रविवार, २७ एप्रिल, २०२५

जगण्यासाठीचं धावणं – रनिंग द रिफ्ट


काही लोकांना युद्धाची फार खुमखुमी असते. सध्या आपल्याकडे याची लाट आलीय. असाच कंड आफ्रिका खंडातील रवांडा देशातील दोन जमातीत होता. मुळात हा देश अनेक नागरी समस्यांनी गांजलेला नि अनेक भौतिक प्रश्नांनी ग्रासलेला. स्वकमाईमधून दोन वेळच्या अन्नाला महाग असणारी अर्धी लोकसंख्या. रवांडामध्ये हुतू आणि तुत्सी या दोन वांशिक गटातील संघर्षाला नरसंहाराचे स्वरूप लाभले आणि हा देश रसातळाला गेला. तब्बल अकरा लाख लोकांना प्राण गमवावे लागले. जगातला सर्वात गरीब देश म्हणून त्याची नोंद झाली. त्या संघर्षावर आधारित एक सुंदर कादंबरी आहे. त्याविषयीची ही ब्लॉगपोस्ट.

2010 साली अल्गॉनक्विन बुक्सद्वारे प्रकाशित झालेली रनिंग द रिफ्ट ‘Running the Rift’ ही नाओमी बेनारॉन यांची एक प्रभावी आणि हृदयस्पर्शी कादंबरी. या कादंबरीत रवांडामधील हुतू - तुत्सी यांच्यातला दीर्घ संघर्ष आणि 1990 च्या दशकातील नरसंहाराच्या पार्श्वभूमीवर एका तरुण तुत्सी मुलाच्या जीवनाचा प्रवास रेखाटलाय. ही कादंबरी सामाजिक न्यायाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकणारी असल्याने तिला आंतरराष्ट्रीय ख्यातीचा पेन-बेलवेदर पुरस्कार मिळालाय.

कादंबरीचा नायक जीन पॅट्रिक नकुबा हा एक तुत्सी मुलगा आहे, जो रवांडाच्या डोंगराळ भागात वाढलाय. त्याच्या अंगी धावण्याची नैसर्गिक प्रतिभा आहे. रवांडाचा पहिला ऑलिम्पिक ट्रॅक पदक विजेता बनण्याचे त्याचे स्वप्न असते. या स्वप्नामुळे त्याला स्वतःला आणि विवेकवादी लोकांना हुतू - तुत्सी तणावामुळे होणाऱ्या क्रूर हिंसाचारापासून मुक्ती मिळेल, अशी त्याची आशा असते. कथेचा पहिला भाग जीन पॅट्रिकच्या बालपणावर, त्याच्या कुटुंबावर आणि त्याच्या धावण्याच्या उत्कटतेवर केंद्रित आहे. पण, जसजसा हुतू - तुत्सी संघर्ष वाढत जातो, तसतशी त्याची स्वप्ने आणि जीवन धोक्यात येतात.

जीन पॅट्रिक एका खाजगी शाळेत शिकतो, जिथे त्याला त्याच्या तुत्सी अस्मितेमुळे भेदभाव आणि हिंसाचाराचा 
मूळ फ्रेंच पुस्तक 
सामना करावा लागतो. तो बीआ नावाच्या हुतू मुलीच्या प्रेमात पडतो, पण वांशिक तणाव त्यांच्या नात्यावर परिणाम करतो.  जेव्हा नरसंहार सुरू होतो, तेव्हा जीन पॅट्रिकला आपला जीव वाचवण्यासाठी परागंदा व्हावे लागते. आपलं कुटुंब, प्रेम आणि देश मागे सोडावा लागतो. तो निर्वासित होतो. कादंबरीच्या अखेरच्या भागात रवांडाच्या पुनर्बांधणीच्या प्रयत्नांसह जीन पॅट्रिकच्या लवचिकतेची आणि आशेची कहाणी समोर येते. नरसंहाराच्या भयंकर प्रसंगांनंतरही, कादंबरी मानवी मनाची विवेकी संवेदनशीलता आणि आशावाद मांडते. हुतू - तुत्सी तणाव आणि त्याचे सामाजिक, वैयक्तिक परिणाम कथेच्या केंद्रस्थानी आहेत. कादंबरीच्या सुरुवातीला रनिंग हे जीन पॅट्रिकच्या स्वप्नाच्या रूपात समोर येते मात्र जसजशी कादंबरी पुढे सरकते तेव्हा लक्षात येते की रनिंग हे तिथल्या संघर्षात होरपळलेल्या जीवनाचेच एक रूपक आहे. वास्तवात हे स्वप्न म्हणजेच जीन पॅट्रिकच्या नि त्याच्यासारख्याच बहुसंख्य लोकांच्या स्वातंत्र्याचे आणि टिकून राहण्याच्या इच्छेचे प्रतीक. कुटुंब, मैत्री आणि रोमँटिक प्रेम यांच्या माध्यमातून मानवी नातेसंबंधांचे महत्त्व अधोरेखित होते. कथेतील भौतिकशास्त्र आणि भूगर्भशास्त्राचे संदर्भ रवांडाच्या भौगोलिक आणि सामाजिक उलथापालथीशी जोडले गेलेत. 

लेखिका नाओमी बेनारॉन यांनी स्वतः हे दुःख पाहिलंय. रवांडातील नरसंहार पीडितांसोबत त्यांनी काम केलेय. हाच अनुभव कादंबरीतून प्रकट झालाय. त्या स्वतः उत्तम धावपटू आहेत. अफगाणिस्तान मधील महिलांसाठी त्यांनी लेखन प्रोजेक्ट राबवलेत.

Running the Rift ही केवळ एक क्रीडापटूची कहाणी नाही, 
लेखिका नाओमी बेनारॉन  
तर रवांडाच्या इतिहासातील एका भयंकर  कालखंडाची आणि मानवी संवेदनशीलतेची गोष्ट आहे. ती वाचकांना रवांडाच्या संस्कृती, नैसर्गिक सौंदर्य आणि सामाजिक आव्हानांबद्दल अंतर्दृष्टी देते. कादंबरीतील जीन पॅट्रिकचे पात्र इतके प्रभावी आहे की रवांडामधील वाचकांनी त्यांना विलक्षण पाठिंबा दिला. यातील काही प्रसंग विलक्षण भावोत्कट आहेत तरीही ते अतिशयोक्तीपूर्ण वाटत नाहीत. रिफ्ट म्हणजे दरी, भेग-दरार. पूर्व आफ्रिकेत खंडाची भूमी विलग होण्याची प्रक्रिया हजारो वर्षांपासून सुरू आहे त्याचाच एक भाग म्हणजे पूर्व भागातील दरीचा अफाट विस्तार! या दरीमुळे या भागातील राष्ट्रे विलग होताना दिसतात, हीच दरी जीन पॅट्रिकच्या आयुष्यातही आहे आणि हुतू - तुत्सी यांच्या नात्यातही आहे! म्हणून हे शीर्षक अत्यंत सार्थ ठरते.

थोडेसे रवांडामधील संघर्षाविषयी. 1890 ते 1916 पर्यंत जर्मनीची  
पूर्व आफ्रिकेतील रिफ्ट प्रभावित देशांचा नकाशा   
इथे हुकूमत होती. 1916 नंतर बेल्जियमकडे याचे स्वामित्व आले. 1962 साली रवांडाला स्वातंत्र्य मिळाले. मात्र आपल्याकडे जे काम इंग्रजांनी केले तेच काम तिकडे बेल्जियम राजवटीने केले. हुतू – तुत्सी यांच्यातली दरी त्यांनी रुंदावली. मूळचा हा भूभाग हुतू लोकांचा मात्र तुत्सी जे मूळचे निवासी नव्हते त्यांनी इथे वर्चस्व मिळवले. बेल्जियमने त्यांच्यातल्या तणावाला खतपाणी घातले. त्यांनी तुत्सींना प्राधान्य दिले आणि वांशिक ओळखपत्रे लागू केली जेणेकरून भेद करणे सोपे जावे. या परिस्थितीत कायम तेल ओतण्याचे काम डीआरसी (कॉँगो) या शेजारी देशाने केले. 1992 मध्ये या संघर्षाने सर्वोच्च टोक गाठले. बेबंदशाही माजली.

बहुसंख्य असणाऱ्या हुतू लोकांनी तुत्सी लोकांची आणि त्यांना 
रिफ्टचा वाढता परिसर  
आसरा देणाऱ्या, मदत करणाऱ्या हुतू लोकांची नियोजनपूर्वक हत्या केली. हे शिरकाण सलग शंभर दिवस जारी होते. 8 लाख लोकांची त्या शंभर दिवसांत हत्या झाली असं अधिकृत आकडेवारी सांगते. नरसंहारा दरम्यान रस्ते, शाळा, रुग्णालये, कारखाने आणि सरकारी इमारती यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे अर्थव्यवस्थेची मूलभूत रचना कोलमडली. नरसंहारामुळे व्यापार, शेती आणि उद्योग जवळजवळ थांबले. 1994 मध्ये रवांडाचा GDP प्रति व्यक्ती $125 पर्यंत खाली घसरला, ज्यामुळे रवांडा जगातील सर्वात गरीब देशांपैकी एक बनला. परकीय गुंतवणूक आणि पर्यटन पूर्णपणे थांबले. मारले गेलेल्या लोकांत तुत्सी आणि मवाळ हुतू समुदायातील अनेक कुशल कामगार, शिक्षक, डॉक्टर, शेतकरी आणि प्रशासकीय कर्मचारी होते. यामुळे देशाची उत्पादकता आणि प्रशासकीय क्षमता जवळजवळ ठप्प झाली. 20 लाख रवांडन नागरिकांनी शेजारील देशांमध्ये (जसे की काँगो, युगांडा) आश्रय घेतला, ज्यामुळे देशातील श्रमशक्ती आणि आर्थिक स्थैर्य आणखी कमी झाले. निर्वासितांच्या पुनर्वसनासाठी मोठ्या संसाधनांची गरज होती. नरसंहारानंतर देशात राजकीय अस्थिरता आणि सामाजिक अविश्वास वाढला, ज्यामुळे दीर्घकालीन आर्थिक विकासासाठी अनुकूल वातावरण निर्माण होण्यास अडथळे आले.

सध्या तुत्सी लोक रवांडामध्ये तुलनेने सुरक्षित आणि स्थिर जीवन जगत आहेत, आणि त्यांना आर्थिक व सामाजिक संधी उपलब्ध आहेत. तथापि, ऐतिहासिक तणाव आणि राजकीय गतिशीलता यामुळे काही आव्हाने कायम आहेत. सरकारच्या सामंजस्य आणि एकता धोरणांमुळे तुत्सी आणि हुतू यांच्यातील संबंध सुधारले आहेत, परंतु खोलवर असलेल्या आठवणी आणि अविश्वास पूर्णपणे नाहीसा होण्यास वेळ लागेल. हाणा, मारा कापा युद्ध करा असं म्हणणं सोपं असतं मात्र प्रत्यक्षात तसं काही झालं तर त्यातून सावरण्यास दशके लागू शकतात. इतर देशांच्या तुलनेत देश शेकडो वर्षे मागे जातो.

रवांडाला आफ्रिकेचं हृदय म्हटलं जातं कारण त्याचं नेमकं भौगोलिक स्थान! हा देश हजारो टेकड्यांचा प्रदेश आहे! हृदय रक्ताळले आणि आफ्रिका हळहळले कारण इथे गृहयुद्ध सुरू असताना आंतरराष्ट्रीय समुदायाने निव्वळ बघ्याची भूमिका घेतली होती. इथल्या खनिज संपत्तीवर अनेकांचा डोळा असल्याने अशी नीती अवलंबली गेली असावी. ज्या तुत्सी समुदायाला हाकलून लावले होते त्यांना सन्मानाने परत बोलवावे लागले. सध्याचे सरकार रवांडन पॅट्रियॉटिक फ्रंट (RPF) च्या नेतृत्वाखाली आहे. यात तुत्सी समुदायातील अनेक नेते आणि कार्यकर्ते 1994 च्या नरसंहारानंतर परदेशातून परतलेल्या तुत्सी समुदायातील अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी सरकारच्या पुनर्रचनेत महत्त्वाची भूमिका बजावली. यामुळे तुत्सी समुदायाला राजकीय नेतृत्वात मजबूत प्रतिनिधित्व मिळाले. रवांडाच्या मंत्रिमंडळात आणि उच्च प्रशासकीय पदांवर तुत्सी व्यक्ती सक्रिय आहेत, हुतूही आता समप्रमाणात आहेत.

एकेकाळी एकमेकांच्या जिवावर उठलेल्या या लोकाना आता त्या इतिहासाची नि आठवणींचीही किळस वाटते. हुतू – तुत्सी अशी चर्चा करण्यासही तिथे आता बंदी आहे! या दोन्ही समुदायांमधील संबंध आता सुधारले असले तरीही काही अंतर्निहित तणाव आणि आव्हाने कायम आहेत. रवांडा सरकारने राष्ट्रीय एकता आणि समेट यावर जोरदार भर दिल्यामुळे सामाजिक संबंधांमध्ये प्रगती दिसून येते. रवांडा सरकारने वांशिक धार्मिक जातीय ओळखी काढून टाकून सर्वांना "रवांडन" म्हणून एकच राष्ट्रीय ओळख दिलीय. "Ndi Umunyarwanda" (मी रवांडन आहे) ह्या कार्यक्रमांद्वारे सामाजिक एकता वाढवली जातेय. नरसंहारातील गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी सरकारने गकाका कोर्ट्स (पारंपरिक समुदाय-आधारित न्यायालये) स्थापन केली, ज्यामुळे हुतू आणि तुत्सी समुदायांमधील सत्य, क्षमा आणि समेट प्रक्रिया घडून आली. या कोर्ट्समुळे अनेक हुतू गुन्हेगारांनी तुत्सी पीडितांकडे तुत्सी पीडितांकडे सार्वजनिकपणे माफी मागितली. या कोर्ट्समध्ये सुमारे 20 लाख प्रकरणे हाताळली गेली, आणि अनेक हुतू व्यक्तींनी पश्चाताप व्यक्त केला, काहींनी तुरुंगवास भोगला, तर काहींना समुदाय सेवेची शिक्षा देण्यात आली. या प्रक्रियेमुळे पश्चाताप आणि समेटाला प्रोत्साहन मिळाले.

असे असले तरी शालेय अभ्यासक्रमातून त्यांनी या गोष्टी वागळल्या नाहीत! नरसंहाराच्या इतिहासासह एकता आणि समेट यावर भर दिलाय. तरुण पिढीला जातीयतेच्या आधारावर भेदभाव टाळण्याचे शिक्षण दिले जातेय, ज्यामुळे नवीन पिढीतील हुतू आणि तुत्सी यांच्यातील संबंध सुधारले आहेत. रवांडाच्या आर्थिक प्रगतीमुळे दोन्ही समुदायांना रोजगार, शिक्षण आणि व्यवसायाच्या संधी मिळाल्या आहेत. किगालीसारख्या शहरी भागात हुतू आणि तुत्सी एकत्र काम ज्यामुळे तणाव कमी झालाय. सरकारच्या पुढाकाराने हुतू तुत्सी यांच्यातील मिश्र विवाहांचे प्रमाण वाढलेय. विशेषतः शहरी भागात. हे सामाजिक एकीकरणाचे एक सकारात्मक लक्षण आहे.

रवांडा सरकारने नरसंहारातील गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी गकाका कोर्ट्स (पारंपरिक समुदाय-आधारित न्यायालये) स्थापन केली, जिथे हutu समुदायातील अनेकांनी आपल्या कृतींसाठी तुत्सी पीडितांकडे सार्वजनिकपणे माफी मागितली. या कोर्ट्समध्ये सुमारे 20 लाख प्रकरणे हाताळली गेली, आणि अनेक हutu व्यक्तींनी पश्चाताप व्यक्त केला, काहींनी तुरुंगवास भोगला, तर काहींना समुदाय सेवेची शिक्षा देण्यात आली. या प्रक्रियेमुळे पश्चाताप आणि समेटाला प्रोत्साहन मिळाले. सरकारच्या सुधारणा, आंतरराष्ट्रीय सहाय्य आणि सामाजिक समेट यामुळे रवांडाने आश्चर्यकारक पुनर्बांधणी केली आहे आणि तो पूर्व आफ्रिकेतील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक बनला आहे. या सर्व गोष्टी कधी उघडपणे तर कधी चोरपावलाने या कादंबरीत आल्या आहेत! वाचून काही बोध घेता आला तर आनंदच आहे!

ज्यांची पोटं भरलेली असतात, ज्यांना उद्या काय खायचे नि त्यासाठी पैसे कुठून आणायचे याची भ्रांत नसते ते लोक भडकावत असतात अशा अर्थाचे एक वाक्य कादंबरीत येते. जे हुतू लोक दाणापाण्याला मौताज होते त्यांच्या डोक्यात पद्धतक्षीरपणे द्वेष पेरला, कामधंदे नसणारे नि मागेपुढे कुठली दौलत नसणारे हे सारे भणंग एकमेका विरोधात उभे ठाकले. उदारमतवादी हुतू लोकांनाही त्यांनी सोडलं नाही. आता तिथल्या सत्तेत उदारमतवादी हुतू आणि मवाळ तुत्सी आहेत, ज्यांनी चिथावणी दिली त्यांना व्यवस्थेत स्थान नाही! असेच चित्र युद्धोपरांत देशात दिसते.

या कादंबरीची विशेष गोष्ट म्हणजे लेखिका जन्माने अमेरिकन आहेत. त्यांचे आईवडील दोघेही मानसोपचार तज्ज्ञ. रवांडाच्या बातम्यांनी त्यांना विलक्षण घायाळ केलं. नरसंहार शेवटच्या टप्प्यात असताना त्या तिथं गेल्या. त्यानंतर काही वर्षे त्या तिथे राहिल्या. यातील पात्रे त्यांना तिथे रुग्णसेवा करताना गवसली. 2009 साली त्यांनी ही कादंबरी लिहिली. त्यांचे विशेष शिक्षण समुद्रशास्त्रात झालेय. बऱ्याच ठिकाणी त्यांनी भूकंपशास्त्रज्ञ आणि भुभौतिकशास्त्रज्ञ म्हणून काम केलेय. पूर्व आफ्रिकेच्या रिफ्टविषयी त्यांना विलक्षण आकर्षण आहे. त्यामुळे रवंडाविषयी लिहिताना त्यांनी अत्यंत सुरेख भौगोलिक वर्णने केली आहेत.

शांतता, सुव्यवस्था, विकास आणि प्रगती हा प्रत्येक नागरिकांचा हक्क आहे आणि याप्रती सर्व सरकरांची बांधिलकी असली पाहिजे. आपली सत्ता टिकावी म्हणून राजकीय आर्थिक सामर्थ्यवान लोक जनतेला आपसात लढवत ठेवतात आणि स्वतःची राजकीय पोळी भाजून घेतात. दोन्हीकडचे मूढ अंध याला बळी पडतात आणि पर्यायाने दोन पिढ्यांचे वाटोळे होते! मग सुरू होते जगण्याकरिता धावण्याची लढाई, रनिंग द रिफ्ट ही त्याचीच तर गोष्ट आहे!

- समीर गायकवाड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा