Monday, September 17, 2018

कैफ...ती एकदोन दिवसात निघून जाणार होती.
कसाबसा तिचा निरोप मिळाला, 'भेटायला ये.'
नेहमीप्रमाणे वेळेवर पोहोचण्याचा निश्चय करूनही बऱ्याच उशिरा पोहोचलो.
ठरवलेल्या जागी जाईपर्यंत काळजात धाकधूक होत होती.
काय झालं असेल, का बोलवलं असेल, पुढं काय होणार एक ना अनेक प्रश्न.
सिद्धेश्वर मंदिरालगतच्या तलावालगत असलेल्या वनराईत तिने बोलावलेलं.
मला जायला बहुधा खूपच विलंब झालेला.
वाट बघून ती निघून गेली होती...
खूप वेळ थांबलो, पाण्याचा सपसप आवाज कानात साठवत राहिलो,
ती जिथं बसायची तिथं बसून राहिलो,
तिच्या देहाचा चिरपरिचित गंध वाऱ्याने पुरता लुटून नेण्याआधी रोम रोमात साठवत राहिलो.

Saturday, September 15, 2018

डिजिटल साहित्यातून नवी वाचन चळवळ..जगभरात मागील काही दिवसांत कोलाहलाच्या, विद्वेषाच्या आणि आपत्तींच्या अप्रिय घटनांच्या बातम्या सातत्याने समोर येताहेत त्यामुळे वातावरणास एक नैराश्याची झालर प्राप्त झालीय. या गदारोळात भिन्न परिप्रेक्ष्यातल्या दोन वेगवेगळ्या वृत्तांनी हे मळभ काहीसे दूर होईल. यातली एक घटना वाचनचळवळीच्या पुनरुत्थानाशी निगडीत आहे जी स्थलसापेक्ष नाही, ती एकाच वेळी जगाच्या पूर्वेस आणि पश्चिमेसही घडलीय. तर दुसरी घटना आशियाई देशातल्या विरंगुळयाच्या बदलत्या व्याख्यांशी संदर्भित आहे. या दोन्ही घटना म्हणजे गेल्या काही वर्षातील आधुनिक मानवी जीवनशैलीच्या अतिरेकी डिजिटलवर्तनाचा परिपाक असणाऱ्या कालानुगतिक प्रक्रिया आहेत, ज्याचा दृश्य परिणाम आता दिसून येतोय. त्याचा हा आढावा.

Tuesday, September 11, 2018

अनटोल्ड अरनॉल्ड - अरनॉल्ड श्वार्झनेगरची दास्तान..


अरनॉल्ड श्वार्झनेगरचे आयुष्य जितक्या प्रकाशझोतांनी भरलेले आहे तितक्याच काळोखानेही त्याला ग्रासले आहे. एखादी व्यक्ती प्रसिद्धीच्या झोतात आल्यानंतर तिच्या लाईमलाईटबद्दल सर्वत्र चर्चा होऊ लागते, मात्र त्याच वेळी तिच्या आयुष्याच्या एका कोनाड्यात बंदिस्त असलेल्या दुःस्मृतींना हात लावण्यास कुणी धजावत नाही. संवेदनशील आणि सच्च्या मनाच्या व्यक्ती स्वतः होऊनच काळाच्या पडद्याआड दडलेल्या या अंधारल्या गोष्टींना जगापुढे आणतात. त्यावर खुल्या मनाने व्यक्त होतात. त्यासाठी खूप मोठं मन आणि धाडस लागतं. अरनॉल्डसारख्या बलदंड बलशाली व्यक्तीसदेखील सुरुवातीला ते नीट जमलं नाही परंतू काही काळ गेल्यावर त्याला सत्य पचवता आलं आणि जगापुढे मांडता आलं.

Saturday, September 8, 2018

बापू काका ...


एकत्र कुटुंब पद्धतीच्या संस्कारात वाढलेल्या आमच्या कुटुंबात मला सात चुलते होते. त्यातलेच एक बापूसाहेब, ज्यांना आम्ही सगळी भावंडं बापूकाका म्हणत असू. परवा संध्याकाळी त्यांचे दुःखद निधन झाले. उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी हे आमचं गाव. माझ्या या काकांचं जगणं खूप काही भव्य दिव्य वा उत्कट विराट नव्हतं पण त्यांना जो कुणी भेटेल त्याला कायमचं काळजात सामावून घेणारं कमालीचं मायाळू होतं. गावातल्या छोटेखानी शाळेत इतर सर्व भावंडे शिकली सवरली पण बापूकाकांना मात्र पाटीपेन्सिलीवर जीव लावता आला नाही. त्यांचा सगळा जीव शेतीवाडीवर. शेतातली पानंफुलंही त्यांना बघून खुश होत असावीत, बांधावरच्या बाभळीही त्यांच्या गंधाने भारीत होत असाव्यात अन त्यांच्या स्पर्शाला काळी आईही आसुसलेली असावी. आजोबांनी त्यांना शाळेत पाठवलं की ते परस्पर निघून जात आणि कधी शेणाच्या गोवऱ्या थापायला जात तर कधी गुरे वळायला जात.

Wednesday, September 5, 2018

गोष्ट कुळकर्णी मास्तरांच्या शाळेची...


गावाकडच्या प्राथमिक शाळेत नारायण कुळकर्णी नावाचे एक मास्तर होते. त्यांची तऱ्हाच न्यारी होती. त्यांच्या वर्गातल्या ज्या पोरांनी मधल्या सुट्टीत खायला आणलं नसेल त्यांना त्यांच्या स्वच्छ नक्षीदार शबनम बॅगेतून आणलेल्या दोन डब्यातलं चवदार जेवण थोडं थोडं करून वाटायचे. ज्या पोरांना खाऊ घालत ती पोरं अभ्यासात चुकली तर तळहात लालबुंद होईस्तोवर पट्ट्या मारत पण चुकीला माफी देत नसत आणि माया करतानाही हात आखडता घेत नसत. पांढराशुभ्र सदरा, करकचून बांधलेलं दोन सोग्याचे स्वच्छ धोतर आणि करकरा वाजणाऱ्या कोल्हापुरी चपला. चापून चोपून तेल लावलेल्या केसांचा तरवारीसारखा विंचरलेला भांग. विस्तीर्ण गोऱ्या भालप्रदेशावर अष्टगंधाचा टिळा, तरतरीत नाकडोळे आणि टोकदार दाट मिशा. धनुष्याकृती भुवयांवर विराजलेल्या सोनेरी काड्यांच्या फ्रेममधील चष्म्याआडचे त्यांचे करारी डोळे जरब निर्माण करत, कधी कधी त्यात पाणीही तरळलेले दिसे. त्यांच्या गळ्यातल्या लालसर दोऱ्याला काहीतरी लटकवलेलं होतं ते कधी नीट दिसलंच नाही. त्यांचे चढ्या आवाजातले कडक, स्पष्ट उच्चार कानाला गोड वाटत. ते कविता ताल लावून म्हणत आणि इतिहास शिकवताना त्यात इतके दंग होत की आता वर्गातच समरांगण उभं ठाकतेय की काय असे वाटू लागे. ते जीव तोडून गणिते शिकवत पण आमचा आडच इतका कोरडाठाक होता की त्यात कितीही पाणी ओतले तरी जिरूनच जाई. तोडक्या मोडक्या साहित्यावरती ते विज्ञानाचे प्रयोग शिकवत, कधीकधी काही साहित्य त्यांनी पदरमोड करून आणलेलं. परीक्षा जवळ आली की पोरांऐवजी तेच चिंताक्रांत दिसत आणि मग कच्च्या पोरांचे ते ज्यादा तास घेत असत, प्रश्नोत्तरे सोडवून घेताना दिसत. अशा वेळी खोड्या करणाऱ्या पोरांचा कोंबडा करून त्याला तासंतास उभा करत. नारायण मास्तर कधीही दाढी वाढलेल्या वा मळकटलेल्या कपड्यात दिसलेच नाहीत. ते झपाझपा चालत जाऊ लागले की त्यांच्यासोबत चालणारा दमून जाई.

Saturday, September 1, 2018

जैविक इंधनावरील विमान उड्डाणाची तथ्ये


२८ ऑगस्टला 'स्पाईसजेट' या खाजगी विमान वाहतूक कंपनीने विमानाचे इंधन एव्हिएशन टर्बाईन फ्युएल’ (ए.टी.एफ.) व बायोफ्युएल (जैवइंधन) एकत्रित वापरून (मिश्रण प्रमाण ७५/२५) डेहराडून ते दिल्ली हा वीस मिनिटांचा प्रवास केला. हे उड्डाण सफल होताच अनेक हौशा-गवशांनी आपले 'पुष्पक विमान' काल्पनिक हवेत उडवत कल्पनास्वातंत्र्याची ‘कोटीच्या कोटी उड्डाणां'च्या 'गगनभराऱ्या' केल्याचे पहावयास मिळाले. आर्थिक व पर्यावरणाच्या अंगाने आणि भविष्याच्या दृष्टीने बायोफ्युएलच्या वापराचा प्रयोग उपयुक्त आहेच याबाबत दुमत असण्याचे काहीच कारण नाही. पण या विमानोड्डाणानंतर अनेकांनी ज्या पुड्या सोडल्या त्या पाहू जाता रमर पिल्लेची आठवण झाली. आपल्या देशात जडीबुटी वापरून कोणताही आणि कुठल्याही अवस्थेतला जुनाट आजार बरा करता येतो असा एक गैरसमज दृढ आहे. परंतु केवळ रोगोपचारच नव्हे तर आपली इंधन समस्यासुद्धा वनस्पती इंधनाच्या अभूतपूर्व शोधातून जादूच्या कांडीसारखी सुटू शकते यावर ९०च्या दशकात कैकांनी विश्वास ठेवला होता. या जैवइंधनाचा संशोधक केवळ हायस्कूलपर्यंत शिक्षण झालेला, रमर पिल्ले हा तमिळ युवक होता हे विसरण्याजोगं नाही. लाथ मारीन तिथं इंधन काढीन या अविर्भावात बायोफ्युएलचे सोनं गवसलल्याचा दावा त्याने केला होता. अवघ्या काही रुपयात पाचेक लिटर पेट्रोलएवढी ऊर्जा त्याचे हर्बलफ्युएल देऊ शकते या त्याच्या दाव्यावर भारतीय वैज्ञानिक, आयआयटी सारख्या तंत्रज्ञान संस्थेतील काही अभियंते, सरकारच्या विज्ञान - तंत्रज्ञान खात्यातील टेक्नोक्रॅट्स आणि एतद्देशिय अस्मितागौरवगायक मंडळींना या संशोधनाने भंजाळून सोडले होते. पिल्लेचा दावा खोटा होता, तो जे बायोफ्युएल वापरायचा त्यात गुप्तपणे पेट्रोल मिसळले जात होते. याचा सुगावा लागताच सगळ्यांचे मुखभंजन झाले. आतादेखील संमिश्र बायोफ्युएलवर उडवलेल्या विमान उड्डाणानंतर अनेकांना रमर पिल्लेची बाधा झाली की काय असे वाटावे असे चित्र दिसते.

Saturday, August 25, 2018

रिजेक्ट..


ते कुठेही दिसतात.
डांबरी रस्त्याचे उध्वस्त कोपरे, अवाढव्य पुलांखालचे काळोखे कोनाडे
गर्दीने सुजलली रेल्वे स्टेशन्स, बस स्थानकं, सिव्हील हॉस्पिटल, अस्ताव्यस्त रहदारीने व्यापलेले सिग्नल्स.
ते कळकटून गेलेले. अजागळ अस्वच्छ किळसवाणे.
केसाच्या जटा, अंगावर धुळीचे पुटे, काळवंडलेल्या कपड्यांची लक्तरे.
भेगाळलेले ओठ, हातापायाची वाढलेली नखे. 
चिरलेले तळवे आणि धूळधुरातही चालणारे फुफ्फुसांचे भाते.
चिल्बटलेले केस अन घामेजलेलं अंग.
कधी मळकटलेली पथारी पसरलेली तर कुठे चवाळे अंथरलेलं. शेजारीच करकचून आवळलेलं कसलं तरी गाठोडं.

Thursday, August 23, 2018

प्रतिक्षाकधी आलीस घरी परतुनी जरी, दारात मी उभा असेन नसेन....
प्रतिक्षेचे सुकलेले ताटवे झुलतील, अंगणात तुझ्या स्वागतासाठी.
दारावरचे तोरण सांगेल, झुरलो किती युगे मी तुझ्या दर्शनासाठी.
मंजुळांच्या देहातले गीत थिजलेले ऐक जरा, वृंदावनाच्या भल्यासाठी.
धुळकटलेल्या घराच्या खिडक्यातले उसासे, उदास हसतील तुझ्यासाठी.
मलूल रातराणीचा गंध फिका, देईल जबानी माझ्या बेचैन संथरात्रींची !
कोनाडयातली कालबाह्य सतार, वाजवेल धून माझ्या विरहायुष्याची.
नागमोडी जिन्यावरच्या पाऊलखुणा, वदतील गाथा तुझ्या शोधाची.
नक्षीदार हृदयाचा कशिदा दिसेल, भिंतीवर तिथेच माझ्या तसबिरीशेजारी !
हलकेच फिरव कोमल कर, अभ्र्यात उशीच्या दफन केलेल्या अश्रुंवरी.
बिछान्यात नकोस झोपू, येतील भयाण स्वप्ने प्रतिक्षार्त भग्न प्रासादांची.
छताकडे नकोस पाहू, न जाणो उमटले असेल बिंब सताड उघड्या डोळ्यांचे.
झुंबरातल्या दिव्यांना विचार, अंधारकळांचे अस्तित्व होते किती काळाचे.
अर्धमिटलेल्या पुस्तकांच्या पानात भेटतील, ठसे थरथरत्या बोटांचे.
थबकू नकोस कुठेही, सरळ आत ये.. घरात ह्या मी असेन नसेन....
देव्हारा देईल साक्ष, समईत अल्वार विझलेल्या स्वप्नांच्या वातींची.
भिंतीत चिणलेले अबोल श्वास सांगतील गाथा माझ्या प्रेमवेदनेची.
मात्र रेलू नकोस सज्जात, पडुनी इथूनच संपवली मी यात्रा आर्त प्रतिक्षेची ....

- समीर गायकवाड

Wednesday, August 22, 2018

यशोदेचा कान्हा


आटला जरी मायेचा पान्हा, उदास न होई कान्हा  
देवकीचा खट्याळ तान्हा, जाई गोठ्यात पुन्हा
बिलगता गाईच्या कासा, पाहुनी चित्तचोरट्या    
लाडे म्हणतसे यशोदा, कान्हा तू असा रे कसा ?
सांग नंदाच्या सुता, माझा आटला का रे पान्हा?
कान्हा म्हणे यशोदेस, काय सांगू आता बहाणा

"माझ्या सगळ्याच गं, ह्या माता मला बघुनी फुटे त्यांनाच पान्हा ! !"

ऐकूनी त्याचे मधाळ बोल यशोदा म्हणे, 'माझा लाडाचा गं कान्हा !'

- समीर गायकवाड.

Sunday, August 19, 2018

चैत्रातला वैशाख .....


पार्थिवाजवळच्या शोकमग्न आप्तेष्टांसारखी 
झाडे निश्चल उभी असतात तेंव्हा
जणू आईच्या कुशीत तोंड खुपसण्यासाठी 
सकल मेघ निघून गेलेले असतात.
निरभ्र झालेले आकाश एकटेच उरते 
मुलाच्या अकाली मृत्यूनंतर थिजलेल्या बापासारखे !
एरव्ही उन्मुक्त वाहणारा वारा क्षितिजपार 
तोंड लपवून उभा असतो,
निष्पाप अनाथ मुलासारखा.