सोमवार, २८ एप्रिल, २०२५

द्रौपदीची थाळी

 द्रौपदीची थाळी..


वृद्धाश्रमाचे प्रातिनिधिक चित्र   


परवा दिवशीचे मदतीचे आवाहन वाचून वृद्धाश्रमातील 77 वर्षांच्या आज्जीनी काल फोन केला होता आणि विचारणा केली की, "थोडीशीच रक्कम आहे, तेव्हढी रक्कम चालेल का?"

बोलताना त्यांचा कंठ दाटून आला होता.
रिकाम्या वेळी मेणबत्त्या, खडू तयार करून त्यांनी जमा केलेली ती रक्कम होती.

मागे काही वेळा मी त्यांना भेटलोय. त्यांच्याविषयी पोस्टही केली होती.
त्यांच्या केअरटेकर फेसबुक वापरतात. माझी पोस्ट त्यांना वाचून दाखवतात.

मदतीची 'ती' पोस्ट वाचून त्यांचे मन राहवले नाही. त्यांनी हट्ट धरला की समीरला फोन लावून द्या, थोडे पैसे साठले आहेत, त्याला देऊन टाकते.

फोनवर त्या अगदी आत्मीयतेने बोलत होत्या. माझी विचारपूस करायला विसरल्या नाहीत. त्यांच्या मदतीस होकार द्यावा यासाठी त्या म्हणून खूप आग्रह करत होत्या.
त्यांना म्हटलं, "आज्जी मी आजवर एक रुपयाही माझ्या वैयक्तिक खात्यात मदत म्हणून कधीही घेतला नाही, आणि ज्यांना मदत हवीय त्यांच्याकडे जीपे नाहीये. खेरीज तुम्हाला मदत देण्याऐवजी तुम्हीच मदत देताय हे काही मनाला पटत नाहीये!
तरीही त्यांचे टुमणे सुरूच होते.

शेवटी त्यांना म्हटलं, 'प्लीज तुम्ही पैसे पाठवू नका, आम्हीच तुम्हाला मदत केली पाहिजे. तुम्ही तिथे आहात याचेच दुःख आहे.'
त्या म्हणाल्या, "आता माझी कुठलीच तक्रार नाही. नात्यागोत्याच्या पलिकडे गेलेय. आता कुठल्या भावना नाहीत की कुठल्या इच्छा उरल्या नाहीत. मरण्याआधी जमेल तितकं चांगलं वागत राहायचं!" थरथरत्या आवाजात त्या बोलत होत्या आणि इकडे माझे डोळे वाहत होते! कदाचित त्यांचेही डोळे भरून आले असावेत पण त्या तसं दाखवत नव्हत्या!

त्यांना म्हटलं, "अशा अवस्थेत देखील तुम्ही मदत देण्याची इच्छा व्यक्त करताय ही किती मोठी गोष्ट आहे! प्लीज तुम्ही मदत देऊ नका." त्यावर त्या मौन झाल्या, फोन कट केला. पुन्हा कॉल बॅक करावे म्हटलं तर त्यांचा हट्ट मोडणार कसा हा प्रश्न पडला! त्यांचाही कॉल आला नाही.
मात्र -

मात्र त्यांनी त्या केअरटेकर ताईंना त्यांच्या मोबाइलवरून मला न् विचारता परस्पर 840 रुपये आज पाठवायला सांगितले; बदल्यात त्यांच्या जवळचे रोख पैसे त्यांना दिले.

अकराच्या सुमारास केअर टेकर मॅडमचा फोन आला. पैसे जमा झाले आहेत का पहा! आज्जी रुसून बसल्या होत्या काही केल्या ऐकत नव्हत्या, नाईलाज झाला म्हणून पैसे पाठवले!"
ते ऐकून जीव वरमून गेला.
जीपे ओपन केलं तर त्यात त्यांच्या नावाने एंट्री दिसत होती. मला मेल्याहून मेल्यासारखं झालं. त्यांना फोन केला आणि दोन वाजेपर्यंत आश्रमात येत असल्याचं कळवलं. आज्जीना सांगू नका अशी विनंती केली. त्यांनी होकार दर्शवला.

आज्जीनी दिलेल्या आठशे चाळीस रुपयांपैकी दहा रुपये ठेवून घेऊन बाकीचे आठशे तीस रुपये त्यांना आताच त्यांना परत करून आलोय.
पैसे परत दिल्यावर त्यांचे डोळे डबडबून आसवले होते. मात्र अगदी प्रयत्नपूर्वक त्यांनी स्वतःला सावरलं होतं.
बोलताना त्यांची मान हलत होती, आवाजात कंप होता. कातडी लोंबत असणाऱ्या मखमली हातानी त्या माझ्या पाठीवरून अलगद बोटं फिरवत होत्या.
"माझा म्हाताऱ्या गरीब विधवेचा इतकाही अधिकार नाही का?" असं म्हणत होत्या!

काही माणसं वरवर छोटी वाटणारी परंतु प्रत्यक्षात खूप मोठी कृती करत असतात मात्र त्यांची नोंद कुठेच कधीच होत नसते!

मग त्यांना सांगितलं की, "आज्जी तुमचे हे दहा रुपये आयुष्यभर मदत मिळवून देत राहतील! या पैशांत द्रौपदीची थाळी येऊ शकेल! यातून येणाऱ्या अगणित घासांमधला प्रत्येक घास तुम्हाला दुवा देत राहील!"
माझ्या या वाक्यासरशी त्या हमसून हमसून रडल्या! त्यांचा अश्रू आवेग ओसरल्यावर छातीशी धरून त्यांना शांत केलं!

काही मिठ्या काळजातलं तुफान शांत करतात!

- समीर गायकवाड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा