रविवार, २९ जानेवारी, २०१७

क'वीलक्षण' ...



एके काळी कवी, कवयित्री हजार माणसात देखील सहज ओळखू यायचे, त्यासाठी डोक्याला ताण द्यायची फारशी गरज पडत नसे. त्यांची लक्षणे ठरलेली असत. कलात्मकतेचा बाज दाखवणारी त्यांच्या डोक्यावरच्या केसांची अस्ताव्यस्त झुल्फे कवीच्या लेबलखाली ती मस्त खपून जायची. शिवाय कवीला इतकीही उसंत नाही असा एक समज त्यातून रूढ व्हायचा. दाढीचा किरकोळ खर्च टाळणारे प्रतिभेचे बाह्यलक्षण क्रमांक दोन म्हणजे रापलेल्या गालफडावरील हनुवटीकडे वाढलेले दाढीचे खुंट होय. कवीच्या नाकावरून घसरून खाली आलेला कधीही फ्रेम तुटायच्या बेतात असलेला त्याचा चष्मा त्याला अगदी चपखल शोभून दिसे. कवीच्या कपाळावर आठ्यांची आखीव रेखीव जाळी जळमटे असायचीच.

शनिवार, २८ जानेवारी, २०१७

धोक्याचा नवा सायरन - तमिळनाडू



टोकाचा भाषिक, प्रांतीय अस्मितावाद आणि भीषण परंपरावाद एकत्र आल्यावर त्यातून विघटनवाद जन्माला येतो, जो तमिळनाडूमध्ये आला आहे. काल तमिळनाडू विधानसभेत विरोधी पक्ष नेते एम.के. स्टॅलिन यांनी विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी सरकारजवळील जी माहिती सभागृहासमोर मांडली आहे ती चक्रावून टाकणारी धोक्याचा मोठा सायरन वाजवणारी आहे. गुप्तचर यंत्रणांच्या कुंभकर्णी झोपेचा पर्दाफाश करणारी आहे. या आंदोलनात स्वतंत्र तमिळनाडू देशाची मागणी झाली आहे ! लादेनचे फोटो तिथे झळकावले गेलेत, मोदींच्या नावाने शंख झालाय, आंदोलक पेट्रोल बॉम्बने सज्ज होते, तब्बल २००० फुटीरवाद्यांनी पोलिसांवर हल्ला केला, त्यांच्यावर पेट्रोल बॉम्ब फेकले गेले, आंदोलकांच्या नावाखाली निदर्शने करणाऱ्या अशा विघातक लोकांचे सीसीटीव्ही फुटेजही पन्नीरसेल्वम यांनी सभागृहाला दाखवले.

बुधवार, २५ जानेवारी, २०१७

'केवळ माझा सह्यकडा' - वसंत बापट


`माझीया जातीचे मज भेटो कोणी,
ही माझी पुरवून आस,
जीवीचे जिवलग असे भेटला की
दोघांचा एकच श्वास'
कवितेवर अशी जीवश्च निष्ठा असणारा कवी म्हणून वसंत बापट ओळखले जातात. बालवयापासून वसंत बापटांवर राष्ट्रसेवा दलाचे आणि सानेगुरूजींच्या सहवासाचे संस्कार झाले. राष्ट्रसेवादलाच्या मुशीत घडलेल्या वसंत बापट यांच्या १९५२ सालातील 'बिजली' हया पहिल्या काव्यसंग्रहावर हया संस्काराचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. 'सेतू', 'अकरावी दिशा', 'सकीना', 'मानसी' हे त्यांनंतरचे काव्यसंग्रह होत . त्यांच्या प्रतिभेची विविध रुपे रसिकांनी वाचली अनुभविली. पुढे 'तेजसी' व 'राजसी' हे दोन काव्य संग्रह ना. ग. गोरे यांच्या हस्ते प्रकाशित झाले. 'चंगा मंगा', 'अबडक तबडक', 'आम्ही', 'गरगर गिरकी', 'फिरकी', 'फुलराणीच्या कविता' आणि परीच्या राज्यात हे त्यांचे बालकवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. लहान मुलामध्ये मूल होऊन जगण्याची कला बापटांना नक्कीच अवगत असावी असे त्यांच्या बालकाव्यसंग्रहांच्या नावावरून वाटते. त्याच बरोबर 'बालगोविंद' हे त्यांचे बालनाट्य विख्यात आहे. पौराणिक एतिहासिक कथानकांवरची त्यांची नृत्यनाट्येही प्रभावी ठरली `केवळ माझा सह्यकडा' ही त्यांची कविता सर्वतोमुखी झाली. 'गगन सदन तेजोमय' सारखे अप्रतिम प्रार्थनागीत त्यांनी लिहिले. कालिदासाच्या विरही यक्षाची व्याकुळता त्यांनी मेघहृदयाच्या रूपाने मराठीत आणली. त्यांची 'सकीना' उर्दूचा खास लहेजा होऊन प्रकटली आणि, `तुला न ठेवील सदा सलामत जर या मालिक दुनियेचा,कसा सकीना यकीन यावा कमाल त्यांच्या किमयेचा' असं व्यक्त होत त्यांच्या लेखन किमयेची कमाल सांगून गेली.

रविवार, २२ जानेवारी, २०१७

सोशल मीडियावरील आवर्तने - डिजिटल कालपर्वातले सर्वाधिक प्रभावी हत्यार !


सोशल मिडीयाला हाडूक लागते चघळायला. एखादी घटना घडली की तिच्या अनिवार लाटा येतात आणि त्या घटनेचा बहर ओसरला की या लाटाही ओसरतात. मग नवी घटना घडते आणि तिच्या लाटा येतात. या लाटांना काहीही पुरते. अगदी 'कटप्पाने बाहूबलीला का मारले' यावरदेखील लोकांनी आपल्या भिंतींवर नक्षी करून ठेवली होती. अण्णा हजारेंनी केलेल्या रामलीला मैदानापासूनच्या ते अगदी परवाच्या कठुआ बलात्कार-खून प्रकरणाच्या लाटा देशाने पाहिल्यात, कळत नकळत यात सारेच सामील झाले. टूजी स्पेक्ट्रम, कोल ब्लॉक, कॉमनवेल्थ, रामदेव बाबाचे फसलेले आंदोलन, आसारामची अटक, निवडणूकीतले सत्तापालट, मोदींचे सत्ताग्रहण, बाळासाहेबांचे निधन, भीमा कोरेगावची दंगल, अखलाकची हत्या, गोरक्षकांचा हैदोस, केरळ-बंगालमधील राजकीय धार्मिक हत्या, विराटचं लग्न, आयपीएलचा धिंगाणा, निर्भयाचं आंदोलन आणि आता कठुआ- उन्नावची घटना. याच्या जोडीला सणवार, जयंत्या, पुण्यतिथ्या, 'डे'ज, इव्हेंट्स यांची झालर असते. अशा अनेक घटना सातत्याने घडत राहतात. या घटना घडताच ताबडतोब प्रतिक्रिया द्यायला लोक बाह्या सरसावून पुढे येतात, जणू काही आता हे बोलले नाही तर आभाळ कोसळणार ! प्रत्येकाला वाटते की आपण प्रत्येक मुद्द्यावर बोललेच पाहिजे. पण हजारो जण जरी आपलं अकाऊंट बंद करून गेले तरी सोशल मिडीयाला फरक पडत नसतो. पण जो तो आपल्या वकुबानुसारची भाषा वापरू लागतो -

निद्रापुराण ....



झोप सर्वांना हवीहवीशी असते, नीटनेटकी झोप नसेल तर माणसे बेचैन होतात. डुलकी, झापड, पेंग ही सगळी झोपेची अपत्ये. 'कुंभकर्ण' हा झोपेचा देव आहे की नाही हे ज्ञात नाही पण 'निद्रा' नावाची देवी अनेकांना प्रिय असते. झोपेच्या सवयी, झोपेचे प्रकार, झोप येण्याच्या घटनास्थिती देखील व्यक्तीपरत्वे भिन्न असतात. वेगवेगळ्या ठिकाणी, विविध अवस्थेत येणाऱ्या झोपांचे एक स्वतंत्र निद्रापुराण लिहिले जाऊ शकते. झोपेत काहीजण तंबोरा लावतात, काही पिपाणी वाजवतात, काहींनी त्रिताल धरलेला असतो तर काही शेळी फुरफुरल्यागत ओठ फुरफुरवत झोपतात.

बुधवार, ११ जानेवारी, २०१७

युगप्रवर्तक कवी - केशवसुत


'शून्यामाजी वसाहती वसविल्या कोणी सुरांच्या बरे
पृथ्वीला सुरलोकसाम्य झटती आणावया कोण ते ?..
..आम्हाला वगळा, गतप्रभी झणी होतील तारांगणे
आम्हाला वगळा, विकेल कवडीमोलावरी हे जिणे !'
असं म्हणायला दुर्दम्य आत्मविश्वास असावा लागतो, उत्तुंग आयुष्य जगावं लागतं अन कालातीत कर्तृत्व सिद्ध करून दाखवावे लागते. कवी केशवसुत या वर्णनात चपखल बसणारे व्यक्ती होते. त्यांनी निर्मिलेले काव्य अजरामर झाले. मराठी कवितेचे दालन भरून पावले.

कृष्णाजी केशव दामले उपाख्य केशवसुत यांचा जन्म १५ मार्च १८६६ रोजी रत्नागिरीजवळील मालगुंड या गावी झाला. केशवपंत दामले मूळ दापोलीचे. ते शिक्षक म्हणून मालगुंडच्या शाळेत दाखल झाले आणि फडके कुटुंबीयांच्या घरात भाडयाने वास्तव्यास राहिले. याच घरात १५ मार्च १८६६ साली केशवसुतांचा जन्म झाला. त्यांना एकूण बारा अपत्य, सहा मुले व सहा मुली. कृष्णाजी हे त्यांचे चवथे अपत्य. कोकणात खेड गावी प्रार्थमिक शिक्षण घेत असतांना कृष्णाजींना  प्राचीन साहित्य वाचण्याचा छंद लागला. न्यू इंग्लिश स्कूलमध्ये १८८४ला त्यांनी दाखल केले होते. तेव्हा देशभक्त बाळ गंगाधर टिळक, गोपाळ गणेश आगरकर शिक्षक असलेली ही शाळा आहे याची त्यांना कल्पनाही नव्हती. मात्र देशसेवेचे बाळकडू इथेच त्यांना मिळाले. सामाजिक अन्यायावर आपल्या कवितांमधून घणाघाती प्रहार करताना त्यांच्यातील ‘आगरकरांचा शिष्य ’आपणास ठायी ठायी जाणवतो.

मंगळवार, ३ जानेवारी, २०१७

गडकरी मास्तरांना पत्र ...


आदरणीय मास्तर... साष्टांग दंडवत ...

आजची तुमची बातमी वाचून रडलो आणि तुम्हालाच पत्र लिहून काही प्रश्न करावेसे वाटले. तुमच्या कविता आणि धडे वाचून चार अक्षरे वाचण्याच्या अन लिहिण्याच्या भानगडीत मी पडलो. पण आजची घटना पाहून तुम्हाला विचारावे वाटते की, मास्तर तुम्ही हा लेखनाचा आटापिटा का केला होता हो ? आचमने करून अन मास्तरकी करून तुम्ही सुखासमाधानात का जगला नाहीत ? चार भिंतीच्या एका खोलीत आपला फाटका संसार मांडून जगण्याच्या वंचनेत मृत्यूस कवटाळणारया एका मास्तराची इतकी का भीती वाटावी की रात्रीतूनच त्याचा पुतळा फोडावा लागतो ? आज तुम्हाला उत्तर द्यावेच लागेल...

"मंगल देशा ! पवित्र देशा ! महाराष्ट्र देशा !
प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा ..."
ही कविता लिहून तुम्ही काय मिळवलंत गडकरी ?

तुमच्या नावात राम असला म्हणून काय झाले सद्यराज्यात रावण जास्त सक्रीय आहेत ... तुम्ही माणसं ओळखून लिहायला पाहिजे होतं. तुम्ही चुकलात हो !

सोमवार, २ जानेवारी, २०१७

जीवनतत्व - प्रेमाची अभिव्यक्ती


काही दिवसांपूर्वी रजनीकांतचा एक किस्सा वाचण्यात आला होता. रजनीकांत मंदिराबाहेर थांबलेला असताना एका महिलेने त्याला भिकारी समजून दहा रुपये दिले आणि त्याने ते भीक म्हणून स्वीकारले असा तो किस्सा होता. मात्र असा किस्सा अनेक महानुभावांच्या बाबतीत पूर्वी घडला आहे. यातीलच एक किस्सा लिओ टॉलस्टॉयचा आहे. टॉलस्टॉय त्यावेळेस रशियन सैन्यात कार्यरत होता. तो आपल्या काही सैनिकांची मॉस्को स्टेशनवर वाट पाहत होता. मॉस्कोत नेहमीच रक्त गोठवणारी थंडी असे त्यामुळे त्यांच्या अंगावरच्या कपड्यांमुळे कोण लष्करातले आणि कोण सर्वसामान्य हे काहीच कळत नव्हतं. तेव्हढ्यात एक बाई तिथं आली. तिला वाटलं, हा उभा असलेला गृहस्थ हमाल आहे. तिनं टॉलस्टॉयला गाडीतलं सामान उतरायला सांगितलं. टॉलस्टॉय काही वेळ गोंधळला. पण त्याने पुढच्याच क्षणी त्या बाईचं सगळं सामान ऊतरवून दिलं. तितक्यात तिथं सैनिक आले आणि त्यांनी टॉलस्टॉयला सॅल्यूट ठोकला. त्या बाईला काही कळेच ना! हे सैनिक एका हमालाला का सॅल्यूट मारतायत ? त्या बाईनं विचारल्यानंतर टॉलस्टॉयनं आपली ओळख करून दिली. त्या बाईचा विश्वासच बसेना. आपल्यासमोर सार्वकालीन महान कादंबरीकार उभा आहे. एवढच नाही तर त्यानं आपलं सामानही उतरवून दिलं. बाई खजिल झाल्या. त्यांनी टॉलस्टॉयची माफी मागण्याचा प्रयत्न केला. पण टॉलस्टॉयनेच त्यांचे आभार मानले, ते त्यांनी दिलेल्या कामाबद्दल. एवढच नाही तर हमालाला देणार होत्या ती रक्कमही टॉलस्टॉयनं स्विकारली.