रतिम कादंबरी लिहिली, याच कादंबरीला हरी नारायण आपटे अभ्यासवृत्ती मिळाली. 'माकडाला चढली भांग' या नाटकाला अंत्र्याकडून शाबासकी मिळवली पण त्याआधी ' अजगर ' सारख्या कादंबरीवर अत्र्यांनी त्यांच्यावर टीका केली होती. अर्वाचीन नाटककारांबद्दल विशेष माहिती नसताना केवळ अभिजात प्रतिभेच्या जोरावर 'एक शून्य बाजीराव' सारखे अफलातून नाटक त्यांनी लिहिले. या नाटकाला पुढे रंगायनसारख्या नावाजलेल्या संस्थेने विजयाबाई मेहता यांच्या दिग्दर्शनाखाली रंगभूमीवर आणले आणि त्यातून एक इतिहास घडला. 'अवध्य' सारख्या नाटकातून खानोलकरांनी रंगभूमी गाजवली तेंव्हा मराठी नाटक वयात आल्याची ग्वाही माधव मनोहरांसारखा व्यासंगी समीक्षकाने खुल्या दिलाने दिली होती. त्यांच्या 'कोंडूरा' या कादंबरीचा अजब विषय सत्यजित रे सारख्या जागतिक कीर्तीच्या चित्रसम्राटाला मोहवून गेला. व्ही.शांतारामासारख्यांना त्यांच्या 'चानी'ने मोहात टाकले. त्यांची चित्रपटगीते सुद्धा गाजली, त्यांच्या 'कालाय तस्मै नमः' आणि अनुवादित केलेल्या 'हयवदन' या नाटकांचे आजही आकर्षण आहे.



खानोलकरांनी आरती प्रभू हे नाव कसे धारण केले याबद्दलची माहिती देणारा किस्सा अगदीच मनोरंजक असा आहे. ते जेंव्हा गावी होते तेंव्हाची ही गोष्ट आहे. त्यांच्या खानावळीत येणार्‍या दोन गिर्‍हाईकांच्या कुतूहलातुन त्यांचे लेखन सुटले नाही, नेहमी गल्ल्यावर बसणारा हा तरुण रोज कागदावर काय खरडतो, हे पाहावं म्हणून त्यांनी एकदा युक्ती केली. पैसे देताना खानोलकरांच्या नकळत त्यांचे कागद लांबवले. त्यांनी घरी जाऊन पाहिले तर त्या कागदावर उभ्या पद्धतीनं लिहिलेला मजकूर होता ! त्या त्यांच्या आरंभकालाच्या कविता होत्या. त्यानी त्या कविता 'सत्यकथे'कडे पाठवल्या परंतु त्या साभार परत आल्या. पोरीबाळींच्या नावावर पाठवल्यास त्या छापून येतील म्हणून खानोलकरांच्या 'प्रभू-खानोलकर' या नावातील 'प्रभू' घेऊन आधुनिक मुलीचं नाव म्हणून त्यापुढे 'आरती' हे नाव त्यांची जोडलं व त्याच कविता पुन्हा पाठवल्या. त्या श्री. पु. भागवतांच्या हाती पडल्या. या कवितांतील विलक्षण गूढ प्रतिमासृष्टीनं ते चकित झाले आणि पुढे त्यांनी खानोलकरांचं सर्व साहित्य 'सत्यकथा'तून प्रसिद्ध केलं. मात्र या अनपेक्षित प्रसिद्धीच्या झोतानं खानोलकर गोंधळून गेले आणि त्यांनी तेच नाव पुढे काव्यलेखनासाठी धारण केले.

लेखन करायचे असले की खानोलकर जणू कसल्या तरी भावसमाधीत जात आणि एका विलक्षण अवस्थेत देहभान विसरून लिहित राहत अगदी झपाटल्यासारखे. भावसमाधीतुन ते बाहेर आले की त्यांना लाभलेल्या अनुभूती शब्दातून अशा काही प्रकटलेल्या असत की वाचणाऱ्याचं देहभान हरपून जावं. सुरुवातीला सौंदर्यवादाकडे झुकलेली त्यांची कविता जेंव्हा अस्तित्ववादाकडे वळली तेंव्हा ती अधिक परिपक्व झाली आणि तिला उन्मेषाचे धुमारे फुटत राहिले. आपल्या अतुलनीय प्रतिभाशक्तीच्या आणि रुपकात्मक, देखण्या लेखनशैलीच्या जोरावर वासनांच्या फुत्कारापासून ते निसर्गाच्या हळुवार, रौद्र रूपापर्यंतचे घटक त्यांच्या आशयात डोकवत राहिले. दैवी गूढ शक्ती, श्रद्धा, पापपुण्याच्या संकल्पना, नीती अनीतीच्या सीमा, संवेदनांच्या कधी बोथट तर कधी धारदार व्यथा त्यातून जाणवत राहिल्या. मानवी नात्यांचे भावसुलभ, विक्षिप्त, कठोर, हळवे, गूढ, व्यावहारिक, तडजोडीचे आणि अगतिकतेचे सर्वांगीण कंगोरे त्यांच्या लेखनात येत राहिले.

'गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे
माझ्यापास आता कळ्या आणि थोडी ओली पाने..

आलो होतो हासत मी काही श्वासांसाठी फक्त
दिवसांचे ओझे आता, रात्र रात्र शोषी रक्त.

आता मनाचा दगड घेतो कण्हत उशाला
होते कळ्यांचे निर्माल्य आणि पानांचा पाचोळा..'

पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीत दिलेल्या आणि आशाताईंनी गायलेल्या या अर्थपूर्ण भावगीताला रसिकांनी हृदयात जे स्थान दिले ते आजही कायम आहे. भावगीत म्हणून प्रसिद्धी होण्यापूर्वी या कवितेच्या आशयाकडे पाहिले तर एक प्रकारची खिन्नता मनात दाटून येते.

जीवनात प्रत्येकाला खूप काही करावेसे वाटत असते, खूप काही द्यावेसे वाटत असते पण कालौघाच्या रहाटगाडग्यात आपण असे काही पिसलो जातो की त्या गोष्टी राहून जातात. ते क्षण पाण्याच्या बुडबुड्याप्रमाणे निसटून जातात आणि आपण रितेच राहतो. आपल्या भावना तशाच गोठून राहतात आणि ते देणे द्यायचे राहून गेले याची एक हुरहूर मनाला चटका लावून जाते.

या कवितेचेही दोन वेगवेगळे अर्थ लावले गेले. एक अर्थातच प्रेमाच्या प्रकटीकरणाचा होता. आपण आयुष्याच्या या सारीपाटावर सोंगट्या हलावे तसे आपसूक हलत राहतो आणि आपल्या प्रिय व्यक्तीला आपले प्रेम, आपली माया, आपली संवेदना आणि अंतरीचे भाव व्यक्त करायचे राहून जातो. आपण नुसतेच जगत जातो. त्यातून मनाला अपराधी भावनांची सल येते. शेवटी आपण ते देणे द्यायला जातो पण ती वेळ निघून गेल्याचं लक्षात येतं. खानोलकरांच्या काही घनिष्ठ मित्रांनी याच कवितेचा दुसरा अर्थ लावताना या कवितेत खानोलकर इतके हळवे का झाले याचा वेगळा आशय दिला. खानोलकरांचा मुलगा जेंव्हा अंथरुणाला खिळला तेंव्हा त्यांना झालेली अपराधाची जाणीव ही या कवितेची पार्श्वभूमी आहे अस त्यातून सूचित होतं. खरे तर माझ्या मुला मी अख्ख्या विश्वाचे तारांगण तुझ्या ओंजळीत द्यावे, तुझ्या आनंदाची नक्षत्रे त्यात प्रफुल्लीत व्हावीत असं काही तरी मी तुला द्यायला पाहिजे होतं पण ते मी देऊ शकलो नाही. खरे तर मी तुला वेळही दिला नाही, आता माझ्यापाशी उरले आहेत केवळ आठवणींच्या कळ्या आणि अश्रूंनी भिजलेल्या अर्धोन्मिलित पाकळ्या !

तुझे शेवटचे हे काही क्षण आता बाकी राहिले आहेत आणि मी तुझ्या पुढ्यात बसलो आहे. आता त्याचा काय उपयोग होणार आहे ? कारण मी जे काही तोंडदेखले हसत आहे ते केवळ काही काळासाठीच हे मला ठाऊक आहे. त्यानंतर मात्र प्रत्येक दिवसाचा हरेक क्षण माझ्या जगण्यासाठी श्वासाचे ओझे बनून राहणार आहे. आयुष्यातील प्रत्येक रात्र माझ्यासाठी जणू काळरात्र होऊन माझ्या गात्रांचे निव्वळ शोषण करणार आहे. कारण तू गेल्यानंतर जगण्याची कसली उर्मी उरणारच नाही. शुष्क श्वासांचे कोरडे जगणे शेष असणार आहे.

दिवसभर भले आपण आपले सुख-दुःख कामाच्या आणि काळाच्या ओघात विसरू शकू पण जेंव्हा रात्र होते, पाठ जमीनीला टेकते तेंव्हा मात्र आठवणींचे जे मोहोळ उठते ते मनाला ध्वस्त करून जाते. अशा वेळेस आठवणींच्या वेदनांनी दग्ध झालेल्या जीवाला आधार म्हणून आपण ती दुःखेच उशाला घेऊ शकतो, म्हणूनच खानोलकर लिहितात, 'माझ्या मनाचा दगड घेतो कण्हत उशाला...'

यातूनही फार काही निष्पन्न होत नाही, जीवनाचे अस्तित्व क्षणभंगुर होऊन जाईल आणि श्वासांच्या कळ्यांचे निर्माल्य होणार हे निश्चित आहे. मर्मबंधाच्या कुपीत जतन केलेल्या आसावल्या आठवणींच्या पानांचाही पाचोळा होऊन जाईल असे ते विमनस्कपणे लिहितात. एक उदासवाणी झाक या कवितेच्या प्रारंभापासून ते अंतापर्यंत जाणवत राहते. कविता वाचून झाल्यावर आपण दिग्मूढ होऊन जातो. कवितांमधून क्वचित वापरले जाणारे शब्द ते वेगळ्या अर्थाने प्रतिमा म्हणून वापरतात आणि कवितेला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतात. ही त्यांची खासियत या कवितेत मनस्वी पद्धतीने अनुभवायला मिळते.

'ती येते आणिक जाते...', 'दु:ख ना आनंदही, अंत ना आरंभही...', 'नाही कशी म्हणू तुला, म्हणते रे गीत...', 'ये रे घना ये रे घना, न्हाउ घाल माझ्या मना...', 'एखाद्या प्राणाची दिवेलागण...','समईच्या शुभ्र कळ्या, उमलवून लवते...' ही त्यांची आणखी काही प्रसिद्ध भावगीते होत. ‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे’, ‘तु तेंव्हा अशी’ व ‘लवलव करी पातं’ ही काही त्यांची गाजलेली चित्रपटगीते. 'नक्षत्रांचे देणे'ला १९७८ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला. २६ एप्रिल १९७६ रोजी वयाच्या सेह्चाळीसाव्या वर्षी ते अकाली काळाच्या पडद्यांआड गेले. पण काव्यस्वरूपात त्यांनी मराठी साहित्यास दिलेले शब्दांचे आशयबद्ध असं 'नक्षत्रांचे देणे' आजही तितकेच तेजःपुंज आहे. 'संपूर्ण मी तरू की आहे नगण्य पर्ण, सांगेल राख माझी गेल्यावरी जळून...' या त्यांच्या कवितेचा प्रत्यय जगाला त्यांच्या पश्चात येणार होता हे त्यांना जणू ज्ञात असावे. या अलौकिक प्रतिभावंताचे 'नक्षत्राचे देणे' खरोखरच शततारकाहून अनमोल आहे....

- समीर गायकवाड

1 टिप्पणी:

  1. अतिशय सुरेख लेख... आरती प्रभूंना हुबेहुब साकार करणारा... केवळ मराठी फॉंटमुळे की काय, चुका दिसत आहेत... प्रा. डॉ. सायली आचार्य

    उत्तर द्याहटवा