साहित्य रसास्वाद लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
साहित्य रसास्वाद लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, ८ जुलै, २०२५

बदनाम गल्ल्यातले सच्चेपण – सैली 13 सप्टेंबर!



श्रीकांत सिनकर यांनी लिहिलेला 'सैली 13' सप्टेंबर हे आत्मकथनपर कथासंग्रह त्या काळातला आहे ज्या काळामध्ये मराठी जनमानसात सोवळे ओवळे पाळले जात होते इतकेच नव्हे तर साहित्य प्रवाहात देखील अशा प्रकारचे अंडर करंट अस्तित्वात होते. अपवाद दलित साहित्याचा! मराठी साहित्यातील शहरी / नागर आणि ग्रामीण या वर्गवारीपैकी कथित शहरी साहित्यामध्ये जे विविध आशय विषय हाताळले गेलेत त्यातही काही घटक बऱ्यापैकी अस्पृश्यच राहिलेत. अर्थात यातही काही तुरळक सन्माननीय अपवाद होते. मराठी साहित्यामध्ये ज्याप्रमाणे विज्ञान कथा, मनोविश्लेषणात्मक कथा, निढळ लैंगिक कथा, वैश्विक वैचारिक समाजपट असणारे वाङ्मय तुलनेने कमी निर्मिले गेलेय, त्याचप्रमाणे काही विशिष्ठ वंचित शोषित घटकांचा अंतर्भाव असणारे सामाजिक साहित्यही कमी लिहिले गेलेय. त्यातलाच एक घटक वेश्या होय. वेश्या आणि वेश्यावस्ती यावर ज्ञात मराठी साहित्यातले आजवरचे सर्वाधिक भेदक, परिणामकारक लेखन नामदेव ढसाळांनी केलेय हे सर्वश्रुत आहे. अन्य काहींच्या लेखनामध्ये याविषयी कधी तुरळक तर कधी दीर्घ उल्लेख आहेत. देहविक्री करणाऱ्या पुरुषांचा कथावकाश मराठी साहित्यात येण्यासाठी तर 2019 चे साल उजाडावे लागलेय. डॉ. माधवी खरात यांच्या 'जिगोलो' या कादंबरीने ती उणीव भरुन काढली.

बुधवार, ११ जून, २०२५

कलावंतांच्या गहिऱ्या प्रेमाचे सच्चे उदाहरण!


काही गोष्टी हिंदी सिनेमांतच शोभून दिसतात मात्र काही खऱ्याखुऱ्या गोष्टी अशाही असतात की सिनेमाने देखील तोंडात बोटे घालावीत. ही गोष्ट अशाच एका युगुलाची. आपल्याकडे कला क्षेत्रातील प्रेमाचे दाखले देताना नेहमीच अमृता प्रीतम आणि साहिर लुधियानवी यांच्या प्लेटॉनिक नात्याचा उल्लेख केला जातो. कदाचित हिंदी आणि पंजाबीचे उत्तरेकडील वर्चस्व याला कारणीभूत असावे. खरेतर असेच एक उदाहरण आसामी कलाक्षेत्रातलेही आहे, मात्र त्याचा फारसा उल्लेख कुठे आढळत नाही. गोष्ट आहे एका ख्यातनाम चित्रकाराची आणि एका विलक्षण गोड गळ्याच्या गायिकेची. नील पवन बरुआ हा एका युगाचा कुंचल्याचा श्रेष्ठ जादूगार आणि दीपाली बोरठाकूर, ही आसामची गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध!

शुक्रवार, १६ मे, २०२५

लेट नाइट मुंबई ..

'लेट नाइट मुंबई'चे मुखपृष्ठ 

लेखक प्रवीण धोपट यांच्या 'लेट नाइट मुंबई' या देखण्या आणि आगळ्यावेगळ्या विषयाच्या पुस्तकाची अर्पणपत्रिकाही नेमकी आहे - "सूर्य मावळल्यानंतर ज्यांचा दिवस उजाडतो त्या प्रत्येकाला...."
या देखण्या पुस्तकातले हरेक पान याला अनुसरूनच आहे हे विशेष होय! मुंबई शहराविषयी आजवर विविध भाषांमधून पुष्कळ लेखन केलं गेलंय, मुंबईच्या भौगोलिक महत्वापासून ते इतिहासापर्यंत आणि राजकीय वजनापासून ते मायानगरीपर्यंत भिन्न बिंदूंना केंद्रस्थानी ठेवून हे लेखन संपन्न झालेय. मुंबईविषयी एक आकर्षण देशभरातील सर्व लोकांना आहे, इथल्या माणसांची ओळख बनून राहिलेल्या मुंबईकर स्पिरीटवर सारेच फिदा असतात. मुंबईची आपली एक बंबईया भाषा आहे जी मराठी तर आहेच आहे मात्र हिंग्लिशदेखील आहे! मुंबईच्या बॉलीवूडी स्टारडमपासून ते धारावीच्या विशालकाय बकालतेविषयी सर्वांना जिज्ञासा असते. इथल्या डब्यावाल्यांपासून ते अब्जाधिश अंबानींच्या अँटॅलिया निवासस्थानापर्यंत अनेक गोष्टींचे लोकांना कुतूहल असते. स्वप्ननगरीचा स्वॅग असो की मंत्रालयाचा दबदबा, दलालस्ट्रीटची पॉवर असो की गेट वे ऑफ इंडियाचा भारदस्त लुक चर्चा तर होतच राहणार! अशा सहस्रावधी अंगांनी सजलेल्या, नटलेल्या मुंबईच्या रात्रींची शब्दचित्रे प्रवीण धोपट यांनी चितारलीत. यात रात्रीची मुंबई कैद झालीय असे म्हणणे अतिशयोक्तीचे वाटेल मात्र वास्तव काहीसे तसेच आहे. फुटपाथच्या कडेला तसेच फ्लायओव्हरखालच्या अंधारल्या जागी पडून असणारी जिवंत कलेवरे यात आहेत आणि लखलखीत उजेडात न्हाऊन निघालेलं नाइट लाईफही यात आहे. मुंबईवर प्रेम असणाऱ्यांना हे आवडेल आणि ज्यांना रात्रीच्या मुंबईचं रूप ठाऊक नाही त्यांनाही हे पुस्तक आवडेल.

गुरुवार, १५ मे, २०२५

गुलमोहर आणि डियर बाओबाब – वेध एका रंजक गोष्टीचा!

डियर बाओबाबचे मुखपृष्ठ   

आईवडिलांपासून, मायभूमीपासून दुरावलेल्या एका मुलाची आणि एका निहायत देखण्या झाडाची ही गोष्ट..
गुलमोहराला बंगाली, आसामीमध्ये कृष्णचुर म्हटले जाते! कृष्णाच्या मस्तकावरचा मुकुट या अर्थाने हे नाव आहे. तर उडीयामध्ये नयनबाण असं नाव आहे. इंग्लिशमध्ये याची पुष्कळ नावे आहेत, त्यातले mayflower नाव सार्थ आहे. तीव्र उन्हाने बाकी सगळी फुले अवघ्या काही दिवसांत तासांत कोमेजून जात असताना ऐन वैशाखात, लालबुंद गुलमोहोर अक्षरशः दहा दिशांनी बहरून येतो!

गुलमोहरावर बंगाली, आसामी भाषेत काही देखण्या कविता केल्या गेल्यात. त्याला राधा आणि कृष्णाचे संदर्भ आहेत.