सोमवार, २६ ऑगस्ट, २०२४

‘सोशल’ आक्रोशाचा दांभिकपणा!



या दहा दिवसांत आपल्याकडे अल्पवयीन मुलींवरील बलात्काराच्या डझनभर घटना समोर आल्यात. त्याचे पडसाद सर्वत्र उमटताना दिसताहेत. अर्थातच सोशल मीडियावर याचा आक्रोश अधिक जाणवतोय! आक्रोशाची ही पहिलीच वेळ नाहीये, तरीही निव्वळ गदारोळ उठलाय! वास्तवात आपल्याकडे तासाला चार आणि वर्षभरात बत्तीस हजार बलात्कार होतात. दर तासाला किमान पन्नास महिलांना मारहाण केली जाते. बलात्कारांच्या नव्वद टक्के प्रकरणातील आरोपी हे पीडितेच्या परिचयाचे असतात. बलात्काराच्या काही मोजक्याच घटनांना मुबलक प्रसिद्धी मिळते, अशा घटनांची चर्चा वाढू लागली की त्याविरोधात आक्रोश केला की लोकांना कर्तव्यपूर्तीचा ऑर्गझम प्राप्त होतो. पोलिसांना नवी केस मिळते, राजकारणी मंडळींना नवा इश्यू मिळतो, सोशल मीडियावरील लाटेस नवा विषय मिळतो, मीडियाला टीआरपीसाठी नवं हत्यार गवसतं! या सर्वातला जोश निघून गेला की आपण थंड पडतो. माध्यमेही हळूहळू आपला फोकस नव्या हत्यारावर वळवतात, राजकारणी नवे इश्यू शोधू लागतात, पोलिसांना केसेसची कधीच कमी नसते नि आपण आपल्या रोजमर्राच्या बधीर जिंदगीत व्यग्र होऊन जातो! दरम्यान रोज होत असणारे बलात्कार अव्याहत सुरूच असतात. ओरबाडले जाणारे जीव, शापित जीवन जगत राहतात!

रविवार, २५ ऑगस्ट, २०२४

"यंदा दुर्गा मूर्तीसाठी आम्ही माती देणार नाही!... "

समीर गायकवाड #sameerbapu #sameergaikwad

आज दुर्गा प्रसन्न मनाने हसली असेल!
 
कोलकता येथील डॉक्टर तरुणीवरील बलात्कार हत्या प्रकरणी बंगालमधील वेश्यांनी घेतलेली भूमिका ऐतिहासिक आहे! किंबहुना सामान्यांचे डोळे उघडणारी आहे! कथित सभ्य सामान्य माणसं या स्त्रियांपासून अंतर राखतात मात्र जेव्हाही कुठला महत्वाचा सामाजिक प्रश्न उद्भवतो तेव्हा या स्त्रिया त्यात उडी घेतात हा आजवरचा अनुभव आहे.

पीडितेला न्याय मिळावा म्हणून बंगालमधील वेश्यांनी मोर्चात सहभाग नोंदवला! यावेळी त्यांच्या हातात काही घोषणाफलक होते त्यावर लिहिलं होतं की,
प्रयोजने आमादे काचे आशून, किंतू नारी के धारशन कोरबे ना!
প্রয়োজনে আমাদের কাছে আসুন, কিন্তু নারীকে ধর্ষণ করবেন না।
याचा अर्थ असा आहे - तुम्हाला जर इतकीच गरज पडत असेल तर आमच्याकडे या, परंतु कुठल्या स्त्रीवर बलात्कार करू नका!

मंगळवार, २० ऑगस्ट, २०२४

प्राणी-प्रेमाआडचा छुपा विकृत चेहरा - अ‍ॅडम ब्रिटन!


अ‍ॅडम ब्रिटन हे नाव प्राणी संरक्षकांना आणि प्राणीप्रेमी नागरिकांना परिचयाचे आहे, किंबहुना कालपर्यंत अनेकांना त्यांच्याबद्दल विलक्षण आदर आणि प्रेम होतं. काहींनी तर त्यांना आपल्या अंतःकरणात स्थान दिलं होतं, त्यांनाच ते देवमाणूस मानत होते. त्यांच्याइतका नितळ प्राणीप्रेमी आणि सच्चा मानवतावादी कुणीच नाही असं पुष्कळांना वाटायचं. लोक त्यांचे नाव पाहून भरमसाठ देणग्या देत असत. त्यांच्या आस्थापनेला कधीही निधीसाठी तिष्ठत बसावे लागले नाही, त्यांनी आवाज न देताही लोक त्यांना भरभरून देत गेले. त्यांच्या क्षेत्रात त्यांचं नाव एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणूनच घेतलं जाई. वन्यजीव संरक्षक मंडळींसाठी तर ते अगदी खास होते, अ‍ॅडम ब्रिटन यांची लोकप्रियता होतीच तशी! मात्र आता त्यांचा बुरखा फाटला आहे, त्यांचा भेसूर विकृत चेहरा जगापुढे आला आहे. त्यांचं खरं रूप पाहून अनेकांना प्रचंड मोठा धक्का बसला आहे. वन्यजीवप्रेमी मंडळींना तर अजूनही त्यांच्या विकृतीविषयी विश्वास बसत नाहीये. आपण ज्या माणसाला सर्वोच्च प्राणीप्रेमी मानत होतो त्याचं चरित्र केवळ रक्ताळलेलं नसून विकृतीच्या विकारांनी खोलवर ग्रासलेलं आहे हे अनेकांच्या पचनी पडत नाहीये. बऱ्याचदा असं घडतं की एखादी व्यक्ती स्वतःच्या अस्तित्वाविषयी वा आयडेंटीटीविषयी हेतुतः भ्रामक कल्पना पसरवत असते, स्वतःची खोटी प्रतिमा निर्माण करण्याचं काम मात्र सच्चेपणाने केलेलं असतं. लोकांपुढे वेगळेच वास्तव समोर येतं तेव्हा लोक नाराज होतात किंवा आपल्याला फसवल्याची भावना त्यांच्यात निर्माण होते. त्याही पलीकडे जाऊन मुखवट्यातला चेहरा आणि खरा चेहरा यांच्यातील एकशे ऐंशी कोनातला फरक उघड होतो तेव्हा मात्र सर्वांचाच संताप अनावर होतो. अशा व्यक्तीस कठोर शासन केलं जावं अशी मागणी जोर धरू लागते. इतिहासातली पाने चाळली तर अशी पुष्कळ उदाहरणे सापडतात. काहींनी कलाकाराचा तर काहींनी अभिनेत्याचा मुखवटा धारण केला होता तर काहींनी चक्क समाजसेवींची झूल पांघरली तर काही चतुर्विकृत मात्र प्राणीप्रेमी, संवेदनशील, सेवाव्रती बनून वावरत राहिले! अ‍ॅडम ब्रिटन हा प्राण्यांवर प्रेम करणारा नसून प्राण्यांसोबत जगातील सर्वाधिक वाईट वर्तणूक करणाऱ्या, प्राण्यांवर अत्याचार करणाऱ्या व्यक्तींपैकी एक आहे हे सिद्ध झाल्यापासून प्राणीप्रेमी व्यक्तींमध्ये भयंकर अस्वस्थता निर्माण झाली आहे हे वास्तव आहे!