मनोज कुमारांनी अनेक हिट सिनेमे दिले, त्यांच्या सिनेमाचा खास असा जॉनर होता! लोक म्हणायचे की हा माणूस देशभक्तीपर सिनेमे बनवतो. लोकांनी त्याला भारतकुमारची उपाधी दिली होती. सिने समीक्षकही त्याला याच टोपणनावाने बोलत. त्यांच्या कारकीर्दीचे मोजमाप करताना त्यांच्या या राष्ट्र्प्रेमाच्या सिनेमांची दखल घ्यावीच लागते. याहीपुढे जाऊन त्यांच्या सिनेमातली हिट गाणी विसरता येत नाहीत. त्यांच्या गाण्यांविषयी बोलावे तितके कमी अशी स्थिती. त्यातही 'उपकार' या सुपरहिट सिनेमामधले 'मेरे देश की धरती...' या गीताविषयी काही विलक्षण नोंदी सांगता येतील. मात्र त्यासाठी आधी त्यांचा इतिहास जाणून घेणे क्रमप्राप्त ठरते.
मनोज कुमार यांचे मूळ नाव हरिकिशन गिरी गोस्वामी. त्यांचा जन्म 24 जुलै 1937 रोजीचा. पाकिस्तानच्या अबोटाबादमध्ये ते जन्मले. भारत-पाकिस्तानच्या फाळणीप्रसंगी त्यांनी भयंकर वेदनादायक गोष्टी सोसल्या. त्यांच्या डोळ्यादेखता त्यांचे आई वडीलांची आणि काकांची हत्या करण्यात आली. या घटनेने त्यांच्या मनावर आघात झाला. ते दिवस आणि त्या जखमा ते कधीही विसरू शकले नाहीत. लाहोरमधलं आपलं राहतं घरदार शेतीवाडी सारं काही सोडून ते अन्य कुटुंबियासमवेत राजस्थानच्या हनुमानगढ जिल्ह्यात स्थायिक झाले. भारतात आल्यापासून आपल्या देशाविषयीचा अभिमान रुजत गेला. आपण या कर्मभूमीचे, भारतमातेचे देणे लागतो नि ते आपण दिलेच पाहिजे या भावनेने त्यांच्या मनात कायम वास्तव्य केलं. त्यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. ते अशोक कुमार, दिलीप कुमार आणि कामिनी कौशल यांचे खूप मोठे चाहते होते. त्यांचा प्रत्येक चित्रपट पाहायला त्यांना खूप आवडायचं. एका चित्रपटातील दिलीप कुमार यांच्या भूमिकेचे नाव मनोज कुमार होते. हरिकिशन गोस्वामी त्यांच्या भूमिकेने खूप प्रभावित झाले. त्यावेळी पीटीआयला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत त्यांनी म्हटलं होतं की, “मी तेव्हा ११ वर्षांचा असेन, पण मी लगेचच ठरवले की, जर मी कधी अभिनेता झालो तर माझे नाव मनोज कुमार असेच ठेवेन” आणि अशाप्रकारे १९५० च्या दशकाच्या उत्तरार्धात हरिकिशन गिरी गोस्वामी मनोज कुमार झाले. दरम्यान शालेय शिक्षणानंतर दिल्लीमधून पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर अभिनेता होण्याचे स्वप्न घेऊन त्यांनी मुंबईत पाऊल ठेवलं. कॉलेजमध्ये असतानाच ते थिएटरशी जोडले गेले होते.
मनोज कुमार यांची चार दशकांची प्रदीर्घ कारकीर्द आहे. त्यांनी अभिनयातील करिअरची सुरुवात 1957 मध्ये ‘फॅशन’ या चित्रपटातून केली. दिलीप कुमार अभिनीत ‘शबनम’ चित्रपटात छोटीशी भूमिका साकारली होती. त्यानंतर त्यांचा ‘कांच की गुडिया’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात ते नायकाच्या भूमिकेत होते आणि बॉक्स ऑफिसवर तो यशस्वी ठरला होता. तिथपासून पुढची 38 वर्षे म्हणजे जवळपास चार दशकं ते काम करत होते. 1995 मध्ये आलेला ‘मैदान ए जंग’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. त्यांची देशभक्तिपर गीतं आजही लोकप्रिय आहेत. आपल्या अभिनय आणि चित्रपटांमधून देशभक्तीची गोडी लावणारा असा हा कलाकार आता काळाच्या पडद्याआड गेला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते, चित्रपट दिग्दर्शक, पटकथा लेखक, संगीतकार आणि एडिटर म्हणून स्मरणात राहतील. भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वात यशस्वी आणि सर्वोत्तम अभिनेत्यांपैकी एक अशीच त्यांची ओळख राहील. ते देशभक्तीपर चित्रपटांमध्ये अभिनय करण्यासाठी ओळखले जात होते आणि म्हणूनच त्यांना भरत कुमार हे टोपणनाव मिळाले. भारतीय चित्रपट आणि कला क्षेत्रातील त्यांच्या कार्यासाठी त्यांना 1992 मध्ये भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आणि 2015 मध्ये चित्रपट क्षेत्रातील दादासाहेब फाळके हा सर्वोच्च पुरस्कार देण्यात आला. त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला होता तसेच तब्बल सात वेळा फिल्मफेअर पुरस्कारही मिळालेला. बॉक्स ऑफिस इंडियाच्या टॉप ॲक्टर्सच्या यादीत त्यांचे नाव तब्बल आठ वेळा झळकले हे विशेष. दस नंबरी, क्रांती, रोटी कपडा और मकान, पूरब और पश्चिम, उपकार, बेइमान, गुमनाम, हिमालय की गोद में, नीलकमल हे त्यांच्या गाजलेल्या सिनेमांपैकी होत. यातल्या हरएक सिनेमाने त्यांना अफाट कीर्तीच्या शिखरावर नेलं तरीही यातल्याच 'उपकार' सिनेमाने त्यांची खऱ्या अर्थाने स्वतंत्र ओळख निर्माण करून दिली. याच 'उपकार'मध्ये मेरे देश की धरती हे गाजलेलं गाणं होतं!
भारतात प्रजासत्ताक दिन असो वा स्वातंत्र्यदिन असो वा एखादा राष्ट्रप्रेमाचा विशेष कार्यक्रम असो तिथे काही गाणी हमखास लावली जातातच! त्यातलंच अग्रस्थानी असणारं हे गीत होय. या गाण्याचा एक अभिमानास्पद इतिहास आहे. मनोज कुमारच्या 'उपकार'ची कथा खूप छान होती. या चित्रपटात एका भावाची कहाणी दाखवण्यात आली आहे जो आपल्या धाकट्या भावाला शिक्षण देण्यासाठी अनेक त्याग करतो, परंतु त्याचा धाकटा भाऊ चुकीच्या मार्गावर जातो. मनोज कुमारसह प्रेम चोप्रा, आशा पारेख, कन्हैयालाल, मनमोहन कृष्णा आणि इतर कलाकार यात महत्त्वाच्या भूमिका होत्या. 1967 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'उपकार'ने बॉक्स ऑफिसवर त्या काळात 7 कोटी रुपये कमावलेले. 'कांच की गुडिया'च्या पहिल्या मोठ्या यशानंतर त्यांनी पिया मिलन की आस, हरियाली और रास्ता, डॉक्टर विद्या, गृहस्थी, वो कौन थी हे गाजलेले सिनेमे केले. 1965 मध्ये हिमालय की गोद में आणि शहीद हे त्यांचे दोन महत्वाचे सिनेमे आले. यातला शहीद हा चित्रपट महान क्रांतिकारक भगत सिंग यांच्या जीवनावर आधारित होता. हा चित्रपट इतका प्रभावशाली ठरला की तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी मनोज कुमारचे कौतुक केले. त्यांच्या जय जवान जय किसान या लोकप्रिय घोषणेवर काही करता येत असेल तर करावे असेही सुचवले! थेट पंतप्रधानांनी गळ घातल्यावर मनोज कुमार सदगदीत झाले आणि त्यातून 'उपकार'ची निर्मिती झाली.
त्यांनी स्वतः उपकारची कथा लिहिली. त्यांचे आवडते संगीतकार कल्याणजी आनंदजी यांना त्यांनी सिनेमाच्या एकंदर पार्श्वभूमीची माहिती दिली. गाणी कशी हवीत याबद्दल त्यांच्या मनात काही आराखडे होते. त्यांनी स्वतः काही पंक्ती लिहिल्या होत्या मात्र त्या मीटरमध्ये नव्हत्या. विविध गीतकारांची नावे त्यांच्या मनात घोळत होती. इंदिवर त्यांचे जुने सहकारी मित्र होते, त्यांची गाठ घेतली. त्यांनी काही गाणी दिली. कसमे वादे प्यार वफ़ा, गुलाबी रात गुलाबी, ये काली रात काली ही 'उपकार'मधली त्यांची गाणी. हर खुशी हो वहां हे त्यांनी लिहून दिलं आणि सरते शेवटी मनोज कुमारनी त्यांच्याकडच्या स्वलिखित पंक्ती गुलशन बावरांना दाखवल्या आणि सांगितलं की मला अशा आशयाचं गीत अभिप्रेत आहे. गुलशन बावरांनी वेळ न दवडता त्यांना गाणं लिहून दिलं - 'मेरे देश की धरती, सोना उगले..'! महेंद्र कपूर यांनी अत्यंत खड्या स्वरात असं गायलं की ऐकणाऱ्याच्या अंगावर रोमांच उभे राहावेत! लोकांनी उपकारमधली गाणी, संवाद डोक्यावर घेतले! खलनायक प्राण यांना या सिनेमाने नवी ओळख मिळवून दिली! भारतीय सिनेमांच्या इतिहासात देशप्रेमाचा जॉनर मनोज कुमार यांनी मोठ्या दिमाखाने रूढ केला आणि त्याचे अनभिषिक्त ध्रुवपद 'मेरे देश की धरती..' कडे राहिलं! आजही देशाच्या कानाकोपऱ्यावर राष्ट्रप्रेमाची गीते लावली जातात तेव्हा मेरे देश की धरती त्यात असतंच! खरेच आपला देश महान आहे. मात्र आताचे चित्र मन विषण्ण करणारे आहे. आपला देश महान राहावा म्हणून आपण काय योगदान देत आहोत असा प्रश्न आता आपण स्वतःला विचारू इच्छित नाही! आपण आपल्याशीच प्रामाणिक राहिलो नाही! द्वेष मत्सराने आपण ग्रासलो आहोत! मनोज कुमार यांच्या 'उपकार'मधल्या गाजलेल्या गाण्याच्या पंक्ती आपल्याला चपखल शोभतात -
देते हैं भगवान को धोखा, इंसाँ को क्या छोड़ेंगे
कसमें, वादे, प्यार, वफ़ा सब बाते हैं, बातों का क्या..
अशा अजरामर कलाकृती देणाऱ्या या महान कलाकारासमोर देश नतमस्तक आहे. भारतभूमीच्या मातीत जे हिरेमोती गवसले आहेत त्यातलेच एक म्हणून मनोज कुमार सदैव लक्षात राहतील!
- समीर गायकवाड
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा