![]() |
क्रांती महिला संघाच्या स्नेह मेळाव्याचे बॅनर |
ज्या लोकांच्या आयुष्यात आनंद नाही त्यांना एक वेगळ्याच आनंदाची अनुभूती द्यायची. ज्यांना प्रवास करता आला नाही, पर्यटन करता आलं नाही, हॉटेलिंग करता आले नाही, विविध स्थळांना वा शहरांना भेटी देता आल्या नाहीत अशांना त्यांनी प्राधान्य दिले. विविध सामाजिक स्तरावरील गांजलेल्या, पिचलेल्या, तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या लोकांना या आनंदाची अनुभूती ते मिळवून देऊ लागले. मजूर, ओझी उचलणारे हमाल, वंचित शोषित घटक, कामवाल्या स्त्रिया, हातावर पोट असणारे गरीब यांच्या जीवनात त्यांनी आनंदाचे काही क्षण भरले! काही दिवसापूर्वी त्यांचा माझा संवाद झाला तेव्हा त्यांनी सेक्सवर्कर महिलांना मुंबईवारी करवून आणण्यासाठी मध्यस्ताचे काम करण्याबाबत विचारले. मी तत्काळ होकार दिला.
.jpg)
साहजिकच पहिले प्राधान्य माझ्या शहराला म्हणजे सोलापूरला दिले. आमच्या इथल्या तरटी नाका परिसरातील सेक्सवर्कर माताभगिनींचे चेहरे माझ्या मनःचक्षुपुढे तरळले. या महिलांच्या हक्कासाठी रेणुका जाधव यांची क्रांती महिला संघ ही संस्था अत्यंत तडफेने, आस्थेने आणि मनापासून काम करते. त्यांच्यासाठी प्रसंगी आंदोलनही करते नि सणासुदीला त्यांना गोडधोडही देते! बऱ्याच मुलींना यातून बाहेर काढण्याचे कठीण काम रेणुका ताईंनी केले आहे.
त्यांच्या कुटुंबातील गतपिढीला या व्यवसायाचे चटके बसले आहेत, यातली दुःखे त्यांनी भोगली आहेत. त्यांच्यापासून प्रेरणा घेत एमएसडब्ल्यूचे शिक्षण घेतलेल्या रेणुका ताईंनी ही संस्था स्थापन केली नि आपले कार्यक्षेत्र निवडले. दरवर्षी त्यांचे विविध उपक्रम सुरूच असतात. त्यामुळे माझ्या नजरेत पहिले नाव त्यांचेच होते. त्यांना संपर्क साधताच त्यांनी आधी महिलांशी चर्चा केली नि त्यांचा होकार येताच हिरवा झेंडा दाखवला. पहिल्या टप्प्यात तीस मुलींची निवड केली गेली. त्यासाठी आवश्यक त्या औपचारिकतांची पूर्तता केल्यानंतर अपूर्वा मयेकर यांनी स्वखर्चाने त्यांना मुंबईला नेले. मुंबईत त्यांची राहण्याची जेवणाची उत्तम सोय करण्यात आली. स्वतंत्र वाहनातून त्यांना मुंबईदर्शन घडवले गेले. प्रेमपूर्वक सफर घडवली गेली!
वास्तवात या महिलांनी नेटाने याचसाठी पैसे जमवले असते तर त्यांनाही उपलब्धीनुसार ही सफर करता आली असती मात्र या सफरीमध्ये त्यांना जे प्रेम भेटले, जी आस्था लाभली आणि जो मान सन्मान भेटला तो त्यांना त्यांच्या उभ्या आयुष्यात आजवर तरी कधीही भेटला नव्हता. रेणुका ताईंच्या नेतृत्वाखाली त्या संघटित नक्की होत्या मात्र आर्थिक गणिताच्या जुळणीपायी असा एकत्रित प्रवास त्यांना शक्य नव्हता.
मुंबई पाहताना या सर्वजणी हरखून गेल्या होत्या! त्यांच्या आयुष्यातला हा सर्वात सुखद प्रवास होता! अपूर्वा मयेकर आणि रेणुका जाधव या दोघींनी हा आनंद त्यांना मिळवून दिला! या सर्वजणी मुंबईचा प्रवास संपवून सिद्धेश्वर एक्सप्रेसने सोलापूरला परतल्या तेव्हा स्थानिक पत्रकार मित्रांना मी कळवले होते की आनंदाची एक्सप्रेस सोलापूरला आलीय!
आपल्यासाठी अनेक गोष्टी अगदी सहज विनासायास दिमतीस असतात मात्र जगात असेही काही लोक आहेत की ज्यांच्यासाठी या साध्या सुध्या गोष्टी त्यांच्यासाठी प्रिव्हेलेजेस असतात! जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे हेच खरे!
कुणाच्या आनंदासाठी आपण कणमात्र जरी कारणीभूत असलो तरी त्याचा आनंद वेगळाच असतो! हे आनंदक्षण जगातल्या हरएक शोषित पीडित वंचित घटकाच्या वाट्यास येवोत नि सकलांची दुःखे सरोत, रेणुका ताई आणि अपूर्वा ताईंसारख्या माणसांचं प्रमाण वाढो हीच मनोकामना!
- समीर गायकवाड
फोटोविषयी - आतिश कविता लक्ष्मण या ध्येयवेड्या मुलाची संभव फौंडेशन नावाची एनजीओ आहे, क्रांती महिला संघ आणि संभव यांच्या एकत्रित मंचावर या महिलांची दिवाळी आनंदाने साजरी होते. त्यांना फराळ नि साडीचोळी दिली जाते! अशाच एका कार्यक्रमास हजेरी लावली होती तेव्हाचा हा फोटो. रेणुका ताईंसोबतची छबी! अत्यंत कठीण परिस्थितीत त्या आपली एनजीओ चालवतात, त्यांचे कौतुक करावे तितके कमी आहे.
क्रांती एनजीओची माहिती -
रेणुका जाधव यांच्या एनजीओस संपर्क करायचा असेल तर -
+91 99754 75709
kmsswasti777@gmail.com
क्रांती महिला संघाची वेबसाईट - https://krantimahilacbo.com/
क्रांती महिला संघास मदत करण्यासाठीचा तपशील - Account Name: Kranti Mahila Sangh
Account Number : 60018038267
IFSC Code : MAHB0000017
Bank Name : Bank of Maharashra, Navi Peth Solapur
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा