शनिवार, २१ जुलै, २०१८

जागतिक खाद्यसंस्कृतीत कृत्रिम मांसाची भर....


जगभरात मोठ्या प्रमाणात वाचल्या जात असलेल्या ‘द अटलांटीक’ या लोकप्रिय नियतकालिकाच्या १३ जुलै २०१८ च्या आवृत्तीत साराह झांग यांचा ‘द फार्सियल बॅटल ओव्हर व्हॉट टू कॉल लब ग्रोन मीट’ हा लेख प्रसिद्ध झाला आणि जगभरातील मीडियाने कान टवकारले. कारण आतापर्यंत जी गोष्ट कपोलकल्पित म्हणून दुर्लक्षिली गेली होती, त्याबाबतीतचा हा जगासाठीचा वेकअप कॉल होता. १२ जुलै रोजी अमेरिकन अन्न आणि औषध प्रशासनाने(FDA) एक लोकबैठक बोलावली होती. विषय होता, ‘प्रयोगशाळेत कृत्रिम रित्या वाढवल्या गेलेल्या टेस्ट-ट्यूब मांसाचा’. या बैठकीत FDAने उपस्थित लोकांना आणि संशोधकांना पृच्छा केली की, 'या मांसास काय संबोधायचे ?' क्लीन मीट (स्वच्छ मांस), कल्चर्ड मीट (प्रक्रियान्वित मांस), आर्टिफिशियल मीट (कृत्रिम मांस), इन व्हिट्रो मीट (बाह्यांगीकृत मांस), सेलकल्चर प्रॉडक्ट (कोशिकाप्रक्रियाधारित उत्पादन), कल्चर्ड टिश्यू (प्रक्रियाकृत उती-अमांस) अशी नावे यावेळी सुचवली गेली. खरे तर ही केवळ नामाभिधानाची प्रक्रिया नव्हती. हे उत्पादन स्वीकृत करून त्याला बाजारात आणण्याची परवानगी देत आहोत याची ही चाचणी होती.

गुरुवार, १९ जुलै, २०१८

रेड लाईट डायरीज - पांढरपेशींच्या दुनियेतला ऑनलाईन रेडलाईट 'धंदा' ..


पुण्यातील हिंजवडी येथील आयटी पार्कमधील गणेश मंदिरानजीकच्या एका उच्चभ्रू वस्तीतील अपार्टमेंटमध्ये अठरा जुलै २०१८ रोजी पोलीसांनी रेड टाकून सात मुलींची सुटका (?) केली आणि पाच जणांना अटक केली, दोघे फरार (!) होण्यात यशस्वी झाले. हे रॅकेट व्हॉट्सऍप आणि इन्स्टाग्रामवरून चालत होते. आयटी पार्क मधले रॅकेट असल्याने याचे सर्व्हिस प्रोव्हायडींग फंडे ही डिजिटल आणि आधुनिक होते. ही माहिती स्टेशन डायरीतून येते. मी याही पुढची माहिती देतो. या गोरखधंद्याची व्याप्ती पुणे शहरात वा संपूर्ण महाराष्ट्रात वा अखिल देशात किती आणि कशी असावी याची झलक तुम्हाला यातून मिळेल.

शनिवार, १४ जुलै, २०१८

नासाची सूर्यावर स्वारी ...


आकाशांत सर्वत्र तारे व तेजोमेघ अव्यवस्थित रीतीनें पसरलेले दिसतात. जिथे ते दाट दिसतात त्या भागाच्या दिशेनें विश्वाचा विस्तार अधिक दूरवर असतो. तर ज्याला आपण दीर्घिका म्हणतों तो सर्व आकाशास वेष्टणारा, काळोख्या रात्रीं फिकट ढगाप्रमाणें दिसणारा पट्टा होय. हा असंख्य तारे, तारकापुंज व तेजोमेघ यांची बनलेला आहे. तेजोमेघ म्हणजे आकाशांत दुर्बिणींतून अंधुकपणें प्रकाशणारा वायुरूप ढगासारखा पदार्थ. आपली सूर्यमाला मिल्की-वे(आकाशगंगा) नावाच्या दिर्घिकेत आहे. सूर्यमाला सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्याच्या भोवती फिरणाऱ्या खगोलीय वस्तूंनी बनलेली आहे. सूर्यमालेची निर्मिती ही तेजोमेघ सिद्धान्ताप्रमाणे झाली असल्याचे खगोलशास्त्रज्ञ मानतात. यानुसार एका मोठ्या रेणूंच्या ढगाच्या कोसळण्यामुळे सुमारे ४.६ अब्ज वर्षांपूर्वी सूर्यमालेची निर्मिती झाली. हा रेणूंचा ढग कित्येक प्रकाशवर्षे अंतरावर पसरला होता व त्यापासून अनेक ताऱ्यांची निर्मिती झाली. भोवतालच्या तारकासमूहातील ताऱ्याच्या स्फोटामुळे निर्माण होणाऱ्या प्रघाती तंरंगांमुळे सूर्य तयार झाला.

''सूर्य आत्मा जगतस्तस्थुषश्च'' अशी जी ॠग्वेदांत सूर्याची थोडक्यांत महति गायिली आहे ती यथार्थ नाहीं असें कोण म्हणेल ! सूर्य हा तारा आपल्या सूर्यमालेच्या केंद्रस्थानी आहे. सूर्य हा G2V या वर्णपटीय विभागात (spectral class) मोडतो. G2 म्हणजे त्यच्या पृष्ठभागाचे तापमान जवळपास ५५०० केल्व्हिन असून त्याचा रंग पिवळा आहे. सूर्य त्याचे हायड्रोस्टॅटिक संतुलन सांभाळून असल्याने तो प्रसरणही पावत नाही किंवा आकुंचनही पावत नाही. सूर्यामध्ये स्फोट होण्याइतके वस्तुमान नाही. त्याऎवजी ४०० ते ५०० कोटी वर्षांनी तो लाल राक्षसी ताऱ्याच्या अवस्थेत जाईल. या अवस्थेनंतर तीव्र तापमान स्पंदनांमुळे सूर्याचे बाह्य आवरण फेकले जाईल व प्लॅनेटरी नेब्युला तयार होईल. शेवटी सूर्य श्वेत बटूमध्ये रुपांतरित होईल. सूर्यमालेतील एकूण वस्तुमानापैकी ९९% पेक्षा जास्त वस्तुमान एकट्या सूर्यामध्ये आहे. सूर्यापासून उत्पन्न होणारी ऊर्जा सूर्यकिरणांच्या स्वरूपात बाहेर पडते व प्रकाश संश्लेषणाच्याद्वारे पृथ्वीवरील संपूर्ण जीवसृष्टीला आधार देते आणि पृथ्वीच्या वातावरणामध्ये व हवामानामध्ये बदल घडवते.

सोमवार, ९ जुलै, २०१८

'त्या' फोटोच्या निषेधास असलेली इतिहासाची झालर...



काही दिवसांपूर्वी चित्रपट अभिनेते रितेश देशमुख यांनी चित्रपट दिग्दर्शक रवी जाधव आणि कादंबरीकार विश्वास पाटील यांच्यासह रायगडावरील मेघडंबरीत सिंहासनाधिष्टीत शिव छत्रपतींच्या मूर्तीसमोर बसून फोटो काढले आणि ते सोशल मिडियावर पोस्ट केले. यावरून त्याच्यावर प्रखर टीका झाली, कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजे यांनी देखील त्यांच्यावर टीका केली. रितेश देशमुख यांनी लोकांच्या नाराजीचे उग्र स्वरूप पाहून तत्काळ माफी मागत ते फोटो डिलीट करून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. खरे तर रायगडावरील मेघडंबरीच्या नजीक जाण्यास कुणालाही परवानगी नाही, दुरूनच दर्शन घेऊन लोक परत फिरतात. मग हे लोक तिथे आत कसे काय गेले, आत गेल्यानंतर मेघडंबरीवर चढताना त्यांना कुणीच कसे अडवले नाही, दडपणापायी अडवले नाही असे समजून घेतले तरी महाराजांच्या मूर्तीसमोर पाठमोरे बसण्यास तरी त्यांना मज्जाव का गेला नाही हा प्रश्नही अनुत्तरितच राहतो. याच्या चौकशा वगैरे होतील, पुढचे सोपस्कार पार पडतील. पण सोशल मिडीयावर सेलिब्रिटींचे तळवे चाटणारा एक वर्ग आहे, त्यातील काहींनी खोचक शब्दाआडून छुपा सवाल केला की, "हे सर्वजण बसलेलेच होते, उभे नव्हते ; शिवाय इतका गहजब करायचे काही कारण नव्हते कारण शिवछत्रपतींवरील चित्रपटाच्या होमवर्कसाठीच हे तिथे गेले होते.' अशी मल्लीनाथीही करण्यात आली. न जाणो असा विचार आणखी काहींच्या मनातही आला असेल, पण त्यांना या वर्तनाच्या निषेधामागील कारण माहिती नसेल यावर खरंच विश्वास बसत नाही.

शनिवार, ७ जुलै, २०१८

सोशल मीडिया कोणी भरकटवला ?



व्हॉटसऍपवर व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे काही दिवसापूर्वीच्या घटनेत पुरोगामी महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात भिक्षुकी करणाऱ्या भटक्या जमातीच्या पाच निरपराध लोकांना शेकडो लोकांच्या बेभान जमावाने क्रूरपणे ठेचून मारले. या नंतर सरकारने जागे झाल्याचे सोंग केले. यंत्रणांनी कारवाईचे देखावे सुरु केले. ४ जुलैला व्हॉट्सऍपने देखील खेद व्यक्त करण्याची औपचारिकता पार पाडत 'यावर अधिक सजगता बाळगली जाईल' अशी हवा सोडली. मुळात हा प्रश्न असा एका दिवसाचा वा एका घटनेचा नाही. याला प्रदीर्घ पूर्वनियोजित गैरवापर कारणीभूत आहे. आपल्याला पाहिजे तसा वापर करताना खोटे व्हिडीओ पाठवणे, खोट्या आकडेवारीवर आधारित माहितीचा डोंगर उभा करणे, प्रतिस्पर्ध्यांचे चारित्र्यहनन करण्यासाठी कोणत्याही स्तराला जाणे याचे राजकारण्यांना काहीच वाटले नाही. आधी विरंगुळा म्हणून हाती आलेला सोशल मीडिया नंतर व्यसनात रुपांतरीत झाला आणि सामान्य माणूस देखील आपली विकृती यातून खुलेआम व्यक्तवू लागला. त्यामुळेच धुळ्याच्या घटनेला अनेक पैलू आहेत. याला केवळ घटनासापेक्ष पाहून चालणार नाही तर याच्या मुळाशी जाणे अपेक्षित आहे.

रविवार, १ जुलै, २०१८

फेअरवेल टू आर्म्स'चा रम्य इतिहास..


मध्यंतरी सोशल मीडियावर 'सिक्स वर्ड स्टोरी'चा ट्रेंड भलताच व्हायरल होता. सहा शब्दांमध्ये जमेल ती गोष्ट सांगण्याचा प्रयत्न अनेकजण करत होते . या ट्रेंडचा नेमका अर्थ खूप कमी लोकांना ज्ञात होता ! या ट्रेंडला एक मोठा इतिहास आहे, विख्यात अमेरिकन लेखक, साहित्यातील नोबल पुरस्कार विजेता अर्नेस्ट हेमिंग्वेला याचं श्रेय जातं. १९३२ ते १९४५ या काळात त्याचं लेखन इतके गाजलं होतं की त्यावर तिकीट बारीची मोडतोड करणारे सिनेमे तयार झाले ! हेमिंग्वेचे सुरुवातीचे दिवस आणि नंतरचे दिवस यात जमीन अस्मानचा फरक असल्यानं त्याला लेखक म्हणून जी आयडेंटीटी हवी होती ती मिळाली नव्हती. एकदा तो आपल्या लेखक मित्रांसोबत चर्चा करत होता. मित्रांशी बोलताना आपल्यातल्या सिद्धहस्त लेखणीची ताकद सांगितली. यावर त्याच्या मित्रांनी आव्हान दिलं की ‘तो जर इतकाच भन्नाट लेखक असेल तर केवळ सहा शब्दात गोष्ट लिहून दाखवावी !' त्यांचं हे आव्हान जिव्हारी लागलेला हेमिंग्वे हळवा झाला. त्यानं तत्काळ गोष्ट लिहिली ! हेमिंग्वेनं लिहिलं होतं - 'न वापरलेले, तान्हुल्याचे बूट विक्रीला आहेत......' ( For Sale: Baby shoes, Never worn...) हेमिंग्वेचे हे शब्द खूपच लोकप्रिय झाले कारण त्यात अनेक गूढ, करूण आणि मृदू रंग भरले होते. हेमिंग्वेने मित्रांचे आव्हान स्वीकारून पैज जिंकली खरी मात्र इथून त्याची जगभरात ख्याती वाढली. लोकांनीही हा प्रयत्न करून पाहिला ! १९९० च्या दशकात युरोपात या गोष्टीचे पुन्हा पेव फुटले. सोशल मिडियावर दरवर्षी जून जुलैमध्ये Six Word Stories हा ट्रेंड आघाडीवर राहू लागला ! हा ट्रेंड याच काळात झळकतो कारण दरवर्षी २ जुलैला अर्नेस्ट हेमिंग्वेचा स्मरणदिवस साजरा होतो. विसाव्या शतकातील अमेरिकेचा सर्वश्रेष्ठ लेखक अन Six Word Storiesचा जनक असणारा अर्नेस्ट हेमिंग्वे एक अफलातून आयुष्य जगला अन एक दुर्दैवी शेवटाने गेला ! त्याच्या ५८ व्या स्मरणदिनाच्या औचित्याने हा लेख.