सोमवार, ७ एप्रिल, २०२५

केटी गार्डनर - सॉन्ग्ज ऍट द एज ऑफ रिव्हर : गोष्ट एका नदीची आणि दोन देशांची!


ही एका गावाची, गावजीवनाची, नदीची आणि एका जिज्ञासू संवेदनशील लेखिकेची गोष्ट आहे! एक नदी जी एका देशातून शेजारच्या देशात वाहत जाते, तिथून पुन्हा मूळ देशात परतते नि अखेरीस पुन्हा त्याच शेजारच्या देशात जाते, शेवटी समुद्रास मिळते.

नदी जेव्हा दोनदा देशाच्या सीमा ओलांडते तेव्हा तिच्या काठांनजीकच्या गावांत कसे नि कोणते बदल दिसतात हा एक रंजक नोंदीचा प्रवास. माहेरी आलेल्या मुलीसारखी तिची पावले जड होत असावीत जी गावाच्या सीमेजवळून पुन्हा गावांत शिरते नि अखेरीस तिच्या गंतव्य ठिकाणी म्हणजे सासरी रवाना होते.
या नदीची अवस्था तशीच आहे, हिच्या काठी राहणाऱ्या लोकांची अवस्थाही नदीसारखीच! त्यांचे काही नातलग नदीच्या या भागात भारतात तर काहींचे भारतीय नागरिकांचे नातलग बांगला देशात!

बांगलादेशमधील अतराई नदीच्या काठी वसलेल्या तालुकपुर नावाच्या एका छोट्याश्या गावात केटी गार्डनर ही ब्रिटिश महिला शोधपत्रकार अभ्यासासाठी जाते. पेशाने ती सामाजिक मानववंशशास्त्राची प्राध्यापक. केटी तिथे काही आठवड्याच्या अभ्यासासाठी गेलेली असते मात्र प्रत्यक्षात ती तिथे सव्वा वर्ष राहते.

नदीकाठी वसलेले तालुकपूर हे एक निसर्गरम्य गाव. बांगला देशातले गाव असल्याने अर्थातच मुस्लिमबहुल. इथे काही गावकरी हिंदू आहेत आणि त्यांची मंदिरेही आहेत.
या गावात राहताना केटी गार्डनरला बंगाली स्त्रियांचे जे भावविश्व उलगडले त्याला तिने पुस्तकरूप दिले. इथल्या महिलांचा आणि नदीचा जो भावबंध होता त्याला तिने हृद्य शब्दात चितारले. 'सॉन्ग्ज ऍट द एज ऑफ रिव्हर' हे त्या पुस्तकाचे नाव. शीर्षकात जो नदिष्ट भाव आहे त्याला अगदी बारकाईने रेखाटलेय.

गावातल्या चालीरीती सामाजिक रचना, वाढता कर्मठपणा आणि गावातल्या रिकाम्या मुलींची तरुणांची घुसमट हे सारं यात येतं. मात्र यात प्रामुख्याने येतं ते एक बंगाली खेडं, मौन राहणाऱ्या बायकांचं एक बोलकं चित्रण, निसर्गाशी तादात्म्य पावलेल्या पौगंडावस्थेतील मुलामुलींचा रसरशीतपणा यात आहे आणि धार्मिक कट्टरतेकडे झुकू पाहणाऱ्या प्रौढ पुरुषी मानसिकतेचा छद्म चेहरा अधूनमधून डोकावतो! खेड्यांच्या डे-लाईफमधला टिपिकल ठहराव बखुबीने शब्दबद्ध केलाय.

बांगलादेशातला निसर्ग मान्सूनच्या काळात रुद्र रूप धारण करतो, नद्या उफाणतात, नदीकाठची गावं भयभीत होतात पण फक्त काहीच दिवसांसाठी! पाऊस ओसरताच पुन्हा ते नदीच्या कुशीत सामावून जातात.

अतराईला अनेकदा पूर येतो तरीही तालुकपूरसह तिच्या काठची सर्व गावं तिचे ऋण मानतात कारण अनेकांचे पोट
अतराई नदीचे दिनाजपूर जवळचे पात्र   
नदीतील मासेमारीवर भरते. अतराई नदी बांगलादेशातील दिनाजपूर जिल्ह्यात शिरल्यानंतर तिचे पात्र विशाल वाटते मात्र पुढे जाऊन ते अरुंद होत जाते. तालुकपुर नजीक ते आणखी अरुंद होते. ही इमेज दिनाजपूर नजीकच्या नदीपात्राची! 

मासे पकडायला जाणारी पुरुष मंडळी आणि त्यांच्या सरस कथा गावातल्या बायका सुरस वर्णन करून एकमेकांना सांगत राहतात.
प्रत्यक्षात त्या कथा तितक्या सरस नसतातच, त्यात भ्रम विभ्रमच अधिक असतात. ऐकणाऱ्यानाही हे ठाऊक असते तरीही सारेच माना डोलावत राहतात. पुस्तकातले अतिशय सशक्त आणि तपशीलवार वर्णन खिळवून ठेवते.

या नदीविषयी केटीने तपशिलात जाऊन लिहिलेय. भारतीय हद्दीत बंगालमध्ये सिलिगुडीच्या डोंगराळ भागात ही नदी उगम पावते.
महाभारत काळात या नदीचा उल्लेख अत्रेयी नदी असा आहे.
फुलेश्वरी आणि काडातोया ह्या हिच्या उपनद्या.

वैकुंठपूर जंगल पार करून ही नदी बांगलादेशात शिरते. दिनाजपूर जिल्ह्यात काहीशे किमी अंतरचा वळसा घालून ही भारतात परतते!
बंगालमधील दक्षिण दिनाजपूर जिल्ह्यातील कुमारगंज आणि बेलूरघाट हे तालुके पार करून नदी पुन्हा एकदा बांगलादेशात शिरते.

तिथे हीचे विभाजन होऊन गबुरा आणि कंक्रा या दोन उपनद्यांत रूपांतर होते, बरिंदचे खोरे ओलांडून या नद्या 'चालान बीळ'मध्ये विसर्जित होतात. हा एक अतिशय सखल भाग आहे जिथे तब्बल सत्तेचाळीस नद्या एकरूप झाल्यात. हा सारा प्रदेश पाणथळ भूमीत परिवर्तित झालाय.

ठराविक अंतरानंतर यात बांध घातले गेलेत. पुढे जाऊन हे पाणी बंगालच्या उपसागरास जाऊन मिळते! केटी गार्डनरने या सर्व इलाख्याला भेट दिलीय आणि त्याचे रसभरीत वर्णन केलेय.

नदी जगायला शिकवते आणि लिहायलाही शिकवते. केटी गार्डनर नदीविषयी लिहिताना नदीशी एकरूप झालेल्या नागर संस्कृतीविषयी लिहिते, नदी आणि गावातल्या बायकांचे साम्य दाखवताना सामाजिक विषमतेवरही बोट ठेवते.

सरतेशेवटी एक नदी जी दोन्ही सीमावर्ती देशात दोनवेळा शिरकाव करते तेव्हा तिच्या काठी राहणाऱ्या लोकांच्या मनात भूमीच्या सीमा किती पुसट झालेल्या असतात यावरही केटी लिहिते! आपण अंतर्मुख होतो!

ही ताकद लेखनातली आहे आणि या भागातील विलक्षण भौगोलिक प्रतलाचीही आहे. साहित्यात असे प्रयोग व्हायला हवेत! माणसांमधले प्रेम वाढण्यास याने मदत होते!

या पुस्तकानंतर लेखिका केटी गार्डनरला या भूभागाची भुरळच पडली. ती सातत्याने इथे येत राहिली. या पुस्तकानंतर 10 वर्षांनी ग्लोबल मायग्रंट्स लोकल लाइवज् हे बांगलादेशी स्थलांतरितावरचे पुस्तक लिहिले. 2002 साली तिने लंडनमध्ये वास्तव्यास असणाऱ्या वृद्ध बंगाली लोकांवर पुस्तक लिहिले - एज नरेटीव्ह अँड मायग्रेशन हे त्याचे नाव. केटीचे सर्वात गाजलेले पुस्तक म्हणजे लॉसिंग जेमा ही कादंबरी. जेमा आणि तिचा प्रियकर इस्थर यांची ही गोष्ट. या कादंबरीची पार्श्वभूमी भारतातली आहे. जेमा इथे हरवते. तिचा शोध लागतो मात्र त्या काळात तिने स्वतःला शोधलेले असते. वाचनीय कादंबरी.

'लॉसिंग जेमा' लिहिल्या नंतर केटी पुन्हा बांगलादेशमध्ये गेली. काही महीने सलग राहिली. तिथून परत आल्यावर तिने फेकर ही कादंबरी लिहिली. आपल्याकडे नानार रिफायनरीवरून जो संघर्ष सुरू आहे त्यावर तिथलाच एखादी स्थानिक लेखिका वा लेखक या आशयाची देखणी कादंबरी लिहू शकतो. एड आणि सारा या तरुण प्रेमी जोडप्याची ही गोष्ट. एका राक्षसी क्षमतेच्या तेल कंपनीच्या भूमी अधिग्रहण धोरणाविरोधात हे युगुल आवाज उठवतं. सुरुवातीला त्यांना साथ देणारे ग्रामस्थ नंतर पलटी मारतात. त्यांची लढाई हारण्याच्या बेतात येते मात्र अखेरीस बाजी पलटते. उत्कंठावर्धक लेखन. प्रवाही शैली. मजबूत आशय. बांगलादेशी बेरोजगार मुलांना भडकावण्यासाठी कट्टरपंथीय मंडळी त्यांना कसं गुंतवून ठेवतात याचे वर्णनही यात आहे.

केटीने 'द मर्मेड्स पर्स' ही कादंबरी लिहिली. त्यात कॅस बेनब्रिज या मध्यमवयीन प्राध्यापिकेचा प्रवास आहे. हा केटीचाच प्रवास म्हटलं तरी चालेल. कॅसचा पाठलाग केला जातो, तिच्यावर पाळत ठेवली जाते. कॅसच्या मनात बालवयापासूनच समुद्राची भीती असते. तिला फॉलो करणाऱ्यांपासून ती सुटका करून घेते. मात्र याचे रुपक समुद्राशी जोडले असल्याने ही कादंबरी फॅन्टसीच्या वाटेने पुन्हा वास्तवाकडे येते. अर्थातच तिच्या मनातली समुद्राची भीती संपते. स्त्री, नदी आणि समुद्र यांचे भावनिक नाते यात आहे. यातली वर्णने वाचताना लक्षात येते की केटीच्या मनातला भीतीचा समुद्र म्हणजे बंगालच्या उपसागराला कवटाळणाऱ्या कैक बांगलादेशी स्त्रियांच्या मनातली भीतीच होय!

एखादा लेखक एखाद्या भागात भटकंती करायला जातो मात्र तिथला परिसर कायमचा त्याच्या मस्तकात रुतून बसतो. तो पुन्हा पुन्हा त्याला खुणावत राहतो. लेखक जमेल तेव्हा तिथे जात राहतो. खरे तर तिथे त्याला दरवेळेस जे काही नवे गवसत असते ती त्या भूभागाची प्रेरणा होय. त्या मातीशी झालेल्या जिव्हाळ लगटीतून लेखकाला नवे आयाम मिळतात. तो घडत जातो. लिहित राहतो. तो परिसर रूप बदलून नाव बदलून त्याच्या लेखनात पुन्हा पुन्हा डोकावत राहतो! केटी गार्डनर तब्बल पंचवीस वर्षे बांगलादेशात येत राहिली आणि तिथल्या वातावरणात तिला नित्य विषय सुचत राहिले! माझ्या बाबतीत हे खूप कोरिलेट झाले कारण रेड लाइट डायरीज लिहिताना बंगाल आणि खास करून कोलकता नावं बदलून नव्या रूपात अनेकदा त्या लेखनात येत राहिले. हे भारी असतं!

- समीर गायकवाड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा