शनिवार, २७ फेब्रुवारी, २०२१

गोष्ट एका मास्तरांची ...


मराठीला धुमाळ मास्तर होते. पोरांना जाम कुटून काढायचे. कवितेची कुठलीही ओळ म्हणायचे आणि पुढची ओळ वाच म्हणून बोटात पेन्सिल घालून बोटं पिरगाळायचे. समास शिकवताना चिमटीत कान पिळण्याची 'संधी' ते सोडत नसत, त्यांच्या मारझोडीच्या 'क्रियां'ना कुठलेही 'पद' चाले ! पोरांना शेलकी 'विशेषणे' लावून हाक मारण्यात त्यांचा हातखंडा होता, लिहिताना 'कानेमात्रे' एक झाले तर आईबहीण एक करत ! मागच्या बाकावर बसलेल्या अवगुणी 'विशेषनामां'ना ते नेम धरून डस्टर फेकून मारत !

गुरुवार, १८ फेब्रुवारी, २०२१

न झुकलेला माणूस..


चुकीच्या आणि अन्याय्य गोष्टीपुढे न झुकण्यासाठी निडर बाणा हवा, मुख्य म्हणजे कोणतीही किंमत मोजायची तयारी हवी. मग तो विरोध, तो संघर्ष आभाळाहून मोठा होतो. ही हकीकत अशाच एका सामान्य माणसाची. तो एक सामान्य लोहार होता. तो काही शूरवीर योद्धा नव्हता ज्याला विविध शस्त्रे चालवता येत होती. तो एक सामान्य माणूस होता, तरीही त्यानं एक असं काही असामान्य कर्तृत्व करून दाखवलं की त्याच्या मायदेशी बेलारूसमध्ये आजही त्याच्या पुतळ्यापुढे लोक नतमस्तक होतात. त्याच्या स्मारकाचं नाव अगदी विशेष आहे - 'द अनकॉन्कर्ड मॅन' - शरण न गेलेला माणूस ! न झुकलेला माणूस !

रविवार, १४ फेब्रुवारी, २०२१

पौष...

हरेक मराठी महिन्याला एक वलय आहे. त्याची स्वतःची अशी महती आहे मात्र पौष त्याला अपवाद आहे. पौषची कुख्यातीच अधिक आहे.
चैत्रपालवी असते. वैशाखवणवा असतो. ज्येष्ठाचं व्रत असतं.
आषाढाला पर्जन्योत्सुकतेचा मान लाभलाय.
श्रावणमासाची हिरवाई जितकी ख्यातनाम आहे तितकेच धार्मिक महत्वही आहे.
भाद्रपदातला गणशोत्सव शहरांचा चेहरा झालाय तर भादवा गावकुसासाठी अजूनही महत्वाचा आहे.
अश्विनची नवरात्र विख्यात आहे. कार्तिक दिवाळीमुळे अमर आहे.
मार्गशीर्षातली व्रत वैकल्ये अजूनही भाव खाऊन आहेत.
माघी वारीचं महात्म्य वाढतंच आहे.

शुक्रवार, १२ फेब्रुवारी, २०२१

मौनातलं तुफान...

ना तो तिच्याकडे कधी जातो नि ती त्याच्याकडे कधी येत नाही
दोघे कधी भेटत नाहीत की बोलत नाहीत
तरीही त्यांच्यात असतं एक नातं, बेशक त्याला नाव मात्र कुठलं नसतं
भेटलेच जरी दोघे कधी तरी नजरेस नजर देत नाहीत
खरेतर दोघांच्या नजरा शोधत असतात परस्परांना

समोर येताच मात्र डोळ्यांना डोळे त्यांचे भिडत नाहीत
एकमेकाचे लक्ष नसताना चोरून मात्र पाहत असतात
दोघांपैकी जो आधी निघून जातो त्याचे डोळे असतात पाणावलेले
मागे थांबलेला डोळे भरून पाहतो त्या पाठमोऱ्या देहाकृतीकडे

त्याला जाणून घ्यायचं असतं, तिच्या ख्यालीखुशालीविषयी
तिला असते जिज्ञासा त्याच्याविषयी, त्याच्या संसाराविषयी
दोघेही विचारत नाहीत परस्परांना. मात्र
मात्र चौकशी आस्थेने करतात इतरेजनांपाशी !

बुधवार, ३ फेब्रुवारी, २०२१

दिव्या चेकुदुराई - जिथे मृत्यूचाही थरकाप उडाला

लॉकडाउनने माणसांची काय आणि किती दुरावस्था केली हे पाहायला कुणाला वेळ नव्हता कारण ज्याला त्याला स्वतःची भ्रांत पडली होती. यात काही वावगं नाही. मात्र लॉकडाउन सरल्यानंतर एकमेकाला पायाखाली घेऊन पुढे जाण्याची चढाओढ सुरु झालीय तेंव्हा तरी आपण भवतालात डोकवून पाहण्यास हरकत नसावी. मन सुन्न करणाऱ्या या घटना होत्या. यातलीच एक दास्तान दिव्याची आहे. दिव्या चेकुदुराई. वय 22.
जून २०२० मध्ये आंध्रप्रदेशमधील विशाखापट्टणममध्ये तिची हत्या झाली. जगभरातील लॉकडाउनमधला सर्वात ह्रदयद्रावक मर्डर असं तिच्या मृत्यूचं वर्णन करता येईल.

मंगळवार, २ फेब्रुवारी, २०२१

नागम्मा @रेड लाईट डायरीज - लॉकडाउन स्टोरीज

नागम्माचं मूळ नाव नागपार्वती.
हैदराबादमधील बशरतनगर मध्ये तिचं किरायाचं घर होतं.
काला पत्थर रोड परिसरात हा भाग येतो.
ती सादमूद हेमामालिनी सारखी दिसे. सौंदर्याहून अधिक जादू तिच्या रसिल्या आवाजात होती.
तिला तेलुगू, कन्नड चांगलं येई. काही हिंदी भजनं देखील ती गायची. ठुमरीवर तिचा विशेष जीव होता.
उमर ढळलेली असूनही तिच्या अदा कातिल होत्या.

सत्तरी पार केल्यानंतर तिची गात्रे साहजिकच शिथिल झाली होती. तिच्या ढिल्या झालेल्या कातडीने कैक मौसम झेलले होते.
नागम्मा तिच्या तरुणपणात अगदी जहरी कहर असणार यात काहीच शंका नव्हती.
ओल्ड हैदराबादमधलं तिचं वास्तव्य तीस वर्षापासूनचं होतं.
त्याआधी ती समुद्रतटाशी लागून असलेल्या कृष्णा जिल्ह्यातील मछलीपटणमध्ये वास्तव्यास होती.
तिच्या डोळ्यात एक तहानलेला समुद्र दिसे.
तिची गुजराण कशावर चाले हे काहींसाठी कोडे होते मात्र त्यात तथ्य नव्हते. ती स्वाभिमानाने जगणारी बाई होती.
कमालीची संवेदनशील आणि निश्चयी.

अर्थ जगण्याचा..

ढलाण निसटलेल्या बांधावरल्या दगड मुरुमाच्या बेचक्यात सांजेपासून बसून असलेल्या सागवानी म्हाताऱ्याने आपल्या जास्वंदी नातवाला मांडीवर घेतलं होतं. अंधारून येऊ लागल्यावर पायाला रग लागलेला म्हातारा धोतर झटकत अल्लाद उठला. पुढं होत त्यानं नातवाला उचलून कंबरेवर घेतलं. निघताना नातवानं आज्ज्याला विचारलं, "आबा आता पुन्ना कदी यायचं ?"

गालफाडे आत गेलेला, पांढुरक्या दाढीचे खुंट वाढलेला, खोबणीत खोल गेलेल्या निस्तेज डोळयांच्या कडा पुसत ओठावर हसू आणत जिंदादिल म्हातारा
आपल्या तळहातावरची मखमल नातवाच्या गालावर पसरवत उत्तरला, "उद्याच्याला याचं की ! आभाळापल्याड तुजी आज्जी ऱ्हाती. माजी विचारपूस करायला रोज ती सूर्याला पाठवती. जोवर ती सूर्याला धाडून लावती तोवर आपण येत ऱ्हायचं आणि बांधावर बसून त्याला निरखत ऱ्हायचं. "
आज्जा काय सांगतोय यातलं नातवाला काहीच कळलं नाही. कंबरेत वाकलेल्या आज्ज्याला ते पोर घट्ट करकचून बिलगलं. खुललेल्या आज्ज्यानं त्याचा गालगुच्चा घेतला. आस्ते कदम दोघंही निघाले तेंव्हा त्यांच्या फिकट सावल्या पाहून दिगंताला टेकलेल्या सूर्याला गलबलून आलं !
शोधलं तर हरेक प्रश्नाचं उत्तर सापडतं.