बुधवार, १६ एप्रिल, २०२५

गोष्ट दोन प्रतिभावंतांमधील विलक्षण साम्याची!


काहींच्या आयुष्यात एक विलक्षण साम्य असणाऱ्या घटना घडतात. गोष्ट आहे जागतिक कीर्तीचे अमेरिकन संशोधक बेंजामिन फ्रँकलिन आणि मराठी लेखिका मालती बेडेकर तथा विभावरी शिरूरकर यांची.
मालती बेडेकर यांचं लग्नाआधीचं नाव बाळूताई खरे. मराठीमधलं काही विलक्षण दिशादर्शक लेखन त्यांनी केलंय. त्या आद्य स्त्रीवादी लेखिका म्हणूनही ओळखल्या जातात. मात्र त्यांच्या लेखनाची एक कथा आहे! विभावरी शिरुरकर या नावाने त्यांनी त्या काळातलं अत्यंत जहाल असं लेखन केलं. त्यांनी लिहिलं खरं मात्र ते प्रकाशित कोण करणार? तर त्यांच्या मोठ्या भगिनी कृष्णा मोटे या यादेखील लेखिका आणि समाजशास्त्रज्ञ होत्या. त्यांचे पती ह. वि. मोटे यांनी हे लेखन प्रसिद्ध केलं. 'कळ्यांचे निश्वास' हे त्या कथासंग्रहाचे नाव. जरठ विवाह, बालविधवा,स्त्रीच्या कामवासना, प्रणयभावना, लग्नाचा बाजार, स्त्रीमनाची कोंडी, परित्यक्ता आणि विधवा विवाह यावर त्यांनी अत्यंत टोकदार कटाक्ष टाकले होते. या लेखनाची इतकी चर्चा झाली की ही विभावरी शिरूरकर कोण आहे याचा छडा लावला पाहिजे अशा चर्चा वर्तमानपत्रात झडू लागल्या.

आपल्यापैकी अनेकांना 'रणांगण' या कादंबरीचे लेखक विश्राम बेडेकर माहिती असतीलच. 'एक झाड आणि दोन 

पक्षी' हे त्यांचं आत्मचरित्रही चर्चेत होतं. त्यात थोडा अतिरंजितपणा होता ही गोष्ट वेगळी. असो. त्यांचं 'टिळक आणि आगरकर' हे नाटक महत्वाचं. 'काबुलीवाला' आणि 'शेजारी' या गाजलेल्या सिनेमांच्या पटकथा त्यांनी लिहिल्या होत्या. मालतीबाई, विश्राम बेडेकर यांच्याशी वयाच्या तेहतिसाव्या वर्षी विवाहबद्ध झाल्या. तो प्रेमविवाह होता. बेडेकर यांचे पहिल्या पत्नीशी संबंध तुटल्यात जमा होते. मालतीबाई यांनी पहिल्या पत्नीची भेट घेतली. त्या बाईंनी त्यांचा घटस्फोटाचा विचार मालतीबाई यांना सांगितला. विश्राम बेडेकर यांच्याशी विवाह करण्याचा आग्रह केला. पुरुषाच्या दुसऱ्या विवाहाला त्या काळात कायद्याने अटकाव नव्हता. मालतीबाई आणि विश्राम बेडेकर यांचे लग्न झाले. लग्नाच्या वेळी मालतीबाई सोलापूरमध्ये नोकरीस होत्या. त्यांनी लग्न मुंबईत केले. विश्राम बेडेकर यांनी लगेच, बडोदा राज्यात जाऊन प्रथम पत्नीला घटस्फोट दिला. पुढे, त्या बाईंनीही त्यांच्या परिचित गृहस्थांशी लग्न केले. विश्राम बेडेकर लग्नानंतर इंग्लंडला निघून गेले. ते परत आल्यावर दोघे काही काळ सोलापूरात राहिले.

मालती बेडेकर यांच्या जाई, शबरी, आणि हिंदोळ्यावर या कादंबऱ्या उल्लेखनीय होत. स्वतःला दत्त अवतार म्हणवून घेणाऱ्या वामन महाराजांचा ढोंगीपणा त्यांनी उघड केला. त्या एव्हढ्यावर थांबल्या नाहीत. के. एन. केळकर यांच्यासोबत सहलेखन करत त्यांनी 'हिंदू व्यवहार धर्मशास्त्र' हे पुस्तक लिहून कर्मठ सनातनी मंडळींना शब्दांची धुरी दिली! विरलेले स्वप्न, खरे मास्तर, घराला मुकलेल्या स्त्रिया, अलंकार-मंजूषा ही त्यांची साहित्य संपदा.

विशेष बाब म्हणजे त्यांची पुस्तके प्रकाशित होण्याआधी त्यांनी श्रद्धा, बी.के., कटुसत्यवादिनी, एक भगिनी आणि बाळुताई खरे या नावांनीही लेखन केलं. विविध नियतकालिकांत आणि वर्तमानपत्रात त्या या नावांनी समाजाच्या बुरसटलेल्या चालीरितींवर आघात करणारे लेखन करत. ही सर्व नावे तेव्हा चर्चेत होती. खास करून विभावरी शिरुरकरचे रहस्य उलगडले जाईपर्यंत अनेकांना या नावाची कुणीतरी समाजसुधारक पुरोगामी विचारांची महिलाच हे लेखन करत असेल असे वाटायचे.

स्त्रीच्या भावविश्वाचा सूक्ष्म अभ्यास, पुरुषसत्ताक मानसिकतेने होणारे अन्याय, समाजातील आदिवासींच्या व्यथा आणि व्यवस्थेने पिचलेल्या समूहांचे अनुभव त्यांच्या लेखनातून प्रकर्षाने दिसतात. 'बळी' ही 1950 मध्ये प्रकाशित झालेली कादंबरी या क्षेत्रातील त्यांच्या अनुभवांवर आधारित होती. 1940 मध्ये स्थापन झालेल्या महिला सेवाग्राम संस्थेसाठी त्यांनी दहा वर्षे झोकून दिले. त्यांच्या लेखनाने स्त्रीच्या संघर्षाला वाचा फोडली आणि स्वतंत्र अस्तित्वासाठी झगडणाऱ्या स्त्रियांना प्रेरणा दिली. खऱ्या मालती बेडेकर समोर आल्या तेव्हा अनेकांनी तोंडात बोटे घातलेली!

आता बेंजामिन फ्रँकलिनची गोष्ट! बेंजामिन फ्रँकलिन हे बहुआयामी व्यक्तिमत्व. वैज्ञानिक, शोधक, राजकारणी, मुत्सद्दी, आणि लेखक! त्यांचं आयुष्य आणि लेखन यातून त्यांची बुद्धिमत्ता, व्यावहारिकता आणि विनोदबुद्धी दिसते. फ्रँकलिन यांना फारसं औपचारिक शिक्षण मिळालं नाही. वयाच्या 10 व्या वर्षी त्यांना शाळा सोडावी लागली, पण त्यांनी स्वतःला वाचन, लेखन आणि प्रयोगांद्वारे घडवलं. त्यांनी गणित, विज्ञान, तत्त्वज्ञान आणि भाषा यांचा अभ्यास स्वतःहून केला.

वयाच्या 15 व्या वर्षी फ्रँकलिन यांनी त्यांचा भाऊ जेम्स याच्याकडे छापखान्यात काम सुरू केलं. पुढे त्यांनी स्वतःचा छापखाना सुरू केला आणि 'पेनसिल्व्हेनिया गॅझेट' हे वृत्तपत्र आणि 'पुअर रिचर्ड्स ॲल्मनॅक' (Poor Richard's Almanack) प्रकाशित केलं. यात हवामान अंदाज, खगोलीय माहिती, कॅलेंडर यांसोबतच बुद्धिमंत्र, नीतिवचनं आणि विनोदी टिप्पण्या होत्या. यातले त्याचे काही कोट्स आजही खूप प्रसिद्ध आहेत. “Early to bed and early to rise, makes a man healthy, wealthy, and wise” किंवा “A penny saved is a penny earned”! या ॲल्मनॅकमुळे सामान्य लोकांमध्ये शिक्षण आणि नीतिमूल्यांचा प्रसार झाला. मात्र या रिचर्डची गंमत विभावरी शिरूरकर सारखी होती! रिचर्ड सॉन्डर्स या टोपणनावाने ते लिहिलं गेलं होतं! लोकांना हा रिचर्ड खरा वाटला होता!

मालती बेडेकरांसारखंच समाजाला झोडपून काढणारं लेखन फ्रँकलिन आणखी एका टोपणनावाने केलं. त्यांनी Silence Dogood नावाच्या काल्पनिक विधवेच्या नावाने वयाच्या 16 व्या वर्षी वृत्तपत्रात लेख लिहिले. या लेखांमधून त्यांनी समाजातील विविध समस्यांवर नर्मविनोदी आणि उपहासात्मक टिप्पणी केली.मालती बेडेकर जेव्हा वर्तमानपत्रात नाव बदलून लिहित होत्या तेव्हा त्यांचेही वय इतकेच होते!

फ्रँकलिन यांनी विजेच्या प्रयोगांवर आणि इतर वैज्ञानिक शोधांवर अनेक लेख लिहिले, जे रॉयल सोसायटी ऑफ लंडनला सादर केले गेले. पण ते एव्हढयावर थांबले नाहीत. त्यांनी “The Speech of Polly Baker” नावाचा बनावट निबंध लिहिला. यात त्यांनी पॉली बेकर नावाच्या काल्पनिक स्त्रीच्या नावाने समाजातील दांभिक नैतिकतेवर टीका केली. हा निबंध इतका विश्वासार्ह होता की अनेकांनी पॉली बेकर ही खरी व्यक्ती आहे असंच मानलं! आहे की नाही विलक्षण साम्य!

'The Autobiography of Benjamin Franklin' हे फ्रँकलिन यांचं आत्मचरित्र हे अमेरिकन साहित्यातील एक महत्त्वाचं पुस्तक मानलं जातं. यात त्यांनी त्यांच्या बालपणापासून ते यशस्वी उद्योजक आणि वैज्ञानिक बनण्यापर्यंतचा प्रवास लिहिला आहे. त्यांनी स्वतःच्या चुका, शिकलेले धडे आणि जीवनातील तत्त्वं यांचं प्रामाणिक वर्णन केलं. उदा., त्यांनी स्वतःच्या 13 सद्गुणांचा (Virtues) उल्लेख केला, ज्यांचा ते रोज पाठपुरावा करायचे, जसे की संयम, काटकसर आणि प्रामाणिकपणा. हे पुस्तक प्रेरणादायी आणि स्वयं-सुधारणेचं (self-improvement) आदर्श उदाहरण मानलं जातं. बेंजामिन फ्रँकलिन यांना अमेरिकेचे राष्ट्रपिता founding father of nation मानलं जातं!

आज 235 वा स्मरणदिवस! 235 वर्षांपूर्वीचा अमेरिकन समाज विवेकशील होता आणि बेंजामिन फ्रँकलिनचा दृष्टिकोन मानवतावादी होता. त्यांच्यावर इंग्रजांनी राष्ट्रद्रोहाचा आरोप लावला होता! त्यांना वैचारिक मूल्ये होती, नैतिक अधिष्ठान होते! आता सगळा विस्कोट करून टाकलाय! आता मानवतावादी मूल्ये जाऊन केवळ एकाधिकारशाही आणि मूठभर भांडवलशाहीचे तंत्र तिथे राज्य करतेय! अर्थात ते जनतेने निवडलेले सरकार आहे! देशोदेशीची जनता काही शतकांच्या कालखंडानंतर भ्रमित होत असतेच!

इकडे मालती बेडेकरांच्या जन्माला 125 वर्षे उलटून गेलीत. त्यांनी रूढी परंपरा यांच्या विरोधात जे विचार मांडले त्याला शंभर वर्षे होताहेत. शंभर वर्षानंतरचे चित्र असे आहे की आताच्या बऱ्याच स्त्रियांना पुन्हा परंपरा, रूढी यांचे आकर्षण वाढू लागलेय!

या दोन प्रतिभावंतांच्या जीवनातलं आणि पश्चात काळातलं हे साम्य जितकं विलक्षण भेदक आहे तितकेच व्यथित करणारेही आहे!

- समीर गायकवाड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा