वारांगनांवर कमी लिहिले गेले याची खाजगी वैयक्तिक कारणे कमी असावीत नि सामाजिक पार्श्वभूमीची अधिक असावीत. इथे वानगीदाखल 'डायरी एका चंद्राबाईची' या कादंबरीचा उल्लेख करता येईल. डॉ. द. ता. भोसले यांची साहित्यिक कारकिर्द जवळपास 90 वर्षांची होतेय, त्यांनी विभिन्न साहित्य प्रकार हाताळलेत. विविध आशय विषय त्यांच्या लेखनात समरस झालेत. सामाजिक तसेच जातीय अभिसरण त्यांच्या साहित्यात उतरलेय, त्यांच्या साहित्याच्या केंद्रस्थानी वेश्या येण्यासाठी 2018चे साल उजाडावे लागले. या कादंबरीची नायिका चंद्रा नावाची वेश्या आहे. मराठी साहित्यात वेश्यांना केंद्रस्थानी ठेवून जे लिखाण झालेले आहे त्यातले हे एक लक्षवेधी लेखन होय. या कादंबरीचे एक कथाविशेष असे होते की चंद्राकडे तिचे पहिले गिऱ्हाईक म्हणून तिचे शिक्षकच येतात! पेशाने साडेतीन दशकाहून अधिक काळ शिक्षक असणारे भोसले जेव्हा अशा प्रकारचे पात्र रेखाटतात तेव्हा निश्चितच त्यावर साधक बाधक मते मांडून चर्चा व्हायला हवी होती, मात्र त्यावर चर्चा झाली नाही! याचे कारण समाजासाठी लिखित वाचिक स्वरूपात वर्ज्य असलेला कादंबरीचा विषय असावा! या कादंबरीमध्ये चंद्राला आधार देणारे बापू नावाचे पात्र आहे, ती त्याच्यामध्ये जोडीदार शोधते. तिच्या अनौरस पोराला तो आपले नाव देतो. दोन भिन्न सामाजिक स्तरांवरचे पुरुष एका वेश्येसोबत कसे वागतात याचे भेदक चित्रण यात होते! मात्र अभ्यासकांनी यावर नोंदवलेल्या मताचा सूर वेगळाच सपक होता. पुरुषाच्या आयुष्यामध्ये स्त्रीचे नाते कसे असते, तो तिच्याशी कसा वागतो यावरून त्याचा स्त्री विषयक दृष्टिकोन ठरण्यास बऱ्यापैकी मदत होते. उदाहरणार्थ बहिण नसेल तर भावाचे जगणे समृद्ध होत नाही, आई नसेल तर मुलाला आयुष्य अंधारात घालावे लागते, पत्नी नसेल तर पती निराशेच्या गर्दीत ढकलला जातो. म्हणजेच स्त्री ही पुरुषाच्या जीवनाला समृद्ध करते अशा आशयाचे चिंतन यात आढळते असा त्याचा मतितार्थ होता. वरवर हे ढोबळ वाटत असले तरी याच्या मुळाशीही थोडे तथ्य नक्की आढळते. जयवंत दळवी यांच्या 'चक्र' या कादंबरीमध्ये सत्तरपूर्व कालखंडाच्या झोपडपट्टी जीवनाचे चित्रण आहे. या कादंबरीमध्ये लुका आणि बेन्वा या व्यक्तिरेखा मुख्य होत्या. गुन्हेगारीसह बकाल समाज जीवनावरती भाष्य करत उसवलेल्या मानवी जीवनाचा अस्ताव्यस्त कॅनवास 'चक्र'मध्ये चितारला होता. छोट्यामोठ्या गुन्हेगारांचे जग आणि कस्पटाहून किरकोळ असणाऱ्या बायकांची जिंदगानी हे सर्व त्यात होते. मात्र सत्तरच्या दशकातील मुंबईसारख्या महानगरातील वेश्यावस्ती वेश्या, किन्नर त्यात ठळकपणे समोर दिसत नाहीत. गलिच्छ बहिष्कृत मानलं गेलेल्या झोपडपट्टीचा धांडोळा घेणाऱ्या 'चक्र'ने हे घटक आपल्या परिघातून बाहेर का ठेवले असतील याचे उत्तर मिळणं कठीण आहे. मात्र दळवींनी हा घटक पूर्णतः दुर्लक्षितही ठेवलेला नाही, त्यांच्या 'महानंदा' या कादंबरीमध्ये भाविणीची कथा होती तर त्यांचेच समकालीन असणाऱ्या बा. भ. बोरकर यांच्या 'भावीण'मध्येही समांतर चित्रण होते.
मराठी साहित्यात भाविणी अथवा देवदासी यांचे चित्रण वेश्यांच्या तुलनेने अधिक आढळते कारण, देवदासी भावीणी या स्त्रिया समाजाच्या कथित पांढरपेशी सभ्य बुरख्याशी काहीशी सलगी असणाऱ्या स्त्रिया होत. किंबहुना देवदासी भावीणी हे शब्दोच्चार करतानाही समाजाला अवघडलेपण जाणवत नाही. कथित सभ्य स्त्रियाही यांचा उच्चार करतात तसेच कमी प्रमाणात का होईना परंतु त्यांची दखल घेतात. सावंतवाडी, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि गोमंतकात आढळणाऱ्या देवदासी म्हणजेच भावीणी होत. या अल्पशिक्षित असत, नृत्य गायनात फारशा कुशल नसत. मंदिराची झाडलोट करण्याचे काम त्यांच्या वाट्याला असे. दिवेलागण, ईशपूजन यात त्यांचा सहभाग असूनही त्या मुख्यत्वे वेश्याव्यवसायच करत कारण त्यांच्या उदरनिर्वाहासाठी इतर साधने असूनही समाज त्यांच्याकडे भोगवस्तू म्हणूनच पाहायचा! हे उपेक्षेचे जीवन धर्मानेच त्यांच्या माथी मारलेले असूनही या बायकाच वाईट चालीच्या, चरित्रहीन भ्रष्ट आहेत असे मानून त्यांना देहविक्रयाच्या दलदलीत लुटून देणारा हा समाजच त्यांच्याहून अधिक नीच व खालच्या स्तराचा होय. तरीही याच समाजअंगास वेश्या हा शब्द उच्चारायची लाज वाटते, ओशाळल्यागत वाटते हा निव्वळ दुटप्पीपणा होय. या दुटप्पी नैतिकतेचे सांस्कृतिक दडपण त्या त्या काळातील साहित्यकलाविश्वावर नक्कीच असणार. किंबहुना यामुळेच यावर मोकळ्या मनाने, नितळ खुलेपणाने मराठीत नगण्य लेखन झालेय. तरीही काही नोंदी अनिवार्य ठरतात. दळवी, बोरकर यांच्यासह ना. सी. फडके (स्वप्नांचे सेतू), मधु मंगेश कर्णिक (देवकी), चि. त्र्यं. खानोलकर (त्रिशंकू), रणजित देसाई (अभोगी), मामा वरेरकर (कुलदैवत), चंद्रकांत काकोडकर (गोमंतका जागा हो), बा. द. सातोस्कर (जाई, मेनका) यांनीही हा विषय हाताळला. मात्र या लेखनाकडे सामाजिक शोषणाचे, स्त्री शोषणाचे प्रकटन म्हणून पाहता येत नाही कारण यात रोमॅंटिसिझमचा भरणा होता. भाषिक प्रादेशिकत्वाचा अंश होता, यात देवदासीच्या मूळ समस्येचा परखड ऊहापोहदेखील नाही. देवदासींचे वास्तव चित्रण न येता तात्विक चर्चा येते, संवादही कृत्रिमतेकडे अधिक झुकणारे आहेत, कथासूत्र काल्पनिक असल्याचे जाणवते. देवदासींच्या सामाजिक व लैंगिक जीवनाची जराही उकल यात होत नाही. मात्र हा दोष भरुन काढणारे लेखनही गतकाळात होऊन गेलेय, त्याची नोंदही घेतली पाहिजे. राजन गवस यांच्या 'चौंडकं' मध्ये देवदासींच्या एकंदर जीवनमानावर टोकदार भाष्य आहे, त्यांच्या सामाजिक वीणेची चिकित्सा आहे. यातली भाषा रसरशीत आहे. संवाद पात्रांच्या जिवंतपणाची साक्ष देणारे आहेत. याखेरीज बळवंत कांबळे (नापत), उत्तम बंडू तुपे (झुलवा), उद्धव शेळके (देवदासी) यांचे प्रयत्नही दखलपात्र होत. अलीकडील काळात अरुणा सबाने (मुन्नी), निलम माणगावे (शोध), वैशाली हळदणकर (बारबाला) यांची नोंद महत्वाची. इतक्या नोंदीनंतरही वेश्यांविषयक बेधडक लेखनाचा मूळ प्रश्न तसाच राहतो! यालाही काही कारणे होती.
पूर्णतः वेश्येला वाहिलेले, तिच्या जीवनाची दास्तान सांगणारे अथवा वेश्यावस्तीचे चित्रण करणारे प्रत्ययकारक साहित्य त्या काळामध्ये निर्माण झालं नाही याचे मूळ तत्कालीन सामाजिक जडणघडणीच्या सांस्कृतिक दडपणात होते! विशेषतः शहरी पार्श्वभूमी असणाऱ्या साहित्यावर याचा मोठा पगडा होता. या दडपणाचे प्रतिबिंब साहित्यात उमटणे साहजिक असले तरीही दरम्यानच्या काळात समकालीन बंगाली, कानडी आणि हिंदी साहित्यामध्ये यावर लक्षणीय लेखन झाले. हिंदीत सआदत मंटो, इस्मत चुगताई यांनी यावर प्रभावी लेखन केलेय. मराठी कादंबरीमध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात गणिका, देवदासी यांचा उल्लेख असलेले अथवा त्यांना समोर ठेवून निर्मिलेल्या साहित्यात हे घटक केवळ तोंडी लावण्यापुरते वापरले गेलेत. या विषयावर गांभीर्याने लिहायचं झाल्यास वाचकाचा पहिला प्रश्न असतो की लेखक (लेखक पुरुष असो वा स्त्री) तिथे त्या बदनाम वस्तीत कशासाठी केला होता? त्याचा 'तिथल्या' कुणाशी काही संबंध होता वा त्याला 'तसा' नाद होता? लेखकाने जर खरे बोलून आपण तिथे जात होतो, तिथल्या बायकांचा नाद होता वा त्या वस्तीशी आपली सलगी होती आदी गोष्टी खऱ्या सांगितल्या तर सार्वजनिक, वैयक्तिक जीवनामध्ये बदनामीची, मानहानीची भीती असे. कारण वेश्या म्हणजे कुलटा! कुलटेपाशी जायचं आणि तिच्याच कथा लिहायच्या हे त्या समाजमनाच्या पचन पडणारे नव्हते. त्याचा परिणाम असा झाला की काहींनी काल्पनिक लेखन केले त्यामुळे त्या मूळ विश्वाची नेमकी ओळख होऊ शकली नाही. शिवाय लेखक म्हणजे कथित सभ्य इसम (!) म्हणून गणला जाई, त्याला हे झेपलेही नसते. ही कोंडी श्रीकांत सिनकर यांनी फोडली! नुसती फोडली नव्हे तर तिचा कपाळमोक्ष केला! त्याचेच कादंबरीरूप 'सैली तेरा सप्टेंबर'!
मराठी लेखक आणि त्याच्या आयुष्यात आलेलं वेश्यावस्तीतलं प्रेमजीवन हा मराठी साहित्याचा विषय होऊ शकला नसता मात्र श्रीकांत सिनकरांनी 'सैली 13 सप्टेंबर' ही कादंबरी लिहून नवी दिशा चोखाळली. या कादंबरीचे लेखनगुण साहित्यिक दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या भिन्न पातळीवरचे आहेत. कथित साहित्यिक मापदंड लावून हिची चिकित्सा करू राहिल्यास फारसे लक्षणीय असे काही हाती लागत नाही. मात्र सामाजिक नजरिया समोर ठेवला तर मुळापासून हादरवून टाकण्याची क्षमता या कादंबरीत नक्कीच आहे. त्यातही एखाद्या लेखकाने आपल्या आयुष्यात घडलेल्या एका अशा घटनेवरती बोलणे जे समाजासाठी पाप विटाळ आहे, कलंक आहे, बदनामी आहे! खरेतर ही एक ब्याद आहे कारण ती वेश्येशी संबंधित गोष्ट आहे! असे असूनही सिनकरांनी ते धाडस केलं, यामागे काही इतिहास आहे, काही कारणे आहेत. त्याची चिकित्सा करणाऱ्यांना गृहितक पद्धतीने मते मांडता येत नाहीत कारण ही कादंबरी सत्यावर बेतली होती. ती सिनकरांची आत्मकथा होती. यातल्या पात्रांची पार्श्वभूमी नि त्यांचं बाह्यविश्व थेट वेश्यावस्तीशी निगडीत आहे. त्यासाठी तकलादू प्रभावळ वापरलेली नाही. काकोडकरांच्या 'गोमंतका जागा हो'मध्ये गोवामुक्ती संग्रामाचा कॅनव्हास आहे, मामा वरेरकरांच्या 'कुलदैवत'मध्ये मोगा नावाच्या देवदासीची कथा आहे जी तिचा खरेदीदार कंगाल झाल्यावर स्वतः लंकेची पार्वती होते, सातोस्करांच्या 'जाई'मध्ये एका विवाहित पुरुषावर प्रेम करणाऱ्या देवदासीच्या प्रेमाचा त्रिकोण आहे, बोरकरांच्या 'भावीण'मधली शेवंती आपल्या प्रेमनिष्ठेपायी थेट महारवाड्यात जाऊन प्रौढासाक्षरतेचे वर्ग चालवते! अशा पार्श्वभूमीच्या कथांमध्ये नायिकेचा देहविक्रयाचा पेशा गुदमरून गेला तरी बेहत्तर मात्र कथेच्या गरजेपोटी म्हणून देहविक्रय करणारे पात्र निवडले जाई, परिणामी त्यात भेदकतेचा अभाव असे. अपवाद वगळता त्या सगळ्या प्रेमकथाच होत! 'सैली'तही प्रेमकथा असूनही तिची धाटणी व मांडणी तशी कामचलाऊ नाहीये, तिची बोली तिखट आहे आणि तिचं भाष्य लक्ष्यवेधी आहे! मराठी वाचकांच्या आणि समीक्षकांच्या कथित वाङ्मयीन वर्गवारीच्या खोडीनुसार श्रीकांत सिनकर यांची ओळख पोलीसचातुर्य कथा, तत्सम गुन्हेगारी विषयक लेखन करणारे साहित्यिक अशीच सीमित राहिली. वास्तवात त्यांच्या लेखनामध्ये केवळ गुन्हेगारी विश्व व तपास इतक्याच गोष्टी नव्हत्या! सिनकरांचा वावर गुन्हेगारी अड्डे, जुगाराचे क्लब, वेश्यावस्ती मटकावाले आदींपाशी असे. निव्वळ घरात बसून त्यांनी या कथा रचलेल्या नाहीत, त्यासाठी त्यांनी मळलेल्या वाटाही धुंडाळल्या नाहीत! ते स्वतः या विश्वात फिरत राहिले! शक्य असलेल्या सर्व भानगडी त्यांनी आपल्या आयुष्यात केल्या आणि निस्तरल्याही! नानाविध अनुभव घेतले. कुणाला जवळ करायचं कुणाला दूर करायचं हे त्यांचे त्यांनी ठरवलं आणि स्वतःच्या हिमतीवर ते करूनही दाखवलं! जीवनात जे काही केलं त्यासाठी त्यांनी स्वतःला जबाबदार धरलं. असं जगण्यासाठी कमालीचं एकाकीपण भिनावं लागतं. ते सिनकरांच्या वाट्याला आलं होतं. सिनकर एक व्यक्ती म्हणून कसे होते याविषयी त्यांच्या सुनील तांबेंसह समकालीन लेखक मित्रांनी काही उत्तम निर्विष नोंदी केल्यात. त्यातून त्यांचे बेधडक आणि अफाट व्यक्तिमत्त्व समोर येते. कथित नैतिक संकेतांसह समाजाला फाट्यावर मारत आपल्याच धुंदीत जगणारा हा माणूस नितळ होता. सौजन्यशील बोलणं, अतिथ्यशील वागणं हा त्यांचा स्थायीभाव होता. मित्रांना खिलवणे, पाजणे ते आवडीने करत.
त्यांना मनमौजी म्हणणं अनुचित ठरेल, ते अनिर्बंध जगले असं म्हणणं योग्य ठरेल; कारण काही महत्वाच्या प्रसंगी त्यांना मनाचा कोंडमारा करत जगावे लागलेय. अशापैकीच एक गोष्ट 'सैली'ची आहे! माधव मनोहरांनी 'सैली'साठी बोलकी प्रस्तावना लिहिलीय. आपल्या पसंतीच्या एरिस्टोक्रॅट विस्कीचे हवे तितके पेग रिचवणारे आणि 'मी फुकट खाणारा पिणारा माणूस नसून लेखक आहे, स्वतःच्या जीवावर जगणारा माणूस आहे!' असं ठणकावून सांगणारे सिनकर एका देखण्या नेपाळी वेश्येच्या प्रेमात पडले होते. 'सैली' तिचे नाव! तिचेच व्यक्तिचित्र या कादंबरीत रेखाटलेय. सैलीशिवाय जगन, दत्तू आणि जीन यांच्यासोबतचे नातेसंबंध उलगडलेत. 1955 साली वयाच्या पंधराव्या वर्षी सिनकर दत्तूला भेटले, त्यानंतर जगन, सैली आणि जीनची भेट झाली. 1979 साली जीनसोबतचे नाते दुरावले नि हा अध्याय संपला. या दोन तपांच्या काळाची गोष्ट म्हणजे 'सैली 13 सप्टेंबर'! यातील 13 सप्टेंबर ही तारीख सैलीच्या वाढदिवसाची! देहजाणिवांच्या पलीकडे असणारी जिवाची ओढ 'सैली'त पानोपानी भेटते. गरिबीतून सिनकर कोवळ्या वयात मटक्याच्या फास्टमनीकडे खेचले गेले. आपली जुगारी ओढ ते गरीबीने जस्टीफाय करत नाहीत, ती वर्णनातून समोर येते. 'न्यूयॉर्क कॉटन' मटक्याचे बुकिंग घेणाऱ्या वाण्याचा मदतनीस असणारा जगन त्यांना यातूनच भेटला! त्याच्याशी जोवर मैत्री होती तोवर खिसा गच्चच राहिला! सात दशकांपूर्वी षोडशवर्षीय पोरापाशी जुगारातून शंभराची नोट येणे याचा हर्षार्थ ज्यांना अनुभवास आला तेच जाणोत! जगनसोबत सिनकर मुंबईभर फिरले. हातभट्टीपासून वेश्यावस्तीपर्यंतच्या बदनाम वाटा त्यांनी धुंडाळल्या. वेश्येशी प्रत्यक्ष देहस्पर्शास मात्र आणखी पाच वर्षे लागली! जगनसोबत त्यांनी हर तऱ्हेची ऐश केली. जगनमुळे श्रीकांतना पैशाचं जुगाराचं विश्व 'ओपन' झालं. बरेच दिवस सर्व सुरळीत चालले. 1960 मध्ये सिनकर मुंबईमधून पुण्याला गेले, 1961 मध्ये पानशेतच्या पुरामुळे ते मुंबईस परतले. ते पुण्यातच राहिले असते तर ते मटका अड्डेवाले झाले असते! दरम्यान सिनकरांनी मुंबई सोडण्याआधी जगनने वाण्याजवळचे बुकिंग घेण्याचे नि रायटरचे काम सोडून स्वतःचा 'धंदा' सुरू केला होता, त्यात पकडलं गेल्यावर सिनकरांनीच त्याला जामीन मिळवून दिला होता. दिड दशकांनी सिनकर जगनला भेटले तेव्हा तो जगनशेठ झाला होता. त्याचे हे स्थित्यंतर श्रीकांतना रुचले नाही, आपला मित्र बदलला असला तरी त्याने दिलेला मूलमंत्र त्यांना अखेरपर्यंत प्रिय होता! इथून सिनकरांचा जगनशी संपर्क तुटला. 1961 ला पुण्याहून मुंबईला परतल्यावर रिकामटेकडया मित्रांच्या कृपेने त्यांच्या आयुष्यात दत्तू आला! विक्रोळी स्टेशनला लागून असलेल्या टेकडीच्या तळाशी हातभट्टीच्या अड्ड्यामध्ये दारू गाळण्यासाठी भट्टया पेटवायचे काम दत्तू करायचा त्यामुळे त्याची ओळख 'दत्तू बॉयलर'! सिनकरांच्या आयुष्यात जगनमुळे जुगार आला आणि दत्तूमुळे हातभट्टी आली! कंपनीत कामाला असूनही कफल्लक असणारे सिनकर नि हातभट्टीवाला दत्तू यांची मैत्री विलक्षण होती. हातभट्टी कशी बनवतात, त्यातले बारकावे कोणते इत्यादी दत्तूच्या मदतीने शिकून सिनकरांनी स्वतःच दारू बनवली! 1963 ला सिनकरांची नोकरी सुटताच दत्तूची साथही सुटली. दिड दशकानंतर दत्तू पुन्हा भेटला मात्र त्याचं एकाकी जगणं सिनकरांच्या जिव्हारी लागलं. जुगार, दारू आयुष्यात आल्यानंतर साहजिकच वेश्यागमनाचा तिसरा टप्पाही त्यांच्या जीवनात आला! 1960 ला सिनकर कुंटणखान्यात गेले.
कुंटणखान्यात जाण्यामागे वासनापूर्ती करणे, देहभावनांचे शमन करणे हीच कारणे होती असं सिनकर प्रांजळपणे मांडतात! यात गुंतूनही विशीच्या वयातले सिनकर मुली पटवून त्यांना भाडोत्री गाडीवर फिरवत! रूढ जगतामध्ये सामान्यतः वेश्येकडे जाणारा माणूस म्हणजे चरित्रहीन, नीतिहीन, बदनाम समजला जात असूनही सिनकर हे सत्य मांडताना कुठेही डगमगत नाहीत! निव्वळ तटस्थपणे ते स्वतःकडे, समाजाकडे पाहतात. बैदा गल्लीमधल्या आंटीपाशी दारू ढोसून केवळ टाईमपाससाठी फॉकलंड रोडवर बायकांकडे जाणे हे उचित की अनुचित की अनैतिक या लॉजिकल गुंत्यात न पडता ते त्यांना हवे तसे जगत! त्यांचं ते रुटीन होतं आणि या दरम्यानच 1964 मध्ये सैली त्यांना भेटली. ही नेपाळी तरुणी तिच्या नजरेमुळे चहऱ्याच्या ठेवणीमुळे सिनकरांच्या मनात ठसली. तिच्याकडे त्यांनी वेश्या म्हणून कधीही पाहिले नाही हे विशेष! तिच्यावरती त्यांनी प्रेम केलं. एका वेश्येसोबत असणारा देहव्यवहार त्यांनी जरूर केला मात्र तो सराईत पिसाटलेला उपभोग नसून सहवासाचा आनंद होता हे ते नमूद करतात. सैली आणि सिनकर यांच्यात शारीरिक व्यवहार संपताच अंतःकरणाच्या ओढीचे नाते निर्माण झाले होते. मात्र या नात्याला नाव कोणतं याचे उत्तर सिनकर देऊ शकले नाहीत कारण समाजाला हे नातंच मान्य नसते. भलेही सैली आणि सिनकर यांच्यातले प्रेम प्लेटोनिक नसेल पण ते वखवखलेल्या वासनेचे, हपापलेल्या देहजाणिवांचेही नव्हते. एकदा सैलीच्या मालकिणीने अड्ड्याची जागा बदलली, त्यामुळे सिनकरांची तिची चुकामुक झाली. सिनकरांच्या अंगी केवळ देहभूक असती तर त्यांना ठाऊक असलेल्या अख्ख्या मुंबईतल्या कोणत्याही कुंटणखान्यात जाऊन आपले कंडशमन केलं असतं. मात्र मामला तो नव्हताच. सैली पुन्हा भेटल्यानंतर तिच्या देहसुखापेक्षा तिचा सहवास पुन्हा लाभणार याचा त्यांना आनंद होतो! सैलीच्या कुंटणखान्यातील इतर मुलींबरोबर सिनकर शय्यासोबर करत नाहीत! ते आपल्या नकळत सैलीच्या विश्वात घेऊन जातात. पुढे जाऊन त्या दलदलीतून बाहेर काढण्यासाठी तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवतात. हे करत असताना ते कुठेही प्रबोधनाचा बाज नाहीये! ती आपली लाईफ पार्टनर होऊ शकते यावर त्यांचा विश्वास होता, इतर वेश्या आणि सैली यांच्यातले फरक सिनकरांना पक्के ठाऊक होते. सिनकरांचा बोल्डनेस आणि सच्चे निढळ प्रेम याची प्रचिती त्यांच्या वेश्यावस्तीतील वावरातून येते. आपल्या घरामध्ये त्यांनी सैलीचा फोटो फ्रेम करून लावला होता आणि आपण तिच्याशी लग्न करणार आहोत हे ते उघडपणे सांगत. सैली सिनकरांना लग्नास नकार का देते याचे ठोस निष्कर्ष सिनकर मांडत नाहीत. आपण लेखक आहोत हे तिच्याशी ओळख झाल्यापासून सात वर्षांच्या काळापर्यंत लपवल्यानंतर एके दिवशी सैलीला सत्य कळतं. हा भला माणूस गुंतून पडला तर त्याची अधोगती होईल अशी तिची भावना असते, त्यांच्यातले संबंध ताणले जातात. अखेर सिनकरांचे सैलीसोबतचे नाते लयास गेले. एके दिवशी अफाट दारू पिऊन सिनकर तिच्यापाशी जातात. तिला आपल्यासोबत बाहेर चलण्यास सांगतात. सैली नकार देते! तिने आधी लग्नास नकार दिला होता नि आता ती आपल्यासोबत येण्यासही नकार देतेय याचा ते भलताच अर्थ लावतात आणि तिला चारचौघात अवमानित करतात. तीही त्यांना तिखट प्रत्युत्तर देते. संतापलेले सिनकर तिच्याविरुद्ध पोलिसात तक्रार देतात. त्यातून त्यांचं नातं कायमचं संपुष्ट आलेलं. 1971 नंतरचे सिनकर आणि पूर्वीचे सिनकर यांच्या लेखनात, विचारात फरक आहे जाणवतो! सेक्सपासून स्वतःला दूर ठेवणारे सिनकर पुढे जाऊन 'जीन'कडे ओढले जातात! जीनचे खरे नाव अरुंधती. उच्चशिक्षित, सुंदर, कमावती, स्वतःचे विचार असणारी आणि पुरुषांच्या मनाचा तळ शोधणारी तरुणी होती ती. तिच्या कमनीय देहाकडे सिनकर खेचले जातात. जीनच्या नकाराचा सवालच नव्हता. भाळलेल्या पुरुषाबरोबर आवडत्या पद्धतीने जगण्यास सज्ज असलेली जीन एका अर्थाने हाय प्रोफाईल प्रोस्टिट्यूटच! ते दोघेही एकमेकांच्या देहाशी, मनाशी खेळत राहतात. जीन एकाच वेळी अनेक पुरुषांना खेळवू शकते. तिला हवा तसा पुरुष भेटतो. तिचं लग्न ठरतं. सिनकरांच्या आयुष्यातून ती निघून जाते. इथं एक त्रिकालाबाधित सत्य सिनकर अगदी बिनदिक्कत मांडतात, जीनसोबत आपण कितीदा झोपलो आणि कितीदा देहसुख भोगलं याचं मूल्यमापन ते करू शकत नाहीत कारण जीनसोबत समागम करताना प्रत्यक्षात तिचा देह कवेत असूनही त्यांच्या मनामध्ये त्यावेळेस शैलीचा चेहरा असायचा. हे असं अनेक पुरुषांसोबत घडतं पण ते इतक्या धडधडीतपणे सांगण्याची हिंमत क्वचित कुणात असते. आपण वेश्येकडे जात होतो, तिच्याशी संबंध ठेवत होतो लग्न करू इच्छित होतो, दारू मटका जुगार वेश्या याखेरीज गुन्हेगारीचे जग जवळून पाहूनही त्या दुनियेचे आपण घटक झालेलो नाहीत हे ते सच्चेपणाने मांडतात. बहुतेक आत्मकथनात स्वतःची भलावण करण्याचा दोष आढळतो. अपवाद वगळता कुणी तंतोतंत खरं लिहिलं तरी एखाद दुसरी गोष्ट लपवण्याकडे अनेकांचा कल असतो. इथे सिनकर या सर्व लक्षणांच्या ठिकऱ्या उडवतात. सभ्यतेची झापडे लावून वाचन करणाऱ्या वाचकालाही थपडा लगावतात, मात्र हे करत असताना ते कुणालाही दोष देत नाहीत! वास्तवात हेच खरे दोषदर्शन आहे कारण अशी बरीच पात्रे आपल्यापैकी अनेकांच्या आयुष्यात लपूनछपून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष येतात, आपण त्यांच्यासोबत कसे वागतो वा त्यांच्या बाबतीत काय विचार करतो हे आपण कधीही प्रांजळपणे मांडत नाही कारण आपण अव्वल दर्जाचे छुपे भामटे असतो. सिनकर भामटे नव्हते हा फरक आहे. सैलीच्या दुसऱ्या आवृत्तीमध्ये पेशाने नर्स असलेल्या सिनकरांच्या पत्नीचे अधिकचे व्यक्तिमत्व आलेय. तिच्यासोबत नाते जुळण्यापूर्वी सिनकरांनी तिला 'सैली..' वाचायला दिलं! त्यांचे हे नितळ खरेपण तिला आवडले. सैलीकडे समाज कसा पाहील याचा विचार सिनकरांनी जिवंत असतानाही केला नाही, मृत्युपश्चातचा तर सवालच नव्हता. साहित्यिक मांडणीमधली सामाजिक कथा बऱ्याचदा बेंगरूळ स्वरूपाची वाटते तिला अशा प्रकारच्या लेखनाची अलर्जी असते. व्यसनाधीनता, रंडीबाजी वेश्यागमन याचं उदात्तीकरण साहित्य खपवून घेत नाही अशी मखलाशी करत हे लेखन सांदाडीत टाकलं जातं. मात्र समाजाच्या ठायी जे दोष आहेत त्याबद्दल साहित्यिक काय करतो याविषयी साहित्यविश्व मौनाची गुळणी धरते! समाज तर यावर व्यक्तही होऊ इच्छित नाही, मुळात समाजरूप गांडूळाचे नसून गांडूचे असते! सरडा नसूनही ते गरजेप्रमाणे रंग बदलते त्याला 'असले' सिनकर पचनी पडतच नाहीत! कथेत साहित्यमूल्य नाही, प्रतिभेची गुणलक्षणे नाहीत आदी भाकड चिकित्सेत सैली अनेक पातळ्यांवर कमी पडत असेल मात्र छाती ठोकून खरं सांगण्यामध्ये आणि जसं आहे तसं मांडण्यामध्ये ती अनेक साहित्यकृतींपेक्षा कैक पटीने पुढे आहे!
Renaissance of Realistic Wonder या लेखसंग्रहात 'सैली'विषयी म. दा. हातकणंगलेकर यांनी लिहिलंय की 'The book is telling example of how popular writers can not help becoming mauldin when they attempt to strike the pose of profound feelings'. याला कारण सिनकरांची स्वतःकडे तटस्थपणे पाहण्याची वृत्ती होय. 'सैली'मधून हा दृष्टिकोन ते वाचकांपर्यंत पोहोचवतात, त्यामुळे स्वतःच्या शोकमग्नतेच्या देखाव्यापासून वाचकांनाही दूर राखतात. 'सैली'ची आठवण येण्याजोगं लेखन असलेल्या 'बाकी शून्य'मध्ये कमलेश वालावलकर स्वतःचे कठोर परीक्षण करण्यास भाग पाडतात, मात्र अंती डिप्रेसिव्ह करतात! इथे सिनकरांचे सकल विश्व धूसर होऊनही ते त्याकडे ज्या विलक्षण दूरस्थ भावनेने पाहतात तेच इतके प्रभावी आहे की नकळत सिनकरांविषयी सहानुभूती निर्माण होते! आता काळ बदललाय. अशा धाटणीच्या लेखनास आता थोडी तरी समाजमान्यता मिळतेय याची पायाभरणी 'सैली'सारख्या लेखनातून झालीय हे नाकारता येणार नाही. जे घडलेय ते लिहिताना सच्चेपणाचा रंग काळा असला म्हणून त्याचे मूल्य घटत नाही; खोटेपणाचा रंग भलेही कितीही शुभ्रधवल असला तरी त्यापुढे हा काळोख हजार पटीने भारी ठरतो! नैतिकतेच्या बेगडी शुभ्र कॅनव्हासवरती 'सैली'च्या सच्चेपणाचा काळा ठिपका उठून दिसतो अगदी कथित पतिव्रतेच्या भाळावरल्या ढळढळीत कुंकवासम!
- समीर गायकवाड
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा