2015 साली, शिओरी इतो थॉमसन रॉयटर्समध्ये त्या इंटर्न होत्या. तेव्हा त्या पंचवीस वर्षांच्या होत्या. या दरम्यानच त्यांनी टीबीएसचे वॉशिंग्टन डी.सी. ब्यूरो प्रमुख नोरियुकी यामागुची यांच्याशी नोकरीच्या संधीबद्दल चर्चा करण्यासाठी भेट घेतली. ही भेट एका हॉटेलच्या खोलीत झाली, जिथे त्यांच्यावर कथित लैंगिक अत्याचार झाला. शिओरी यांनी यामागुची यांच्यावर बलात्काराचा आरोप केला, परंतु त्यांना तक्रार दाखल करण्यासाठी पोलिसांकडून प्रचंड अडथळ्यांचा सामना करावा लागला. जपानच्या पोलीस व्यवस्थेने त्यांना सुरुवातीला गंभीरपणे घेतले नाही. पोलिसांनी त्यांना सांगितले की यामागुची यांच्याशी जवळचे संबंध असलेले तत्कालीन पंतप्रधान शिन्झो अबे यांच्यामुळे ही केस पुढे जाणे कठीण आहे. तपासाला उशीर झाला आणि शिओरी यांना अपमानास्पद प्रश्नांना सामोरे जावे लागले, जसे की त्यांनी त्या रात्री काय परिधान केले होते किंवा त्यांनी मद्यपान का केले होते. वास्तवात पोलिसांनी यामागुची यांना अटक करण्याची तयारी केली होती, पण ऐनवेळी ती कारवाई रद्द झाली, ज्यामुळे शिओरी यांना व्यवस्थेच्या पक्षपाताचा अनुभव आला. यामुळे त्यांनी स्वतःच पुरावे गोळा करण्याचे ठरवले.
डॉक्युमेंट्रीमध्ये शिओरी यांनी त्यांच्या स्वतःच या केसचा तपास केल्याचे दाखवलेय, ज्यामध्ये त्यांनी गुप्तपणे रेकॉर्ड केलेले ऑडिओ, व्हिडिओ डायरी आणि मोबाइल फुटेज यांचा समावेश आहे. 2017 मध्ये, जपानच्या पोलिसांनी यामागुची यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यास नकार दिल्याने शिओरी यांनी सिव्हिल कोर्टात खटला दाखल केला. 2019 मध्ये, टोकियो जिल्हा न्यायालयाने यामागुची यांना शिओरी यांना 3.3 दशलक्ष येन नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला. हा निर्णय जपानमधील लैंगिक हिंसाचाराच्या पीडितांसाठी एक ऐतिहासिक विजय मानला गेला. यामागुची यांनी या निर्णयाविरुद्ध अपील केले, आणि त्यांनी उलट शिओरी यांच्यावर अब्रू नुकसान केल्याचा दावा केला, जो 2020 मध्ये फेटाळण्यात आला. शिओरी इतो यांचा संघर्ष हा 'ब्लॅक बॉक्स डायरीज' या डॉक्युमेंटरीचा मध्यवर्ती भाग आहे आणि तो त्यांच्या वैयक्तिक धैर्याचा, सामाजिक बदलासाठीच्या लढ्याचा आणि जपानमधील लैंगिक हिंसाचाराविरुद्धच्या व्यवस्थात्मक आव्हानांचा पुरावा आहे. त्यांचा हा प्रवास अनेक स्तरांवर प्रेरणादायी तसेच टोकदार अनुभूतीचा आहे. त्यांच्या भावनिक आणि कायदेशीर लढ्यामुळे जपानच्या बलात्कार कायद्यात 2023 मध्ये सुधारणा झाल्या. शिओरी यांच्या दृष्टिकोनातून सादर झालेली ही डॉक्युमेंट्री जगभरातील लैंगिक हिंसाचाराविरुद्धच्या लढ्याला आणि सामाजिक बदलाला अधोरेखित करते. शिओरी यांना केवळ कायदेशीर अडथळ्यांचा सामना करावा लागला नाही, तर सामाजिक आणि मानसिक दबावांचाही सामना करावा लागला. जपानच्या पुरुषप्रधान संस्कृतीत लैंगिक अत्याचाराविषयी उघडपणे बोलणे अत्यंत कठीण मानले जाते. शिओरी यांना समाजाकडून टीका, अपमान आणि धमक्या मिळाल्या, ज्यामुळे त्यांचे मानसिक स्वास्थ्य प्रभावित झाले. जपानमधील पुरुषप्रधान आणि रूढीवादी संस्कृतीत, लैंगिक हिंसाचाराच्या पीडितांना अनेकदा दोषी ठरवले जाते किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते. शिओरी यांना त्यांच्या केसच्या सार्वजनिक प्रदर्शनामुळे 'ध्यान वेधून घेणारी' किंवा 'नाटक करणारी' अशी टीका सहन करावी लागली. या डॉक्युमेंट्रीने जपानच्या सामाजिक आणि कायदेशीर व्यवस्थेतील त्रुटींवर परखड कटाक्ष टाकले आणि पीडितांच्या दाहक अनुभवांना आवाज बहाल केला.
'ब्लॅक बॉक्स डायरीज'चा प्रीमियर 2024 मध्ये सनडान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये झाला आणि त्यानंतर तो 50 हून अधिक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये दाखवला गेला. याला 97व्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी फीचरसाठी नामांकन मिळाले आणि नॅशनल बोर्ड ऑफ रिव्ह्यूने 2024 च्या टॉप फाईव्ह डॉक्युमेंट्रीमध्ये याची निवड केली. याशिवाय झ्युरिच फिल्म फेस्टिव्हलमध्ये मानाचा पुरस्कार जिंकला. असे असले तरी याबाबतीत काही विवादही आहेत. काही जपानी समीक्षकांनी आणि जिज्ञासू व्यक्तींनी, जसे की विख्यात जपानी लेखिका एरी शिबाता आणि सिने दिग्दर्शिका यांग योंग-ही, यांनी शिओरी यांच्या माहितीपटातील काही दृश्यांना त्यांच्या परवानगीशिवाय वापरल्याचा आरोप केला. तसेच, जपानमधील सामाजिक आणि सांस्कृतिक समस्यांवर यातून थेट आरोप करत चित्रण केल्याने अनेकांना ते रुचले नाही. यामुळे जपानमध्ये ही डॉक्युमेंट्री प्रदर्शित होण्यात अडचणी आल्या आणि अद्यापही तिथे याचे पब्लिक स्क्रिनिंग झाले नाही.
पॅरामाऊंट प्लस, ऍमेझॉन प्राईम आणि ऍपल टीव्ही या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा माहितीपट पाहता येईल. 'ब्लॅक बॉक्स डायरीज'ची दखल जगभराने घेतल्यानंतर शिओरी इतो यांनी मागे वळून पाहिले नाही. एक झुंजार पत्रकार, बोल्ड लेखिका आणि यशस्वी चित्रपट निर्माती म्हणून त्यांची ओळख तयार झालीय. लैंगिक हक्क आणि मानवी हक्कांवर त्यांनी आपले लक्ष केंद्रित केलेय. 2017 मध्ये "Black Box" नावाचे टेबलबुक प्रकाशित केले, जे जगभरातील अकरा भाषांमध्ये अनुवादित झाले, ज्याने जपानच्या फ्री प्रेस असोसिएशनचा सर्वोत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जिंकला. 2020 मध्ये, टाइम मॅगझिनने त्यांना जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये समाविष्ट केले होते! एका घटनेने गर्भगळीत न होता त्यांनी जगाला नवी दिशा दिली.
लास्ट पॉइंट – ऍमेझॉन वरची डार्क विंड्स ही सिरिज लवकरच रजा घेतेय. हिला हाय रेटिंग मिळाले होते, डबल मर्डर मिस्ट्री आणि तपास अधिकाऱ्यांचे परस्परविरोधी स्वभाव याचे क्लासिक चित्रण यात आहे.
- समीर गायकवाड

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा