सोमवार, ३० एप्रिल, २०१८

लोककलेची ढासळती कमान ...


पंढरीतल्या एका रंगात आलेल्या फडात ढोलकी कडाडत होती. लोक मनमुराद दाद देत होते. 'ती' मन लावून नाचत होती. मधूनच 'तिच्या' चेहरयावर वेदना स्पष्ट दिसत होत्या. तिचे पोट किंचित फुगल्यासारखे वाटत होते. खरे तर 'तिला' असह्य वेदना होत होत्या तरीही 'ती' देहभान हरपून नाचत होती. तिची लावणी संपताच ती पटामागे गेली, घाईने 'तिने' साडी फेडली अन पोटाचा ताण हलका झाला तसा 'तिने' थोडा श्वास मोकळा सोडला. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळे होते. 'तिला' प्रसूतीच्या वेणा सुरु झाल्या आणि काही मिनिटात 'तिची' प्रसूती झाली देखील. इकडे फडावर दोनेक लावण्या होऊन गेल्या, सोंगाडयाची बतावणी सुरु झाली. 'तिच्या'  वेदनांना मात्र अंत नव्हता. सोंगाडयांची बतावणी संपली, पुढच्या लावणीआधी लोकांनी 'तिच्याच' नावाचा धोशा सुरु केला. तिची सहकलाकार एव्हाना पुढच्या लावणीसाठी मंचावर आली होती. लोकांनी त्याआधीच शिट्ट्या फुकायला आणि खुर्च्यांचा आवाज करायला सुरुवात केली. हार्मोनियमवाला बिथरून गेला आणि त्याचे काळीपांढरीचे गणित चुकू लागले. कशीबशी ती लावणी संपली. तोवर 'तिने' दगड हाती घेऊन नाळ तोडून काढली आणि आपल्या बाळाला स्वतःपासून विलग केले, आणि पुन्हा कासोटा आवळून साडी नेसली आणि फडावर जाऊन उभी राहिली. ती जीव तोडून नाचली. त्या लावणीचे बोल होते, 'पोटासाठी नाचते मी पर्वा कुणाची!'

'ती' नाचतच होती, 'तिच्या'वर, 'तिच्या' कलेवर फिदा झालेल्या लोकांना तिच्या डोळ्यातून वाहणारे पाणी दिसत नव्हते. पायातले चाळ 'तिला' मणामणाचे वाटत होते. सगळा रंगमंच तिच्या भोवती फेर धरून नाचत होता. तिला चकरा येऊ लागल्या. ती कोसळण्याच्या बेतात यायला आणि लावणी संपायला एकच गाठ पडली. कशीबशी ती पडद्यामागे गेली आणि तिथे जाऊन कोसळली. तिची अदाकारी अन तिचा नाच बघणारया लोकांनी काही वेळापूर्वी 'तिची' प्रसूती झाली होती यावर विश्वास ठेवला नसता. पण 'तिने' इतिहास रचला होता ! ही घटना घडली होती पंढरपुरात आणि जिच्या वाटेस हे भोग आले होते तिचा जन्मही एका बेभान आषाढी एकादशीच्या रात्रीस झाला होता ! तिचे नाव होते विठा !! नृत्यसम्राज्ञी विठाबाईंच्या जीवनाची ही आठवण अभूतपूर्व अशी आहे.   

पंढरपुरी बाजाच्या म्हणजे बैठकीच्या लावणीला सत्यभामाबाई पंढरपूरकर यांनी प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. मधुचंद्राचा अनुभव घेणाऱ्या बालिका वधूच्या भावस्थितीचे दर्शन घडविणारी लावणी सत्यभामाबाई पंढरपूरकर सादर करीत तेंव्हा घाबरलेल्या बालिकावधूच्या  दहा भावमुद्रांचे दर्शन त्या घडवीत. अंगाला कंप सुटणे, ओठ कोरडे पडणे, डोळ्यातून अश्रू येणे, गाल लाल होणे आदी मुद्रा सत्यभामाबाई करून दाखवीत. एकदा लावणी सम्राट बाळकोबा उत्पात यांच्यासमोर ही लावणी सादर करताना 'दहावी अदा कोणती ?' असा सवाल त्यांनी सत्यभामाबाई पंढरपूरकर यांना करताच त्यांनी जवळच्या खांबाला मिठी मारून डोळे गच्च बंद केले व ही 'दहावी अदा' असे करून दाखवले. सुरुवातीच्या काळात स्वतःच्या घराच्या दिवाणखान्यातच त्या लावणी सादर करू लागल्या. त्यातही बैठकीच्या लावण्या जास्त असत. पण पुढे या बैठकीच्या लावण्यांचा त्यांच्यावर शिक्का बसला. अनेक सामाजिक बंधने, स्त्रीत्वाच्या मर्यादा आणि तत्कालीन नैतिकतेचे संदर्भ पाहता सत्यभामाबाईंनी ज्या नेटाने आणि जोमाने आपली लावणीची सेवा अबाधित अखंड ठेवली त्याला तोड नाही.  

एक काळ होता जेंव्हा तमाशाचा फड बैलगाडीतून गावोगाव फिरत राहायचा आणि आपल्या कौशल्याच्या जीवावर नावलौकिक कमवायचा. ज्याच्या नसानसात कला भिनलेली आहे त्याची कीर्ती व्हायचीच. कोंडीबा टाकळीकर हा असाच कलासक्त माणूस. एके काळी पुणे स्टेशनला हमाली करायचे. त्यांना तमाशाचे भयानक वेड. हमालीतून आलेल्या पैशातून आणि घरातली सगळी साधनं वापरून ते एक छोटेखानी फड चालवत असत. हमाली करत हा उद्योग चाले. तमाशात ते नाच्याचं, सोंगाड्याचं तर क्वचित नटाचे कामही करायचे. त्यांच्या दोन्ही चिमुरडया मुली लता आणि सुरेखा फडासोबत असायच्या. कोंडीबा दर्दी कलारसिक फडमालक होते. त्यामुळे त्यांचे कलासंस्कार त्यांच्या मुलींवर कधी झाले हे कुणाला कळलेच नाही. या जोडीतली सुरेखा अगदी बालवयातच वडीलांच्या तमाशात नृत्य करु लागली होती. तिचा धिटुकला परफॉरमन्स अन नृत्यगुण बघून प्रेक्षक कौतुकाने यात्रेतल्या 'शेव-रेवडी'च्या माळा तिच्या गळ्यात घालायचे. आधी कौतुक, अप्रूप आणि आवड म्हणून केलेलं नृत्य तिच्या रोमरोमात भिनत गेलं. अंगातील नृत्याची लय, त्यात असलेली गती आणि ऊर्मी तिला स्वस्थ बसून देत नव्हती. वडीलांच्या पश्चात पोटापाण्यासाठी आणि कलेच्या उर्मीसाठी या दोघी बहिणी त्याकाळी प्रचंड लोकप्रिय असलेल्या दत्तोबा तांबे यांच्या तमाशा फडात रुजू झाल्या. त्या दोघींनी स्वतःचा फड उभारण्याचे स्वप्न उराशी बाळगले. पुढील नियोजन होईपर्यंत साहेबराव नांदवळकर व चंद्रकांत ढवळपुरीकर यांच्या तमाशात काही दिवस केवळ 'शिध्यावर' त्यांनी नृत्यसेवा केली. ते साल १९८६ चे होते जेंव्हा या दोन बहिणींनी "लता-सुरेखा पुणेकर' नावाने स्वतःचा फड सुरू केला होता. पण ही झेप मोठी होती अन सोपीही नव्हती. त्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागली होती. जिद्दीने उभं राहावं लागलं.

गावातून सहा हजार हातउसने घेऊन आणि घरातील दाग-दागिने विकून पंचवीस हजार रुपये एकत्रित करून त्यांनी फड उभा केला. फडाचा पहिला मोठा प्रयोग सुरतच्या सीमेलगत असणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील डांगसौंदाना या गावी ठरला होता. कर्मधर्मसंयोगाने त्याकाळी बऱ्यापैकी नावलौकिक असलेल्या शंकर कोचूरे यांच्या फडाचाही कार्यक्रम गावातील पलीकडच्या पेठेला होता. पुणेकरांच्या बारीतील वगाची सुरवात होण्याच्या दरम्यानच शंकर कोचूरेंच्या काही कार्यकर्त्यांची आणि पुणेकरांच्या कर्मचाऱ्यांची त्यांच्याच तिकीट खिडकीवर हाणामारी झाली. या हाणामारीत काही जण जखमी झाले. दवाखान्यात नेण्यासाठी गंभीर जखमींना जीपमधून पाठवले गेले. जीप मागे घेताना अचानक मागे कुठेतरी खोल खड्ड्यात जाऊन पडली. तिथे दोनशे फुट खोल दरी होती. या दुर्घटनेत कोणी दगावलं नाही मात्र दोघांची हाडे मोडून निघाली. दिग्मूढ होऊन गेलेल्या पुणेकर भगिनींनी  त्यांच्या उपचाराची तजवीज केली. अशा दिव्यातून निखरून आलेल्या सुरेखा पुणेकरांची यशोगाथा सर्वश्रुत आहे. 

प्रत्येक श्रेष्ठ तमाशा कलावंताची कथा ही अशी संघर्षाची आहे. हा आता इतिहास राहतोय की काय असे दिवस आज या कलेस आलेत.   एक काळ होता तमाशाला, वग नाट्यांना चांगले दिवस होते. विविध ठिकाणी कलाकेंद्रे झाल्यावर त्याला स्थिरता आली होती. पण या दशकात याला उतरती कळा लागलीय. याला अनेक कारणे आहेत, तो एका स्वतंत्र लेखाचा विषय होईल. मूळ मुद्यावर लिहितो. कला केंद्रात किमान पाचेक पार्ट्या तरी ठेवाव्या लागतात मगच तिथे येजा सुरु होते. महाराष्ट्रातली काही कलाकेंद्रं ख्यातनाम आहेत. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातल्या वेळे गावातलं पिंजरा कलाकेंद्र ; पुणे जिल्ह्यातलं चौफुल्याजवळचं न्यू अंबिका, सणसवाडीजवळचं जय अंबिका, जेजुरी जवळचं जयपुष्पराज ; कोल्हापुरातलं गोकुळ शिरगाव एमआयडीसी जवळचं रेणुका, उजळाईवाडी जवळचं लक्ष्मी ; अहमदनगर जिल्ह्यातील जामखेडजवळचं जय अंबिका, घुंगरू आणि जगदंबा आणि आमच्या सोलापूर जिल्ह्यातलं मोडनिंबजवळचं सागर, भाग्यलक्ष्मी व नटरंग , बार्शी जवळचं महालक्ष्मी, सोलापूर शहरालगतचं बाळे इथलं घुंगरू कलाकेंद्र ही पश्चिम महाराष्ट्रातील मोठी कलाकेंद्रे आहेत.

इथे बैठकीची लावणी असते आणि खुले स्टेज असते. स्टेजसाठी पन्नास शंभर रुपयांचे तिकीट असते. तिथं तासभर लावण्या चालतात. ज्यांच्या पार्ट्यांना बैठक मिळत नाही शक्यतो अशा पार्टीतील नर्तिका, अदाकारा स्टेजवर नाचतात. कलाकेंद्राच्या व्याप्तीनुसार बैठकीसाठी खोल्या असतात. साध्या रंगाचे पोपडे उडालेल्या, लोड तक्के जीर्ण झालेल्या, जागोजागी पान तंबाखूच्या खुणा मिरवणारया हजार रुपयाच्या खोलीपासून ते अगदी राजमहालाला शोभतील अशा वीसहजार रुपयाच्या खोल्या इथं उपलब्ध असतात. हौशी लोक ग्रुप करून येतात आणि आपल्याला हवी ती पार्टी निवडतात, बजेटनुसार खोली ठरवतात, मग तासाभराची बैठक संपन्न होते. बेत रंगला तर हा अवधी वाढत जातो. बैठकीत एक गायिका, एक ढोलकीपटू, एक हार्मोनियम वादक(पेटी मास्तर), कमीत कमी दोन नर्तिका असा लवाजमा असतो. नर्तिका बहुतांश करून तीनच्या पुढेच असतात पण त्यातली एकच मनापासून नाचत असते, एक तिला साथ देत असते आणि एक नुसती टंगळ मंगळ करत असते. जेंव्हा ही संख्या पाच सात अशी असते तेंव्हा नक्कीच बैठक मोठी असते. बरयाचवेळा असे असते की जी देखणी आणि नखरेल अदाकारा असते ती केवळ एक दोन गाणी पेश करते आणि फोन आल्याचं निमित्त करून गायब होते !

दिड दोन हजार रुपयात सहसा बैठकी ठरतात. या दशकात हा व्यवसाय रोडावत चालल्याने अनेक कलाकेंद्रे अखरेच्या घटका मोजीत आहेत तर काही ठिकाणी पार्ट्यात कपात केली जातेय. कारण इतकं मोठं बिऱ्हाड सांभाळणं आत बट्ट्याचं ठरत जातं. अनेक कला केंद्रे कर्जबाजारी झालीत, अनेक पार्ट्यांना दिवाळखोरीचे दिवस आलेत. तशात गावोगावच्या जत्रात तमाशा फड लावणे खर्चाचे होऊ लागल्याने दुहेरी उपासमार होण्याची पाळी आलीय. पुणे जिल्हयातील जुन्नर तालुक्यातलं नारायणगाव म्हणजे तमाशा पंढरी. इथे सर्व पार्ट्यांच्या तंबूकनातीत सुपारया फुटतात. पण आता मौसम रोडावत चाललाय. अनेक कलाकेंद्रात बोलीच लागत नाही, बैठका बसत नाहीत. उपजीविकेचे अन्य मार्ग हाताळताना यांचे साहजिकच शोषण होऊ लागलेय.

गावोगावच्या बड्या आसामींच्या लग्नाच्या वरातीत आणि छोट्या मोठ्या उत्सवात बँजो - ढोलीबाजा - डॉल्बीवर कलाकेंद्रातील मुली रस्त्यावर नाचताना मोठ्या प्रमाणात आढळू लागल्या आहेत. शे दोनशे माणसं हपापल्या नजरेने बघत (?) असतात आणि मधोमध या मुली नाचत असतात. यांचं हे नाचणं मनापासूनचं नसतं ते यंत्रवत असतं हे पट्टीचा रसिक लगेच सांगतो ही बाब अलाहीदा. मुली नाचवण्याचं हे प्रमाण इतक्या वेगाने वाढतेय की पुढचा धोका लगेच दृष्टीपथात येतोय. युपी, बिहार, एमपी, झारखंड, उत्तरांचल, हिमाचल मध्ये आता भोजपुरी, अवधी, हिंदी गाण्यांच्या नावाखाली जो हिडीस, बीभत्स प्रकार स्टेज - ऑर्केस्ट्रा - बारात - भंडारा - मेला - जश्न यात सादर होतोय तो लाजेने मान खाली घालावयास भाग पाडणारा आहे. डान्स बार बंद पडल्यानंतर हजारोच्या संख्येने मुली यात लोटल्या गेल्या आणि त्यांच्या आयुष्याचा अक्षरशः उकिरडा झाला. आपण त्याच दिशेने जातोय. दुर्दैव असे की त्या वाटेवर जाईपर्यंत समाज आणि शासन जागे होणार नाही.

त्यातही कोल्हाटी समाजाचे कौतुक करावे वाटते, ९ मार्चला मढी येथे यंदाच्या वर्षापासून समाजाची एकही मुलगी घुंगरू बांधून उतरणार नाही असा त्यांनी ठराव केलाय. मढी, सोनारी, जेजुरी व माळेगाव येथे जात पंचायतीऐवजी प्रबोधन मेळावे घेऊन सामाजिक ऐक्य व संवाद संघशक्तीचे अस्तित्व अबाधित राखण्यासाठी कोल्हाटी बांधव सरसावले आहेत. विविध कला केंद्र, संगीत बारी, विवाह यात्रा-जत्रा उरुसामधून नाचगाणे करत मनोरंजन करणाऱ्या महिला प्रामुख्याने कोल्हाटी समाजाच्या असतात. नाच-गाण्यांची परंपरा देवादिकांसह राजे- महाराजांपासून सुरू असून आम्हीसुद्धा सेवा करतो, अशी या समाजाची भावना. कोल्हाटी समाजाचे अॅड. अरुण जाधव यांच्या शिकवणीनुसार ‘‘आम्ही कुठपर्यंत ढोलकी अन् घुंगराच्या तालावर दमायचं ? आता नाचायचं नाही; शिकायचं, अधिकारी-पदाधिकारी व्हायचं !” हा निर्धार करत नाच-गाण्याला मूठमाती देण्याबाबत सर्वच समाजबांधव आग्रही आहेत. सगळीकडेच अशी जागृती नाही आणि जागृती असूनही खूप काही उपयोग नाही कारण या मुलींवर जी कुटुंबे अवलंबून आहेत त्यांची पोटे कोण भरणार याचे उत्तर कुणाकडेच नाही. पोटासाठी नाचणाऱ्या या जीवांची खरेच कुणाला पर्वा नाही का ?   

- समीर गायकवाड.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा