गर्दीच्या ठिकाणी दिवसभर फिरस्ती करुन खेळणी विकणाऱ्याचं पोर घरी खेळणीसाठी रडत असतं,
बांधकाम मजूरास पत्र्याच्या वा तत्सम घरात राहावं लागतं,
लोकांची घरे रंगवणाऱ्या रंगाऱ्याच्या घराचे पोपडे उडालेले असतात,
हमाली करणाऱ्याचं ओझं कुणीच उचलत नसतं,
जगाच्या चपला शिवून देणाऱ्याच्या पायतल्या वाहणा झिजलेल्या असतात,
कापडाच्या दुकानात कामास असलेला कामगार कॉलरजवळ विरलेले शर्ट नि कंबरेत अल्टर केलेली विजार वापरतो,
मिठाईच्या दुकानातल्या सप्लायवाल्याच्या घरी वर्षाला देखील नीट गोडधोड होत नसतं,
हॉटेलमधल्या वेटरचा आपलं कुटुंब घेऊन हॉटेलात जेवायला जाण्याचा बेत कधीच तडीस जात नाही,
दिवसभर बाजारात उभं राहून गजरे विकणाऱ्या फुलवाल्याची बायको मोगऱ्याविनाच असते,
वखारीत काम करणाऱ्याच्या घरी सैपाकासाठी इंधन नसतं,
आडत बाजारात शेकडो पोती धान्य वाहून नेणाऱ्याच्या घरी धान्याची भांडी भरलेली नसतात,
चार घरची कामे करणाऱ्या मोलकरणीला आपल्या घरची धुणीभांडी करताना लाख आवंढे गुमान गिळावे लागतात...
या नोंदी काही केल्या संपत नाहीत.