![]() |
'क्रांती महिला संघ' स्नेहमेळावा |
26 मार्च 2025. सोलापूरचे निर्मलकुमार फडकुले सभागृह. भर दुपारच्या रणरणत्या उन्हात देखील सभागृह महिलांनी भरलेलं. सर्वांच्या चेहऱ्यावर कमालीचं सुख! हसमुख चेहरे उत्साहाने ओसंडून वाहत होते. कार्यक्रम सुरु झाला. एकेक टप्पा पार पडत गेला. नि मंचावर दोन मुलींचा व त्यांच्या मातांचा सत्कार केला गेला. सुनीता आणि सुरेखा! एकीची मुलगी अभियांत्रिकीची पदवी घेऊन टाटा मोटर्समध्ये जॉईन झालेली तर दुसरीची मुलगीही अभियांत्रिकी शिक्षण घेऊन कॅम्पसमध्येच सिलेक्ट झालेली. तर सावित्रीची मुलगी वैद्यकीय शिक्षणाच्या अंतिम पडावानजीक येऊन पोहोचलेली! त्या मुलींचे चेहरे अभिमानाने फुलून आलेले आणि त्यांच्या मातांच्या डोळ्यात काठोकाठ खारं पाणी साचलेलं!
हा कार्यक्रम होता 'क्रांती' या सोलापूर बेस्ड एनजीओचा! क्रांतीची सर्वेसर्वा आहे रेणुका जाधव ही सामाजिक विचारांनी झपाटलेली तरुण कार्यकर्ती! 'क्रांती'चा आणि रेणुकाचा एकच समान इतिहास आहे. 1980 च्या दशकाच्या सुरुवातीला सोलापूरमधील एका सेक्स वर्कर श्रीमती येलुबाई नागनाथ मंठाळकर यांनी त्यांच्या व्यवसायातील अडचणी अत्यंत टोकदारपणे अनुभवल्या आणि त्यांनी आपली मुलगी काशीबाई जाधव हिचे भविष्य चांगले करण्याचा निर्धार केला. आपण जे भोगलेय ते आपल्या मुलीच्या वाट्याला येऊ द्यायचे नाही याचा त्यांनी निर्धार केला. केवळ निर्धार करून त्या थांबल्या नाहीत, त्यांनी काशीबाईला या क्षेत्रातून काढून शाळेत दाखल करण्याचा धाडसी निर्णय घेतला, जेणेकरून ती शिक्षण घेऊ शकेल आणि जीवनात प्रगतीचा नवा मार्ग निवडू शकेल. काशीबाई जाधवांनी आपल्या आईच्या प्रती सदैव ऋणभाव ठेवला. आपल्या आईच्या निर्णयस सार्थ ठरवले. आपण किती भाग्यवान आहोत हे देखील त्यांनी ताडले. लैंगिक शोषणाच्या दलदलीतून त्या बाहेर पडल्या. काशीबाईंनी आपल्या आईचा आणि समकालीन स्त्रियांचा संघर्ष पाहिला होता, रोजचे झगडे पाहिले होते. कलंक आणि भेदभावही सोसले होते! या अनुभवांचा त्यांच्यावर कायमचा प्रभाव पडला. यातून प्रेरणा घेत त्यांनी 'क्रांती'ची स्थापना केली. पुढे जाऊन त्यांची कन्या रेणुका हिने एमएसडब्ल्यूचे शिक्षण घेऊन 'क्रांती महिला संघ' या संस्थेला नीटस आणि उत्तुंग स्वरूप मिळवून दिले. त्याची मधुर फळे आज दिसताहेते.
एका गजबजलेल्या, नि काहीशा कठोर असणाऱ्या क्षमाशील नसलेल्या शहराच्या मध्यभागी, येलुबाई ही आपल्या मुलीच्या भल्या आयुष्यासाठी जीवन समर्पित केलेली स्त्री मोठ्या धीराने राहायची! पुरुषांची लैंगिक भूक शमवण्याचे काम त्या अनिच्छेने करत. आपली मुलगी काशीबाईला उत्तम जीवनशैली असणारे चांगले जीवन लभावे यासाठी त्यांची धडपड होती. यात अकस्मात आलेल्या अडचणींविरुद्ध त्या लढल्या. काहीही झाले तरी आपल्या मुलीने या धंद्यात यायचे नाही या इराद्याने झपाटलेल्या येलुबाईंनी काशीला अक्षरश: रक्ताचे पाणी करून वाढवले. अढळ दृढनिश्चयाच्या सहाय्याने त्यांनी काशीबाईला प्रेमाने वाढवले. तिच्यात प्रतिष्ठा, स्वाभिमान आणि धैर्य ही मूल्ये रुजवली. "जग तुमच्याबद्दल काय म्हणते यावर तुमचे नियत्रण असू शकत नाही परंतू त्यास तुम्ही कसा प्रतिसाद देता यावर तुमचं भविष्य अवलंबून आहे! शिक्षण आणि चारित्र्याची ताकद ही तुमची ढाल आहे" असं येलुबाई म्हणत आणि काशीबाईंनी ते शब्दश: खरे करून दाखवले
येलुबाईंनी काशीबाईंना शाळेत पाठवण्यासाठी कमाईतली पै न् पै वाचवली! त्यांना विश्वास होता की शिक्षण हे गरिबी आणि कलंकाचे चक्र तोडण्याची गुरुकिल्ली असेल. तथापि, बाहेरील जग दयाळू नव्हते. काशीबाईंना तिच्या आईच्या भूतकाळाबद्दल माहिती असलेल्या लोकांकडून सतत कुजबुज, छळ आणि न्यायाचा सामना करावा लागला. वर्गमित्रांकडून टोमणे आणि स्थानिक गुन्हेगारांकडून धमक्या तिच्या सहनशक्तीची परीक्षा घेत होत्या, परंतु काशीबाई निराश झाल्या नाहीत. आईकडून मिळालेल्या बाळकडूमुळे त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या, शोषण करणाऱ्या लोकांविरोधात कायदेशीर मदत घेतली आणि त्यांना धमकावणाऱ्यांची तक्रारही केली.
२००८ मध्ये, काशीबाईंनी महाराष्ट्रातील सोलापूर येथे क्रांती महिला संघाची स्थापना करून आपल्या संघर्षांस कृतीत रूपांतरित केले. या समुदाय-आधारित संघटनेचे उद्दिष्ट असुरक्षित परिस्थितीत असलेल्या महिलांना शिक्षण, कायदेशीर मदत आणि आरोग्य सेवा प्रदान करणे होते. अथक प्रयत्नांद्वारे, त्यांनी या महिलांना पर्यायी उपजीविका शोधण्यात आणि त्यांचा सन्मान परत मिळवण्यास मदत केली. काशीबाई लैंगिक कामगारांच्या हक्कांसाठी एक मुखर समर्थक बनल्या, राष्ट्रीय व्यासपीठांवर भाषणे देत आणि उपेक्षित समुदायांना पाठिंबा देण्यासाठी सरकारी सुधारणांचे आवाहन करत त्यांनी आयुष्यातला मोठा कालखंड व्यतित केलाय.
येलुबाईंनी त्यांच्या मुलीला परिवर्तनाची, बदलाची शक्ती बनताना पाहिले तेव्हा त्यांना प्रचंड अभिमान वाटला. त्या मायलेकींनी एकत्रितपणे दुःख आणि दडपशाहीचे पिढ्यानपिढ्याचे चक्र तोडले. काशीबाईंची शक्ती, करुणा आणि सहृदयी नेतृत्व स्त्रीसुलभ कनवाळू शक्तीचा पुरावा म्हणून उभे राहिले. त्यांच्या आयुष्याची चित्तरकथाच सिद्ध करते की एखाद्याची सुरुवात किंवा एखाद्या समोरील आव्हाने काहीही कितीही असोत, उज्ज्वल भविष्य घडवणे आणि आपल्या वाटचालीने इतरांचे जीवनमान उंचावणे शक्य आहे.
क्रांती महिला संघाचा दर वर्षी स्नेह मेळावा साजरा होतो. संस्थेकडे नोंदणीकृत असलेल्या नि संस्थेशी जोडण्यास इच्छुक असलेल्या तसेच विशेष निमंत्रण असणाऱ्या सेक्सवर्किंग महिलांचा हा मेळावा असतो. या महिलांना बोलण्यासाठी, त्यांनी बोलतं व्हावं म्हणून आणि त्यांच्यातलं एकाकीपण, दुभंगलेपण कमी व्हावे तसेच त्यांच्यातला आत्मविश्वास वाढावा या गोष्टींसाठी या स्नेह मेळाव्याचा भरपूर फायदा होतो.
देहविक्रय हा शब्द वापरू नये असे सर्वोच्च न्यायालयाने बजावले असले तरी सत्यही नाकारलेले नाही. 26 मार्चच्या या खास कार्यक्रमात या सेक्सवर्कर्स महिलांनी आम्ही बदलत असल्याची ग्वाही सोलापूरकर वा राज्यवासियांना नव्हे तर देशवासियांना दिली. कारण वेश्याव्यवसाय करत असणाऱ्या महिलांच्या मुलींची केवळ दिशा बदलत नव्हती तर त्यांच्या आयुष्यात नवे देखणे वळण आकारास आले होते! 'एका अशा जगाची निर्मिती करायची जिथे महिला आणि ट्रान्सजेंडर समुदायाच्या प्रत्येक सदस्याला सन्मानाने, सुरक्षिततेने जगण्याचा आणि प्रगती तसेच विकासाच्या संधींसह जगण्याचा अधिकार असेल!' हे क्रांतीचे ब्रीदवाक्य आहे. याचाच एक भाग म्हणून हा मेळावा आयोजित केला होता.
आपापल्या घरातली कामे आटोपून संस्थेच्या सदस्या असणाऱ्या माताभगिनी एकेक करत जमा होत गेल्या. संस्थेचा परिचय करून देण्यात आला. दरम्यान सभागृह गच्च भरत गेले. या सोहळ्याच्या फोटोमधले चेहरे न झाकता आहे असेच फोटोपोस्ट करणे ज्या दिवशी सहजशक्य झालेले असेल त्या दिवशी आपल्यातली मानवता जिंकली असेल आणि या फोटोमधील स्त्रियांना उपेक्षेपासून मुक्ती मिळाली असेल! असो. हे क्षण या लोकांच्या बदलाचे साक्षीदार होते. यापैकी 99 टक्के महिलांना रेशनकार्ड मिळवून दिले गेलेय. विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला गेलाय. पारलिंगी महिलांना ट्रान्सजेंडर दाखले काढून दिले गेलेत! स्वावलंबी होऊन हा व्यवसाय त्याग करावा यासाठी विशेष योजना राबवल्या गेल्यात. यात ज्या महिलांनी जोरकस कामगिरी केलीय त्यांचा सत्कार करण्यात आला.
आमची पुढची पिढी या नरकात सडणार नाही हे या बायकांनी परवा दिवशीच सिद्ध करून दाखवलेय! जे भोग यांच्या माता भगिनींच्या वाट्याला आले ते यांच्या वाट्याला येणार नाहीत याची ही नांदी होती! ही एक सामाजिक 'क्रांती' आहे! आणि ती घडवली जातेय स्थानिक महिलांच्या परस्पर विश्वास, सहकार्यातून, संघर्षातून! पूर्वी एचआयव्हीचे प्रमाण जास्त होते. तुलनेने आता खूपच कमी झालेय. तसेच क्षयरोगीही घटले आहेत. चुकून कुणाला याची बाधा झाली तर सरकारी यंत्रणांच्या सहाय्याने औषधोपचार केले जातात. त्यांची निगा राखली जाते. धीर दिला जातो. त्या पूर्ववत बऱ्याही होतात.
एका भगिनीने तिचे मनोगत व्यक्त करताना सांगितले की, "अन्य सामान्य स्त्रिया जॆव्हा कधी आजारी पडत असतील तेव्हा त्यांची काळजी घ्यायला त्यांचे कुटुंब असते, त्या माहेरी जाऊ शकतात. त्यांची आई, बहीण, मुलगी कुणी ना कुणी त्यांची सेवा करते. काळजी घेते. आमचे कोण आहे हो साहेब? पण आमच्या सोबत आमची क्रांती आहे, रेणुकाताई आहे!" दोघींचे डोळे डबडबले होते!
संस्थेसाठी स्वयंसेवक म्हणू उत्तम योगदान देणाऱ्या महिलांचा सत्कार केला गेला. विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणाऱ्या शासकीय अधिकारी वर्गाचाही सन्मान केला गेला. तसेच या महिलांच्या अंगी असणाऱ्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी विविध गुण दर्शनाचा कार्यक्रमही ठेवला होता. ज्यात पारलिंगी महिलांचा समावेश मोठ्या प्रमाणात होता. विजेत्यांना गौरवलं गेलं. अत्यंत देखणा आणि हृद्य सोहळा!
संपूर्ण कार्यक्रम संपन्न होत असताना या माता भगिनींच्या चेहऱ्यावरचे सुख समाधान अपूर्व होते! त्यांचा आनंद ओसंडून वाहत होता. समाज आपल्याला किंमत देत नाही हे शल्य त्यांच्या मनी आहे हे त्यांच्याशी बोलताना जाणवत होतं! पण म्हणून त्यांनी काही हार मानली नव्हती. त्यांचा संघर्ष कालही होता, उद्याही असेल!
मला फक्त इतकेच म्हणायचेय की एक माणूस म्हणून आपण त्यांच्याकडे पाहिले पाहिजे. त्यांच्याविषयीची तिरस्काराची भावना सोडली पाहिजे नि त्यांनाही समाजाचा एक महत्वाचा घटक म्हणून पाहिले पाहिजे. सामान्यतः समाजात वावरत असताना कोणती स्त्री वेश्या आहे हे लोक बरोबर ओळखतात मात्र वेश्येतही एक अभागी स्त्री दडलेली आहे हे त्यांना कधीच का उमगत नसावे या प्रश्नाचे उत्तर मला आजतागायत मिळालेले नाही! त्यांना आपण आपलं मानलं तर त्या आयुष्यभर आपलं ऋण मानायला तयार आहेत. त्यांची पुढची पिढी यात नसेल हे नक्की मात्र त्यांच्या जागी समाजातून आणखी कुणी त्यांची जागा भरण्यासाठी उभी केली जाऊ नये हे ही खरे!
हा दिवस खूप खूप भारी होता! याचे श्रेय माझी बहीण रेणुका जाधव आणि मातोश्री काशीबाई जाधव यांना जाते! अशी माणसं आहेत म्हणून काहींची गणना माणसात होतेय!
- समीर गायकवाड
बीबीसी मराठीवर हा लेख प्रसिद्ध झालाय; त्याची लिंक - https://www.bbc.com/marathi/articles/c62z2x5gdj2o?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा