मंगळवार, १७ एप्रिल, २०१८

रेड लाईट डायरीज - एक पाऊल सावरलं...


एक आनंदाची बातमी.
आमची आसिफा सुखरुप तिच्या देशी, तिच्या गावी परतली.
मागील वर्षी सप्टेबरमध्ये पुण्यात टाकलेल्या धाडीत काही मुली आणि कुंटणखाण्याच्या मालकिणींना अटक झाली होती. मोठी पोहोच असणाऱ्या आणि नोटा ढिल्या करण्यास तयार असणाऱ्या बायकांना 'रीतसर' जामीन मिळाला. यातील काही मुली अल्पवयीन होत्या. त्यातच एक होती आसिफा. बांग्लादेशाची राजधानी ढाक्यापासून काही अंतरावर तिचे गाव आहे. (तिच्या कुटुंबावर आणि तिच्यावर जे काही गुदरलं आहे ते कुणाच्याही बाबतीत घडू नये) ती कुमारवयीन असतानाच तिला आधी बंगालमध्ये एस्कॉर्ट केलं गेलं.

तिथे काही काळ 'वापर' झाल्यानंतर तिची रवानगी पुण्यातल्या बुधवार पेठेत करण्यात आली. तिथे दोनेक वर्षात तिची ओळख मिहीर या उच्चशिक्षित आणि चांगल्या घरातील मुलाशी झाली. दोघांचं एकमेकावर प्रेम होतं पण पुढे काय करायचे आणि कसे करायचे त्यांना ठाऊक नव्हते. शिवाय आसिफा सज्ञान नव्हती. त्यामुळे ते नुसतेच नित्य एकमेकांना भेटत. रेड पडली तेंव्हा आसिफालाही अटक झाली. तिचं वय कमी असल्याने तिची रवानगी कारागृहाऐवजी मुंबईतील एका विख्यात महिला सुधारगृहात करण्यात आली. इकडे जामीन मिळून सगळी मंडळी बाहेर आली आणि पुन्हा नव्याने नव्या जागी 'धंद्या'ला लागली.

आसिफाचं काय झालं काहीच कळत नव्हतं. दरम्यान मिहीरचा जीव कासावीस होऊ लागला. नाना कुशंका त्याच्या मनात येऊ लागल्या. त्याने माझ्याशी संपर्क साधून सर्व माहिती कळवली. एफआयआर, खटला क्रमांक, आदेश क्रमांक सगळ्याची जुळणी करून त्या महिला सुधारगृहाची माहिती काढली. त्या नंतर तिथे अनेकदा संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी डाळ शिजू दिली नाही. काही महिला सुधारगृह खऱ्या सुधारणांऐवजी अन्य कुकर्मामुळे बदनाम आहेत तसं काही तर घडत नाही ना असे वाईट विचार मनात येऊ लागले. मुंबईतील ऍडव्होकेट Leena Pradhan-Gurav -लीना प्रधान गुरव या माझ्या चांगल्या परिचयाच्या आहेत, माझ्या स्नेही आहेत. त्यांच्या कानावर ही गोष्ट घातली, सगळे डिटेल्स त्यांना दिले. त्यांनीही बरेच प्रयत्न केले पण दाद मिळत नव्हती. अखेर मुंबई पोलिस दलाची मदत घेण्याचे ठरवले. आधी माझे मित्र Nandu Sawant -नंदू सावंत यांच्याकडे सगळी माहिती दिली, पण वेळ निघून जात होता आणि इकडे मिहीरची अवस्था बघवत नव्हती.

शेवटी एका बड्या पोलिस अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर मदत केली. आसिफाच्या कागदपत्रांची पूर्तता झाली. रीतसर तिला तिच्या मायदेशी, तिच्या गावी पाठवले गेलेय. ती सुखरूप गावी पोहोचल्याचा फोन मिहीरला आला आणि त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. माझाही जीव भांड्यात पडला. आता पुढच्या महिन्यात लिगल व्हिसा काढून तो बांग्लादेशात तिला भेटायला जाणार आहे. ते दोघे काही लग्न / निकाह करणार नाहीत. पण तिच्या आयुष्याचं पुनरुज्जीवन करून तो तिला जगण्याची नवी उभारी देणार आहे. तिला तिच्या पायावर उभं केलं तरी त्याच्या आयुष्याला जगण्याचे नवे आयाम लाभतील आणि तिला नवी दिशा मिळेल.

आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्याशीच लग्न व्हायला हवे असे काही नसते, आपल्यावर कुणी तरी प्रेम केलं किंवा आपण कुणावर तरी प्रेम केलं ही भावनाच इतकी उदात्त आणि उत्तुंग आहे की ती अंतिम श्वासापर्यंत तृप्तता देते. लग्न होणं, अपत्यं होणं या गोष्टी कुटुंबव्यवस्थेशी निगडीत आहेत त्याला मानवी भावभावनांनी नियंत्रित करता येतं पण प्रेम करणं वा प्रेम होणं या गोष्टी कुणाच्याही नियंत्रणात नसतात. याचा अर्थ असा नव्हे की विवाह पश्चात आयुष्यात बदफैल व्हावं. असो..

इथे हिंदू कुटुंबातील एक उच्चशिक्षित तरूण एका निष्पाप निरागस मुस्लीम मुलीचं आयुष्य नव्याने सुरु व्हावं म्हणून दोन देशाच्या सीमा पार करणार आहे आणि एकीकडे काही लोक असेही आहेत जे आपल्याच देशात धर्मभेदाचा खेळ खेळत आहेत. आपण प्रेम पसरवायचं की विद्वेष हे ज्याने त्याने ठरवायचे आहे. भाषा, प्रांत, देश या सर्व सीमा पार करून अंधारलेल्या भूतकाळातील कटू आठवणींचा इतिहास पुसून नव्या भविष्याचा सुवर्णवेध घेणाऱ्या दोन भिन्न धर्माच्या या जीवांपासून काही शिकता आलं तर शिकून घ्यावं ! अशा काही गोष्टीत आपलं निमित्तमात्र अस्तित्व मनाला जे समाधान मिळवून देतं ते शब्दाच्या पलीकडले आहे...

नफरतीचे विष फैलावणाऱ्यांनो आपसात प्रेम - स्नेह यांची जरा जोपासना तर करून बघा ! परात्म प्रेमाच्या अंकुराचं जगणं नितांत सुंदर आहे, ते जगून तरी बघा !!

- समीर गायकवाड.

अपूर्व जिद्दीने आणि संयमाने वागणाऱ्या, संवेदनशील मिहीरचे कौतुक करावे तितके कमी आहे.
या कामी मदत करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक अभार.
घटनेतील तरुण आणि तरुणीची मूळ नावे बदलली आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा