रविवार, १९ फेब्रुवारी, २०२३

शिवबा आपल्याला खरेच कळलेत का?


शिवाजीराजे म्हणजे मराठ्यांचं काळीज असं जेंव्हा लिहितो तेंव्हा नकळत आपण आपला खुजेपणा दाखवत असतो. शिवबा सगळ्यांचेच काळीज होते !

शिवाजी महाराज कसे होते हे सांगताना जो तो व्यक्ती त्याला अभिप्रेत असलेले वा ज्या रूपांत तो राजांना पाहू इच्छितो तेच वर्णन संबंधितांकडून केले जाते.
मग सकल शिवाजी महाराज कळणार तरी कसे?
मनातले सर्व अभिनिवेश नि सर्व भावभावनांना दूर सारून राजांना पाहिलं तर हिमालयाहून उत्तुंग आणि जळाहून नितळ असे पराक्रमी, दक्ष, चाणाक्ष दूरदृष्टी असणारे द्रष्टे धोरणकर्ते, कुटुंबवत्सल, रयतप्रेमी, ज्ञानी, संयमी, शांत, विचारी अशा अनेक बहुआयामी राजांचे चित्र समोर येते.

ते क्षत्रियकुलावंतस असल्याचा अभिमान आपण मिरवतो तेंव्हा तो त्यांचा अभिमान नसून आपला वर्गीय अभिनिवेश असतो.
शिवबा राजांचं अस्तित्व सकल कुळ गोत्र जात धर्म यापलीकडचं होतं, त्याचा अभिमान असायला हवा!

एककल्ली देवधर्माधिष्ठित राज्य हीच राजसत्ता असेही त्यांचे धोरण नव्हते, लोककल्याणकारी स्वराज्य हे त्यांचे धोरण होते.

शिवराय केवळ धुपारत्या ओवाळत नसत वा कुठल्या दैवी साधनांच्या बळावर त्यांनी राज्य उभे केले नाही, त्यांनी पराक्रमाने व चतुराईने शून्यातून राज्य उभे केले, त्याकरिता युद्धनीती वापरली. पुरंदरचा तह असो की आग्र्याहून सुटकेचा प्रसंग असो त्यांची कुटनीती विलक्षण होती.

त्यांनी केवळ रांझ्याच्या पाटलाचे हातपाय कलम केले होते असे नव्हे तर बदफैलीचा निव्वळ आरोप झाला तरी आपल्या मेव्हण्याचे डोळे काढण्याचे समानन्यायी तत्व त्यांनी अंगीकारले होते.

आपल्या मातेच्या शब्दांना वचन मानणारे, पित्याचे स्वप्न पुरे करणारे, साधूसंतांचा आदर करणारे, चुकलेल्यांना क्षमा करणारे आणि घेतला वसा जपणारे शिवबाराजे बहुआयामी जाणते राजे तर होतेच मात्र खऱ्या अर्थाने श्रीमानयोगी होते!

हा राजा एकमेवाद्वितीय होता ज्यांनी आपल्या जीवावर उठलेल्या नि स्वराज्याशी उभा दावा मांडलेल्या शत्रूंना ठार मारल्यानंतर त्यांच्या कबरी बांधल्या होत्या व त्यांच्या देखरेखीसाठी तरतूद केली होती.

जिंकलेल्या संस्थानाच्या राणीच्या बाळाला मांडीवर बसवून दुध पाजणारा राजा जगाच्या पाठीवर कुठेही सापडणार नाही!

जगात असे अनेक राजे महाराजे होऊन गेलेत की ज्यांनी नावापुरतं स्त्रीदाक्षिण्य दाखवलं मात्र त्यांचे अंतरंग वेगळेच होते, शिवबा त्यांना अपवाद होते. शिवबांच्या दरबारी कधी नाचगाणं झालं नाही की कधी स्त्रीचा अवमान झाला नाही!

आपल्या मावळ्यांना छातीशी कवटाळून रडणारा राजा आणि त्यांच्या कुटुंबाची देखभाल करणारा हा राजा अभूतपूर्व होता, त्याच्यासाठी त्याची रयत हेच कुटुंब होतं.

आपल्या मुलावर राजधर्माचे संस्कार करतानाच त्याच्या बहुविध शिक्षणासाठी दक्ष असणारे शिवबाराजे जितके कनवाळू होते तितकेच कठोरही होते! आपल्या पत्नीवर त्यांचे अमीट प्रेम होते.

शिवबाराजे म्हणजे केवळ युद्धांची खुमखुमी असणारे, युद्धघोष करणारे नि शत्रूच्या जीवावर उठलेले योद्धे नव्हते. रयतेच्या गवताच्या गंजीची काळजी करताना उंदीराने दिव्याची वात नेऊ नये इतकी बारीकसारीक दक्षता बाळगण्यास सूचित करणारे शिवबा रयतेच्या हितास आणि सुखास प्रथम प्राधान्य देत.

शिवराय म्हणजे डोक्यावर घेऊन नाचण्याची गोष्ट नसून डोक्यात ठेवून जगण्याची गोष्ट आहेत. शिवराय कोणत्याही जाती धर्माच्या विरुद्ध नव्हते वा कोण्या एका जाती धर्मापुरतेही ते मर्यादित नव्हते. ते अखिल रयतेचे राजे होते.

शिवकल्याणकारी राज्य जे जिजाऊ मां साहेबांच्या स्वप्नात होते त्याची उभारणी करणे हे त्यांचे परमध्येय होते.

शिवाजी राजांनी अमुक एक व्यक्ती अमुक जात धर्माची आहे म्हणून त्यास ठार मारा असे फर्मान कधी काढले नाही.
जो जो स्वराज्यावर चालून आला व ज्याने ज्याने स्वराज्यनिर्मितीत अडथळे आणले वा स्वराज्यातील रयतेस ज्यांनी ज्यांनी त्रास दिला ते सर्व लोक महाराजांच्या लेखी दुश्मन होते.
तर ज्यांनी स्वराज्यासाठी आपलं योगदान दिलं व रयतेच्या कल्याणासाठी जे राबले ते सर्व जाती धर्माचे लोक त्यांनी आपले मानले.

शिवाजी राजांसाठी 'रयतेचे कैवारी' आणि 'रयतेचे दुश्मन' अशा लोकांच्या दोनच वर्गवारी होत्या.
चंद्रराव मोरे आणि अफजलखान यांत धर्मभेद न करता रयतेचा व स्वराज्याचा वैरी हे एकच परिमाण त्यांनी या दोघांसाठी वापरले.
त्याच प्रमाणे हिरोजी इंदलकर व दौलत खान, इब्राहीम खान यांच्यातही फरक केला नाही. कारण ते स्वराज्यनिर्मितीतले घटक होते.

असे असूनही अनेक लोक त्यांना विविध चौकटीत बंद करून त्यांच्या उत्तुंग आणि भव्य प्रतिमेला एक प्रकारे सीमित करतात.
शिवरायांना कुठल्या चौकटीतून आपण पाहत असू तर तो आपला दोष असतो
कारण हा रयतेचा राजा असा एकमेवाद्वितीय होता की त्याला कुठली चौकटच लागू होत नव्हती.

खऱ्या अर्थाने रयतेचा, मातीचा आणि माणसांच्या मनामनातला राजा !
राजा शिवछत्रपती !

राजे समजून घ्यायचे असतील तर त्यांना डोक्यात ठेवायला हवं नुसतं डोक्यावर घेऊन ते जमणार नाही..

आपल्या मनातल्या प्रतिमा, आपली धोरणे नि आपले विचार बाजूला ठेवून आपण जर शिवराय अभ्यासले तर निश्चितच एक बहुआयामी नि आगळे वेगळे शिवराय आपल्याला भेटतील, मग आपल्यातले कैक गुणदोष गळून पडतील. विचारांना एक नवी दृष्टी लाभेल..

शिवजयंतीच्या शुभेच्छा तर आहेतच, शिवबांचे विचार खऱ्या अर्थाने अंमलात आणण्यासाठी शुभेच्छा.

- समीर गायकवाड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा