रविवार, ३० सप्टेंबर, २०१८

बदनाम गल्ल्यांचा अक्षर'फरिश्ता' - मंटो !


सआदत हसन मंटो यांच्या जीवनावरचा नवाजुद्दिन सिद्दिकी अभिनित 'मंटो' हा चित्रपट २१ सप्टेबर रोजी रिलीज झालाय. नंदिता दास यांनी त्याचं दिग्दर्शन केलंय. मंटोच्या कथांवर आधारलेले 'काली सलवार', 'मिर्जा- गालिब', 'शिकारी', 'बदनाम', 'अपनीनगरियां' हे सिनेमे येऊन गेलेत. शिवाय पाकिस्तानमध्येच त्यांच्यावर जिओ फिल्म्सने बनवलेला याच नावाचा बायोपिक येऊन गेलाय. या चित्रपटात मंटोच्या काही प्रसिद्ध कथा समोर येतात, कथेतली पात्रे येतात, मंटोच्या आयुष्यातील काही महत्वाच्याघटनांचा पट रंगत असताना या कथातील पात्रे मध्ये येतात त्यामुळे रसभंग होतो. मंटो दाखवायचे म्हणजे त्यांच्या आयुष्यातल्या घटनांचा पट उलगडताना त्यांच्या कथांवर भाष्य होणं अनिवार्यच आहे. मात्र चित्रपट संपल्यानंतर मंटो जितके लक्षात राहतात तितक्याच त्यांच्या कथाही लक्षात राहतात. मात्र एकूण परिणाम साधण्यात चित्रपट कमी पडतो. असं का होतं ? हा या चित्रपटाच्या रसग्रहणाचा भाग होऊ शकतो. इस्मत चुगताई कोण होत्या, मंटोच्या जीवनात वेश्यांचं काय स्थान होतं आणि मुख्य म्हणजे मंटोनी तत्कालीन साहित्याच्या तथाकथित मापदंडांना सुरुंग लावत कोणतं साहित्य लिहिलं होतं हे विस्ताराने समोर न आल्याने ज्यांना या विषयी काहीच माहिती नाही वा अल्पशी माहिती आहे त्यांच्या पदरी फारसं काही पडत नाही. मंटो समजून घेण्याआधी त्यांचं साहित्य समजून घ्यायला हवं मग ते पानागणिक उलगडत जातात !

शनिवार, २९ सप्टेंबर, २०१८

'चलो ज़िंदगी को मोहब्बत बना दें' : जगजीत आणि चित्रा सिंग - एका अनोख्या प्रेमाची कथा ...


रात्र गडद होत गेल्यावर चित्रासिंग आपल्या शयनकक्षातले दिवे मालवतात. म्लान उजेडाच्या साथीने तिथे अंधार वसतीस येतो. चित्रांना आता वेध असतात रात्रीतून तिथे सुरु होणाऱ्या मैफलीचे. आस्ते कदम तिथे मंच उभा राहतो, प्रेक्षक जमा होतात, पुढ्यात हार्मोनियम घेऊन बसलेले जगजीतसिंग अवतीर्ण होतात. रात्र जशी सरत जाते तसतशा गझलांच्या एकामागून एक मैफली सजतात. लोक आनंद घेत राहतात. टाळ्यांचा गजर होत राहतो. 'वन्समोअर'चे पुकारे होत राहतात, वीणा झंकारत राहते. मधूनच भानावर येणाऱ्या चित्रा आपल्या डोळ्यांच्या कडा पुसत दीर्घ निश्वास सोडतात. उत्तररात्रीच्या अखेरच्या प्रहरी थकलेल्या चित्रा त्यांच्या नकळत डोळे मिटून शांतपणे झोपी जातात. तेंव्हा फुलांनी सजलेला मंच अदृश्य होतो, टाळ्या वाजवणारे रसिक श्रोते लुप्त होतात. एक नीरव शांतता पसरते आणि खांद्यावर मखमली किरमिजी रंगाची शाल पांघरलेले, पांढऱ्या शुभ्र वस्त्रातले जगजीतजी त्यांच्या जवळ जाऊन त्यांच्या कोमल म्लान चेहऱ्यावरून आपला थरथरता हात फिरवतात. त्यांच्या डोळ्यातून ओघळणारा उष्म अश्रूंचा थेंब चित्रांच्या गाली पडायच्या आधी अदृश्य होतात. शीतल वाऱ्याच्या झुळुकेने जाग यावी तद्वत चित्रा जाग्या होतात. एकवार डोळे उघडतात आणि किंचित मंद स्मित करत पुन्हा झोपी जातात.

बुधवार, २६ सप्टेंबर, २०१८

मंटो, भाऊ पाध्ये, 'वासूनाका' आणि आचार्य अत्रे ...




भाऊ उर्फ प्रभाकर नारायण पाध्ये यांचा जन्म २६ नोव्हेंबर १९२६चा. ते दादरचे. त्यांच्या कथा कादंबऱ्यांनी तथाकथित लेखन सभ्यतेच्या अक्षरशः चिंधडया उडवल्या. सआदत हसन मंटोंनी जे काम हिंदीत केलं होतं तेच थोड्या फार फरकाने भाऊंनी मराठीत केलं होतं. मंटोंना निदान मृत्यूपश्चात अफाट लोकप्रियता मिळाली, लोकांनी त्यांना डोक्यावर घेतलं, त्यांच्यावर कवने रचली. त्या मानाने भाऊ कमनशिबी ठरले. त्या काळात साधनांची वानवा असूनही भाऊंचे शिक्षण चांगलेच झाले होते. १९४८ साली मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात त्यांनी पदवी संपादन केलेली. पदवी संपादनानंतर काही काळ (१९४९-५१) त्यांनी कामगार चळवळीत कार्यकर्ता म्हणून काम केलं. त्यानंतर तीन वर्षँ ते माध्यमिक शाळेत शिक्षकाचे काम केलं. नंतर वडाळ्यातील स्प्रिंग मिल येथे चार वर्षँ व एलआयसीत चार महिने त्यांनी कारकुनी केली. १९५६ मध्ये शोशन्ना माझगांवकर या कामगार चळवळीतील कार्यकर्तीशी त्यांचा विवाह झाला. काही काळ त्यांनी 'हिंद मझदूर', 'नवाकाळ'(१ वर्ष) व 'नवशक्ती'(१० वर्षं) या वृत्तपत्रांमधून पत्रकारिता केली. 'नवशक्ती' सोडल्यावर काही काळ त्यांनी 'झूम' या सिने-साप्ताहिकाचे संपादन केलं. 'रहस्यरंजन', 'अभिरुची', 'माणूस', 'सोबत', 'दिनांक', 'क्रीडांगण', 'चंद्रयुग' या नियतकालिकांतून स्तंभलेखन केलं.१९८९पासून अर्धांगाच्या आघाताने त्यांना लेखन अशक्य झालं. ३० ऑक्टोबर १९९६ रोजी त्यांचं निधन झालं.

शनिवार, २२ सप्टेंबर, २०१८

तपस्वी कर्मयोगी - भाऊराव पाटील


आपल्या मुलास दरमहा दहा रूपये कोल्हापूर दरबाराची स्कॉलरशिप मिळत असे हे कळल्यानंतर तातडीने कोल्हापूरला येऊन त्या रकमेतील फ्क्त दोन रूपये त्याला खर्चासाठी ठेवायला सांगून उर्वरित आठ रूपये आपल्या सार्वजनिक संस्थेमध्ये जमा करायला सांगणारे ते एकमेव संस्थाचालक वडील असावेत. आपली स्वतःची इतकी मोठी शिक्षणसंस्था असूनही मुलाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उद्भवला तेंव्हा त्यांनी मुलाला पाठविलेल्या पत्रात ते म्हणतात,"तु संस्थेमध्ये नोकरी करू नये अशी माझी पहिल्यापासून इच्छा होती व आजही आहे . ज्या संस्थेच्या स्टोअर्समध्ये तु काम करीत आहेस त्या स्टोअर्सला चालू साली फारसा नफा झालेला नाही. व यापुढेही मुळीच होणार नाही. त्यामुळे स्टोअर्सला नोकर कमी करावे लागतील त्यात तुला कमी न करता दुस-यास कमी करावे लागेल हे स्वभाविक आहे. अशावेळी तू होऊन नोकरी सोडावी व विमा कंपनीचा अगर इतर धंदा तु करावा अशी माझी तुला प्रेमाची सूचना आहे." यातून त्यांची तत्त्वनिष्ठा आणि त्याग यांचे दर्शन घडते.

सोमवार, १७ सप्टेंबर, २०१८

कैफ...



ती एकदोन दिवसात निघून जाणार होती.
कसाबसा तिचा निरोप मिळाला, 'भेटायला ये.'
नेहमीप्रमाणे वेळेवर पोहोचण्याचा निश्चय करूनही बऱ्याच उशिरा पोहोचलो.
ठरवलेल्या जागी जाईपर्यंत काळजात धाकधूक होत होती.
काय झालं असेल, का बोलवलं असेल, पुढं काय होणार एक ना अनेक प्रश्न.
सिद्धेश्वर मंदिरालगतच्या तलावालगत असलेल्या वनराईत तिने बोलावलेलं.
मला जायला बहुधा खूपच विलंब झालेला.
वाट बघून ती निघून गेली होती...
खूप वेळ थांबलो, पाण्याचा सपसप आवाज कानात साठवत राहिलो,
ती जिथं बसायची तिथं बसून राहिलो,
तिच्या देहाचा चिरपरिचित गंध वाऱ्याने पुरता लुटून नेण्याआधी रोम रोमात साठवत राहिलो.

शनिवार, १५ सप्टेंबर, २०१८

डिजिटल साहित्यातून नवी वाचन चळवळ..



जगभरात मागील काही दिवसांत कोलाहलाच्या, विद्वेषाच्या आणि आपत्तींच्या अप्रिय घटनांच्या बातम्या सातत्याने समोर येताहेत त्यामुळे वातावरणास एक नैराश्याची झालर प्राप्त झालीय. या गदारोळात भिन्न परिप्रेक्ष्यातल्या दोन वेगवेगळ्या वृत्तांनी हे मळभ काहीसे दूर होईल. यातली एक घटना वाचनचळवळीच्या पुनरुत्थानाशी निगडीत आहे जी स्थलसापेक्ष नाही, ती एकाच वेळी जगाच्या पूर्वेस आणि पश्चिमेसही घडलीय. तर दुसरी घटना आशियाई देशातल्या विरंगुळयाच्या बदलत्या व्याख्यांशी संदर्भित आहे. या दोन्ही घटना म्हणजे गेल्या काही वर्षातील आधुनिक मानवी जीवनशैलीच्या अतिरेकी डिजिटलवर्तनाचा परिपाक असणाऱ्या कालानुगतिक प्रक्रिया आहेत, ज्याचा दृश्य परिणाम आता दिसून येतोय. त्याचा हा आढावा.

शनिवार, १ सप्टेंबर, २०१८

जैविक इंधनावरील विमान उड्डाणाची तथ्ये


२८ ऑगस्टला 'स्पाईसजेट' या खाजगी विमान वाहतूक कंपनीने विमानाचे इंधन एव्हिएशन टर्बाईन फ्युएल’ (ए.टी.एफ.) व बायोफ्युएल (जैवइंधन) एकत्रित वापरून (मिश्रण प्रमाण ७५/२५) डेहराडून ते दिल्ली हा वीस मिनिटांचा प्रवास केला. हे उड्डाण सफल होताच अनेक हौशा-गवशांनी आपले 'पुष्पक विमान' काल्पनिक हवेत उडवत कल्पनास्वातंत्र्याची ‘कोटीच्या कोटी उड्डाणां'च्या 'गगनभराऱ्या' केल्याचे पहावयास मिळाले. आर्थिक व पर्यावरणाच्या अंगाने आणि भविष्याच्या दृष्टीने बायोफ्युएलच्या वापराचा प्रयोग उपयुक्त आहेच याबाबत दुमत असण्याचे काहीच कारण नाही. पण या विमानोड्डाणानंतर अनेकांनी ज्या पुड्या सोडल्या त्या पाहू जाता रमर पिल्लेची आठवण झाली. आपल्या देशात जडीबुटी वापरून कोणताही आणि कुठल्याही अवस्थेतला जुनाट आजार बरा करता येतो असा एक गैरसमज दृढ आहे. परंतु केवळ रोगोपचारच नव्हे तर आपली इंधन समस्यासुद्धा वनस्पती इंधनाच्या अभूतपूर्व शोधातून जादूच्या कांडीसारखी सुटू शकते यावर ९०च्या दशकात कैकांनी विश्वास ठेवला होता. या जैवइंधनाचा संशोधक केवळ हायस्कूलपर्यंत शिक्षण झालेला, रमर पिल्ले हा तमिळ युवक होता हे विसरण्याजोगं नाही. लाथ मारीन तिथं इंधन काढीन या अविर्भावात बायोफ्युएलचे सोनं गवसलल्याचा दावा त्याने केला होता. अवघ्या काही रुपयात पाचेक लिटर पेट्रोलएवढी ऊर्जा त्याचे हर्बलफ्युएल देऊ शकते या त्याच्या दाव्यावर भारतीय वैज्ञानिक, आयआयटी सारख्या तंत्रज्ञान संस्थेतील काही अभियंते, सरकारच्या विज्ञान - तंत्रज्ञान खात्यातील टेक्नोक्रॅट्स आणि एतद्देशिय अस्मितागौरवगायक मंडळींना या संशोधनाने भंजाळून सोडले होते. पिल्लेचा दावा खोटा होता, तो जे बायोफ्युएल वापरायचा त्यात गुप्तपणे पेट्रोल मिसळले जात होते. याचा सुगावा लागताच सगळ्यांचे मुखभंजन झाले. आतादेखील संमिश्र बायोफ्युएलवर उडवलेल्या विमान उड्डाणानंतर अनेकांना रमर पिल्लेची बाधा झाली की काय असे वाटावे असे चित्र दिसते.

शनिवार, १८ ऑगस्ट, २०१८

महादेवी वर्मा यांची कविता - ठाकुरजी !

वय जसजसे वाढत जाते तसतशी मानसिकता बदलत जाते. विचारधारा प्रगल्भ होत जाते. जीवनाकडे आणि सकल चराचराकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलत जातो. काही 'दिव्य' लोक याला अपवाद असू शकतात. पण ज्यांच्यात संवेंदनशीलता आणि आत्मचिंतन करण्याची प्रवृत्ती असते त्यांचे विचार सातत्याने बदलत जाऊन विरक्तीच्या डोहाशी एकरूप होत चाललेल्या एका धीरगंभीर औदुंबरासारखी त्यांची अखेरची अवस्था होते. ज्ञानपीठसह असंख्य पुरस्कार -गौरव विजेत्या महादेवी वर्मा यांना गुगलने आजचे डूडल समर्पित केले आहे. २६ मार्च १९०७ चा त्यांचा जन्म. त्यांच्या जन्मानंतर वडील बांके बिहारी यांना हर्षवायू होणं बाकी होतं, कारण त्यांच्या कुटुंबात तब्बल २०० वर्षांनी मुलगी जन्मास आली होती. ते ज्या देवीचे साधक होते तिचेच नाव त्यांनी तिला दिले, 'महादेवी' !

बुधवार, १५ ऑगस्ट, २०१८

'परमाणू' - पोखरणच्या अणूचाचणीचा सोनेरी इतिहास..



बरोबर २० वर्षांपूर्वी भारताने संपूर्ण जगाला आपली ताकत दाखवून दिली होती. प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असा तो क्षण होता. तत्कालिन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या त्या धाडसी निर्णयामुळे संपूर्ण जग अवाक झाले होते. ११ मे १९९८ रोजी राजस्थानच्या पोखरण रेंजमध्ये भारताने केलेल्या अणूस्फोट चाचण्या यशस्वी ठरल्या होत्या. ११ मे च्या दुपारी ३.४५ च्या सुमारास तीन त्यानंतर दोन दिवसांनी १३ मे रोजी दोन अशा एकूण पाचही अणूस्फोटाच्या चाचण्या यशस्वी ठरल्या. भारत अणवस्त्र संपन्न देश बनल्याचा संदेश या चाचण्यांमधून जगभरात गेला. याच घटनेवर आधारित 'परमाणू' या चित्रपटाचे 'झी सिनेमा'वर आज स्क्रीनिंग आहे. #indiblogger

शनिवार, ११ ऑगस्ट, २०१८

रेड लाईट डायरीज - नवरा की दलाल ?


दिल्लीच्या जी.बी.रोडवरील रेड लाईट एरियातली आजची घटना. (अकरा ऑगस्ट २०१८)  
पानिपतमध्ये राहणाऱ्या सद्दाम हुसेन याने पहिली पत्नी हयात असताना धोकाधडी करत गुपचूप दुसरा निकाह केला होता. तिच्याशी पटेनासे झाल्यावर तिला फिरायला नेतो असं सांगत त्याने थेट जी.बी.रोडवर आणलं. तिथल्या चलाख दलालांनी त्याला बरोबर हेरलं. त्याच्याबरोबरचं 'पाखरू' काय किंमतीचं आहे हे त्यांना नेमकं ठाऊक होतं पण सद्दामला बाई किती रुपयात विकायची हे माहिती नव्हतं. त्यानं बायकोची किंमत दिड लाख रुपये सांगितली. दलाल मनातल्या मनात खूप हसले असतील. काहींनी त्याच्याशी बार्गेन करून पाहिलं. पण सद्दाम आपल्या 'बोली'वर ठाम होता. शेवटी त्याच्यामुळे नसते वांदे होतील म्हणून काही दलालांनी त्याला हुसकावून लावले.

बुधवार, ८ ऑगस्ट, २०१८

करुणानिधी - द सुपर थलैवा...


दोन दिग्गज फलंदाज प्रदीर्घ वेळापासून क्रीझवर असतील व त्यांनी मोठी भागीदारी रचली असेल आणि त्यांच्यातला एकजण बाद झाला की दुसरा देखील फार काळ तग धरू शकत नाही. तो देखील काही वेळातच बाद होतो असं एक गृहीतक आहे. असंच काहीसं राजकारणातही होत असतं. एकमेकाशी प्रदीर्घ वैर असणारे दोन दिग्गज तमिळ राजकारणी एका पाठोपाठ एक गेले. दोघांनी एकमेकांना इतके पाण्यात पाहिले होते की सत्तेचा लंबक आपल्या बाजूला कलल्यावर त्यांनी परस्परास अत्यंत अपमानास्पद व धक्कादायक पद्धतीने अटक केली होती. जयललिता आणि करुणानिधी यांनी जे सुडाचे राजकारण केले ते इतके टोकाचे होते की अनेक सामान्य लोकांनीही त्यात उडी घेत एकमेकांची डोकी फोडली होती. राजकारण ही एक विचारधारा न राहता सत्ताकेंद्रित द्वेषमूलक प्रवृत्ती म्हणून दक्षिणेत रुजवण्यात या दोहोंनी समान हातभार लावला होता.

पिशवीसूत्र



खरं तर पिशवीचा संबंध मानवी जीवनाशी जन्माआधी आणि जन्मानंतरही येतो. जन्म होण्याआधी गर्भाशयाच्या पिशवीत नऊ महिने काढावे लागतात तर मृत्यूनंतर मर्तिकाचे सामान एका पिशवीवजा गाठोड्यात आणले जाते. पिशवीचा प्रवास असा प्रारंभापासून अंतापर्यंत प्रत्येकाची सोबत करतो. दैनंदिन जीवनात देखील पिशवी हा अविभाज्य घटक झालाय. पिशवीच्या जगात नुकताच एक प्रलय येऊन गेला तो म्हणजे प्लास्टिक पिशवीवरील बंदी. ही बंदी थोडीफार शिथिल होईल न होईल वा त्यावर राजकारण होईल हे जगजाहीर आहे. कारण आपल्या लोकांनी कशावर राजकारण केले नाही अशी गोष्टच आपल्याकडे नाही. कोणाच्या घरी पोर जन्मलं वा कुठे कुणी मयत झालं तरी त्यावरही घरगुती राजकारण सुरु होते. घरगुती पातळीवरचे राजकारण सासू सुनेच्या पारंपारिक छद्म-डावपेचाहून भयानक असते. त्यानंतर गल्लीत, मग गावात आणि राज्य-देश पातळीवर राजकारण होत राहते. यातून कशाचीच सुटका नाही, मग प्लास्टिक पिशवी कशी अपवाद राहील ! तर मंडळी या प्लास्टिक पिशवीने अलीकडील काळात आपलं आयुष्य पुरतं व्यापून टाकलेलं होतं.

शनिवार, ४ ऑगस्ट, २०१८

नव्या युरेशियाची रचना कितपत शक्य ?


अमेरिकेचे अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प हे विक्षिप्त, लहरी, एककल्ली आणि मुजोर स्वभावाचे असून त्यांची विचारधारा उजवीकडे कललेली आहे असं वॉशिंग्टन पोस्टने त्यांची उमेदवारी पक्की होताच म्हटले होते. काहींनी हे टीकेचे सुरुवातीचे स्वर कायम ठेवले तर काही ट्रम्प यांच्यासमोर नमले. आपल्यावर टीका करणाऱ्या मिडीयाचा समाचार घेताना तोल ढासळलेल्या ट्रम्प यांनी हे सर्व लोक ‘देशद्रोही’ असल्याची टीका नुकतीच केलीय. ट्रम्प यांचा तीळपापड होण्याचे ताजे कारणही तसेच आहे. ‘द्वेषमूलकतेने ठासून भरलेल्या तथाकथित राष्ट्रवादी लोकांच्या पाशवी समर्थनाच्या आधारे सत्तेत आलेल्या अमेरिकेच्या उद्दाम नेतृत्वास तुम्ही नमवू शकत नसाल तर तुम्ही त्यांचे जागतिक राजकीय महत्व कमी करून त्यांना शह दिला पाहिजे’ अशा अर्थाचे लेख मीडियात साधार मांडणीतून प्रसिद्ध केले जाऊ लागलेत. यातीलच एका लेखात ट्रम्प यांची दादागिरी कमी करण्यासाठी चीन आणि युरोपने एकत्र येऊन नव्याने युरेशियाची सूत्रे जुळवण्यावर प्रकाश टाकला होता. विशेष म्हणजे 'द इकॉनॉमिस्ट'नेही यावर भाष्य केलंय. या विचारांची ट्रम्प प्रशासनाने सवयीप्रमाणे टवाळी केली. पण यामुळे एक वेगळाच ट्रेंड चर्चेत आला ज्याची सुरुवात रॉबर्ट कॅपलेनयांच्या एका पुस्तकाने केली होती.

शनिवार, २१ जुलै, २०१८

जागतिक खाद्यसंस्कृतीत कृत्रिम मांसाची भर....


जगभरात मोठ्या प्रमाणात वाचल्या जात असलेल्या ‘द अटलांटीक’ या लोकप्रिय नियतकालिकाच्या १३ जुलै २०१८ च्या आवृत्तीत साराह झांग यांचा ‘द फार्सियल बॅटल ओव्हर व्हॉट टू कॉल लब ग्रोन मीट’ हा लेख प्रसिद्ध झाला आणि जगभरातील मीडियाने कान टवकारले. कारण आतापर्यंत जी गोष्ट कपोलकल्पित म्हणून दुर्लक्षिली गेली होती, त्याबाबतीतचा हा जगासाठीचा वेकअप कॉल होता. १२ जुलै रोजी अमेरिकन अन्न आणि औषध प्रशासनाने(FDA) एक लोकबैठक बोलावली होती. विषय होता, ‘प्रयोगशाळेत कृत्रिम रित्या वाढवल्या गेलेल्या टेस्ट-ट्यूब मांसाचा’. या बैठकीत FDAने उपस्थित लोकांना आणि संशोधकांना पृच्छा केली की, 'या मांसास काय संबोधायचे ?' क्लीन मीट (स्वच्छ मांस), कल्चर्ड मीट (प्रक्रियान्वित मांस), आर्टिफिशियल मीट (कृत्रिम मांस), इन व्हिट्रो मीट (बाह्यांगीकृत मांस), सेलकल्चर प्रॉडक्ट (कोशिकाप्रक्रियाधारित उत्पादन), कल्चर्ड टिश्यू (प्रक्रियाकृत उती-अमांस) अशी नावे यावेळी सुचवली गेली. खरे तर ही केवळ नामाभिधानाची प्रक्रिया नव्हती. हे उत्पादन स्वीकृत करून त्याला बाजारात आणण्याची परवानगी देत आहोत याची ही चाचणी होती.

गुरुवार, १९ जुलै, २०१८

रेड लाईट डायरीज - पांढरपेशींच्या दुनियेतला ऑनलाईन रेडलाईट 'धंदा' ..


पुण्यातील हिंजवडी येथील आयटी पार्कमधील गणेश मंदिरानजीकच्या एका उच्चभ्रू वस्तीतील अपार्टमेंटमध्ये अठरा जुलै २०१८ रोजी पोलीसांनी रेड टाकून सात मुलींची सुटका (?) केली आणि पाच जणांना अटक केली, दोघे फरार (!) होण्यात यशस्वी झाले. हे रॅकेट व्हॉट्सऍप आणि इन्स्टाग्रामवरून चालत होते. आयटी पार्क मधले रॅकेट असल्याने याचे सर्व्हिस प्रोव्हायडींग फंडे ही डिजिटल आणि आधुनिक होते. ही माहिती स्टेशन डायरीतून येते. मी याही पुढची माहिती देतो. या गोरखधंद्याची व्याप्ती पुणे शहरात वा संपूर्ण महाराष्ट्रात वा अखिल देशात किती आणि कशी असावी याची झलक तुम्हाला यातून मिळेल.

शनिवार, १४ जुलै, २०१८

नासाची सूर्यावर स्वारी ...


आकाशांत सर्वत्र तारे व तेजोमेघ अव्यवस्थित रीतीनें पसरलेले दिसतात. जिथे ते दाट दिसतात त्या भागाच्या दिशेनें विश्वाचा विस्तार अधिक दूरवर असतो. तर ज्याला आपण दीर्घिका म्हणतों तो सर्व आकाशास वेष्टणारा, काळोख्या रात्रीं फिकट ढगाप्रमाणें दिसणारा पट्टा होय. हा असंख्य तारे, तारकापुंज व तेजोमेघ यांची बनलेला आहे. तेजोमेघ म्हणजे आकाशांत दुर्बिणींतून अंधुकपणें प्रकाशणारा वायुरूप ढगासारखा पदार्थ. आपली सूर्यमाला मिल्की-वे(आकाशगंगा) नावाच्या दिर्घिकेत आहे. सूर्यमाला सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्याच्या भोवती फिरणाऱ्या खगोलीय वस्तूंनी बनलेली आहे. सूर्यमालेची निर्मिती ही तेजोमेघ सिद्धान्ताप्रमाणे झाली असल्याचे खगोलशास्त्रज्ञ मानतात. यानुसार एका मोठ्या रेणूंच्या ढगाच्या कोसळण्यामुळे सुमारे ४.६ अब्ज वर्षांपूर्वी सूर्यमालेची निर्मिती झाली. हा रेणूंचा ढग कित्येक प्रकाशवर्षे अंतरावर पसरला होता व त्यापासून अनेक ताऱ्यांची निर्मिती झाली. भोवतालच्या तारकासमूहातील ताऱ्याच्या स्फोटामुळे निर्माण होणाऱ्या प्रघाती तंरंगांमुळे सूर्य तयार झाला.

''सूर्य आत्मा जगतस्तस्थुषश्च'' अशी जी ॠग्वेदांत सूर्याची थोडक्यांत महति गायिली आहे ती यथार्थ नाहीं असें कोण म्हणेल ! सूर्य हा तारा आपल्या सूर्यमालेच्या केंद्रस्थानी आहे. सूर्य हा G2V या वर्णपटीय विभागात (spectral class) मोडतो. G2 म्हणजे त्यच्या पृष्ठभागाचे तापमान जवळपास ५५०० केल्व्हिन असून त्याचा रंग पिवळा आहे. सूर्य त्याचे हायड्रोस्टॅटिक संतुलन सांभाळून असल्याने तो प्रसरणही पावत नाही किंवा आकुंचनही पावत नाही. सूर्यामध्ये स्फोट होण्याइतके वस्तुमान नाही. त्याऎवजी ४०० ते ५०० कोटी वर्षांनी तो लाल राक्षसी ताऱ्याच्या अवस्थेत जाईल. या अवस्थेनंतर तीव्र तापमान स्पंदनांमुळे सूर्याचे बाह्य आवरण फेकले जाईल व प्लॅनेटरी नेब्युला तयार होईल. शेवटी सूर्य श्वेत बटूमध्ये रुपांतरित होईल. सूर्यमालेतील एकूण वस्तुमानापैकी ९९% पेक्षा जास्त वस्तुमान एकट्या सूर्यामध्ये आहे. सूर्यापासून उत्पन्न होणारी ऊर्जा सूर्यकिरणांच्या स्वरूपात बाहेर पडते व प्रकाश संश्लेषणाच्याद्वारे पृथ्वीवरील संपूर्ण जीवसृष्टीला आधार देते आणि पृथ्वीच्या वातावरणामध्ये व हवामानामध्ये बदल घडवते.

सोमवार, ९ जुलै, २०१८

'त्या' फोटोच्या निषेधास असलेली इतिहासाची झालर...



काही दिवसांपूर्वी चित्रपट अभिनेते रितेश देशमुख यांनी चित्रपट दिग्दर्शक रवी जाधव आणि कादंबरीकार विश्वास पाटील यांच्यासह रायगडावरील मेघडंबरीत सिंहासनाधिष्टीत शिव छत्रपतींच्या मूर्तीसमोर बसून फोटो काढले आणि ते सोशल मिडियावर पोस्ट केले. यावरून त्याच्यावर प्रखर टीका झाली, कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजे यांनी देखील त्यांच्यावर टीका केली. रितेश देशमुख यांनी लोकांच्या नाराजीचे उग्र स्वरूप पाहून तत्काळ माफी मागत ते फोटो डिलीट करून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. खरे तर रायगडावरील मेघडंबरीच्या नजीक जाण्यास कुणालाही परवानगी नाही, दुरूनच दर्शन घेऊन लोक परत फिरतात. मग हे लोक तिथे आत कसे काय गेले, आत गेल्यानंतर मेघडंबरीवर चढताना त्यांना कुणीच कसे अडवले नाही, दडपणापायी अडवले नाही असे समजून घेतले तरी महाराजांच्या मूर्तीसमोर पाठमोरे बसण्यास तरी त्यांना मज्जाव का गेला नाही हा प्रश्नही अनुत्तरितच राहतो. याच्या चौकशा वगैरे होतील, पुढचे सोपस्कार पार पडतील. पण सोशल मिडीयावर सेलिब्रिटींचे तळवे चाटणारा एक वर्ग आहे, त्यातील काहींनी खोचक शब्दाआडून छुपा सवाल केला की, "हे सर्वजण बसलेलेच होते, उभे नव्हते ; शिवाय इतका गहजब करायचे काही कारण नव्हते कारण शिवछत्रपतींवरील चित्रपटाच्या होमवर्कसाठीच हे तिथे गेले होते.' अशी मल्लीनाथीही करण्यात आली. न जाणो असा विचार आणखी काहींच्या मनातही आला असेल, पण त्यांना या वर्तनाच्या निषेधामागील कारण माहिती नसेल यावर खरंच विश्वास बसत नाही.

शनिवार, ७ जुलै, २०१८

सोशल मीडिया कोणी भरकटवला ?



व्हॉटसऍपवर व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे काही दिवसापूर्वीच्या घटनेत पुरोगामी महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात भिक्षुकी करणाऱ्या भटक्या जमातीच्या पाच निरपराध लोकांना शेकडो लोकांच्या बेभान जमावाने क्रूरपणे ठेचून मारले. या नंतर सरकारने जागे झाल्याचे सोंग केले. यंत्रणांनी कारवाईचे देखावे सुरु केले. ४ जुलैला व्हॉट्सऍपने देखील खेद व्यक्त करण्याची औपचारिकता पार पाडत 'यावर अधिक सजगता बाळगली जाईल' अशी हवा सोडली. मुळात हा प्रश्न असा एका दिवसाचा वा एका घटनेचा नाही. याला प्रदीर्घ पूर्वनियोजित गैरवापर कारणीभूत आहे. आपल्याला पाहिजे तसा वापर करताना खोटे व्हिडीओ पाठवणे, खोट्या आकडेवारीवर आधारित माहितीचा डोंगर उभा करणे, प्रतिस्पर्ध्यांचे चारित्र्यहनन करण्यासाठी कोणत्याही स्तराला जाणे याचे राजकारण्यांना काहीच वाटले नाही. आधी विरंगुळा म्हणून हाती आलेला सोशल मीडिया नंतर व्यसनात रुपांतरीत झाला आणि सामान्य माणूस देखील आपली विकृती यातून खुलेआम व्यक्तवू लागला. त्यामुळेच धुळ्याच्या घटनेला अनेक पैलू आहेत. याला केवळ घटनासापेक्ष पाहून चालणार नाही तर याच्या मुळाशी जाणे अपेक्षित आहे.

रविवार, १ जुलै, २०१८

फेअरवेल टू आर्म्स'चा रम्य इतिहास..


मध्यंतरी सोशल मीडियावर 'सिक्स वर्ड स्टोरी'चा ट्रेंड भलताच व्हायरल होता. सहा शब्दांमध्ये जमेल ती गोष्ट सांगण्याचा प्रयत्न अनेकजण करत होते . या ट्रेंडचा नेमका अर्थ खूप कमी लोकांना ज्ञात होता ! या ट्रेंडला एक मोठा इतिहास आहे, विख्यात अमेरिकन लेखक, साहित्यातील नोबल पुरस्कार विजेता अर्नेस्ट हेमिंग्वेला याचं श्रेय जातं. १९३२ ते १९४५ या काळात त्याचं लेखन इतके गाजलं होतं की त्यावर तिकीट बारीची मोडतोड करणारे सिनेमे तयार झाले ! हेमिंग्वेचे सुरुवातीचे दिवस आणि नंतरचे दिवस यात जमीन अस्मानचा फरक असल्यानं त्याला लेखक म्हणून जी आयडेंटीटी हवी होती ती मिळाली नव्हती. एकदा तो आपल्या लेखक मित्रांसोबत चर्चा करत होता. मित्रांशी बोलताना आपल्यातल्या सिद्धहस्त लेखणीची ताकद सांगितली. यावर त्याच्या मित्रांनी आव्हान दिलं की ‘तो जर इतकाच भन्नाट लेखक असेल तर केवळ सहा शब्दात गोष्ट लिहून दाखवावी !' त्यांचं हे आव्हान जिव्हारी लागलेला हेमिंग्वे हळवा झाला. त्यानं तत्काळ गोष्ट लिहिली ! हेमिंग्वेनं लिहिलं होतं - 'न वापरलेले, तान्हुल्याचे बूट विक्रीला आहेत......' ( For Sale: Baby shoes, Never worn...) हेमिंग्वेचे हे शब्द खूपच लोकप्रिय झाले कारण त्यात अनेक गूढ, करूण आणि मृदू रंग भरले होते. हेमिंग्वेने मित्रांचे आव्हान स्वीकारून पैज जिंकली खरी मात्र इथून त्याची जगभरात ख्याती वाढली. लोकांनीही हा प्रयत्न करून पाहिला ! १९९० च्या दशकात युरोपात या गोष्टीचे पुन्हा पेव फुटले. सोशल मिडियावर दरवर्षी जून जुलैमध्ये Six Word Stories हा ट्रेंड आघाडीवर राहू लागला ! हा ट्रेंड याच काळात झळकतो कारण दरवर्षी २ जुलैला अर्नेस्ट हेमिंग्वेचा स्मरणदिवस साजरा होतो. विसाव्या शतकातील अमेरिकेचा सर्वश्रेष्ठ लेखक अन Six Word Storiesचा जनक असणारा अर्नेस्ट हेमिंग्वे एक अफलातून आयुष्य जगला अन एक दुर्दैवी शेवटाने गेला ! त्याच्या ५८ व्या स्मरणदिनाच्या औचित्याने हा लेख.

शनिवार, २३ जून, २०१८

निर्वासितांच्या प्रश्नावरील विनाशकारी मौन..


यंदाच्या जूनमध्ये जागतिक स्थलांतरितांच्या विश्वात दोन महत्वाच्या घटना घडल्या. बेकायदेशीर मार्गाने युरोपात घुसखोरी करण्याच्या एका प्रयत्नांत स्थलांतरितांची एक बोट भूमध्य समुद्रात उलटली. त्यात जवळपास ५० लोकांना जलसमाधी मिळाली. त्यातील ४७ मृतदेह ट्युनेशीयाच्या किनाऱ्यावर आढळून आले आहेत. ६८ जणांना वाचवण्यात यश आले आहे. घटनेतील सर्व मृत अस्थिर असलेल्या आखाती देशातील होते. बोटीत नेमके किती लोक होते याची आकडेवारी अजूनही समोर आलेली नाही. या नंतरची दुसरी घटना जीवितहानीची नव्हती पण त्याने जगाचे लक्ष वेधले. अमेरिका-मेक्सिको सीमेवर आपल्या आईची झडती घेताना भेदरलेल्या अवस्थेतील रडणाऱ्या बालिकेच्या फोटोला जगभरातील माध्यमांनी प्रसिद्धी दिली. टर्कीच्या सीमेवर वाहत आलेल्या चिमुकल्या सिरीयन मुलाच्या मृतदेहाच्या फोटोने जगात जशी खळबळ उडवून दिली होती तशीच खळबळ याही घटनेने उडाली. या दोन घटनांमुळे जगभरातील स्थालांतरितांचे प्रश्न पुन्हा चर्चेत आले. विशेष म्हणजे मागचं वर्ष याच मुद्द्यावर एक निराशाजनक नोंद करून गेलं. गतवर्षीची जगभरातील निर्वासितांची संख्या तब्बल सोळा दशलक्षाहून अधिक झाली. ही आकडेवारी जाहीर व्हायला आणि या दोन घटना एकाच वेळी समोर आल्याने यावर सुंदोपसुंदी सुरु झालीय.

मंगळवार, १२ जून, २०१८

जात्यावरच्या 'ओवी'चं आशयसंपन्न विश्व - #ओवी_गाथा !



#ओवी_गाथा - १०

"संगत करं नारी दुरल्या देशीच्या पकशा

खडीच्या चोळीवर त्याच्या नावाचा नकशा."

एखाद्या स्त्रीने गावाबाहेरील वा बिरादरीबाहेरील परपुरुषाशी सूत जुळवले तर ते संबंध लपून राहत नाहीत. त्या 'दूर देशाच्या पक्षाचं' नाव गाव तिच्या मनावर कोरलं गेल्याने तिच्या चोळीत देखील त्याचं प्रतिबिंब उमटते. तिचं न्हाण झाल्यावर खडीवर वाळत घातलेल्या तिच्या चोळीवर त्याच्या नावाचा नकाशाच पाहायला मिळतो !!
________________________________________

#ओवी_गाथा - ११


"गुणाच्या माणसा गुण केलेस माहेरी

धन्याची कोथिंबीर वास मळ्याच्या बाहेरी."

रानात धने पेरले तर त्याची कोथिंबीरच उगवते. रानात उगवलेली कोथिंबीर कितीही झाकून पाकून ठेवली तरी तिचा वास दूरवर जातो आणि माणूस लांबूनच ओळखतो की मळ्यात धनं पेरलंय. त्यासाठी कुणाच्या कानात सांगावं लागत नाही ते कळतंच. तसेच एखाद्या स्त्रीचे / पुरुषाचे लग्नाआधी काही गुण उधळून झाले असले तरी ते उघड होतातच. त्याचा दरवळ कधी ना कधी होतोच ...
________________________________________

#ओवी_गाथा - १२

"ऊठवळ नार बसती इथतिथ

भरताराला पुस आपल्या भोजनाच कसं"

संसारात नीट लक्ष नसणारी केवळ नट्ट्यापट्ट्यावर ध्यान असणारी स्त्री 'उठवळ बाई' म्हणून ओळखली जाते. ही उठवळ बाई आपलं घरदार सोडून जगाची दारं पिटत बसते. त्यातून वेळ मिळाल्यावर घरी येथे आणि उपाशी बसलेल्या आपल्या नावऱ्यालाच विचारते की आता जेवणाचं काय / कसं करायचं ?
________________________________________

#ओवी_गाथा - १३

"पिकली पंढरी पंढरी, दिसते लई हिरवीगार

देवा इठ्ठालाच्या तुळशीला, सदाचाच बहर ....."
________________________________________

#ओवी_गाथा - १४

रुक्मिणीची चोळी, अभंगाने भरली दाट
देवा विठ्ठलाला जवा, लाविला हरिपाठ..
________________________________________

#ओवी_गाथा - १५

इंद्रायणीचा देवमासा, देहूला रे आला कसा
जात नव्हती माशाला, होता भक्तीचा वसा.
________________________________________

#ओवी_गाथा - १६

कुणबी निघालं शाहू, मला वांग्याचा तोडा
थोरलं माझं घर, मला येईना एक येढा,
काहूर नाही तरी, मनी आनंदाचा ओढा !

दैवाने काहीही सांगितले असले तरी माझे पती हे कुणबी निघाले. थोडक्यात माझ्या नशिबी कष्टच आलॆ. अशा वेळी धनी तरी काय करणार ? कधी चुकून दागिने मागितले तर जास्तीत जास्त तो वांग्याचा तोडा देईल. माझा पती घरातला सर्वात थोरला आहे म्हणून की काय त्याच्या वाट्याला कष्ट जास्ती आले आहेत, आम्ही नुसतेच श्रम करतो आहोत. अन आजतागायत त्याने मला सोन्याचा एक वेढा (सर) देखील दिलेला नाही. पण म्हणून काय मी नाखूष नाही, मी माझ्या संसारात सुखी आहे.
____________________________________

"लई चांगुलपण घेते पदराच्या आड
बाळायाची माझ्या सूर्यावाणी परभा पडं..'

माझे बाळ खूप लोभस आहे, खूप देखणे आहे. त्याचबरोबर त्याच्या अंगी खूप सद्गुण आहेत. पण कधीकधी अति देखणं असणं किंवा चांगलं असणं अंगाशी येऊ शकतं म्हणून त्याला लोकांपासून वाचवण्यासाठी मी त्याला पदराआड घेते. पदराआड घेतले की तो छातीला बिलगून शांतपणे झोपी जातो. त्याला पदराआड ठेवल्याचे कुणाला कळलेही नसते पण तसे होत नाही. कारण माझ्या बाळाचं तेज इतकं आहे की त्याची प्रभा पदराआडून बाहेर येते आणि माझ्या सर्वांगावर विलसते....
_____________________________________
#ओवी_गाथा - १८

बाळाला म्हण बाळ बाळ दिसत बेगड

सांगते बाई तुला फुटली अंगणी दगड

काही बायका माझ्या बाळाच्या देखणेपणावर मत्सर भाव मनात राखून टोमणे मारतात. खरे तर त्यांना माझ्या बाळाचा चांगुलपणा, त्याचं कमालीचं सुंदर रुपडं सहन होत नसतं. त्या उद्विग्नतेतून त्या काहीबाही बोलत राहतात. मग एखादी माझ्या बाळाला बेगड (खोटं नाटं सौंदर्य) म्हणतात. पण काय सांगू तुम्हाला, तिने असं टोचून बोललेलं देवालाच सहन होत नाही. तिच्या बोलण्यावर तो नाराजी दाखवतो आणि तिचे बोलणे पूर्ण होते नाही होते तोवर अंगणातला मोठाला आपसूक दगड फुटतो. जणू काही तो तिला सांगतो की, 'बये, तोंड आवर, बाळाला नावं ठिवू नकासा'....

________________________________________
#ओवी_गाथा - १९

काजवे फुलले फुलले बाई लाख लाखाचं

सांगते बाई बाळायाच माझ्या मुख राजसाचं

माझ्या बाळाचे तेज कसे आहे म्हणून सांगू तुम्हाला ? त्याचा प्रकाश माझ्या मुखी पडतो हे तर मी सांगितलेच आहे. पण जगाला कसं सांगू की नेमका प्रकाश आहे तरी किती आणि कसा ? तर, सांगतेच. ऐका, माझ्या बाळाचा मुखडा खूप लोभस आहे. तो राजस आहे. त्याच्या तेजाची तुलना करायची झाली तर अंगणी लाख लाख काजवे प्रकाशमान झाल्यावर जितका उजेड पडेल तितकी आभा त्याच्या चेहऱ्याची आहे. मग माझे बाळ किती तेजस्वी आहे याचा तुम्हीच अंदाज घाला ...

___________________

#ओवी_गाथा - २१

बाईचा जलम नको देऊ देवराया
रस्त्यानी चालता निंदा करीती आईबाया

वरवर पाहता ही ओवी अगदी सर्वसामान्य वाटते. कुणा एका स्त्रीची एक कैफियत इतकंच तिचं स्वरूप समोर येतं. पण आशयचित्र असं नाहीये. जात्यावर ओव्या म्हणताना एकामागून एक विषयावर एक सलग ओव्या त्या मायबहिणी गात असतात. भक्तीपासून संसारापर्यंतचे विषय येऊन जातात आणि जेंव्हा स्त्रीच्या व्यथांचा विषय येतो तेंव्हा प्रत्येक जण ओवीमधून आपलं मत मांडू लागते. पण यातलीच एक चतुर असते, ती नकळत सर्व स्त्रियांनाच टोमणे मारते. ती म्हणते बाईचा जन्म देऊ नकोस. आता तुम्ही म्हणाल यात काय विशेष ? हे मागणं आजकाल केवळ ग्रामीण स्त्रियांच्याच तोंडी आढळतं असं काही नाही, तर अनेक शहरी स्त्रियांच्या तोंडून देखील हे वाक्य ऐकायला येते. या ओवीतली खरी गंमत पुढच्या पंक्तीत आहे. ती म्हणते, बाईचा जन्म का नको तर रस्त्याने चालताना आईबायाच एकमेकीची निंदा करतात. पुरुषांनी बाईची निंदा करायची गरजच पडत नाही स्त्रियांची इतकी निंदा स्त्रियाच करत असतात. मग त्यात जन्मदात्री आई देखील इतर उठवळ स्त्रियांच्या सोबत असते ! आई आणि बाया हे शब्द एकत्र जोडून विलक्षण अर्थ साधला आहे, केवळ यमक जुळवणे इतकेच या ओवीचे कसब नसून स्त्रीमनाची यथार्थ खंत व्यक्त करणे हा देखील हेतू आहे... कुठलंही शिक्षण न घेतलेल्या गतकाळातल्या माझ्या मायबहिणी खरोखरच प्रतिभाशाली आणि विचारी होत्या... 
______________________________

निळ्या सावळ्या आभाळाची मिठी सैल झाली
काळ्या मातीच्या ऐन्यात कंच शेतं अंकुरली
कुण्या पुण्याईने कुणब्याच्या पोटी जन्म उद्धारली
ओवी मातीत जन्मलेली ओठी मेघांच्या बहरली
कोण कौतिक हिरवाईचे शब्दे कविता पाझरली
हात राबता रानामध्ये सारी सृष्टी की तरारली
नाचे पानोपानी श्रीरंग घुमे रानोमाळी बासरी
पिके मोत्याचे शिवार वारा गाई त्याची गाणी
झुले गंधवेडया सावलीत बांधावरची बाभूळराणी
येता उधाण धरतीला थिटे पडती हात दोन्ही !

_______________________________
#ओवी_गाथा - २२
आली आगोटी रेटूनी घेते अधुली हातात
डेाई बियाची पाटी मैना जाती शेतात


मनासारखा पाऊस सगळीकडे झाला की बळीराजा पेरणीच्या कामांची घाई करतो. त्याची कारभारीण देखील त्याच्या हातात हात घालते. बळीराजा रामप्रहरीच उठून रानात जातो, त्याच्या मागोमाग त्याची कारभारीण देखील बेगीनं घरातली कामं आवरून जाते. घरातली कामं वेळेत पुरी करण्यासाठी ती दोघं लवकर उठलेली असतात. सकाळीच तिचा स्वयंपाक आटोपलेला असतो. मुलांच्या आंघोळी पांघोळी उरकून ती एका फडक्यात भाकरी गुंडाळून घेते, चुलीला नमस्कार करून तिच्या पोटातली आगटी आत सारते, समोर साठलेल्या राखेला मागे सारून त्यावर थोडं पाणी शिंपडते. स्वतःचं आवरून घेते आणि कोनाड्यात ठेवलेली अधुली (शेर, पायलीसारखे माप) हातात घेते. शेजाऱ्याला घराकडे लक्ष द्यायला सांगून डोक्यावर उतळी घेऊन ती शेताकडे झपाझप पावले टाकू लागते. तिच्या डोक्यावरच्या उतळीत (दुरडी / पाटी) पेरणीचं बियाणं आणि दुपारसाठीची भाकरी असते. वाटंनं येणाऱ्या जाणाऱ्याकडे न बघता ती तडक शेत गाठते आणि कारभाऱ्याला कामात मदत करू लागते. 
पावसानंतर पेरणीची लगबग सुरु होताच पूर्वी खेडोपाडी हे चित्र ठरलेले असे. आता काळ पुष्कळ बदललाय पण सुविधा आल्यात, शेतीची पद्धतही बदललीय पण त्या काळात जी अवीट गोडी होती ती या शेतीतही नाही, पिकातही नाही, गावकुसात नाही आणि आताच्या माणसांत तर नाहीच नाही. जात्यावरच्या या ओव्यातून गतकालीन स्मृतींना पुन्हा पुन्हा जगता येतं हे ही काही कमी सुख नाही ! होय ना ?
_________________________

#ओवी_गाथा २४ -

'आला आला रुखवत त्यात होता तवा; विहीणीनं पेटवली चूल, सरपणात चंदन जाळत हुतं तवा !'

या उखाण्यात चूल आहे ! तेंव्हा उखाण्यात अतिशोयक्ती असे. यांचं द्वंद्व चाले आणि जी हरत असे तिला आपल्या नवऱ्याचे नाव घ्यावे लागे असा ग्रामीण भागात तेंव्हा रिवाज होता. अजूनही नाव घेण्याची प्रथा काही ठिकाणी आहे पण असा नखरेल मुकाबला आता होत नाही आणि आला आला रुखवताची जादूही उरली नाही. या उखाण्यातली विहिण सांगते की, कधी काळी व्याही खूप श्रीमंत होते, तेंव्हा चुलीत चंदन जाळलं जायचं, तेंव्हाच काय ते विहीणीने तेंव्हाच काय तो स्वयंपाक केला आहे. आताच्या काड्या काटक्यांच्या सरपणावर चूल पेटवताना तिची दमछाक होते ! ...
आता तो काळ निघून गेलाय. लग्न आकसत गेलीत, रुखवत मोडीत निघालेत आणि चूलही गेलीय. बदल चांगला असतो.

चुलीबद्दलच्या आठवणी काळजाला घर पाडणाऱ्या आहेत, एकदा जुन्या जखमांची खपली निघाली की त्यातून सावरायला खूप त्रास होतो. चुलीपुढे बसून धग लागल्यागत होते. स्मृतींचे सरपण धडाडून उठते आणि डोळ्यात गेलेल्या धुराने पाणी येण्याऐवजी फुकारी फुंकणारे तळहाताच्या रेषा झिजलेले निस्तेज मलूल हात आता उरले नाहीत या जाणीवांनी डोळे ओले होतात.

आज सोशल मीडिया 'चूलमय' झालाय पण आपल्या सासर माहेरच्या गतकाळातील बायकांनी काय काय सोसले असेल हे चुलीला जेव्हढे माहित असेल तेव्हढे कुणाच्याच बापजाद्यांनाही माहिती नसेल, कारण त्या काळातल्या बायका कुणापुढेच व्यक्त होत नव्हत्या, त्यासाठी त्या चूल पेटवायची वाट बघायच्या. चूल धडाडून पेटली की त्या उबेने त्यांना कधी बरे वाटायचे कारण मायेच्या उबेच्या त्या भुकेल्या असत तर कधी आवर्जून पश्चात्तापासाठी धग लागून घ्यायच्या. सर्वात महत्वाचे म्हणजे आर पेटण्याआधी जो धूर यायचा ना तेंव्हा या आयाबाया खूप रडून घ्यायच्या ! सर्वांना वाटे की धुरामुळे यांच्या डोळ्यात पाणी आलंय, मग चुलीलाच यांची दया यायची आणि ती आस्ते कदम जळत रहायची.

डोईवरचा पदर सावरत घामेजल्या अंगाने अन उपाशी पोटानं या मायमाऊल्या हात चालवायच्या. पेटलेलं सरपण चुलीला चटके द्यायचं आणि घरादारातल्या माणसांच वागणं या बायकांना चटके द्यायचं ! तरीही कुणीच तक्रार केली नाही. चुलीनेही नाही आणि त्या बायकांनीही नाही !

चुलीत घाला म्हणणे सोपे आहे पण त्या साठी आधी चुलीतलं जळणं जगलेलं असावं !
तो काळच भारलेला होता आणि त्यातली सच्चाई, साधेपणा मनाला भावणारा होता याची प्रचीती वरील ओव्यातून पुन्हा पुन्हा येते. 
_______________________________________     
दसरा, दिनांक - ०८/१०/१९
                                 
पहिल्या पंगतीला माझ महिरळ जेवू द्या
तुरण्याच्या दुरड्या इड पानाच येऊ द्या

पहिल्या दसऱ्याच्या दिवशी सुनेच्या माहेरची माणसं आलेली असतात, माहेरावरून आलेली मंडळी प्रवासाने दमलेली असतात. शिवाय त्यांना लगेच माघारी जायचं असतं. तेंव्हा ती सासुरवाशीण पोर तिच्या सासरच्या मंडळींना विनविते की जेवणाच्या पहिल्या पंगतीस माझ्या माहेरची मंडळी जेवू द्यात. दुरडयातली सामग्री आणि विडेही संगे घेऊन या. 

पुढच्या ओवीत ती म्हणते, 
थोरली जाऊबाई टाक पानात येलदोडा
बंधूच्या बरोबर पान खातो माझा चुडा 

आपल्या ज्येष्ठ जाऊबाईस ती सांगते की तिच्या पतीसाठी (ज्याला ही आपला भाऊ मानते) जो पानविडा बनवत आहे त्यात थोडेसे वेलदोडेही टाक कारण तुझ्या पतीसॊबत माझा पतीही (माझा चुडा) ते पान खाणार आहे. 

जेवणं उरकतात, तिच्या माहेरची मंडळी तिचा निरोप घेऊन निघतात. मग ती हळदओल्या अंगाची सून आपल्या पतीला आणि धाकट्या नणंदेला घेऊन शेतात जाते. कारण दसऱ्याचा सण असला तरी तिथेही औजारांची पूजा करायची आहे आणि पूजा झाल्यानंतर उरलं सुरलं काम करायचं आहे. ते तिघं जण रानात जातात. औजारांची सफाई होते, पूजन होते मग तिचा नवरा कंबर कसून काम करतो. तोवर उन्हं कलायला येतात. दिवसभरच्या श्रमाने तिच्या गोऱ्यापान नवऱ्याचा रंग लालबुंद होऊन जातो. तो थकून जातो आणि बांधावर बसून थंड पाणी पिऊ लागतो, तेंव्हा तिची धाकटी नणंद हातातल्या पंख्याने वारा घालू लागते, यावर ती म्हणते -           
माझ्या चुड्याचं सोनं उन्हानं होता लाल
लाडाची नणंद कामीनी बाई वारा घालं 

ओव्यात जे स्नेह प्रेम, जी माया उत्कटता अनुभवता येते ती अन्य काव्यप्रकारात इतक्या आर्ततेनं क्वचित अनुभवास येते.


#ओवीगाथा  २५
___________________________________ 

पाभार बाईचा चाक जोड जाईचा
आता माझ्या बाळा नंदी घरच्या गायीचा

आजही बहुतांश भागात पाभर वापरून पेरणी केली जाते. जात्यावरच्या ओव्यात माझ्या मायमाऊल्या या पाभरीला बाईचं संबोधन देतात.       
पाभर स्त्रीलिंगी शब्द आहे म्हणून नव्हे तर माती ही आई आहे, तिच्या कुशीत बीज रोवण्याचं काम पाभर पार पाडते. 
एका अडलेल्या स्त्रीची सहज सुलभ प्रसूती एक निष्णात दाई अधिक चागल्या प्रकारे करू शकते कारण तिला त्यातले बारकावे आणि खाचाखोचा माहिती असतात, अगदी तसंच मातीच्या गर्भात बीज रोवताना तिची काळजीपूर्वक हाताळणी होणं हे मोठं कसबाचं काम आहे. 
म्हणून पाभरीला जात्यावरच्या ओवीत स्त्रीरूप दिलंय. 
पाभरीच्या तोंडापाशी चाकासारखं दिसणारं चाडं असतं ज्यातून मूठ मूठ दाणे टाकले जातात जे पाभरीच्या नळीतून फणावर येतात आणि मातीत विसावतात. दिंडावर पाय टाकून उभं असलं की पाभरीचे फण खोल रुतून असतात, रूमण्याचा आधार घेऊन बळीराजा दिंडावर उभा राहतो. बैलजोड पाभर ओढत जाते आणि बघता बघता वावर पेरून होतं.

ओवीतली ओळ अशी आहे की पाभार बाईचा चाक जोड जाईचा ! - म्हणजे काय ?
तर या पाभरीचं जे जाक जोड (चाडे) आहे ते जाईच्या लाकडापासूनचे आहे असं ती सांगते. आता जाईच्या लाकडाचे काय ते विशेषत्व ? 
खरे तर दिंड, फण आणि चाडे हे सगळेच बहुतांश करून बाभळीच्या लाकडापासून बनवले जाते. मात्र इथे ओवीत जात्यावर दळणारी माऊली जाईच्या लाकडाची गोष्ट करतेय. 
जाईच्या लाकडाचा पृष्ठभाग खरमरीत असला तरी कालांतराने ते मऊ होत जातं, नंतर त्याला एक विशिष्ठ गंध प्राप्त होतो. हा गंध त्या पेरणीतल्या बियांना लाभावा आणि पाभरबाईच्या हातांनी पेरलेलं बीज सुगंधित व्हावं !

ओवीत ती पुढे म्हणते की, आता माझ्या बाळा नंदी घरच्या गायीचा. 
जात्यावर भल्या सकाळी उठून धान्य दळताना आपल्या मुलाची थोरवी सांगतानाची ही ओवी आहे. 
माझ्या मुलाकडे आता जी बैलजोड आहे ती काही बाजारातून विकत आणलेली नसून घराच्या गायीच्या पोटी जन्मलेल्या गायीची तो वंश आहे असं ती मोठ्या खुबीने सांगते. याचा तिला कोण आनंद आहे !
पाभरबाई, चाक जोड जाई आणि गायी असं यमकही यात जुळवलं आहे. 
वरवर ही यमक जुळवणी वाटत असली तरी या ओवीला मातीचा अमीट सुगंध आहे जो आईच्या स्निग्ध मायेच्या तोडीचा आहे. 
कसलंही शालेय शिक्षण न झालेल्या माय माऊल्यांनी या अवीट गोडीच्या ओव्या कशा रचल्या असतील या कोड्याचे उत्तर काही केल्या सापडत नाही हे खरेच आहे.. 

#ओवीगाथा  २५
______________________________________

( मागील दोन वर्षात #_ओवीगाथा या tag मधून अनेक जुन्या ओव्या आणि त्यांचे अर्थ लिहून झालेत. याचे पुस्तक काढावे का, याचे पुस्तकरूप कुणी प्रकाशित करेल का आणि मुख्य म्हणजे या पुस्तकाचे वाचन होईल का या प्रश्नांवर थोडासा गोंधळून गेलोय. गावाकडच्या जात्यावरच्या ओव्या जात्या पाठोपाठ कालबाह्य झाल्या पण त्यातला अर्थ आणि गोडवा कधीच कालबाह्य न होणारा आहे. यामुळे या दुर्लक्षित विषयावरही बऱ्यापैकी लिहून झालंय. ही शब्दशिदोरी पुढे कशी पोहोचवायची याचे नेमके उत्तर मात्र माझ्याकडे नाही.)

सोमवार, ११ जून, २०१८

लालूप्रसाद यादव - बिहारी बाबूंचा जिव्हाळयाचा माणूस ...


वक्त का पता नही चलता अपनों के साथ,
पर अपनों का पता चलता हैं वक्त के साथ…

बिहारी जनता अजूनही लालूंवर प्रेम करते. 
हा माणूस सगळीकडे आपल्या बोलीत, आपल्या लेहजात बोलतो. साधं राहतो याचंसगळं दिनमान आपल्यासारखं आहे याचं बिहारच्या ग्रामीण जनतेस अजूनही अप्रूप आहे. बिहारी माणूस लालूंचा अजूनही पुरता द्वेष करत नाही, कुठे तरी सिम्पथी अजूनही आहे. लालू प्रसाद यादव यांचा जन्म ११ जून १९४८ चा. आपल्या भावाबहिणींत सर्वात लहान असलेले लालू लहानपणीही गोलमटोल होते, यामुळेच घरच्यांनी त्यांचे नाव लालू ठेवले होते.

मंगळवार, ५ जून, २०१८

जुना पाऊस..


प्रत्येक पावसाळा तिची आठवण घेऊन येतोच.  
खिडकीतून दिसणारया शाममेघांत तिचा भास  होतोच......
"भिजलेली ती आणि तिला भिजवण्यात आनंद मानणारा रमत गमत पडणारा पाऊस. 
रुणझुणत्या पावसात छोट्याशा हातगाड्यावर सुगंधी चॉकलेटी वाफाळता चहा
पिताना तिच्या किनकिणाऱ्या बांगड्या, तिनें मान डोलवली की हेलकावे खाणाऱ्या इअररिंग्ज.
ओलेते कपडे नीटनेटके करताना कपाळावर पुढे येणाऱ्या कातिल बटा.

शनिवार, २ जून, २०१८

रक्त पेटवणारा कवी – नामदेव ढसाळ



विश्वाला कथित प्रकाशमान करणाऱ्या दांभिक सूर्याची खोट्या उपकाराची किरणे नाकारून आपल्या सळसळत्या धमन्यातून वाहणाऱ्या रक्तात अगणित सुर्य प्रज्वलित करून क्रांतीची मशाल पेटवित सर्वत्र विद्रोहाची आग लावण्याची भाषा कुणी कवी जर करत असेल तर त्या कवीच्या धगधगत्या प्रतिभेकडे सगळ्यांचे लक्ष वेधले जातेच. अशा कवीची आणि त्याच्या कवितांची दखल घेणे अनिवार्य ठरते. किंबहुना कोंबडे झाकून ठेवले तरी सूर्य उगवायचा राहत नाही या उक्तीनुसार अशा कवितेस प्रस्थापितांनी डावं ठरवण्याचा यत्न केला तरी व्हायचा तो परिणाम होतोच. नामदेव ढसाळांच्या 'गोलपिठा' या काव्यसंग्रहातली 'रक्तात पेटलेल्या अगणित सुर्यांनो.....' ही कविता असाच इतिहास मराठी साहित्यात घडवून गेली. या कवितेसकट समग्र 'गोलपिठा'वर आजवर अनेकांनी चिकित्सा, टीकासमीक्षा केली आहे. रसग्रहण केले आहे. तरीही व्यक्तीगणिक वैचारिक बदलानुसार त्यात नित्य नवे काहीतरी तत्व सत्व सापडतेच. त्यात ही छोटीशी भर ठरावी. विद्रोही कवितांचा विषय निघावा आणि कविवर्य नामदेव ढसाळांचा उल्लेख त्यात नसावा असं होऊ शकत नाही. ढसाळ हे या विद्रोही कवींचे शीर्षबिंदू ठरावेत आणि त्यांचा 'गोलपिठा' हा या कवितांचा प्रदिप्त ध्वजा ठरावा इतपत या विद्रोही काव्यात नामदेव ढसाळांच्या कवितेचा ठसा उमटला आहे.

दया पवार- 'कोंडवाडा' - एक व्यथा ....



'शिळेखाली हात होता, तरी नाही फोडला हंबरडा
किती जन्मांची कैद, कुणी निर्मिला हा कोंडवाडा......'


काही कविता इतिहास घडवून जातात अन कालसापेक्षतेच्या कसोटयांच्या पलीकडे त्यांचे अस्तित्व टिकून राहते. विद्रोही कवितांनी साहित्याची ध्वजा उंच करताना सुखात्म जगात मश्गुल असणारया साहित्य विश्वास समाजभानाचे असे काही चटके दिले की मराठी साहित्यात विद्रोहाची धग प्रखर होत गेली. 

गोष्ट आधार कार्डच्या मृत्यूची ...

अन्नावाचून मेलेली बुध्नी  

अमेरिकेत लोकप्रिय असलेल्या व मोठ्या प्रमाणात वाचल्या जाणारया 'द न्यूयॉर्कर' या नियतकालिकाच्या १६ मे च्या आवृत्तीत एक लेख प्रकाशित झालाय. 'हाऊ इंडियाज वेल्फेअर रिव्हॉल्युशन स्टार्व्हिंग सिटीझन्स' असे त्याचे शीर्षक आहे. यात झारखंडमधील उत्तम कुवर महतोच्या आईच्या मृत्युच्या घटनेचा हवाला देऊन अनेक गंभीर आरोप केले गेलेत. लेखातील काही बाजू महत्वाच्या आहेत पण लेखाचा मुख्य आधार असणारी घटना काही अंशी आपला रंग बदलत गेली. त्यामुळे यावर प्रकाश टाकणे हिताचे ठरते. भारतातील धान्य वितरण व्यवस्थेतील साठेबाजी, काळा बाजार आणि दडपशाही यावरही या लेखात प्रकाश टाकला गेलाय.

मंगळवार, २९ मे, २०१८

प्रणवदांच्या भेटींचे अन्वयार्थ...


राजकारण करताना अनेक बाबी मुद्दाम दुर्लक्षिल्या जातात तर जाणीवपूर्वक काही बाबींचे चुकीचे चित्र निर्माण केले जाते. एखाद्याचा वापर करायची वेळ येते तेंव्हा अनेक घटकांचं विस्मरण केलं जातं. आरएसएस आणि त्यांचे समर्थक कायम आणीबाणी काळातील घटनांवरून काँग्रेसला आरोपीच्या पिंजरयात उभं करण्याची संधी शोधत असतात.

शनिवार, २६ मे, २०१८

गर्भपाताचे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय राजकारण


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांनी अनैच्छिक गर्भधारणा टाळण्यासाठी केल्या जाणाऱ्या गर्भपाताच्या धोरणाबद्दल नुकतेच एक विधान केले आहे. डोनल्ड ट्रम्प यांनी जेंव्हा अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरला होता तेंव्हा त्यांनी काही महत्वाची आश्वासने देताना तीच आपली मुलभूत धोरणे आणि विचारधारा असेल असे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यात 'अमेरिका फर्स्ट' अग्रस्थानी होते, इस्लामी मुलतत्ववाद्यांना लगाम घालणे हे दुसऱ्या क्रमांकाचे धोरण होते आणि तिसरा मुद्दा होता गर्भपातांना रोखण्याचा. मागील कित्येक टर्मपासून अमेरिकन राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीत गर्भपाताच्या मुक्त धोरणाला विरोध वा पाठिंबा आणि विनापरवाना बंदुका बाळगण्यास विरोध वा पाठिंबा हे दोन मुद्दे कायम चर्चेत असतात. रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट दोघेही आलटून पालटून या मुद्द्यांवर फिरून फिरून येतात. पण किमान या धोरणात फारसा फरक पडलेला दिसून येत नाही. वारंवार अज्ञात माथेफिरू बंदूकधाऱ्याने गोळीबार करून अनेकांच्या हत्या केल्याच्या बातम्या येतात. त्रागा व्यक्त होतो पण धोरण बदलले जात नाही. गर्भपाताचेही असेच होते. पण डोनल्ड ट्रम्प हे हेकट, हट्टी स्वभावाचे आणि धोरणांचे दूरगामी परिणाम काय होतील याकडे लक्ष न देता आपल्या विचारांना साजेशा धारणांची पाठराखण करतात.

शुक्रवार, २५ मे, २०१८

अनुवादित कविता - ओबेदुल जाबिरी : इराक, उर्दू कविता

ज्या इराकमध्ये गृहयुद्ध आणि अशांतता यांनी राज्य केलं आहे तिथले कवी ओबेदुल जाबिरी यांच्या फेडिंग (म्लान) या कवितेचा हा स्वैर अनुवाद आहे. आसपास जिथं तोफांचे आवाज घुमतात आणि मृत्यूचे तांडव चालते तिथल्या एका कवीला शांतीदूत समजल्या जाणारया कबूतराच्या वृद्धत्वावर कविता सुचावी हेच मुळात गूढरम्य आहे... एक विलोभनीय शब्दचित्र साकारण्याची ताकद या कवितेत आहे. कविता आणि जगणं समृद्ध व्हावं असे वाटत असेल तर असलं थोडंफार तरी वाचलंच पाहिजे...

ती मादी कबूतर जेंव्हा वयस्क होईल.
तेंव्हा तिचे पंख करडे होत जातील, तिचं हुंकार भरणं दमत जाईल.
तेंव्हा कल्पना करा ती कुठे जाईल ?
कोवळ्या चिमण्यांसाठी ती दिशादर्शक आरशात परावर्तित होईल काय ?
की एखाद्या मूक खिडकीला गाता यावं म्हणून डहाळी होईल काय ?
विस्कळीत थव्यातून फडफडताच तिचे पंख आपल्याला मिळावेत
अशी मनीषा असणाऱ्या वाटसरूची ते कशी काय माफी मागेल.
छाती फुगवून अंगणातून ती कशी काय उडेल
वा गवताच्या पात्यांना कसे काय भूलवेल ?
बहुधा ती एखाद्या दयाळू मुलाची प्रतिक्षा करेल,
जो तिला गव्हाचे भरडलेले दाणे चारेल !
की वृद्धत्वाच्या आसक्तीला चेतविणारी एखादी ज्योत होईल ?
किंबहुना स्वतःच्या दुःखाचे
मुक्त खिडकीत आणि लोखंडी पिंजऱ्यात ती विभाजन करेल !
कदाचित ती एक पेशेवर रुदाली होऊन जाईल
अन पक्षांच्या अंत्यविधीत रुदन करत राहील.
कल्पना करा, तिच्या अशा अवस्थेत
मायाळू झाडे तिला तळाची फांदी बहाल करतील
अन तिचे एकेकाळचे शेजारी निर्विकार होतील तेंव्हा ती कोठे जाईल ?
नियतीच्या न्यायाचे कातळओझे तिच्या म्लान फिकट पंखांना पेलवेल का ?

मंगळवार, २२ मे, २०१८

औरंगजेब.. कडवा धर्मवादी सम्राट



बादशहा होताच औरंगजेबाने स्वत:ला आलमगीर म्हणजे जगज्जेता व गाझी म्हणजे धर्मयोद्धा घोषित केले. सुन्नी धर्माचा प्रसार करण्यास तो कटिबद्ध झाला. हिंदुस्थान या ‘दार ऊल हरब’ म्हणजे मुस्लीम राजवट नसलेल्या देशाचे ‘दार ऊल इस्लाम’ बनवणे हे त्याचे ‘फर्जे ऐन’ म्हणजे अटळ धार्मिक कर्तव्य बनले. हे कर्तव्य बजावताना झालेले अन्याय-अत्याचार धर्माच्या दृष्टीने क्षम्य असतात. सुन्नी नीतिमत्ता अमलात आणण्यासाठी त्याने ‘मुहनासीब’ हे धर्माधिकारी नेमले. अकबराने हटवलेला जिझिया कर पुन्हा लादला. देवळे पाडण्याचा हुकूम जारी केला. दारूबंदी कडक करून दरबारात संगीताला मनाई केली. त्यामुळे इस्लामी जगतात त्याचे नाव झाले...."

औरंगजेबचे पूर्ण नाव अबुल मुज़फ्फर मुहिउद्दीन मुहम्मद औरंगजेब आलमगीर असे होते. त्याला दिल्या गेलेल्या ‘आलमगीर’, ‘औरंगजेब’ या खिताबांचा अर्थ विश्‍वविजेता असा होतो. अकबर व ताजमहल-शाहजहानवरील अनेक लेखांत औरंगजेबाचे उल्लेख वारंवार येऊन गेले आहेत. भारतातील कडव्या मुस्लीम वृत्तीचा जनक व हिंदू-मुस्लीम वैराच्या कारणीभूत घटकापैकी एक औरंगजेब होय. त्याच्या आयुष्यातील घटनाचक्र विचारात टाकणारे आहे. धर्मसंशोधक इतिहासकारांसाठी तो एक विलक्षण चिंतनविषय आहे. औरंगजेबचा जन्‍म ४ नोव्‍हेंबर १६१८ रोजी गुजरातेतील दाहोदमध्‍ये झाला. शाहजहाँ आणि मुमताजचा तो सहावा मुलगा होता. त्‍याने अरबी आणि फारसीचे शिक्षण घेतले होते. औरंगजेब दिर्घायुषी निघाला. तो ८९ वर्षाचे आयुष्य जगला (१६१८ – १७०७). संपूर्ण सतराव्या शतकावर एक प्रकारे त्याची छाया पसरलेली आहे. खुर्रम म्हणजे शाहजहाँ व मुमताज या असामान्य जोडप्याच्या हयात असणारया चार पुत्रांपैकी तो नंबर तीन. दाराशुकोह आणि शाहशुजा हे त्याच्यापेक्षा मोठे होते तर मुराद हा धाकटा होता.

शनिवार, १२ मे, २०१८

मलेशियातील निवडणुकीचे अन्वयार्थ


मलेशिया हा आशिया खंडातील बलाढ्य देश म्हणून ओळखला जातो. त्याची आर्थिक ताकद अफाट आहे. विकासाची भूक देखील मोठी आहे. मुस्लीमबहुल देश असला तरी कट्टरपंथी अशी आपली ओळख होऊ नये याची तो काळजी घेतो, सोबत मुस्लिमांचे मर्जी सांभाळताना त्यांचे हितही जपतो. ‘आसियान’ समूहातील मलेशियाचे स्थान सर्वोच्च आहे. भारताचे मलेशियाशी संबंध नेहमीच अंतर राखूनच राहिले आहेत. आशिया खंडात महासत्ता व्हायचे हे भारतीयांचे स्वप्न आता लपून राहिलेले नाही. कदाचित यामुळेही अन्य बलवान आशियाई राष्ट्रे भारताविषयी सावध भूमिका घेतात. दोन्ही देशांची एकमेकाविषयी धोरणे आणि प्रतिमा बऱ्याच प्रमाणात निश्चित आहेत. भाजप सत्तेत आल्यावर मात्र मलेशियाच्या भूमिकेत काहीसा बदल झाला. दहशतवाद्यांना निधी पुरवत असल्याचा, चिथावणीखोर भाषणे करत असल्याचा आरोप असलेला वादग्रस्त मुस्लीम धर्मप्रचारक झाकीर नाईक हा मलेशियात आश्रयाला आहे हे आता कुणापासून लपून नाही.

सोमवार, ३० एप्रिल, २०१८

राजसत्तेवरचा अंकुश !


मागील काही काळापासून आपले राजकीय नेते निवडणूकांचा मौसम जवळ आल्यावर विविध धर्मांच्या प्रार्थनास्थळांना, मठांना, पूजास्थानांना भेटी देतायत. विविध जाती धर्माचे बाबा, बुवा, महाराज यांच्या चरणी लोटांगण घालताहेत. धर्मखुणा अंगावर वागवाताहेत. याला हरकत असायचे कारण नाही, असं करणं ही त्यांची अपरिहार्यता असू शकते. पण एकाही राजकीय पक्षाचा नेता ज्या शहरात धर्मस्थळांना भेटी देतो तिथल्या मोठ्या वाचनालयास, शास्त्र प्रयोगशाळेस वा संशोधन केंद्रास भेट देत असल्याचे कुठे दिसले नाही. बाबा, बुवा, महाराज यांच्या पायाशी बसून चमकोगिरी करणारे नेते त्या शहरातील एखाद्या शास्त्रज्ञास, सामाजिक विचारवंतास, तत्ववेत्त्यास भेटल्याचे औषधालाही आढळले नाही. असे का होत असावे यावर थोडासा विचार आणि निरीक्षण केलं तर एक तर्कट समोर आलं. मुळात लोकांनाच या गोष्टींची किंमत नाही. शास्त्रज्ञ, तत्ववेत्ते, समाजसुधारक हवेत कुणाला ? लोकांनाच बुवा, बाबा, महाराज यांचे इतके वेड लागलेय की अमुक एक नेता आपल्या धर्माच्या प्रार्थनास्थळाला भेट देऊन आला, तमक्या बाबाच्या चरणी लीन झाला याचे लोकांना कमालीचे अप्रूप असते. असं न करणारा आता मागास ठरतो की काय अशी विदीर्ण स्थिती आपल्याकडे निर्माण झालीय.

हरवलेले राजकीय दिवस ...



आजच्या काळात सर्वोच्च पदावरील राजकीय व्यक्तीपासून ते गल्लीतल्या किरकोळ कार्यकर्त्यापर्यंत भाषेतील असभ्यपणा सातत्याने डोकावताना दिसतो. पूर्वीचे दिवस मात्र काहीसे वेगळे होते. खरं तर तेंव्हाही याच राजकीय विचारधारा होत्या, हेच पक्ष होते. मग फरक कुठे पडलाय ? याचा धांडोळा घेताना एका ऐतिहासिक क्षणाचे दुर्मिळ छायाचित्र हाती लागले आणि चार शब्द लिहावेसे वाटले. अनेक आठवणींचे मोहोळ जागवणारे हे छायाचित्र भारतीय राजनीतीचे अनेक पैलू आपल्या समोर अलगद मांडते. दिवंगत राष्ट्रपती एपीजे कलाम त्यांच्या राष्ट्रपतीपदाचा उमेदवारी अर्ज भरतानाचा हा सोनेरी क्षण आहे. हिमालयाएव्हढ्या उत्तुंग कर्तुत्वाचा शास्त्रज्ञ देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान होतो हे देखील एक विशेषच म्हणावे लागेल. भारतीय लोकशाहीचा हा लोकोत्तर विजयाचा अनोखा अन लोकांप्रती असणाऱ्या सजीवतेचा विलोभनीय दार्शनिक क्षण होता….

पुरुषांच्या लैंगिक शोषणाचे मौन !



आयआयटी दिल्लीचा २१ वर्षीय विद्यार्थी गोपाल मालोने १२ एप्रिल २०१८ च्या दिवशी रात्री उशिरा नीलगिरी होस्टेलच्या आपल्या रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यातील रहिवासी मालो एमएस्सी केमिस्ट्रीचा प्रथम वर्षाचा विद्यार्थी होता. याआधीही त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. १० एप्रिल रोजी झोपेच्या तब्बल ५० गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु मित्रांनी त्याला वेळेवर रुग्णालयात दाखल केल्याने तो वाचला होता. या दरम्यान त्याच्या भावाने त्याला खूप समजावून सांगितले. त्याचे कौन्सेलिंग केले. तो थोडासा सेटल झाला आहे असे वाटताच त्याला पुन्हा होस्टेलवर आणून सोडले. मालो गुरुवारीच होस्टेलमध्ये परतला होता. आल्या दिवसापासून तो पुन्हा अस्वस्थ झाला. त्याचं मन त्याला स्वस्थ बसू देत नव्हतं, त्याचा भूतकाळ त्याच्यापुढे आ वासून उभा राहत होता.

लोककलेची ढासळती कमान ...


पंढरीतल्या एका रंगात आलेल्या फडात ढोलकी कडाडत होती. लोक मनमुराद दाद देत होते. 'ती' मन लावून नाचत होती. मधूनच 'तिच्या' चेहरयावर वेदना स्पष्ट दिसत होत्या. तिचे पोट किंचित फुगल्यासारखे वाटत होते. खरे तर 'तिला' असह्य वेदना होत होत्या तरीही 'ती' देहभान हरपून नाचत होती. तिची लावणी संपताच ती पटामागे गेली, घाईने 'तिने' साडी फेडली अन पोटाचा ताण हलका झाला तसा 'तिने' थोडा श्वास मोकळा सोडला. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळे होते. 'तिला' प्रसूतीच्या वेणा सुरु झाल्या आणि काही मिनिटात 'तिची' प्रसूती झाली देखील. इकडे फडावर दोनेक लावण्या होऊन गेल्या, सोंगाडयाची बतावणी सुरु झाली. 'तिच्या'  वेदनांना मात्र अंत नव्हता. सोंगाडयांची बतावणी संपली, पुढच्या लावणीआधी लोकांनी 'तिच्याच' नावाचा धोशा सुरु केला. तिची सहकलाकार एव्हाना पुढच्या लावणीसाठी मंचावर आली होती. लोकांनी त्याआधीच शिट्ट्या फुकायला आणि खुर्च्यांचा आवाज करायला सुरुवात केली. हार्मोनियमवाला बिथरून गेला आणि त्याचे काळीपांढरीचे गणित चुकू लागले. कशीबशी ती लावणी संपली. तोवर 'तिने' दगड हाती घेऊन नाळ तोडून काढली आणि आपल्या बाळाला स्वतःपासून विलग केले, आणि पुन्हा कासोटा आवळून साडी नेसली आणि फडावर जाऊन उभी राहिली. ती जीव तोडून नाचली. त्या लावणीचे बोल होते, 'पोटासाठी नाचते मी पर्वा कुणाची!'

शुक्रवार, २७ एप्रिल, २०१८

खलिल जिब्रान - लेखक ते युगकथानायक एक अनोखा प्रवास....


एका अशा माणसाची गोष्ट ज्याच्या शवपेटीवर दोन देशाचे राष्ट्रध्वज गुंडाळले होते ! त्यातला एक होता चक्क अमेरिकेचा आणि दुसरा होता लेबेनॉनचा ! एक असा माणूस की ज्याच्या अंत्ययात्रेला विविध धर्माचे लोक एकत्र आले होते जेंव्हा जगभरात सौहार्दाचे वातावरण नव्हते ! एक अवलिया जो प्रतिभावंत कवी होता, शिल्पकार होता, चित्रकार होता आणि परखड भाष्यकार होता. सर्वात महत्वाचे म्हणजे तो एक दार्शनिक होता. एक सहृदयी पुरुष जो आपल्या प्रेमासाठी अविवाहित राहिला. एक असा माणूस ज्याने वयाच्या पंधराव्या वर्षी धर्माची खरमरीत समीक्षा करणारं पुस्तक लिहिलं. ज्याला तत्कालीन चर्चने हद्दपारीची सजा सुनावून देशाबाहेर काढले होते त्याच देशात पुढे त्याच्या नावाचा डंका पिटला गेला, त्याच्या मृत्यूनंतर लोकदर्शनासाठी तब्बल दोन दिवस त्याचे पार्थिव ठेवावे लागले इतकी अलोट गर्दी त्याच्या अंतिम दर्शनासाठी एकवटली होती. ज्या मॅरोनाईट चर्चच्या आदेशाने त्याला पिटाळून लावले होते त्याच चर्चच्या आदेशानुसार त्याच्या स्वतःच्या गावातल्या दफनभूमीत त्याचे शव विधिवत व सन्मानाने दफन केले गेले. आजदेखील त्या माणसाची कबर तिथे आहे अन आजही त्या कबरीवर फुल चढवण्यासाठी मॅरोनाईट कॅथॉलिक, प्रोटेस्टंट शिया, सुन्नी, यहुदी, बौद्ध यांच्यासह अनेक संप्रदायाचे, धर्माचे लोक तिथे येतात !

मंगळवार, १७ एप्रिल, २०१८

रेड लाईट डायरीज - एक पाऊल सावरलं...


एक आनंदाची बातमी.
आमची आसिफा सुखरुप तिच्या देशी, तिच्या गावी परतली.
मागील वर्षी सप्टेबरमध्ये पुण्यात टाकलेल्या धाडीत काही मुली आणि कुंटणखाण्याच्या मालकिणींना अटक झाली होती. मोठी पोहोच असणाऱ्या आणि नोटा ढिल्या करण्यास तयार असणाऱ्या बायकांना 'रीतसर' जामीन मिळाला. यातील काही मुली अल्पवयीन होत्या. त्यातच एक होती आसिफा. बांग्लादेशाची राजधानी ढाक्यापासून काही अंतरावर तिचे गाव आहे. (तिच्या कुटुंबावर आणि तिच्यावर जे काही गुदरलं आहे ते कुणाच्याही बाबतीत घडू नये) ती कुमारवयीन असतानाच तिला आधी बंगालमध्ये एस्कॉर्ट केलं गेलं.