साहित्यातले नोबेल विजेते पेरुव्हियन लेखक मारिओ व्हार्गास योसा यांचं काल वृद्धापकाळाने निधन झालं. त्यांच्या घरीच त्यांच्या परिवारासमोर अगदी शांत अवस्थेत ते गेले. त्यांच्या अनेक कादंबऱ्या विविध पोर्टल्सवर उपलब्ध आहेत. मी भावनाप्रधान इसम आहे, त्यांचं समग्र लेखन मी वाचलं नाही. जे काही वाचलंय त्यापैकी 'द फीस्ट ऑफ द गोट' (La Fiesta del Chivo) ही कादंबरी खूप प्रभावशाली वाटली. कारण या कादंबरीत नवरसाचं इतकं बेमालूम मिश्रण आहे की आपण दिग्मूढ होऊन जातो. ही कादंबरी एका विवेकी स्त्रीची, तिच्या हारलेल्या पित्याची आणि एका हुकूमशहाच्या उदयापासून अस्ताची आहे!
एखाद्या हुकूमशहाचा अंत होतो तेव्हा नेमके काय होते याचे उत्तर अनेक अँगल्सनी देता येईल. एखाद्या सेंटीमेंटल साहित्यिकाला त्यावर कथानक लिहावेसे वाटले तर तो ते तितक्या दाहकतेने शब्दबद्ध करेल का आणि त्याच्या प्रतिभेचा वापर करून काही सृजनात्मक निर्मिती करेल का? पत्रकारास यावर लिहायला सांगितले तर तो वेगळ्या पद्धतीने लिहिल, एखाद्या कवीला यावर लिहावं वाटलं तर तो आणखीच वेगळ्या तऱ्हेने व्यक्त होईल. व्यक्तीची राजकीय सामाजिक मते, व्यक्त होण्याची पद्धत तसेच जडणघडण आणि घटनेकडे पाहण्याचे दृष्टीकोन या सर्वांचा परिपाक त्याच्या र्निमितीत ध्वनित होतो. लेखक मारिओ योसा यांनी याकडे ज्या नजरेने पाहिलेय ते 'द फीस्ट ऑफ द गोट' मध्ये प्रतिबिंबित झालेय, हे अत्यंत उदात्त उत्तुंग आहे, स्तब्ध करणारे आहे! एखादी हुकूमशाही राजवट कार्यरत असते तेव्हा नेमकं काय काय घडतं हे त्यांनी अतिशय बारकाईने चितारलेय.
2000 साली कादंबरी प्रकाशित झाली तेव्हा योसा 64 वर्षांचे होते. ते जवळपास पाच वर्षे या कादंबरीचे लेखन करत होते. अलीकडे लोक पाच आठवड्यातही कादंबरी लिहितात! असो. डॉमिनिकन हुकूमशहा राफाएल ट्रूहियो याच्या मृत्यूनंतर 39 वर्षांनी ही कादंबरी प्रकाशित झाली. त्याच्या मृत्यूच्या वेळी योसा केवळ पंचवीस वर्षांचे होते. एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं की राफाएल ट्रूहियो याच्या जीवनावर त्याच वेळी कादंबरी लिहिली असती तर तिचे स्वरूप अगदीच भिन्न असले असते! एखादी प्रलयकारी घटना घडते तेव्हा तिचे आपण साक्षीदार असतो त्या वेळी आपल्या मनात लक्षावधी भावनांचे काहूर माजलेले असते मात्र तब्बल दोन तीन दशकांनी आपण त्याच घटनेकडे पाहतो तेव्हा मनातले भाव वेगळे असतात. मधल्या काळात संबंधित व्यक्तीने जे काही पाहिलेले असते, अनुभवलेले असते त्याची जो वैचारिक सामाजिक राजकीय आर्थिक दृष्टिकोन तयार झालेला असतो त्याचा प्रभाव त्याच्या विचार करण्याच्या पद्धतीवर पडलेला असतो. मारिओ योसा यांनी हे लक्षवेधक रित्या समोर आणलेय.
क्रूरता आणि कारुण्य या टोकाच्या दोन भावना असल्या तरी त्यांचे परस्पर संबंध आहेत, कारुण्य दाटून येऊ नये म्हणून क्रूर हुकूमशहा त्यांच्या जुलुमी राजवटीत जनतेला कोणत्या ना कॊणत्या कैफात बंदिस्त करण्याची नीट काळजी घेत असतात यावर मारिओ योसा फोकस करतात! हे चित्र आताही बऱ्याच देशात दिसत्येय. माझ्या नजरेसमोर तर ओळखीचे चेहरेही तरळलेत! असो. ही कादंबरी डोमिनिकन रिपब्लिकच्या इतिहासातील क्रूर हुकूमशहा राफाएल ट्रूहियो यांच्या कारकिर्दीभोवती फिरते. योसा यांनी ही कथा केवळ राजकीय थरारकथा न ठेवता, ती मानवी नात्यांच्या, विशेषतः पिता आणि मुलीच्या नाजूक बंधाच्या केंद्रस्थानी आणली आहे. कथेचा केंद्रबिंदू आहे उरानिया काब्राल ही स्त्री, जी ट्रूहियोच्या शासनकाळात आपले बालपण आणि तारुण्य अनुभवते.
कथा 1990 च्या दशकात सुरू होते, जेव्हा उरानिया काब्राल ही वयाची पन्नाशी गाठलेली एक यशस्वी वकील असते. ती न्यूयॉर्कहून आपल्या मायदेशी डोमिनिकन रिपब्लिकला परत येते. ती तब्बल 35 वर्षांनी आपल्या जन्मभूमीत पाऊल ठेवते. (इथे एक छोटीशी नोंद द्यावी वाटते ती अशी की ट्रूहियोच्या मृत्यूनंतर 35 वर्षांनी योसा यांनी कादंबरी लिहायला घेतली होती, लेखक आणि त्याची पात्रे यांच्यातल्या कालमानाची ही सांगड परफेक्ट जमली की फिस्ट भारी होत असते) उरानियाच्या परतण्यामागचे कारण तिच्या कुटुंबाशी, विशेषतः तिच्या वडिलांशी असलेले तिचे तुटलेले नाते आहे. कादंबरीच्या प्रारंभापासूनच वाचकाची उत्सुकता ताणली जावी याची मारिओ योसा पुरती दक्षता घेतात. कारण वाचकाला प्रश्न पडतो: उरानिया इतक्या वर्षांनी का परतली? तिच्या भूतकाळात असे काय घडले की तिने आपल्या कुटुंबाशी संबंध तोडले होते?
मारिओ योसा यांनी ही कथा तीन समांतर कथानकांमध्ये विणलीय ज्यांचा परस्परांशी संबंध आहे. उरानियाचा वर्तमानकाळ, ट्रूहियोच्या हत्येची योजना आखणाऱ्या क्रांतिकारकांचा काळ आणि ट्रूहियोचा या समग्र कालखंडाकडे पाहण्याचा स्वतःचा जरबयुक्त दडपशाहीचा दृष्टिकोन. उरानियाच्या आठवणींमधून आपल्याला समजते की तिचे वडील ऑगस्टीन काब्राल हे ट्रूहियोच्या शासनातील एक उच्चपदस्थ अधिकारी होते. पण ट्रूहियोच्या क्रूर धोरणांमुळे त्यांचे कुटुंबही बिकट परिस्थितीत सापडते. उरानियाच्या बालपणातील निरागसता पार कोमेजते आणि तिचा वडिलांवरचा विश्वास हळूहळू खचत जातो. हे वर्णन कमालीचे करुण आहे.
कादंबरी पुढे सरकते तेव्हा उरानियाच्या भूतकाळातील एक भयंकर सत्य समोर येते. ट्रूहियो जो आपल्या सत्तेचा आणि कामुकतेचा गैरवापर करायचा, त्याने उरानियावर लहानपणीच अत्याचार केले होते. उरानियाच्या वडिलांनीच तिला त्रुहियाच्या हवाली केल्याने हे घडलेलं. तिला जेव्हा हे सत्य उमगतं तेव्हा तिचा आपल्या वडिलांवरील विश्वास उडतो, त्यांच्यावरचे राहिलेले प्रेमही उद्ध्वस्त होते. उरानियाच्या मनातील भीती, संताप आणि विश्वासघाताची भावना वाचकाला अंतर्मुख करते. योसा यांनी हा घटनाक्रम इतक्या संवेदनशीलतेने रंगवलाय की आपण नकळत उरानियाच्या वेदनेत सहभागी होतो.
दुसऱ्या बाजूला ट्रूहियोच्या हत्येची योजना आखणारे क्रांतिकारक आपल्या जीवावर उदार होऊन लढतात. त्यांचा हेतू देशाला ट्रूहियोच्या जोखडातून मुक्त करणे हा आहे. कादंबरीच्या अखेरीस उरानिया आपल्या आजारी वडिलांना भेटते, पण तिच्या मनातील कटुता कमी होत नाही. ती आपल्या भूतकाळातल्या वास्तवाशी सामना करते तिच्या मनात वडिलांविषयीचे द्वंद्व सुरु होते. जीव वाचवण्यासाठी नावलौकिकाची, पैशाची, सत्तेची जवळीक राहावी म्हणून मुलीलाच साधन बनवणाऱ्या वडिलांना ती क्षमा करू शकत नाही. ट्रूहियोची हत्या होते, पण त्यानंतरही देशातील राजकीय अस्थिरता कायम राहते.
इतक्या विविध शेड्सनी भरलेल्या कादंबरीचा शेवट विलक्षण आहे. देशात शांतता प्रस्थापित होते मात्र उरानियाच्या मनातील अस्वस्थता वाढत राहते. क्रांतिकारकांच्या बलिदानाची किंमत अपरिमित मानवी जीवितहानीच्या बदल्यात मोजता येत नाही इतकी मोठी ठरते. हुकूमशाही राजवट संपते मात्र माणसांच्या मनातली तगमग संपत नाही. एखादी व्यक्ती जेव्हा हुकूमशहा म्हणून सत्ता भोगत असते तेव्हा त्याच्या सत्तेत सामील असणाऱ्या जवळच्या लोकांची वाताहत त्याच्या पश्चात कशी होते हे वाचताना त्यांच्या विषयी सहानुभूती उरत नाही. इतकं सर्व घडत असताना जे लोक तटस्थ असतात, मौनात राहतात त्यांच्याविषयीचे टोकदार कटाक्ष मारिओ व्हार्गास योसा आपली कथानायिका उरानियाच्या माध्यमातून टाकतात. वाचकाला एका गहन विचारात टाकून कथा संपते.
ट्रूहियो वरवर वाह्यात नादिष्ट फटीचर वाटायचा मात्र तो भयंकर खुनशी, कपटी, सुडान्वेषी आणि विकृत होता. सर्वच हुकूमशहा थोडेसे बाष्कळ कसे वाटतात यावर काही कटाक्ष आहेत. कॅरेबियन समुद्र, छोट्या छोट्या बेटांचे भौगोलिक प्रश्न, तिथले सतत बदलत असणारे जिओपोलिटिकल संदर्भ, लॅटिन अमेरिकन मुक्त संस्कृती, श्रीमंतीचे आकर्षण आणि त्रोटक कमाईची साधने यांचे प्रभाव कादंबरीत उमटलेत. अमेरिकेचे उत्तरपूर्वचे राज्य फ्लोरिडाची राजधानी मियामी हे अखेरचे टोक आहे. त्यापासून जवळचा भौगोलिक प्रदेश क्युबा, ज्याच्याशी अमेरिकेचे सूत कधीच जमले नाही. त्या क्युबापासून डॉमिनिकन रिपब्लिक जवळ आहे खेरीज लॅटिन अमेरिकन देश व्हेनेझुएलाही एका बाजूला आहे. भिन्न राजकीय प्रवाह असणाऱ्या बलाढ्य देशांच्या कात्रीत अडकलेल्या छोट्या देशांच्या राजकीय आकांक्षा काय असतात आणि मोठ्या देशातले मोठे मासे त्यांचा वापर कसा करून घेतात यावरही भाष्य आहे. अनेक राजकीय भाष्ये ही कादंबरी करते तरीही ही एक विलक्षण भावनाप्रधान कादंबरी म्हणूनच ओळखली जाते.
हुकूमशहा जिवंत असताना जे लोक त्याच्या विरोधात व्यक्त होऊ शकतात तेच भविष्याला दिशा देऊ शकतात. पुढच्या पिढीसाठी विचारांचे संचित तेच देऊ शकतात. 'द फीस्ट ऑफ द गोट'मध्ये ही बाब मारिओ योसा अधोरेखित करतात. खरेच ही गोष्ट किती मोठी आहे!
जर एखाद्या हुकूमशाही वा जुलुमी एककल्ली सत्तेविरोधात कुणी कोणत्याच माध्यमातून व्यक्तच झालं नाही तर त्या राजवटीनंतर जे कुणी सत्तेत येऊ शकतात वा येऊ इच्छितात त्यांना दिशादर्शक अशा गोष्टी उरतच नाही, म्हणून किमान ज्यांचा विवेक शाबीत आहे त्यांनी तरी त्या त्या कालखंडात व्यक्त होत राहिले पाहिजे.
व्यक्त होणं हे होकायंत्रासारखं आहे जे येणाऱ्या पिढीला दिशा देत राहतं! अशा लेखकाला नोबेल मिळाले नसते तर नवल वाटले असते! उत्तम लिहित वाचत राहिलं पाहिजे, सुदृढ जडणघडणीसाठी या गोष्टी कामाला येतात..
- समीर गायकवाड
नोंद - गेल्या वर्षी (2024) याच हुकूमशहावर कॅथरिन बार्डन या फ्रेंच लेखिकेने कादंबरी लिहिलीय. ट्रुहियोच्या सर्वात मोठ्या मुलीचे उत्तरायुष्य काही काल्पनिक पात्रे व घटनाक्रम बदलून लिहिलेय. विविध भाषा जिथं बोलल्या जातात तिथे जगण्यात, विचारात विविधता आढळते. फ्रेडरिक फोरसिथ या विख्यात लेखकासही या कथावस्तूची भुरळ पडली होती. त्यांनी लिहिलेल्या 'द डे ऑफ द जॅकल'वर सिनेमा निघाला होता. त्यांचा दृष्टिकोन आणि योसा यांची मांडणी यात खूप फरक आहे. 'द फिस्ट ऑफ द गोट'वरही त्याच नावाचा सिनेमा निर्मिला गेला मात्र तो फ्लॉप ठरला. यातले गोट goat हे संबोधन राफाएल ट्रूहियोला त्याचे सहकारी त्याच्या पाठीमागे वापरत असत. विशेष म्हणजे ते त्याला बकरा म्हणत असले तरी ते स्वतः मेंढरागत त्याच्या मागे फिरत!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा