रविवार, १९ जानेवारी, २०२५

अलेक्झांडरच्या वंशाची भुरळ!


सध्या कुंभमेळयाविषयी अनेक प्रकारच्या चर्चां सुरू आहेत, त्यातलीच एक माध्यमाकर्षण असणारी गोष्ट म्हणजे मोनालिसासारखी दिसणारी भारतीय मुलगी! या मुलीच्या पार्श्वभूमीचा धांडोळा घेताना हिमाचल प्रदेशमधील मलाना या खेड्यातील बायकापोरी आठवल्या. कारण ही कथित मोनालिसा आणि या मुलींमध्ये खूप साम्य आहे. मात्र याची मूळे थेट महान योद्धा अलेक्झांडरपर्यंत जाऊन पोहोचतात! थोडे विषयांतर वाटेल मात्र यातही एक कथा, एक आख्यान आणि एक आसक्ती दडून आहे!

अलेक्झांडर हा ग्रीसचा प्रसिद्ध सम्राट होता. त्याने अगदी कमी वयातच जगाच्या मोठ्या भागावर आपले साम्राज्य प्रस्थापित केले होते. यामुळेच त्याला ‘अलेक्झांडर द ग्रेट’ म्हटले जाते. या महान राजाचे कोणी वंशज असतील का याचा शोध अजूनही घेतला जातोय आणि त्याची नाळ भारताशी जुळली आहे! या नवलाचे उत्तर भारतातील एका गावात मिळू शकते. हिमाचल प्रदेशात याची पाळेमुळे पोहोचतात! हिमाचल प्रदेशातील पार्वती व्हॅली पर्यटकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. लोक इथे विचित्र पार्ट्या करायला येतात, जिथे चरसचा खुलेआम वापर केला जातो.

हिमाचल प्रदेशातील मलाना गावातून हा चरस येतो. पण नशा करणाऱ्यांच्या धुमाकुळाच्याही पलीकडे पाहिल्यावर एक वेगळेच मलाना गाव दिसते. जिथे ऐतिहासिक कथा आहेत, तिथे रहस्ये आणि अनेक न सुटलेले प्रश्न आहेत. हिमालयाच्या शिखरांच्या मध्ये वसलेले मलाना गाव खोल दरी आणि बर्फाच्या पर्वतांनी वेढलेले आहे. केवळ 1700 लोकसंख्या असलेले हे गाव पर्यटकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. थंडगार वाऱ्याची झुळूक आणि उंच हिरवीगार देवदार झाडे यांच्यामध्ये शांततेत दिवस घालवण्यासाठी दूरदूरवरून लोक येतात. मलानाचा चरस प्रसिद्ध आहे. स्थानिक लोक ते हाताने घासून तयार करतात हे त्याचे मोठे वैशिष्ट्य आहे. दुसरीकडे, त्याचे व्यसन जगभर आहे. असे म्हणतात की अलेक्झांडरने भारतावर हल्ला केला तेव्हा त्याच्या काही सैनिकांनी मलाना गावात आश्रय घेतला होता. अलेक्झांडरचे भारतातील युद्ध पोरसशी झाले होते. या दरम्यान त्यांचे काही जखमी सैनिक गुपचूप मलाना गावात आले.

मलाना येथील सध्याचे रहिवासी हे अलेक्झांडरच्या त्याच सैनिकांचे वंशज असल्याचे सांगितले जाते. त्या काळातील अनेक गोष्टीही गावात सापडल्या आहेत. अलेक्झांडरच्या काळातील एक तलवार गावातील मंदिरात ठेवल्याचे सांगितले जाते. मात्र आजतागायत या गावातील लोकांचे जनुकीय गुणधर्म अलेक्झांडरच्या सैनिकांशी जुळलेले नाहीत. अनेक स्थानिक लोकांना या कथेचा आधार काय आहे हे देखील माहित नाही. इथल्या लोकांनी आता हे सत्य अलेक्झांडरच्या सैनिकांचे वंशज म्हणून स्वीकारले आहे. परंतु या दाव्याचे समर्थन करण्यासाठी कोणताही सज्जड पुरावा त्यांच्यापाशी नाही. त्या काळातील काही शस्त्रे आणि इतर गोष्टी आहेत, ज्याचा संबंध अलेक्झांडरच्या कालखंडाशी आहे असे म्हटले जाते, परंतु या कथेचे समर्थन करणारे पुरावे आहेत असे वाटत नाही.

असे असले तरीही अलेक्झांडरचा वंशज असण्याची कहाणी इथल्या लोकांच्या उंचीवरून काही अंशी योग्य वाटते. त्यांची भाषाही बाकी हिमाचली लोकांपेक्षा वेगळी आहे. यामुळे मलानी लोकांचे गूढ अधिक गहिरे होते. मलाना गावातील लोक कनाशी नावाची भाषा बोलतात. स्थानिक लोक तिला पवित्र भाषा मानतात. बाहेरच्या लोकांना ते शिकवले जात नाही. ही भाषा जगात कुठेही बोलली जात नाही. स्थानिक लोक हिंदी समजत असले तरी. पण, तो त्याच्या उत्तरात काय म्हणतो, ती गोष्ट कनाशीत घडते आणि समजत नाही. मलानापर्यंत पोहोचणेही खूप अवघड आहे. हा प्रवास इतका कठीण आहे की आपण अनंताच्या प्रवासात आहोत असे वाटते. मलाना गावात जाण्यासाठी रस्ता नाही. डोंगराच्या पायवाटेनेच येथे पोहोचता येते. पार्वती खोऱ्याच्या पायथ्याशी असलेल्या झरी गावातून थेट चढण आहे. झरीहून मलाना गाठायला चार तास लागतात.

मलाना गावातील लोकांचे केस हलके तपकिरी आहेत. त्याचे नाक लांब आहे. त्यांचा रंग अत्यंत गोरा असतो आणि काही लोकांची त्वचा सोनेरी असते. मलानाचे लोक हलके तपकिरी झगे, टोप्या आणि ज्यूटचे बूट घालतात. त्यांना पाहून आपण हिमाचली असल्याचा भास होत नसून भूमध्य समुद्राच्या आसपासच्या लोकांचा भास होतो. गावात कुणी पर्यटक प्रवेश करताच काही तरुण त्याला चरस विकण्याचा प्रयत्न करतात. या गावाची अर्थव्यवस्था फक्त गांजा आणि चरसवर अवलंबून आहे. मात्र त्यामुळे लहान वयातच मुले अमली पदार्थ विक्रीच्या व्यवसायात उतरतात. परिणामी गावचे आराध्य दैवत जमदग्नी ऋषी यांनी स्थानिक लोकांच्या गुरूंमार्फत गावातील सर्व अतिथीगृहे बंद ठेवण्याचे सांगितले. आता बाहेरचे लोक दिवसा या गावात येऊ शकतात.

जमदग्नी ऋषी हे हिंदू पुराणातील महत्त्वाचे पात्र आहेत. पण मलानाचे लोक त्याला जमलू देवता या नावाने ओळखतात. जामलू ऋषींच्या मार्गदर्शनाखाली सुव्यवस्थित संसदीय प्रणाली काम करते आहे . जामलू सध्या पुराणातील ऋषी म्हणून ओळखले जात असले तरी जामलूची पूजा आर्यपूर्व काळात होत असे मानले जाते. ते स्थानिक प्रशासन व्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहेत. मलाना गावातील राजकीय-प्रशासकीय व्यवस्थेने जगभरातील लोकांना आश्चर्यचकित केले आहे. या मागासलेल्या, दूरवरच्या एकाकी गावात एवढी चांगली प्रशासकीय व्यवस्था कशी सुरू झाली हे त्यांना स्वतःलाच ज्ञात नाही. हे गाव भारताच्या हिमाचल प्रदेशात वसलेले असले तरी या गावातील लोक त्यांना भारताचा भाग मानत नाहीत. त्यांची स्वतःची न्यायव्यवस्थाही आहे. मलानाची लोकशाही प्रणाली जगातील सर्वात जुनी लोकशाही मानली जाते. हे ग्रीसच्या प्राचीन लोकशाही व्यवस्थेसारखे आहे. त्यात अप्पर हाऊस आणि लोअर हाऊस आहे. द्विसदनी संसदेद्वारे शासित व्यवस्थेची स्थानिक नावे कनिष्टांग म्हणजे खालचे सभागृह आणि ज्येष्ठांग नावाचे वरिष्ठ सभागृह होत. या प्रशासकीय व्यवस्थेच्या जोडीला अध्यात्माचाही एक घटक आहे. गावात कुठे तंटे बखेडे झाले तर त्याविषयीचा अंतिम निर्णय अप्पर हाऊस म्हणजे वरिष्ठ सदनात असतो. यात गावातील तीन महत्त्वाची व्यक्तिमत्वे आहेत. यातीलच एक व्यक्ती जामलू देवताचा प्रतिनिधी आहे. कोणत्याही मुद्द्यावर जामलू देवताचा शब्द शेवटचा असतो. प्रशासकीय यंत्रणा ही परिषद चालवते. यातच एक गुरू असतो ज्याच्या आत्म्यावर जामलू देवता राज्य करते असे मानले जाते. जमलू देवता त्याच्याद्वारेच या जनतेशी बोलतो असे समजले जाते. जमलू देवता मलाना येथेच राहत असत. त्याला भगवान शिवाने पाठवले होते. गावात दोन मंदिरे आहेत. यातील एक मंदिर जामलू देवतेचे आणि दुसरे त्यांची पत्नी रेणुका देवीचे आहे. गावातील बहुतेक घरे लाकडाची आणि विटांची आहेत.

मलाना गावाच्या मध्यभागी एक मोकळी जागा आहे. या ठिकाणी परिषदेच्या बैठका होतात. या मोकळ्या जागेजवळ जामलू देवतेचे मंदिर आहे. हिमाच्छादित पर्वतांनी वेढलेले हे मंदिर अतिशय आकर्षक दिसते. या मंदिराच्या दरवाजावर लाकडी खांब असलेले सुंदर नक्षीकाम आहे. हाडे, कवटी आणि बळी दिलेल्या प्राण्यांचे काही भाग एका भिंतीवर टांगलेले दिसतात. मंदिराच्या एका भिंतीवर सावधानतेचा एक इशाराही लिहिलेला आहे. तो असा की, या मंदिरास बाहेरच्या व्यक्तीने हात लावल्यास त्याला 3500 रुपये दंड भरावा लागेल. इथल्या लोकांच्या वंशाची भेसळ होऊ नये, यासाठी त्यांना बाहेरील व्यक्तींशी जास्त संपर्क ठेवायचा नाही, असे या इशारा फलकावरून स्पष्ट करण्यात आले आहे. मलाना येथील लोक इतर गावांतील रहिवाशांशी फारसा संपर्क ठेवत नाहीत. ते हस्तांदोलन आणि बाहेरील लोकांना स्पर्श करणे देखील टाळतात. इथल्या दुकानातून एखादी वस्तू घेतली तर थेट पैसे घेण्याऐवजी दुकानदार ठेवायला सांगतात आणि मग उचलतात.

मलानाची नवीन पिढी बाहेरील लोकांना स्पर्श करणे किंवा मिठी मारणे टाळत नाही, परंतु सामान्यतः मलानाचे रहिवासी बाहेरील लोकांपासून अंतर ठेवतात. गावातील लोक गावातच लग्न करतात. कोणी गावाबाहेर लग्न केले तर त्याला समाजातून हाकलून दिले जाते. हिमाचलचे लोक साधारणपणे उमदे असतात. लोकांसोबत अन्न वाटून मोकळेपणाने बोलतात. पण मलानाचे लोक मनमोकळे बोलायला कचरताना दिसतात. मलाना गावचे हे गुणही लक्षवेधक आहेत. इथल्या लोकांच्या अतिशय शांत असण्यात एक रहस्य दडलेले आहे, जे अजून उलगडलेले नाही.

कुल्लू खोऱ्याचा एक भाग असूनही अशी एक वदंता आहे की मलानींमध्ये खूप वेगळी शारीरिक वैशिष्ट्ये आहेत आणि एक बोलीभाषा आहे जी इतर खोऱ्यांपेक्षा वेगळी आहे. तथापि, हिमाचलच्या खोऱ्यांमध्ये, विशिष्ट पहाडी बोलींची लक्षणीय संख्या आहे, त्यापैकी काही एकमेकांपासून पूर्णपणे भिन्न आहेत. त्यामुळे पार्वती खोऱ्यातील गांजा/चरसचा व्यापार वगळता मलाना लोकांची दुर्गमता लक्षात घेता भौतिक/भाषिक वेगळेपण सिद्ध करता येत नाही. त्यांच्या उत्पत्तीबद्दल विविध दंतकथा आहेत. अलेक्झांडरने देश सोडल्यानंतर काही सैनिकांनी या दुर्गम भूमीत आश्रय घेतला आणि नंतर तेथे कायमचे स्थायिक झाले हे मिथक विवादित आहे कारण काही लोक असेही आहेत जे दावा करतात की कलशच्या ज्या खोऱ्यात अलेक्झांडर द ग्रेटच्या सैनिकांनी आश्रय घेतला होता ते पाकिस्तानमध्ये आहे. ही आख्यायिका इंडो-आर्यांमधील स्थानिक लोकांच्या पौराणिक वंशाशी देखील विसंगत आहे ज्यांनी अलेक्झांडर द ग्रेटच्या सैनिकांना अंदाजे एक हजार वर्षे पूर्वीची तारीख दिली होती. मालानी लोकसंख्येचे अलीकडील अनुवांशिक डीएनए ग्रीस सारख्या भूमध्यसागरीय समाजांमध्ये दुर्मिळ आहेत. हे सर्व माहिती होऊनही या भागात मातृत्वाच्या हव्यासापोटी अनेक स्त्रिया बेलाशकपणे येताना दिसतात. इथली रोमनांची दास्तान खरी की खोटी याचा संभ्रम असूनही श्रेष्ठ वंशवादाच्या अधाशीपणापायी अनेक स्त्रिया इथे येऊन इथल्या पुरुषांशी रत होतात, त्यातून जी संतती जन्मास येईल ती अलेक्झांडर द ग्रेटच्या काळखंडातील झुंजार रोमन योद्ध्यांची वंशवेल आपल्या घरात वाढवेल हा फोल भोळा आशावाद त्यांच्यात भिनलेला दिसतो!

ज्या वंशाची रीतसर खात्री होऊ शकलेली नाही नि त्यांच्या मूळ वंशाची नेमकी माहितीही नाही तरीही त्या वंशातले बीज आपल्या गर्भाशयात निसंकोचपणे वाढवताना या स्त्रियांना आणि त्यांच्या आप्तेष्टांना एक खोटा आनंद भयंकर आशा देऊन जातो!

एकविसाव्या शतकात आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा बोलबोला सुरू असण्याच्या काळात जगाच्या पाठीवर काही लोक असेही आढळतात की त्यांना जगाशी काहीही घेणेदेणे नसते, ते सदैव स्वहिताच्या भाकडकथांना महाकाव्य समजून उराशी कवटाळताना दिसतात.

जी गोष्ट युरोपियन करतात ती आपण का करू नये असा ट्रेंड आपल्याकडे नेहमीच दिसतो, त्याला ही घटना कशा अपवाद राहतील? दुसरी बाजू समजून घेतली तरी या विकृत वृत्तीचे कोणतेही नैतिक समर्थन होऊ शकत नाही. हे अधःपतन उघड्या डोळ्यांनी पाहण्याशिवाय आपणही काही करू शकत नाही कारण आपल्यापैकी अनेकांच्या अंगात, मनात, मस्तकात जाती वर्ण धर्म वर्चस्वाचा छोटा का होईना पण एक तरी किडा असतोच!

त्या किडयाचे हे गोजिरवाणे नि काहीसे किळसवाणे रूप! कधीतरी यामागचे सत्य उघडकीस आले तरी मूळ वर्चस्ववादी वृत्तीत फरक पडलेला नसेल कारण या प्रवृत्तीस नेस्तनाबूत करणे अत्यंत कठीण आहे. सबब मूक दर्शक बनून जमेल तिथके भलेबुरे काम करत राहिले पाहिजे! आपण एक चांगले नागरिक होणं महत्वाचे आहे, मात्र यास फारसे कुणाचे प्राधान्य नसते, उलट हरेकास हरताळ फासून कित्येकांना श्रेष्ठ जात धर्म वर्ण वंश याची लालसा लागून राहिलीय, जे खचितही शोभनीय नाही!

कुंभमेळयात मोनालिसासारखी दिसणारी मुळची मध्यप्रदेशची मुलगी अशाच पहाडी जनजातीचा अंकुर होय. स्त्रीचे नितळ सौंदर्य आजही लोकांच्या प्राधान्यक्रमात आहे त्यामुळेच अशा गोष्टीं लोकांना मोहित करतात! मात्र खोलात गेलं तर बऱ्याच भल्याबुऱ्या गोष्टी सापडतात मग आपण खजिल होऊन जातो! कारण मध्यप्रदेशातील बंचरा जातीतील मुलींचा तोंडवळा असाच आहे आणि त्यांच्या वाट्याला आलेले भोग अजूनही मध्ययुगीन परंपरांची ओझी वाहतात!

- समीर गायकवाड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा