मंगळवार, १५ एप्रिल, २०२५

द्वेषाची अखेर विनाशात होते - सिव्हिल पीस!


मणिपूरमधील एका मैती तरुणीचा एक व्हिडीओ अलिकडेच खूप व्हायरल झालाय ज्यामध्ये ती स्वतःच्या राहत्या घरी परतल्यानंतर सारं काही राख झाल्याचं पाहून रडते आणि कायमचं विस्थापित होणार असल्याचं सांगत घराच्या अवशेषांतून बाहेर पडते. हा व्हिडीओ पाहून जागतिक किर्तीचे आफ्रिकन लेखक चिनुआ अचेबे यांच्या ‘सिव्हिल पीस‘ या कथेची आठवण झाली.

सिव्हिल पीस Civil Peace ही कथा जोनाथन इव्हेग्बू नावाच्या नायजेरियन माणसाच्या जीवनावर केंद्रित आहे. जो नायजेरियन गृहयुद्धातून (1967-1970) आपल्या कुटुंबासह सुखरूप बाहेर पडतो. युद्धात त्याच्या हाती पाच अमूल्य गोष्टी गवसल्या असं तो मानतो — त्याचं स्वतःचं जीवन, पत्नी मारियाचं जिवंत असणं आणि त्याच्या चारपैकी तिघा मुलांचं उर्वरित आयुष्य. युद्ध संपल्यानंतर जोनाथन आपले घर शोधण्यासाठी एनुगू या त्याच्या मूळ गावी परततो, जिथे त्याला त्याचं घर सापडतं. काहीशा पडझड झालेल्या अवस्थेतलं आणि काही अंशी जाळपोळ झालेलं घर पाहून त्याला आनंदही होतो आणि दुःखही होतं. तो आनंदाने म्हणतो, “ईश्वर कधीच अडचणी निर्माण करत नाही, त्याने मला धीर दिला!"

जोनाथन आपल्या कुटुंबासह नव्याने जीवन सुरू करतो. तो आपल्या जुन्या सायकलचा वापर टॅक्सी चालवण्यासाठी करतो आणि आपल्या पत्नीला बाजारात खाद्यपदार्थ विकण्यास मदत करतो. युद्धादरम्यान त्याला मिळालेले “एग-राशर” (Egg-rasher, म्हणजे युद्धातील नुकसानभरपाईचे पैसे, 20 पौंड)त्याने जपून ठेवलेले असतात. एके रात्री चोर त्याच्या घरी येतात आणि त्या पैशाची मागणी करतात. जोनाथनला नाईलाजाने ते पैसे द्यावे लागतात. पण दुसऱ्या दिवशी, तो या नुकसानाला फारसे महत्त्व देत नाही. तो म्हणतो, “पैसे काही माझ्या कुटुंबाच्या जीवनापेक्षा मोठे नाहीत. मी पुन्हा मेहनत करेन.” कथा जोनाथनच्या या आशावादी दृष्टिकोनाने आणि त्याच्या जीवनातील उतार चढावाच्या आलेखाविषयी भाष्य करुन संपते.

युद्धाच्या भयानक पार्श्वभूमीवरही मानवी मनाच्या लवचिकतेची आणि आशेची कहाणी ही गोष्ट सांगते. अचेबे यांनी जोनाथन इव्हेग्बूच्या व्यक्तिरेखेतून एक सामान्य माणूस दाखवला आहे, जो असामान्य परिस्थितीतही आपली माणुसकी आणि विश्वास टिकवून ठेवतो. कथेची ताकद तिच्या साध्या पण गहन भाषेत आणि वास्तववादी चित्रणात आहे. ही कथा त्या मैती तरुणीशी रिलेट होते. मणिपूरमधल्या त्या मैती जमातीच्या तरुणीमधला आशावाद पुरता कोमेजून गेला आहे, तिचा माणुसकीवरचा विश्वास उडाला आहे. नागरिकांच्या मनात या गोष्टींविषयीची आस्था नष्ट होणे हे समाज आणि राज्याच्या भवितव्याच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकते.

या कथेत “Nothing puzzles God” ही जोनाथनची श्रद्धा असते, एका प्रसंगात त्याची पत्नी त्याला विचारते, 'ज्यांची घरे संपूर्ण नष्ट झालीत त्यांच्यावर ईश्वर मेहरबान नाही का?' त्यावर तो उत्तरतो, 'आपल्यातला विश्वास आणि आशावाद हेच ईश्वराचे रूप आहे. हे जिवंत आहेत तोवर तोही सचेत आहे.' चिनुआ अचेबे यांनी मानवी मनातील सकारात्मक दृष्टिकोनास ईश्वरवादाच्या प्रतिकात परावर्तित केलेय. युद्धात मुलगा गमावल्यानंतर, घराचे नुकसान झाल्यानंतर आणि शेवटी पैसे लुटले गेल्यावरही नायक हार मानत नाही. कोणत्याही संकटास सामोरे जाण्याची ही मानसिकताच आफ्रिकन समाजातील सामान्य माणसाच्या जिद्दीचे प्रतिनिधित्व करते, जो संकटांमधूनही मार्ग काढतो.

कथा थेट युद्धाचे वर्णन करत नाही, पण त्याचा परिणाम सूक्ष्मपणे दाखवते. उदा., जोनाथनच्या मुलाचा मृत्यू, आर्थिक अस्थिरता आणि चोरांचा धोका हे युद्धानंतरच्या सामाजिक अराजकतेचे वास्तव आहे, जिथे कायद्याचे अस्तित्वच धोक्यात असते. "Civil Peace" ही केवळ युद्धानंतरच्या जीवनाची कहाणी नाही, तर मानवी आत्म्याच्या विजयाची गाथा आहे. जोनाथनची साधी पण शक्तिशाली व्यक्तिरेखा वाचकांना प्रेरणा देते की कितीही संकटे आली, तरी जीवनात पुढे जाण्याची ताकद माणसात असते.

अचेबे यांनी ही कथा इतक्या सहजतेने लिहिली आहे की ती स्थानिक आणि वैश्विक पातळीवर समान रीतीने लागू पडते. व्हायरल झालेल्या व्हिडीओमधील मैती तरुणीच्या मनातला आशावाद पुन्हा सचेतन व्हावा आणि व्यवस्थेवरचा विश्वास पुन्हा आकारास यावा यासाठी तिला बळ मिळणं आवश्यक आहे.

जे समाज, ज्या जाती, जे प्रवाह आणि ज्या आदिम जमाती एकट्या पडत जातात त्यांचे शोषण कायम राहते वा त्यांना सततच्या युद्धग्रस्ततेस, अशांततेस तोंड द्यावे लागते त्यांचे पुनर्वसन हे दिवास्वप्न असते. हा घटक कायमचा विस्थापित झाल्यावर जी पोकळी निर्माण होते तिची जागा दुसरे कुणी घेऊ शकत नाही किंबहुना त्या पोकळीचे रूपांतर स्फोटक वर्तमानात कायम होण्याची भीती असते; एक असा दाहक वर्तमानकाळ जो कधीच भूतकाळात परावर्तित होत नाही....

- समीर गायकवाड

फोटोमध्ये चिनुआ अचेबे (Chinua Achebe)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा