शनिवार, १९ ऑगस्ट, २०२३

देशोदेशीच्या विवाह प्रथा - एक आकलन!



एक काळ होता जेव्हा विवाह ठरवला जायचा तेव्हा वर वधूचे जन्म देखील झालेले नसत. म्हणजेच मूल जन्माला येण्याआधी त्याचा विवाह कुणासोबत होणार आहे हे ठरवले जायचे! त्याचबरोबर हे विवाह केवळ दोन कुटुंबांचे संबंध जुळवून आणण्यासाठी केलेले द्राविडी प्राणायाम असत. पुढे जाऊन हे विवाह टिकविण्याची जबाबदारी त्या वर वधूपेक्षा कुटुंबातल्या सर्व सदस्यांची असे. कारण हे विवाह त्या दोघांचेच नसत! त्यांचे आपसात पटले नाही तरी बळजबरीने ते नाते निभावावे लागायचे. परिणामी अत्यंत शुष्क शरीरव्यवहार वगळता काहीच नसे! पती पत्नीचे नाते नावाला असे.त्यानंतरच्या काळामध्ये मुलाचे आणि मुलीचे आईवडील या दोघांचे लग्न ठरवू लागले त्यात त्या नवदांपत्याची परवानगी नावापुरती असे. घरच्या मोठय़ा माणसांचा दबावच इतका असे की ते म्हणतील त्या जोडीदारासोबत लग्न लावले जाई. लग्न म्हणजे आर्थिक संबंध जोपासण्याचा नामी सोहळा असे.

गुरुवार, ३ ऑगस्ट, २०२३

प्रिय महानोर



प्रिय महानोर, 

तुम्ही गेलात आणि शिवारं उदासली.
रानामळ्यातली हातातोंडाशी आलेली तेजतर्रार पिकं मलूल झाली.

गोठ्यातल्या गायी मौन झाल्या,
माना तुकवून उभी असलेली कुसुंबी झाडं थिजली

उजाड माळांवरुन भिरभिरणारं वारं सुन्न झालं!
हिरव्याकंच घनदाट आमराईने शांततेचं काळीज चिरणारी किंकाळी फोडली!
विहिरींच्या कडाकपारीत घुमणारे पारवे स्तब्ध झाले

गावाकडच्या वाटेवरल्या पाऊलखुणा गहिवरल्या
घरट्यांतल्या पाखरांचा किलबिलाट निमाला

उंच गगनात विहरणारे पक्षांचे थवे एकाएकी विखुरले
पाऊसओल्या मातीस गलबलून आले

तुम्ही गेलात अन् वसुंधरेची हिरवाईही रुसली
अजिंठ्यातली चित्रे गदगदली,
वेरूळच्या लेण्यांचे हुंदके दाटले
पाऊसधाराही गहिवरल्या