शायरी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
शायरी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, १७ सप्टेंबर, २०२२

वो जो हम में तुम में क़रार था .. - मोमीनची भळभळती जखम




अनेकदा असे वाटते की अंतःकरणापासून लिहिलेल्या हरेक कवितेला, गझलेला एक पार्श्वभूमी असावी.
'वो जो हम हम में तुम में करार बाकी था..'या गझलेविषयी असेच काही वाटत आलेय.
ही गझल लिहिलीय मोमीन ख़ान मोमीन यांनी.
 
मोमीन यांचे वडील गुलाम नबी खान हे पेशाने हकीम होते. कोवळ्या वयातच मोमीनला आपल्या कौटुंबिक व्यवसायाचे बाळकडू मिळाले. तारुण्यात पदार्पण करताच त्यांनी आपला पारपांरिक पेशा स्वीकारला. मात्र त्यांचे मन त्यात लागत नव्हते.
तो काळ ग़ालिब आणि ज़ौक़ यांचा होता. युवा मोमीनचे मन त्यांच्या शायरीकडे ओढ घेई. त्याचा ओढा कवितेकडे अधिक होता.
अस्सल प्रेम अनुभवल्याशिवाय वा प्रेमात धोका खाल्ल्याशिवाय शायरीला खऱ्या अर्थाने वजन प्राप्त होत नाही असं आजही मानलं जातं. मोमीनच्या मनातले प्रेमपाखरू भिरभिरण्याआधीच त्यांचा निकाह झाला.

बुधवार, ३० मे, २०१८

लेफ्टनंट कर्नल ते शायर ....फैज अहमद !



रावळपिंडी कटातील आरोपींची सुनावणी सुरु होती. आरोपीच्या पिंजऱ्यात फ़ैज उभे होते. सरकारी वकिलांनी त्यांच्याकडे तिरकी नजर टाकत सवाल केला त्यावर फ़ैज तल्लखतेने उत्तरले - "सुगंध कसा पसरवला जावा याची देखील सुन्नाह आहे ( प्रेषित पैगंबरांच्या आज्ञा - सुन्नाह sunnah ) त्यामुळे तुम्ही इथे जे काही खोटेनाटे पसरवत आहात ते तर खूप गैर आहे !" फ़ैज यांनी केलेल्या या अनपेक्षित बचावापुढे सरकारी वकील हडबडून गेले. बरेच दिवस त्यांना डांबून ठेवण्यात आलं मात्र अखेरीस रिहा करावंच लागलं. फ़ैज अहमद फ़ैज यांची शायरी उस्फुर्त अशा प्रकारची होती !

भारत आणि पाक स्वतंत्र झाल्यावर पाक सरकारने फ़ैज यांना रावळपिंडी कटाचे आरोपी जाहीर करून तंब्बल पंचवीस वर्षे तिथल्या तुरुंगात डांबले. लष्करात राहूनही कवीहृदय असणाऱ्या या कमालीच्या हळव्या माणसाचे तिथे अतोनात हाल झाले. तिथल्या तुरुंगात राहून त्यांनी शायरी केली, लेखन केले. सहा भाषा अवगत असलेल्या, कर्नलच्या हुद्द्यावर काम केलेल्या या शायरला १९६२ मध्ये तत्कालीन रशियन सरकारने लेनिन शांतता पुरस्कार दिला होता. प्रगतीशील लेखन चळवळीचे फ़ैज सक्रीय सदस्य होते. मात्र पाकचे पंतप्रधान लियाकत अली खानांना फ़ैज भारतीय हेर असल्याचा संशय होता. फ़ैज यांच्या मृत्यूपश्चात त्यांचे समग्र साहित्य प्रकाशित झाले आणि एका प्रतिभावंत शायराचा बहुआयामी परिचय जगाला झाला. अनेक वर्षे कारावासात झिजवत ठेवल्यानंतर पाकिस्तान सरकारला पुढे उपरती झाली आणि १९९० मध्ये कर्नल फैज अहमद फैज यांना निशान- ए- पाकिस्तानचा पुरस्कार मरणोत्तर देण्यात आला. काहींची खरी कदर त्यांच्या मरणानंतर केली गेलीय अशा लोकांत दुर्दैवाने फ़ैज यांचेही नाव आहे ही मोठी क्लेशदायक बाब होय.

नशा आणणाऱ्या 'कैफी" गीतांचा इतिहास...



दुपारचे चार वाजले होते. फतेह हुसेन रिझवी आपले मित्र बाबू खान यांच्याशी गप्पा मारत बसले होते. फतेहचा मुलगा अतहर, बाहेरून खेळत थेट घरात आला. बाबू खान गप्पा मारून निघून गेले. फतेह रिझवींनी अतहरला हाक मारून विचारले, ‘‘ बाबू खान यांना सलाम न करता तू थेट आत कसा काय गेलास?’’ अतहरने डोके खाजवत म्हटले, ‘‘अब्बा, मी त्यांना पाहिलेच नाही.’’ अब्बा म्हणाले, ‘‘ आता असं कर, समोर जी ताडाची झाडं दिसतात ना त्या प्रत्येकाला ‘सलाम’ करून ये.’’ बिचारा लहानगा अतहर नावाप्रमाणे खूपच पवित्र आणि निरागस होता. तो गेला आणि प्रत्येकाला सलाम ठोकत बसला. ताडाची झाडं किती होती ? दीडशेपेक्षा जास्त !

शुक्रवार, २० एप्रिल, २०१८

शायरीची ताकद..

Image result for habib jalib poetry

१९७३ मधील ही घटना आहे. पाकिस्तानात जुल्फीकार अली भुट्टो यांचे सरकार स्थापन झाले होते. आपल्या यशाचा आणि सत्तेचा आनंद साजरा करण्यासाठी त्यांनी आपल्या होम टाऊनमध्ये म्हणजे लरकानामध्ये एका मेजवानीचे आयोजन केले होते. अर्थातच अत्यंत उच्चस्तरीयांकरिता निमंत्रण होते. या मेजवानीत सर्व शाही बडदास्त राखण्याचे त्यांचे आदेश होते. पंजाबच्या तत्कालीन गव्हर्नरांना विशेष आदेश दिला गेला की या प्रसंगी नृत्याची अदाकारी पेश करण्यासाठी लाहौरची प्रसिद्ध नर्तिका मुमताज हिला वर्दी देण्यात यावी. गव्हर्नर साहेबांनी याची जबाबदारी वरिष्ठ पोलिस अधिकारी अब्दुल गनी यांच्यावर सोपवली. त्यांनी मुमताजला गळ घातली पण पाकिस्तानी मैफलीत होणारे शोषण ठाऊक असल्याने तिने कानावर हात ठेवले. पोलिस युपी बिहारचे असोत की पाकिस्तानच्या सिंध पंजाबचे असोत त्यांचा एकच खाक्या असतो तो म्हणजे दडपशाही.

बुधवार, २८ जून, २०१७

दाग देहलवी - आईच्या अधुऱ्या प्रेमाची गझल.....

daag dehlavi


एखाद्याची कविता वा शायरी खूप टोकदार असली की ओळखून घ्यावं की त्यानं खूप कठीण काळ पाहिलेला आहे, अशांच्या आयुष्यात डोकवलं की अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतात. जगात अशीही माणसं जन्माला येतात की त्यांना नको ती दुःखे अनुभवावी लागतात, नको ती दृश्ये पाहावी लागतात, बदनामीचा डाग नाहक आयुष्यभर माथ्यावर मिरवावा लागतो. त्यातही हा सल आपल्या सर्वात जवळच्या म्हणजे आईच्या नात्याचा असला की जगणं असह्य होऊन जातं आणि उरतो तो अथांग वेदनांचा काळाकभिन्न भवसागर. 
ही दास्तान एका विख्यात शायराची आहे. आयुष्यभर त्याला आपल्या जन्मदात्या आईची अखंड फरफट पहावी लागली. कळत्या वयापासून त्याच्या आईला जगाने दिलेली दुषणे त्याने काळजात दफन करून ठेवली होती, ज्याच्या जखमांचे नासूर होत गेले आणि त्यातून शायरी प्रसवली.

बुधवार, ८ मार्च, २०१७

अजरामर ग़ालिब .....



ग़ालिबच्या पत्नीने अनेक अपत्यांना जन्म दिला. मात्र त्याचं एकही अपत्य जगत नव्हतं. तेव्हा माणसाच्या काही सगळ्याच इच्छा पूर्ण होत नाहीत हे उमजून असलेला ग़ालिब लिहितो…'हजारों ख्वाहिशे ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले…' या पातळीचं सत्य लिहिल्यानंतरही गालिब स्वतःच्या आयुष्यातून पुत्राच्या इच्छेला बाहेर काढत नाही आणि तो सतत मूल जगण्याची वाट पाहत राहतो. पाचवीला पूजलेली आर्थिक चणचण, एकही अपत्य न जगणं, प्रेयसीचं निधन अशा नैराश्याच्या फेरयात अडकलेला गालिब लिहितो …
'कैदे हयात, बन्देगम, अस्ल में दोनों एक हैं
मौत से पहले आदमी गम से नजात पाए क्यों?…'
असं जेंव्हा तो मन व्यक्तवतो तेव्हा मनातल्या भावना मांडणारे अचूक शब्द आणि त्या शब्दांत भरून राहिलेला अर्थ जाणवून ऐकणारा स्तिमित होतो.

मंगळवार, ९ फेब्रुवारी, २०१६

कभी शाम ढले तो मेरे दिल में आ जाना - निदा फाजली ...



२००१ चे साल असेल. प्रीतीश नंदी, पूजा भट्ट आणि तनुजा चंद्रांना तेलुगु सुपरहिट 'स्वाती किरणम'वर बेतलेला हिंदी चित्रपट बनवायचा होता. हळव्या मनाच्या संगीत शिक्षकाच्या आयुष्यावर हा चित्रपट होता. त्यामुळे गाणी आणि संगीत ह्यातच सिनेमाचा प्राण होता. प्रीतिशजींना यासाठी निदा फाजलींचे नाव अधिक योग्य वाटले. त्यांनी निदांना गाणी देण्याची विनंती केली. काही तासात त्यांनी आठ गाणी लिहून दिली. तनुजा चंद्रा अवाक झाल्या कारण प्रत्येक गाणं अप्रतिम होतं. निदांनी आपल्या हृदयातील सारं तुफान ह्या गाण्यात रितं केलं होतं. चित्रपट तिकीट बारीवर सणकून आपटला पण गाणी सुपरहिट झाली. 'कभी शाम ढले तो मेरे दिल में...' हे यातलं सर्वाधिक गाजलेलं गीत. एके काळी सर्व संगीत वाहिन्यांवर याचा कब्जा होता. मात्र 'कभी शाम ढले तो मेरे दिल में आ जाना, कभी चाँद खिले तो दिल में आ जाना.... मगर आना इस तरह तुम कि यहाँ से फिर ना जाना..." असं निदा कुणाला आणि का म्हणत आहेत याचा अर्थ ध्यानी आला की आपल्याही डोळ्याच्या कडा ओलावतात.

मंगळवार, १२ मे, २०१५

दोस्त, बिवी और शायरी - नात्यांचे एक अनोखे सत्यकथन ....



दोन मित्रांचे त्यांच्या हयातीतच एकाच स्त्रीशी आलटून पालटून लग्न होऊ शकते का ? असे झाले तर त्यांच्यातले सामंजस्य अबाधित राहू शकते का ?
खऱ्या मैत्रीत स्त्री-संबंध कधीच दुरावा आणू शकत नाहीत याचा प्रत्यय देणारी मित्रप्रेमाची नशिल्या शायरीने सजलेली रोमांचक सत्यगाथा..

दोन जिवलग मित्र. दोघेही अप्रतिम प्रतिभावंत शायर.
त्यापैकी वयाने मोठा असणारा असगर आणि कमी वयाचा जिगर.
जिगरची आई १० व्या वर्षी वारलेली तर वडील १५ व्या वर्षी निवर्तलेले. शिवाय त्याचा निकाह जिच्यासोबत झाला होता ती देखील लवकर वारली.
वाहिदन असं त्या अभागी स्त्रीचं नाव होतं.
या नंतर तो आग्र्याच्या एका वेश्येच्या प्रेमात पडला होता, शिराज तिचं नाव.