बुधवार, १६ एप्रिल, २०२५

सेंट ऑफ सॅफ्रॉन आणि द ओडिसी ऑफ काश्मिरी पंडित – विस्थापिकरण


'सेंट ऑफ सॅफ्रॉन - थ्री जनरेशन्स ऑफ ऍन इराणियन फॅमिली' हे विख्यात लेखिका रूही शफी यांचे आत्मचरित्र आहे, जे ईराणी महिलांच्या तीन पिढ्यातील जीवनसंघर्षावर आणि परिवर्तनावर केंद्रित आहे.

रुहींची आजी, आई आणि त्या स्वतः असा कालपट आहे. यात पाहिली पिढी ग्रामीण जीवनात राहणारी, दुसरी शहरीकरणाच्या प्रभावाखाली, आणि तिसरी राजकीय अस्थिरतेमुळे निर्वासित होणारी अशी वाटचाल दाखवलीय.

इराणचा समाजिक इतिहास कसा मध्ययुगीन काळाकडे वाटचाल करत गेलाय याचे उल्लेख उदाहरणासह येतात. 1920 ते 1980 या काळातील इराणच्या राजकीय आणि धार्मिक बदलांचा इराणी महिलांच्या जीवनावरील परिणाम आणि प्रभाव यांचे वेधक चित्रण यात आहे. लेखिकेने तिच्या वैयक्तिक अनुभवांना सामाजिक इतिहासाशी जोडून धार्मिक विचारधारेचा पगडा आणि सामाजिक नियंत्रणाची ताकद दाखवलीय.

लेखिका 1980 च्या सुमारास तेहरानला अलविदा करून लंडनला येते. तिथे आल्यानंतरही तिला मायभूमीची ओढ शांत बसू देत नाही. ज्या देशाने महिलांना अनेक नागरी हक्क देण्यास नकार दिला, त्यांना मध्ययुगात नेले, त्यांचे दमण शोषण केले त्या देशाविषयीची ओढ कशा प्रकारची असू शकते याचे ठोकळेबाज अंदाज इथे चालत नाहीत. तिथे राहत असलेल्या अन्य स्त्रियांना तरी संघर्षाची प्रेरणा मिळावी हाही यामागचा हेतू नाही. कारण इराणमधल्या किती महिला हे पुस्तक वाचू शकतील या विषयी रुही स्वतःच साशंक आहेत. मग त्यांनी हे सर्व का लिहिलं?

एखाद्या प्रदेशात नेमके काय घडतेय, तिथे कशा प्रकारची वागणूक दिली जातेय आणि इतकं सर्व घडत असताना समाज, देश आणि तिथले नागरिक तमाशबिन बनून का राहतात यांचा हा धांडोळा आहे. इराणच्या पहलवी राजवटीचे आधुनिकीकरण, १९७९ची इस्लामिक क्रांती, आणि त्यानंतरच्या सामाजिक-राजकीय बदलांचा समावेश आहे. यात ग्रामीण जीवनातले बदल, शहरीकरणाआडून दृढ होणारा धार्मिक वर्चस्वाचा पगडा आणि विस्थापित होतानाचे (डायस्पोराचे) अनुभव हे सारंच स्तब्ध करतं.

काहीशी अशाच प्रकारची कैफियत असणारं आपल्याच देशातील आणि आपल्याच राज्यातून विस्थापित झालेल्या काश्मिरी पंडितांचं दुःख मांडणारं एक पुस्तक आहे ज्याची दखल घेतली पाहिजे.

"The Odyssey of Kashmiri Pandits: Destination-Homeland-Panun Kashmir" ही डॉ. एम. एल. भट यांनी 

लिहिलेली एक अत्यंत संवेदनशील आणि माहितीपूर्ण कादंबरी. 1990 मध्ये काश्मिरी पंडितांच्या निर्वासनानंतर, त्यांचं हलाखीचं जीवन, सर्वस्व गमावल्याचं दुःख आणि परत आपल्या मातृभूमीला परतण्याची आशा या पुस्तकात व्यक्त केलीय.

डॉ. मोतीलाल भट हे काश्मीरमधील एका लहान गावात (मुरान) जन्मले. 1990 मध्ये त्यांना दहशतवादामुळे आपले घर सोडावे लागले आणि तब्बल 27 वर्षे ते निर्वासित म्हणून जीवन जगले. सध्या ते जम्मूमध्ये निवृत्त जीवन जगतात. त्यांना दोन मुले आहेत आणि पुस्तकाच्या प्रस्तावनेत त्यांनी आपल्या कुटुंबाचे—पत्नी चंपा, मुलगा नितिन, मुलगी डॉ. निरुपमा, जावई डॉ. अलोक, आणि सून प्रमिला—आभार मानले आहेत. त्यांचे वैयक्तिक अनुभव या पुस्तकाचा पाया आहेत.

1980 च्या दशकाच्या अखेरीस काश्मीरमधला दहशतवादाचा उदय, ज्यामुळे काश्मीरी पंडितांवर हल्ले आणि धमक्या वाढल्या. 1990 च्या सुरुवातीस काश्मीर खोऱ्यात दहशतवाद आणि अस्थिरतेचा उदय झाला. यामुळे काश्मीरी पंडितांवर हल्ले, धमक्या, आणि हिंसाचार वाढला, ज्यामुळे अंदाजे 3 ते 4 लाख काश्मीरी पंडितांना आपली घरे, जमीन, आणि मालमत्ता सोडून जम्मू, दिल्ली, आणि इतर भागात स्थलांतर करावे लागले.

काश्मीरी पंडितांना सोसावे लागलेल्या नरक यातना, जिहादी आतंकवाद्यांचे अत्याचार, सरकारी उपेक्षा आणि स्वतःच्या देशात शरणार्थी म्हणून जगण्याचे दुःख यांचे अत्यंत दाहक वर्णन यात आहे. लेखकांनी त्यांच्या वैयक्तिक अनुभवांद्वारे या सामूहिक दु:खद घटनांचा आलेख रेखाटलाय. पुस्तकात काश्मीरी पंडितांच्या दृष्टिकोनातून या घटनांचा आणि त्यांच्या सामाजिक परिणामांचा सखोल अभ्यास आहे. जिहादी दहशतवादी कुठलीही दयामाया न दाखवता नृशंस हत्याकांडे करतात. घरे जाळतात. नजरेच्या देखता आपलं सर्वस्व राख होताना पाहायचं आणि आपले सगळे शेजारी पाजारी कुत्र्याच्या मौतीने मरताना पाहत तिथून परागंदा व्हायचं हे सर्व अमानवी आणि भयंकर आहे. हे ज्यांनी सोसले त्यांनाच याची दाहकता अधिक ठाऊक!

पुस्तकात 'पनुन काश्मीर' या संकल्पनेवर जोर दिला आहे, जी काश्मीरी पंडितांसाठी काश्मीर खोऱ्यात स्वतंत्र आणि सुरक्षित गृहराज्य (होमलँड) स्थापन करण्याची मागणी करते. ही मागणी पनुन काश्मीर या संस्थेद्वारे पुढे नेली जाते.

मोतीलाल भट काश्मीरी पंडितांच्या परतण्याच्या आशेला आणि त्यांच्या मूळ घरण्याशी असलेल्या भावनिक नात्याला अधोरेखित करतात. त्यांच्या निर्वासित जीवनाची ते तुलना यहूदी लोकांच्या दीर्घकालीन भटकंतीशी करतात, ज्यामुळे त्यांच्या अनुभवाची तीव्रता अधिक टोकदार झालीय.

राहुल पंडिता यांनी लिहिलेलं 'अवर मून हॅज ब्लड क्लॉट्स' हे पुस्तक सर्वकालिन बेस्ट सेलर्स पुस्तकापैकी एक आहे. यातले अनुभव तर मस्तक क्षुब्ध करणारे आणि काळीज विदीर्ण करणारे आहेत.

एखाद्या जातीच्या, जमातीच्या, धर्माच्या, पंथाच्या, जमातीच्या, प्रवाहाच्या, वर्णाच्या, भाषिकांच्या, प्रांताच्या कोणत्याही विशिष्ठ जनसमुदायास विस्थापित व्हावं लागणं हा त्या सरकारचा, तत्कालीन व्यवस्थेचा आणि समाजाचाही अपराध दोष होय. असे विस्थापित झालेले समुदाय पुन्हा नेटके स्थिरावत नाहीत. त्यांचं पुनर्वसन होत नाही. कश्मिरी पंडितांची समस्याही याला अपवाद नाही. त्यांचे पुनर्वसन अजूनही होऊ शकलं नाही! जगभरात जिथे जिथे अशा घटना घडल्यात तिथे तिथे कटुता वाढलेली दिसते. आताचे युद्धजन्य वा गृहयुद्धाने ग्रासलेले प्रदेश, राष्ट्रे जरी नजरेसमोर आणली तरी हे सहज पटेल.

एखाद्या समुदायाला निघून जा म्हणणं आणि त्यांनी येन केन प्रकारे निघून जावं म्हणून त्यांना विविध प्रकारच्या दडपशाहीच्या मार्गाने प्रवृत्त करणे हे एक प्रकारचे नियोजित विस्थापन होय. याने कुणाचेच भले होत नाही. ज्या स्त्रियांना, वृध्दांना, बालकांना यातून जावं लागतं त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होतं.

एखाद्याला चिथावणी देणं सोपं आहे मात्र चिथावणी दिलेल्या सहस्रावधी जमावांना आवरणं कुणालाच शक्य नसतं. यातून येतो तो विनाश जो कुणा सत्तालोलुप दलांच्या सत्तेचा सोपान असू शकतो मात्र सामान्य जनतेचे ते थडगे असते ज्यावर सत्तेचे सिंहासन आरुढ असते.

'सेंट ऑफ सॅफ्रॉन..' च्या लेखिका रूही शफी एके ठिकाणी प्रश्न करतात की - राज्य प्रगतीच्या, विकासाच्या मार्गे पुढे न्यायचे असेल तर शासन व्यवस्थेस अशी भडकावू थेरं करावी लागत नाहीत मात्र त्यांना ते मूलतत्ववादी मार्गाने मागे नेऊन आपला धार्मिक अजेंडा सेट करायचा असेल तर ते मध्ययुगापर्यंत मागे न्यायला तयार असतात. ज्यांची माथी भडकेलेली असतात ते यात सामील होतात मात्र कालांतराने जोश सरल्यावर काळाची चक्रे मागे फिरवण्याच्या नादात त्यांनी जे काही करून ठेवलेलं असतं त्याची जबाबदारी कोणच घेत नाही. मग भविष्यातल्या त्या काळात जी पिढी जिवंत असेल ती कुणाला दोष देईल?

- समीर गायकवाड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा