पावसाळ्यात वेगवेगळ्या वस्तू सादळून जातात, वातड होतात. त्यांची चव बदलते. आई होती तेव्हा घरात बहुतेक जर्मन पितळाचे डबे होते. त्यातल्या बहुतांश डब्यांची झाकणे बिघडलेली असत, सांदीतून फटीतून हवा आत जाऊन आपलं काम चोखपणे पार पाडे. आई यावर शक्कल लढवत असे, जुनेर साड्यांचे तुकडे डब्याच्या तोंडावर लावून मग झाकण लावत असे. आतल्या वस्तू सादळत नसत. जुनेर साड्या नसल्या की वर्तमानपत्रांची पाने त्यांची कसर भरून काढत. आईचा कल मात्र साड्यांच्या तुकड्यांकडे असे.
डब्यात ठेवलेल्या वाळवणाच्या वस्तू पावसाळी हवेत तळून, भाजून खाताना त्याला निराळाच स्वाद येई. डबा उघडताच आईच्या साडीचा तो स्निग्ध मायागंध दरवळे! आता एअरटाईट कंटेनर असतात, वस्तू सादळत नाहीत मूळ चव शाबित राहते मात्र त्यात तो मायेचा स्निग्ध परिमळ दरवळत नाही! कालपरवा जुन्या बोहारीण मावशी घरी आल्या होत्या, घर हुडकत हुडकत आल्या होत्या. आसपास बांधकामे पुष्कळ झाल्याने घर लवकर सापडले नाही म्हणून हैराण झाल्या होत्या. ‘घरात जुने काही कपडे असतील तर दे बाबा’, असं म्हणत हेका लावून बसल्या होत्या. अलीकडे अपवाद वगळता घरोघरी रोजच्याला कुणी साडी नेसत नाही याची त्यांना खंत होती. एक्स्टर्नल कॉलेज करत असणाऱ्या त्यांच्या तरुण सुनेला घेऊन आल्या होत्या!