शुक्रवार, १८ एप्रिल, २०२५

अमेरिकन स्वातंत्र्यदेवतेचे खरे अस्तित्व – एमा लॅझरस!


ही नोंद आहे एमा लॅझरस या कवयित्री विषयीची. ही नोंद आहे एका विदारक विरोधाभासाची! ही नोंद आहे बदलत्या विखारी भूमिकांची!


अमेरिकेच्या स्वातंत्र्य देवतेच्या जगप्रसिद्ध शिल्पाखाली चबुतऱ्यावर एक कविता कोरली आहे. ही नोंद तिच्याविषयीही आहे.

एमा लॅझरस ही अमेरिकन कवयित्री होती, त्याचबरोबर ती ज्यू कार्यकर्ती होती. त्या काळातील ज्यू व्यक्तींना निर्वासितासारखं राहावं लागे. 1849 ते 1887 हा एमाचा कालखंड. तिचा जन्म न्यूयॉर्कमधला. तिचे पणजोबा जर्मनीहून तिथे आलेले. तिचे बाकी नातलग पूर्वज पोर्तुगालमधून अमेरिकेत पोटार्थी म्हणून आलेले. हे सगळे ज्यू होते.

त्यामुळे निर्वासित वा शरणार्थी लोकांविषयी एमाच्या मनात अपार आस्था होती. शिवाय एकंदर अमेरिकेतच जगभरातले लोक शरण घ्यायला वा प्रगतीच्या नव्या वाटा धुंडाळायला येत आणि तिथेच स्थिरावत. अशा प्रकारे तिथे जगातल्या सर्व खंडातले लोक कमीअधिक प्रमाणात आले.

एमाच्या साहित्यिक कारकिर्दीचा आढावा मी घेत नाहीये. तिच्या एका कवितेविषयी काही सांगायचेय. एमाने 1883 साली "The New Colossus" (नवी उत्तुंग व्यक्ती) ही कविता लिहिली. ही कविता अमेरिकेच्या Statue of Liberty शी जोडली गेली आहे आणि ती स्थलांतरितांचे स्वागत करणारी भावना व्यक्त करते. स्वातंत्र्य देवतेच्या स्मारकासाठी निधी गोळा करण्याच्या मोहिमेच्या कला प्रदर्शनात ही कविता सादर केली गेली.
ही रचना 14 ओळीचे सॉनेट (मराठीमधलं सुनीत !!) आहे आणि ती पेट्रार्कन सॉनेटच्या शैलीत लिहिलीय.

गांजलेल्या नि प्रज्ञावंत लोकांना स्थलांतर, स्वातंत्र्य, संधी बहाल करणाऱ्या अमेरिकेची ओळख सर्वांचे स्वागत करणारी भूमी अशीच आहे. एमाच्या कवितेने स्टॅच्यू ऑफ लिबर्टीला "Mother of Exiles" (निर्वासितांची माता) असं संबोधलं आहे!

ही संपूर्ण कविताच मुळात आशयघन आहे. त्यातही अखेरच्या पंक्ती अतिशय प्रभावी आहेत.

"Give me your tired, your poor,
Your huddled masses yearning to breathe free,
The wretched refuse of your teeming shore.
Send these, the homeless, tempest-tost to me,
I lift my lamp beside the golden door!"

'दुःखी गरीब सामान्य लोकांच्या झुंडी ज्या एकट्या पडल्या आहेत त्यांना कवितेत साद घातलीय. त्या निराधारांना तिच्या मुक्त भूमीवर ती बोलावते. अंधारात खितपत पडलेल्या लोकांसाठी ती सुवर्णद्वाराजवळचा दिवाच जणू! या शूरांच्या भूमीत याल तर स्वर्ग लाभेल याची आशा ती बहाल करते!' असा याचा स्वैर अर्थ लावता येईल.

या पंक्ती स्थलांतरितांसाठी अमेरिकेच्या स्वागतशील भूमिकेचे प्रतीक बनल्या! या पंक्तीवरून लक्षात येईल की अमेरिकेचे प्राधान्य येणाऱ्या निर्वासितांना शरण देण्याचे होते. त्यांना सामावून घेण्याचे होते. तो देश म्हणूनच मिश्र संस्कृतीचा आहे!

या कवितेला स्वातंत्र्य देवतेच्या पुतळ्याखाली स्थान मिळाले असल्याने हीच अमेरिकेची भूमिका आहे असा अर्थ गेली कित्येक वर्षे लावला जात होता. आणि अमेरिकेची धोरणे देखील त्यास साजेशीच होती!

एमाने अनेक रशियन ज्यू लोकांना अमेरिकेत स्थिरावण्यास मदत केली. तिच्या कवितांमध्ये सामाजिक न्याय आणि मानवतावाद यावर भर आहे. सर्व निराधार आणि बेघरांना हा देश आपलं मानत होता आणि तिथे येणाऱ्या लोकांनीही ते राष्ट्र आपलं मानलं. वास्तवात अमेरिका हे जगाचे जनप्रतिनिधीक भूमीस्वरूप आहे!

मात्र आता वास्तव वेगळे आहे. दरम्यानच्या अनेक दशकात आणि मागील काही वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलेय. आपल्या राष्ट्रात अवैध वास्तव्य करून असणाऱ्या, बेकायदेशीर रित्या घुसलेल्या लोकांना तो हाकलून देतोय. यात फारसे काही गैर नाही. मात्र जे तिथे पोटापाण्याला आले आहेत वा शिक्षणासाठी आले आहेत परंतु सरकारी धोरणावर टीका करतात अशा लोकांनाही हा देश हाकलून लावतोय. तिथे आता बाहेरच्या लोकांचे आदराचे स्थान धोक्यात आलेय हे स्पष्ट आहे.

त्यातही अजून एक मेख आहे! ती म्हणजे जे इस्राएलवर टीका करतात वा ज्यू धोरणाविरोधात बोलतात त्यां विदेशी मंडळींना रडारवर घेतले गेलेय. एक ज्यू कुटुंब निर्वासित म्हणून या देशात येतं. त्या कुटुंबाच्या एका पिढीतली मुलगी निर्वासितांच्या स्वागताची कविता लिहिते, ती कविता थेट अमेरिकेच्या स्वातंत्र्य देवतेच्या भव्य स्मारकावर कोरली जाते! आणि आता मात्र त्याच ज्यू लोकांवर टीका करणाऱ्या लोकांना तिथे स्थान नाहीये! इतकेच नव्हे तर बाहेरून येणाऱ्या लोकांना तिथे मानाचे स्थान नसून त्यांनी पैशात मोजले जातेय!
तिथले सत्ताधारी तिथले मूळ स्थानिक नाहीत, तेही उपरेच आहेत याचा त्यांना विसर पडलाय!

म्हणजेच त्या कवितेत जे काही लिहिलेय त्याच्या अगदी विपरीत भूमिका तिथे आता घेतली जातेय. कदाचित आणखी काही वर्षांनी पुन्हा पूर्वीची वा आणखी टोकाची भूमिका घेतलेली असू शकते. किंवा जशी जर्मन लोकांना ना*झीझमची चूक कळली तशी आताच्या धोरणकर्त्यांची चूक नंतर उमगू शकते!

काळ कूस बदलत असतो, काहींना आपल्या भूमिका बदलायला भाग पाडत असतो. कधी कधी समाज, राज्य, राष्ट्र पुन्हा पुन्हा त्याच वळणावर येतो आणि दरम्यानच्या काळातली विसंगती समोर येत राहते. काही वर्षे वा दशके हा काळाच्या एकूण चक्रामधला खूप छोटा घटक असतो मात्र आपण त्या घटकाचे साक्षीदार असल्याने आपल्याला तो खूप मोठा वाटू लागतो.

बहुसंख्य समुदायाला जे आज खूप उचित, उत्तम, उदात्त वाटते ते काळाच्या बदलत्या प्रवाहात इतक्या विरोधी टोकाला जाऊ शकते की अमुक एका काळात माणसं अशी कशी काय वागली असा प्रश्न त्या बदलत्या काळातल्या पिढीला पडतो! सबब काही गोष्टी कालचक्रावर सोडून द्याव्यात मात्र ते करत असताना आपण मूक वा मौनी राहू नये, जे विवेकाला धरून आहे ती भूमिका मांडत राहावं. जेणे करून अशा कालखंडाचे इतिहास जेव्हा मापन करतो तेव्हा कोण योग्य होते नि कोण अयोग्य होते याची चिकित्सा होताना आपल्या पुढच्या पिढीची मान आपल्या मूढतेमुळे शरमेने झुकलेली नसावी!

आज जिथेही अशी अगदी विरोधाभासाची भूमिका घेतली जातेय तिथले तथाकथित विचारी ज्ञानी आणि विवेकी लोक कोणती भूमिका घेत होते याचे मूल्यमापन काही वर्षांनी नक्की होत असते. सबब भूमिका मांडत राहिलं पाहिजे. जे चुकीचे आहे त्याविषयी जमेल तसा आवाज उठवत राहिलं पाहिजे! कदाचित अशाच कुणी तरी लिहिलेल्या पंक्तींना वा उद्धृत केलेल्या विधानांना नंतर दिशादर्शक म्हणून पाहिलं जाईल!

- समीर गायकवाड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा