हंडाभर पाण्यासाठी प्राण पणाला लावणाऱ्या बायकांचा, काळजाचा थरकाप उडवणारा हा व्हिडिओ कालपरवाचाच आहे.
ही क्लिप पाहिल्या बरोबर मनात अशी तीव्र इच्छा उत्पन्न झाली की, इथल्या तमाम लोकप्रतिनिधींना या विहिरीत थेट तळापर्यंत असेच रस्सीच्या सहाय्याने उतरायला लावले पाहिजे आणि हंडाभर पाणी त्यांच्या डोईवर ठेवून थेट वाडीवस्तीपर्यंत भर उन्हात चालवत नेलं पाहिजे! आणि मग त्यांना अनिवार्य हिंदी, कबर, कुत्रा, गुरुजी, कोरटकर, सोलापूरकर यांच्या विषयीचे प्रश्न विचारले पाहिजेत. समाधानकारक उत्तरे देईपर्यंत पाण्याचा एक घोटही प्यायला द्यायचा नाही! असो.
व्हिडिओ क्लिपमधील गावाचे नाव बोरीची बारी, तालुका पेठ, जिल्हा नाशिक! म्हणजेच आपल्या डिजिटल प्रगतशील महाराष्ट्रामधलं हे दृश्य!
हे अपयश झाकण्यासाठी तर राज्यकर्त्यांना आस्तित्वात नसलेल्या मुद्यांचा सहारा घ्यावा लागत असेल का? नक्की सांगता येत नाही.
नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुका हा पेठ - दिंडोरी या विधानसभा मतदारसंघा अंतर्गत येतो. नरहरी झिरवाळ हे धरणवादी पक्षाचे इथले सध्याचे आमदार. तर भास्कर भगरे हे इथले खासदार जे शरद पवार राष्ट्रवादीमधून निवडून आलेले. या प्रश्नावर यांनी काय केलंय हे पत्रकारांनी, वृत्तवाहिन्यांनी विचारलेय का?
1962, 1972, 1978, 1990, 1995 सालच्या विधानसभेत इथे कॉँग्रेसचा उमेदवार आमदार म्हणून निवडून आलेला. 1967 शेकाप, 1980 आणि 1985 जनता पार्टी तर 2009 चा शिवसेनेच्या धनराज महाले यांचा अपवाद वगळता 1999, 2004, 2014, 2019 आणि 2024 अशी पाचवेळा आमदारकी भोगणारे (होय भोगणारेच!) नरहरी झिरवाळ इथले विद्यमान आमदार! हे सदगृहस्थ विधानसभेचे अध्यक्षही होते. असो.
आपल्या राज्याचे जलसंपदा मंत्री कोण आहेत, याचे उत्तर सेकंदात द्या असा प्रश्न नागरिकांनाच नव्हे पत्रकारांना देखील विचारला तरी त्यांना त्याचे उत्तर लगेच देता येणार नाही! कारण राज्यकारभार कोण हाकतेय आणि कुणाच्या हाती काय आहे हे सर्वांना ठाऊक आहे!
अहमदनगरचे अहिल्यानगर झाले मात्र तिथल्याच कर्मभूमीचे ना. राधाकृष्ण विखे यांच्यात अहिल्यामाईंचे काही गुण आले का याचे उत्तर कोण देणार! त्या माऊलींनी अनेक ठिकाणी विहिरी खोदून दिल्या, पाण्याचे भव्य घाट बांधून दिले मात्र इथे हे सध्याचे जलसंपदा मंत्री आहेत हे कोणत्या तोंडाने सांगायचे?
"कामासाठी मी रात्र की दिवस पाहत नाही" असे समर्पण भावनेचे दिव्य विधान करणारे नि अत्यधिक तेजस्वी पार्श्वभूमीचे राज्याचे कृषीमंत्री ना. माणिकराव कोकाटे याच नाशिक जिल्हयातले! बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिका लाटल्याच्या प्रकरणात त्यांना जी शिक्षा सुनावली गेलीय त्याला सध्या तरी स्थगिती मिळालीय, अन्यथा यांनी कारागृहात देखील रात्रीचा दिवस केला असता!
एखादी विहीर तळाशी गेली आणि पस्तीस फुटावरून एखादी बाई पाणी भरायला जाऊन मेली बिली तर तालुक्याचे, जिल्ह्याचे, राज्याचे फार काही बिघडणार नाही हे या साऱ्यांना ठाऊक आहे. परत एकदा असो.
पेठ तालुक्याला लागून दिंडोरी, सरगाणा आणि त्र्यम्बकेश्वर हे भूमीसलग तालुके आहेत. पैकी पेठ दिंडोरी यांचा एकत्र विधानसभा मतदारसंघ आहे. आदिवासीबहुल मतदार असलेल्या कळवण-सुरगाणा मतदारसंघातही धरणवादी पक्षच सत्तेत आहे. तर बऱ्यापैकी आर्थिक संपन्न असणाऱ्या इगतपुरी - त्र्यंबकेश्वर मतदारसंघावरही धरणवादीचेच आमदार सत्तेत आहेत!
आताचे शिक्षण मंत्री दादा भुसे, छगन भुजबळ, सुहास कांदे, देवयानी फरांदे, राजाभाऊ वाजे, शोभा बच्छाव, दिलीप बनकर, राहुल दौलतराव आहेर, सीमा हिरे हे सर्व इथले प्रमुख राजकीय मान्यवर.
बाकी राज्य पातळीवरील अन्य नेत्यांविषयी काय बोलायचं? त्यांनी बोलण्यासारखं काय ठेवलंय?
सांगायची आणखी एक बाब म्हणजे केंद्र शासनाच्या योजनांची तसेच प्रधानमंत्री कार्यालयाच्या विविध योजनांची तसेच सार्वजनिक उपक्रमांची उत्तम अंमलबजावणी केल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांच्याकडून नाशिक जिल्ह्याचे नुकतेच कौतुक केले गेलेय.
या दुर्दैवी घटनेची एक प्रकारची थट्टा म्हणजे नाशिकच्या जिल्हाधिकारी महोदयांचे नाव जलज आहे! जलज शर्मा!
ज्या बोरीची बारी गावातली ही क्लिप आहे त्या गावाविषयी सांगायचं झाल्यास मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत इथे कडक उन्हाळा असतो. वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम तर वार्षिक पर्जन्यमान 2000 मिमी पर्यंत असते.
हा संपूर्ण तालुका 100 टक्के आदिवासी लोकसंख्या असणारा नि सह्याद्रीच्या कड्याकपारीत, डोंगराळ भागात वसला आहे. नैसर्गिकदृष्ट्या साधनसंपत्तीने नटलेला प्रदेश. इथले रहिवासी निसर्गाच्या सानिध्यात पाडा- वस्ती करून राहतात. विविध प्रकारची वनऔषधे, सागवान, महुची फुले इथे मुबलक उपलब्ध. आदिवासी बांधवांचा चरितार्थ जंगलावरच होतो.
तालुक्यातील आदिवासी समाजाने शेतात पिकविलेला माल व जंगलातून मिळवलेली वनऔषधे, भाज्या करंजाळी, कोहोर, पेठ, जोगमोडी येथील आठवडे बाजारात विकला जातो आणि त्यातून चलन उपलब्धी होते. इथे भातशेतीसह काही पारंपरिक पिके घेतली जातात. रस्त्यांची मोठी गैरसोय या भागात आहे.
दारिद्र्य, व्यसनाधीनता, अनारोग्य यांच्या जोडीला सरकारी अनास्था हा इथला मुख्य आजार! देश स्वतंत्र होऊनही 75 वर्षांनी इथल्या मूलभूत समस्या बहुतांश करून तशाच्या तशा असल्याने औरंगजेबाला इथेच फासावर लटकावले तर इथले अनेक प्रश्न सुटतील अशी अनेकांना खात्री वाटते!!
- समीर गायकवाड
ही क्लिप पाहिल्यानंतर मर्मकवी अशोक नायगांवकर यांची 'खडी फोडते बहिणाबाई..' ही कविता आठवली आणि डोळ्यात नकळत पाणी आलं..
खडी फोडते बहिणाबाई.. -
खडी फोडते बहिणाबाई, ओवीला बघ रक्त चिकटले
रिताच हंडा वणवण फिरतो, फक्त खालची माय बदलली...
पारोशाने नदी म्हणाली, किती दिसात गं न्हाले नाही
मरता मरता झाड म्हणाले, दोन थेंब तरी पाणी द्या हो!
शहाणपटीने धारण बांधले, अभियंत्यांना मुता म्हणालो
गाळ म्हणाला धरणाचीया, किती उंचवर बांधू समाधी?
खडी फोडते बहिणाबाई, ओवीला बघ रक्त चिकटले
रिताच हंडा वणवण फिरतो, फक्त खालची माय बदलली!
असा कसा गं श्रावणास हा, विशाखाचा चटका बसला
गाव म्हणाले पाणी पाणी, आम्ही गळ्यातून गाणी म्हटली
त्या तुकयाची गाथा बुडता, नदीत अवघी ओल पसरली ;
या कवितेची वही बुडविण्या, एक तरी हो डोह राहू द्या...
_________________________________________________________
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा