रविवार, २८ जून, २०१५

बैलाचे ऋण - श्री.दि.इनामदार



तुझ्या शेतात राबून माझी सरली हयात,
नको करू हेटाळणी आता उतार वयात
नाही राजा ओढवत चार पाऊल नांगर, 
नको बोलूस वंगाळ नको म्हणूस डंगर !

माझ्या ऐन उमेदीत माझी गाईलीस ओवी, 
नको चाबकासारखी आता फटकारू शिवी
माझा घालवाया शीण तेव्हा चारलास गूळ, 
कधी घातलीस झूल कधी घातलीस माळ

अशा गोड आठवणी त्यांचे करीत रवंथ, 
मला मरण येऊ दे तुझे कुशल चिंतीत
मेल्यावर तुझे ठायी पुन्हा ए कदा रुजू दे, 
माझ्या कातड्याचे जोडे तुझ्या पायात वाजू दे ....

शुक्रवार, २६ जून, २०१५

चॉकलेट पुराण ...




चॉकलेट म्हटल्याबरोबर तोंडाला पाणी सुटायचा काळ बालपणीचाच. आता चॉकलेट ढीगभर खायला मिळतात पण त्यात ते आकर्षण नाही. मला आठवतेय लहानपणी रावळगाव चॉकलेट मिळायचे. दोन पैशात एक आणि पाच पैशाला पाच अस त्याचा भाव असे. माझ्या गणिताचे लहानपणापासून ते आजपर्यंत तीन तेरा नऊ अठरा झाले असल्याने चॉकेलटच्या भावाचे हे गणित मला कधी कळलेच नाही. पांढऱ्या प्लास्टीक वेष्टनात गुंडाळलेले अस्सल चॉकलेटी रंगाचे गोल गरगरीत अगदी मजबूत टणक असे ते चॉकलेट...तोंडात हळू हळू घुमवत घुमवत गालाच्या या पडद्यापासून ते त्या पडद्यापर्यंत जीभेशी मस्ती करत ते विरघळून आकाराने बारीक होत जायचे. दोघा तिघांनी एकदम चॉकलेट खाल्ले असेल तर तुझे आधी संपले की माझे आधी संपले हा वानगीदाखल संशोधनात्मक कार्यक्रम तोंडातले चॉकलेट तोंडाबाहेर काढून तपासणी काढून पूर्ण व्हायचा. आम्ही सिद्धेश्वर पेठेत राहत असताना तिथे रेणके राहत असत, त्यांची पोरे अगदी वस्ताद. ते कधीच चॉकलेट विरघळू देत नसत,मग त्याच्याकडे आशाळभूत नजरेने बघताना टुकटुक माकड कधी होऊन जायचे काही कळत नव्हते.

गुरुवार, १८ जून, २०१५

मराठी कवितेचे राजहंस - गोविंदाग्रज !....



'मंगल देशा ! पवित्र देशा ! महाराष्ट्र देशा !
प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा
राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा
नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा
अंजनकांचन करवंदीच्या काटेरी देशा
बकुळफुलांच्या प्राजक्ताच्या दळदारी देशा
भावभक्तीच्या देशा आणिक बुद्धीच्या देशा
शाहिरांच्या देशा, कर्त्या मर्दांच्या देशा
जे ध्येय तुझ्या अंतरी निशाणावरी,
नाचते करीजोडी इहपर लोकांसी
व्यवहारा परमार्थासी वैभवासी वैराग्यासी
जरिपटक्यासह भगव्या झेंड्याच्या एकचि देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा

महाराष्ट्राचे वर्णन करणाऱ्या बऱ्याच कविता येऊन गेल्या आणि भविष्यात देखील त्या येत राहतील. आपण ज्या भूमीत जगतो, लहानाचे मोठे होतो तिचे ऋण व्यक्त होण्यासाठी आपल्या मातीवर प्रेम करणारी, तिचे गुणगान करणारी कविता लिहावी अशी भावना कविमनात उत्पन्न होणे स्वाभाविक आहे. तदोदभवित हेतूने आजपावेतो अनेक नामवंत कवींनी मराठी माती आणि मराठी माणसांचा गौरव करणाऱ्या कविता लिहिल्या आहेत पण कवी गोविंदाग्रजांच्या या कवितेतला जोश काही औरच आहे.

‘तरुण आहे रात्र अजुनी’ आणि सुरेश भट...



सुरेश भट व्यक्ती आणि वल्लीही या लेखात त्यांचे स्नेही डॉ. किशोर फुले यांनी अत्यंत रोमांचक आणि बहारदार आठवणींचा शेला विणला आहे. त्याचा गोषवारा देण्याचा मोह कुणालाही आवरणार नाही. ते लिहितात की, “अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालयात शिकत असतांना सुरेश भट विद्यार्थ्यांमध्ये खूपच लोकप्रिय होते. त्यांच्या भारदस्त व्यक्तिमत्त्वाचा एक दरारा होता. त्या काळात अमरावती शहरात खाजगी मथुरादास बस सर्व्हिस होती. कॉलेजची मुले-मुली या बसने जायचे-यायचे. एकदा पावसाळ्याचे दिवस असल्याने आकाशात काळे ढग भरून आले होते. बसमध्ये मुली बसल्या होत्या. भटांच्या भोवती मित्रांचा घोळका. मुलींकडे पाहून मित्रांनी कवीवर्याच्या कवित्त्वालाच आव्हान दिले. 'खरा कवी असशील, तर या सिच्युएशनवर कविता करून दाखव' ! आणि -

'काळ्या, काळ्या मेघांमधुनी ऐसी चमकली बिजली,
जशी काळ्या केसांमधुनी पाठ तुझी मज गोरी दिसली !'

ही कविता अवतीर्ण झाली आणि बसमध्ये एकच हास्यकल्लोळ उडाला. या मनोरंजक आणि तात्काळ सेवेसारख्या तात्काळ कविता करतांनाच -

'हरवले आयुष्य माझे राहिले हे भास
झगमगे शून्यात माझी आंधळी आरास

व्यर्थ हा रसरुपगंधाचा तुझा अभिसार
वेचूनि घे तू वार्यागवरी माझे अभागी श्वास.'

किंवा

'पाठ दाखवून अशी दुःख कधी टळते का?
अन्‌ डोळे मिटल्यावर दैव दूर पळते का?
दाण्याचे रडणे कधी या जात्याला कळते का?'

असे जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणार्या दर्जेदार कवितांची आरासही ते लावीत असत. महाविद्यालयीन जीवनापासून सुरू झालेली ही काव्याची आराधना त्यांनी आयुष्यभर सुरू ठेवली. कवितेसाठी त्यांनी आपल्या जगण्याचे मोल चुकविले. विद्यार्थ्यांचा घोळका आणि सुरेश भट असे समीकरणच होते. कारण वर्गखोलीत बसणे त्यांच्या सिलॅबसमध्येच नव्हते आणि दुसरे म्हणजे कॉलेजच्या परिसरातील झाडाखाली झडणारी त्यांची इन्स्टंट कवितांची मैफिल. मराठी वाङ्‌मय मंडळाचे ते अध्यक्ष होते. वाङ्‌मय मंडळाच्या कार्यक्रमात त्यांचे सवाल जवाब चालायचे.

बुधवार, १७ जून, २०१५

नको नको रे पावसा - इंदिरा संत..



नको नको रे पावसा, असा धिंगाणा अवेळी घर माझे चंद्रमौळी, आणि दारात सायली नको नाचू तडातडा, अस्सा कौलारावरून तांबे सतेली पातेली, आणू भांडी मी कोठून नको करू झोंबाझोंबी, माझी नाजूक वेलण नको टाकू फूलमाळ, अशी मातीत लोटून आडदांडा नको येऊ, झेपावत दारांतून
माझं नेसूचं जुनेर, नको टाकू भिजवून किती सोसले मी तुझे, माझे एवढे ऐकना वाटेवरी माझा सखा, त्याला माघारी आणा ना वेशीपुढे आठ कोस, जा रे आडवा धावत विजेबाई कडाकडून मागे फिरव पांथस्थ आणि पावसा, राजसा, नीट आणि सांभाळून घाल कितीही धिंगाणा, मग मुळी न बोलेन पितळेची लोटीवाटी, तुझ्यासाठी मी मांडीन माझ्या सख्याच्या डोळ्यांत तुझ्या विजेला पूजीन..

मंगळवार, १६ जून, २०१५

विस्कटलेली दुपार आणि आठवणींची साठवण ..


हातून निसटलेला पारा अस्ताव्यस्त कणा कणांत ओशाळलेल्या मुद्रेने भूमीवर निपचित पडून असतो आपण जसाच्या तसा पुन्हा त्याला गोळा करू शकत नाही...मात्र त्याच्याकडे पाहून त्याचे गतरूप आठवत राहतो...
आठवणींचा पाराही असाच असतो, मनाच्या गाभारयातल्या प्रत्येक अणुरेणूत सैरभैर मुद्रेने तो चिणलेला असतो...कधी तो अश्रूतून पाझरतो तर कधी एकट्याने बसून असताना ओठांची स्मितरेषा आखून जातो !
काही चित्रे काही प्रसंग काही माणसे या आठवणीच्या पारयात सदैव आपले प्रतिबिंब न्याहळत असतात अन स्मृतींच्या चैत्रबनात परत परत हरखून जाण्याचे अलौकिक सुख मिळवतात…

सोमवार, ८ जून, २०१५

'इजाजत' प्रेमाची आणि जगण्याची! ..



बाहेर रोमँटिक पाऊस पडतोय आणि मी जाऊन पोहोचलोय त्या रेल्वे स्टेशनवर, जिथे कधीकाळी रेखा आणि नसीरुद्दीन त्या गदगदून आलेल्या घनगर्द अंधारात दडलेल्या स्टेशनवर एक रात्र घालवण्यासाठी अकस्मात एकत्र येऊन थांबले आहेत.
एकमेकाला पाहून त्यांच्या मनात अनेक भावना दाटून आल्यात.
मागच्या जखमा ताज्या झाल्यात अन् काही खपल्या देखील निघाल्यात.

त्याच्या जीवनात आलेल्या 'दुसरी'ची आता काय अवस्था आहे हे तिला जाणायचेय अन् आपण कसे वाहवत गेलो, आपली चूक नव्हती हे त्याला सांगायचेय....

रात्रभर तो तिच्याकडे बघत बोलत राहतो मात्र ती अधून मधून नजर चुकवत राहते.
त्याला खरे तर माफी मागायचीय पण एकाच दमात सारं सांगण्याची त्याची हिंमत होत नाहीये.

तिलाही आठवत्येय की, सुरुवातीला आपण किती सुखी होतो ; मात्र त्याने आपल्याशी प्रतारणा करावी याचा धक्का कसा पचवावा, हे तिला उलगडलेले नाही.

त्यांची अबोल तगमग पाहून रात्रभर तळमळत असणारा अंधार तिच्या अंगावरच्या शालीत तिला अलगद लपेटून चिंब झालाय
अन् मंद पिवळसर उजेड त्याच्या ओलेत्या डोळ्यात झिरपतोय,

निर्मनुष्य स्थानकावरच्या प्रतिक्षागृहाच्या खडबडीत दगडी भिंती त्या दोघांना रात्रभर अनुभवून सुन्न होऊन गेल्या आहेत,
ते ज्या टेबलभोवती बसले होते तिथल्या खुर्च्या त्यांना जवळ आणण्यासाठी आसुसल्या आहेत
तर पहाटेच्या गारव्याला त्यांना एकत्रित बाहुपाशात घ्यायचे आहे.

मात्र ज्या बाकावर ते दोघे बसून आहेत त्याला मात्र त्यांचा अबोला भावतो आहे. स्थितप्रज्ञ होऊन त्या दोघांना तो आपल्या कवेत घेऊन बसला आहे.

तिथल्या हेडलॅम्पला त्या दोघांना डोळे भरून पाहायचेय तर प्लॅटफॉर्मवरील लांबसडक कॉरिडॉरला त्यांचे खाली पडणारे अश्रू झेलायचे आहेत.

गुलाबाची एकेक पाकळी हळूहळू अल्वारपणे बाजूला काढावी तशा एकेक घटना तो तरलपणे तिच्या पुढ्यात मांडतोय,
त्याचं दुखणं ऐकता ऐकता ती आतूनच धुमसून निघत्येय,
आपण कुठे कमी पडलो याचा तिचा शोध संपत नाहीये अन् रातकिड्यांची किर्रर्र देखील सरत नाहीये.

तिला जाणून घ्याययचेय ती घरात नसताना 'त्या' रात्री घरात नेमके काय झाले होते ? तो तसं का वागला होता ?
त्यालाही सत्य सांगायचेय, मात्र सत्य सांगताना त्याला तिचं मन पाकळीवरच्या दवबिंदूसारखं जपायचं आहे.
तो जीवापाड प्रयत्न करतोय,
त्या बंद खोलीची काचेची पिवळसर तावदाने डोळ्यात पाणी आणून त्याच्या चेहऱ्याकडे पाहतायत अन् शिसवी दरवाजा भिंतीत तोंड खुपसून मूक अश्रू ढाळतोय !

ती अधून मधून नाकावरचा चष्मा मागे सरकावण्याच्या बहाण्याने त्याच्याकडे बघत्येय, त्याच्यात काय बदल झालेत याचा हळूच अंदाज घेतेय तर तिच्याकडे तिरक्या नजरेने डोळे भरून पाहत ती किती बदलली आहे याचे गणित तो करतोय.

बघता बघता पहाट सरत आलीय, आपल्या मनातलं मळभ त्यानं रितं केलंय. "झालं गेलं विसरून जा अन् माझ्याकडे परत ये इतकंच सांगायचे बाकी राहिलंय" असं सांगायचाच अवधी बाकी आहे.

दरम्यान रात्रभर झोपी गेलेल्या सभोवतालच्या झाडाच्या पालवीला आत जाग आलीय अन् वाऱ्याचा रात्रीचा सूर देखील बदललाय.

'तो' मनाचा हिय्या करून तिच्याशी आता बोलणारच आहे इतक्यात तांबड्या पिवळ्या सुर्यकिरणांना सोबत घेऊन "तोही ' तिथे येतो ! हा ‘तो’ म्हणजे तिचा सध्याचा पती !
त्याच्याकडे नजर जाताच ह्याचे शब्द गळ्यात विरतात, अश्रू डोळ्यात विझून जातात. स्तब्ध होऊन जागीच थिजून जातो.

रात्रभर दोलायमान झालेलं तिचं मन 'त्याला' पाहून किंचित खुलून उठतं.
तिचं हसू खरं की खोटं याचा अंदाज बांधत हा रडवेला होऊन जातो.

त्या दोघांना रात्रभर अनुभवणारे ते प्लॅटफॉर्म, ती खोली, त्या खिडक्या, तो दरवाजा, टांगता हेडलॅम्प, तांबडे पिवळे दिवे, तो बाक, ते टेबल, त्या खुर्च्या साऱ्यांना नियतीने चकवा दिलाय.
सारेच हिरमुसले आहेत.
मी देखील चेहरा बारीक करून तिथून निघालो आहे. पाऊस पूर्ण थांबला आहे...

बाहेर प्रसन्न सकाळ झालीय अन् आकाश निरभ्र झालेय. उंच आकाशात उडणाऱ्या बगळ्यांच्या त्रिकोणी थव्यात व्हिक्टरीचे 'व्ही' साईन शोधत मी आता शीळ घालत निघतोय....

जीवन हे असेच आहे, एका हातात काही तरी गवसलेय म्हणेपर्यन्त दुसऱ्या हातातले काही तरी गळून पडलेले असते.
साऱ्यांना सारे मिळत नसते, जो क्षण समोर आहे त्याला स्वच्छंदीपणे समोर जाताना जीवनाशी व स्वतःशी प्रामाणिक राहिले की दुःखाचा आनंदही सुखाइतकाच घेता येतो.

काळजात घर करून राहिलेल्या सिनेमांत 'इजाजत'चे स्थान फार वरचे आहे..... 'इजाजत' केवळ एक सिनेमा नाही तर जीवनातील नात्यांचा हळुवार उलगडा करून दाखवणारी हळवी कविता आहे ..

मनात खोल खोल रुतून बसणारी अन् उत्तुंग अभिनयाने सजलेली, नटमोगरी नसली तरीही सोज्वळ चाफ्यासारखी दरवळणारी प्रेमपुष्पांची नाजूक गाथा आहे...

मी जेंव्हा जेंव्हा 'इजाजत' पाहतो, तेंव्हा नात्यांचे अर्थ नव्याने शिकतो ...

जीवनातील सुखदुःखाच्या व्याख्या नित्य नव्याने सांगणार्‍या रुपेरी पडद्यास नम आँखोसे सलाम .....

- समीर गायकवाड.


गुरुवार, ४ जून, २०१५

बगळ्यांची माळ फुले - वा. रा. कांत

स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते स्वातंत्र्योत्तर पाच दशके इतक्या विस्तृत काळात अत्यंत देखणी, आशयसंपन्न अशी कविता ज्यांनी काव्यशारदेच्या चरणी अर्पित केली अशा कवींमध्ये कवी वा. रा. कांत यांचे नाव घेतले जाते. वा.रा. कांत एक विलक्षण प्रतिभाशाली कवी होते याचा प्रत्यय त्यांच्या काव्यात सातत्याने जाणवत राहतो. स्वतःचा मृत्यू आणि मृत्युपत्र हा कवितेचा विषय असू शकतो हे त्यांनी अत्यंत टोकदार संवेदनशील रीतीने प्रसूत केलं. एक वेगळाच विस्मयकारक अनुभव त्यांच्या  'मृत्युपत्र' कवितेत येतो.

या रचनेद्वारे आत्मसंवादी कविता लिहीत असताना कांत आपल्या आयुष्याच्या अखेरच्या कवितेतही एक हृदयस्पर्शी व्यक्तता साधतात. इस्पितळात रुग्णशय्येवर असताना कांतांनी आपल्या मुलाला ही कविता लिहायला लावली होती. ही त्यांची अखेरची कविता ठरली. मालाड येथील एव्हरशाइन नर्सिग होममध्ये रुग्णशय्येवर असताना कांतांनी त्यांच्या मुलाकडून लिहून घेतलेली ही अखेरची कविता ! या कवितेवर काही संस्कार करायचे त्यांच्याकडून राहून गेले असण्याची शक्यता आहे. परंतु अर्धागवायूच्या आजारामुळे पुढे या कवितेसंबंधी ते कोणाशीही काही बोलले नाहीत.

मंगळवार, २ जून, २०१५

सामूहिक कबर - खादीम खंजेर : इराकी कविता


ब्रेकींग न्यूज : निकटच्या अंतरावरच सामुहिक कबर सापडलीय !
कालच मी फोरेन्सिक मेडिसिन विभागात जाऊन आलो. 
त्यांनी माझ्या बोटांचे ठसे मागितलेले, डीएनए जुळतो का ते टेस्ट करण्यासाठी. 
ते सांगत होते की, त्यांना काही विजोड कुळाच्या अस्थी मिळाल्यात.
आशेच्या सुऱ्याच्या पात्यावर ठेवलेल्या संत्र्यासारखं दर टेस्टगणिक वाटत होतं. 
बंधू, मी आता घरी आलो आहे.
तुझ्या फोटो फ्रेमसमोर ठेवलेल्या कृत्रिम फुलांवरची धूळ हटवतोय अन अश्रूंनी त्यांचे सिंचन करतोय.