शुक्रवार, १ ऑगस्ट, २०२५

क्लिऑन – धूर्त कपटी रोमन नेता!


इसवीसनपूर्व पाचव्या शतकात क्लिऑन हा अथेन्समधील एक लोकप्रिय नेता (demagogue) होता, जो आपल्या आक्रमक वक्तृत्वासाठी आणि सामान्य जनतेच्या भावनांना हात घालण्यासाठी ओळखला जायचा.

क्लिऑनने पेलोपोनेसियन युद्धादरम्यान स्पार्टाविरुद्ध आक्रमक धोरणांचा पुरस्कार केला आणि सत्ताधारी वर्गाला (aristocrats) बदनाम करण्यासाठी जनतेच्या मनामध्ये आक्रोश निर्माण केला, त्याने जनतेच्या संतापाचा वापर केला.

प्रतिस्पर्ध्यांवर खोटे आरोप ठेवून किंवा त्यांच्या नीतिमत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून जनतेचे लक्ष विचलित केले. उदाहरणार्थ, स्फॅक्टेरियाच्या युद्धात (Battle of Sphacteria, इ.स.पू. 425) त्याने सैन्याचे यश स्वतःच्या नावावर घेतले आणि युद्धविरोधी नेत्यांना कमजोर केले. त्याच्या या रणनीतीमुळे तो अथेन्सच्या राजकारणात प्रभावशाली नेता बनला.

क्लिऑनची आक्रमक धोरणे आणि बदनामीच्या रणनीतींमुळे त्याला काही काळापुरती सत्ता मिळाली. त्याच्या सत्ताकाळात तो विलक्षण लोकप्रिय आणि शक्तिशाली नेता म्हणून लौकिक मिळवून होता.

मात्र प्रत्येकास कधी ना कधी सिंहासन सोडावे लागते हा न्याय त्यालाही लागू होताच! आपला कालखंड खूप दीर्घ असावा म्हणून धडपडणाऱ्या क्लिऑनला काही वर्षे नियतीने साथ दिली मात्र एका युद्धा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.

मृत्यूनंतर मात्र क्लिऑनची प्रतिमा ही पूर्वीसारखी जननायकाची राहिली नाही, त्याची प्रतिमा कारस्थानी खलपुरुष अशीच राहिली. थ्युसिडाइडीस आणि अ‍ॅरिस्टोफेन्सच्या The Knights नाटकात क्लिऑनच्या रणनीतींवर खरपूस टीका आहे.

आजही युरोपियन देशांसह जगभरात क्लिऑनच्या आवृत्त्या पाहावयास मिळतात. फिलिपिन्सचे माजी अध्यक्ष दुतार्ते असोत की ब्राझीलचे माजी राष्ट्राध्यक्ष बोल्सेनेरो अशी काही ठळक नावे चटकन समोर येतात. डॉनल्ड ट्रम्प हेही त्यातलेच. बांगलादेशमधला सत्तापालटही असाच आहे! असे आधुनिक क्लिऑन बरेच सापडतील! आपल्याकडेही असे काही क्लिऑन आहेत!   

प्रतिस्पर्ध्यांना पुरते डागाळून टाकायचे आणि आपले अनिर्बंध राज्य आणायचे हा फंडा डिजिटल युगात अधिक सोपा झाला आहे कारण त्यासाठी आवडत्या राजकारण्यांना पैसा पुरवून पुन्हा तीच सत्ता आपल्या पायाशी बटिक ठेवणारे गब्बर भांडवलशहा आता मोकाट आहेत. आणि त्यांचीच चलती आहे!

- समीर गायकवाड 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा