सोलापुरात व्हीआयपी रोडवर सात रस्त्या नजीक मुस्लिम कब्रस्तान आहे. तिथे मागे एका कौटुंबिक जिव्हाळ्याच्या व्यक्तीच्या तरुण पत्नीच्या अंतिम विदाईसाठी गेलो होतो. जीवघेण्या आजाराचे निदान झाल्यानंतर महिन्यात तिचा मृत्यू झाला होता. तिच्या इंतकालची बातमी त्यानेच कळवली होती. दोन वर्षे वयाची जुळी मुलं मागे ठेवून ती निघून गेली. त्यादिवशी त्याच्या नजरेला नजर देता आली नाही. काळ पुढे जात राहिला. घटनेच्या दुसऱ्या वर्षी शब-ए- बारातला त्याने खूप आग्रह केल्याने जाऊन आलो तर त्याची मुलं थोडीशी मोठी वाटत होती नि ती त्या आईच्या कबरीला अगदी बिलगून बसली होती.
कबर तरी काय म्हणावी! मातीचा एक ढिगारा ज्याच्या चार दिशांना खुणा म्हणून काही दगड ठेवलेले. त्यावर फुलांची चादर अंथरलेली. एक रेशमी तलम वस्त्रही अंथरलेलं. त्यांचे नातलगही आले होते. ती लहानगी मुलं त्या मातीच्या ढिगाऱ्यात त्यांची आई शोधत असावीत! तिची ऊब अनुभवत असतील. तिला अम्मी अम्मी म्हणून हाका मारत असतील. इतर समवयीन मुलांच्या आईला पाहून त्यांना वाटत असेल की आपली अम्मीही असायला पाहिजे होती. त्यांची समजूत कोण आणि कशी घालणार? तिथून आल्यानंतर तो प्रसंग आणि ती मुलं बरेच दिवस डोळ्यापुढे तरळत राहिले.
यंदाच्या वर्षीच्या शब-ए-बारातसाठी आठवड्यापूर्वी मित्राने फोन केलेला. फोनवर जाणवत होतं की तो शोकाकुल झाला होता. त्याची अडचण विलक्षण होती. किती जरी झाले तरी कब्रस्तानच्या मूळच्या आरेखित जागेबाहेर जाऊन त्यात बदल होणं अशक्यच, म्हणजेच आहे त्याच जागेत दरवर्षी जितके म्हणून मयत येतील त्यांचे दफन करावेच लागते. असं करता करता जागा संपून जाते मग पुन्हा त्याच त्या जागी रोटेशन पद्धतीने दफनविधी केले जातात. यात अपवाद वगळता बहुतांश कबरीची माती विधिवत खालीवर करून त्यात नव्याने दुसऱ्याचे दफन केले जाते. मित्राच्या पत्नीची कबर आता लोप पावली होती. तिचे नामोनिशाण उरले नव्हते. मुलांना आता आईची ओढ लागली होती. त्यांना त्या जागी नेऊन निराश करणं त्याला झेपत नव्हतं. त्यांची आई जिथे निद्रिस्त झाली होती ती जागा त्यांच्या मनात कोरली गेली होती त्याचे आता काय करायचे हा त्याच्या पुढचा यक्षप्रश्न होता. त्याला सांगितलं की सर्व वास्तव त्यांना आहे असे सांग आणि प्रत्यक्ष नेऊनही दाखव. तिथली माती तरी असेलच, ती त्यांना पाहू देत!
त्यानंतर दोन दिवसांनी मित्र हिरमुसला होऊन सांगत होता की त्याच्या जुळ्या मुलांपैकी एकाने तिथली माती गुपचूप खिशात घालून आणली. नंतर घरी आल्यावर रुमालात बांधून ठेवली, ती माती आता त्याच्या दप्तरात असते! न जाणो उद्या मातीही नाहीशी झाली तर अम्मीला कुठे शोधायचे हा त्या लहानग्या जिवाला पडलेला प्रश्न! ऐकताना गलबलून आलं, काळीज डोळ्यातून वाहू लागलं!
- समीर गायकवाड
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा