हा धाकटा होता. याचे वडील काही वर्षांपूर्वी निर्वतलेले. याची दोन्ही भावंडे लग्न होऊन संसाराला लागलेली. त्यांच्या बायकांना दाढीमिशा आलेला, कथित बेढब दिसणारा वयस्कर प्रौढ दीर सांभाळणे जिकिरीचे आणि काही प्रमाणात अवघडणारे लाजेचे वाटत असावे. अथवा आणखीही काही पारिवारीक वा व्यावहारिक कारण असावे.
पंचाहत्तरी गाठलेली आई आणि चाळीशीतला तिचा तो निरागस मुलगा दोघेच इकडे राहत. त्याचा दवाखाना वा आजारपण उद्भवले की एखादा भाऊ येऊन दोनेक दिवसांची चक्कर टाकून मदत करून जाई.
गेल्या काही दशकात त्यांच्या कुटुंबात अनेक कार्यक्रम झाले मात्र ती आई आणि तो मुलगा क्वचित कुठे दिसले! तो मुलगा हेच तिचे विश्व!
आठ वर्षांपूर्वी तिचे पती अपघाताने गेले तेव्हा ती कोसळून गेली कारण आता मुलगा आणि ती असे दोघेच त्या घरात उरलेले.
मुलासाठी केअरटेकर ठेवणारे परवडणारे नव्हते. तुटपुंजे उत्पन्नात कसेबसे भागत होते. त्याची दाढी करणे, केस कापणे, लघवी संडास काढणे सारे ती माऊली करे.
काही दिवसांपूर्वी त्याला फुफुसाचा संसर्ग झाला. आठवडाभराचे हॉस्पिटलायजेशन झाले. तो असा एकाएकी जाईल असे कुणाला वाटले नव्हते.
डोक्याचा भलामोठा भेंडा सांभाळत आपले मोठाले डोळे मिचकावत निरागस हसणारा तो जीव आयसीयूमध्येच गेला.
घरी असला की तो हाफचड्डी नि बंडीमध्ये असायचा.
घसरत घसरत पुढे सरकायचा. आईच त्याला घास भरवायची. त्याला थापटत झोपी लावायची. त्याला इच्छा झाली तर टीव्हीवर जुनी गाणी सिनेमे लावून द्यायची.
तिचा सारा दिवस त्याच्या देखभालीत जायचा. तो जन्मल्यापासून तिला वैयक्तिक आवडीनिवडी, इच्छा आकांक्षा, छंद यांचा विसर पडला होता.
तिचे सुख त्याच्या मायेत समर्पित झाले होते.
त्याचे वडील हयात होते तोवर त्यांची खूप मदत व्हायची. नंतर मात्र तिने एकटीने किल्ला लढवला होता.
तो असा तडकाफडकी गेला तेव्हा अनेकांच्या प्रतिक्रिया अशा होत्या की, 'बरे झाले आता मथुराबाईची सुटका झाली. फार केलं तिने! त्याचं पुण्य तिच्या पदराला येईल!' तो गेला त्या दिवशी त्या माऊलीचे अश्रू सरत नव्हते!
अख्ख्या गल्लीतल्या बायका तिच्या घरी येऊन हमसून हमसून रडल्या.
त्याचे क्रियाकर्म मोठ्या भावाने केले. अन्य सारे विधी झाले.
तिच्या दोन्ही मुलांनी आईला आपल्यासोबत येण्याचा खूप आग्रह केला मात्र ती माऊली काही त्यांच्यासोबत गेली नाही.
पत्नीसोबत त्यांना भेटायला गेलो होतो तेव्हा त्या ओक्साबोक्शी रडल्या.
"किस्ना (त्यांचा मुलगा) असताना त्यांनी मला राहायला बोलवलं असतं तर नक्की गेले असते, आता जाऊन काय करू? तिथे गेल्यावर त्याच्या आठवणींनी ऊरात काहूर माजेल! जीव लागणार नाही. तिथेही नातवंडे आहेत त्यांच्यात मला किस्ना दिसेल! माझा किस्ना एकटाच मला टाकून गेला, त्याच्याशिवाय मी राहू शकत नाही."
काही केल्या त्यांचा शोक ओसरत नव्हता. त्यांच्या बहिणीची विधवा मुलगी आता सोबतीस असते.
गल्लीच्या कोपऱ्यालाच त्यांचे जुन्या पद्धतीचे दोन खोल्यांचे घर आहे.
अंगणात तुळस आहे. बाहेर पांढऱ्या नि गुलाबी सदाफुलीची पुरुषभर उंचीची झाडे आहेत, दोन तीन नारळांची झाडे आहेत. देखणा सोनचाफाही आहे.
दिवस मावळताना रोज सांजेला त्या तुळशी वृंदावनात दिवा लावायच्या, अगदी न चुकता! आताशा एक दिवा उंबरठ्यावरही दिसतो!
त्या दिव्याच्या ज्योतीत किस्ना दिसतो! न संपणारी प्रतीक्षा जिवघेणी असते, काळजाच्या न सुकणाऱ्या जखमा दाखवता येत नसतात!
सर्वच प्रश्नांची उत्तरे मिळत नसतात, सारीच दुःखे सांगता येत नसतात, सर्वांना सर्व काही सांगता येत नसते!
काही माणसं हयातभर जळत असतात, झिजत असतात, झटत असतात! लोक त्याला त्याग समर्पणाचे नाव बहाल करतात, मात्र ज्या जिवाने हे भोगलेले असते त्याच्या वेदना जगातला कुठलाही जीव समजून घेऊ शकत नाही हेच खरे सत्य असते!
त्या दिवशी घरी गेल्यावर मथुराबाई रडत रडता म्हणाल्या होत्या की, पुनर्जन्म असतो की नाही मला ठाऊक नाही मात्र असलाच तर किस्नाच्या पोटी मला जन्माला यायचेय, त्याच्या कुशीत मला शांत झोपी जायचेय!
आता सगळीकडे दिवेलागण झालीय, बाहेर रस्त्यावर बऱ्यापैकी अंधार आहे, घरोघरी लाईट्स लागल्या आहेत. मथुराबाईंच्या घराच्या उंबरठ्यावर आजही दिवा नक्की तेवत असेल आणि घरात त्या तेवत असतील शांतपणे फुलवातीसारखं!
- समीर गायकवाड
(घटनेतील नावे बदलून लिहिली आहेत.) 31 /05 / 2024
#ललित #समीरगायकवाड #trending #blogger #mustread #goodread #threads #art #life #literature #साहित्य #sameergaikwad #blog #vlog #humanity #mankind #support #search #sameerbapu #समीरबापू #साहित्य

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा