गुरुवार, २० मार्च, २०२५

होळी, प्रेमाला आसुसलेल्या जिवांची!

 

   

काल धुलिवंदनानिमित्त शहराबाहेरच्या एका वृद्धाश्रमातील कार्यक्रमास गेलो होतो. बऱ्याच मोठ्या संख्येत वयोवृद्ध तिथे वास्तव्यास आहेत. तिथल्या काहींची देहबोली अगदी हतबलतेची तर काही चेहरे पूर्णतः निर्विकार, टोटल ब्लॅंक! तर काही चेहऱ्यांवरती उसन्या अवसानाची ग्वाही देणारं केविलवाणं हास्य तर काही मात्र रसरशीत वार्धक्यास संघर्षासह सामोरे जाणारे नितांत प्रसन्न चेहरे! तरीही एकुणात ते सारे ओकेबोकेसे लोक ज्यांना त्यांच्याच कुणीतरी जिवलगाने तिथं भरती केलेलं कधी काळी. कुठल्या तरी दिवशी आणून सोडलं असेल.

साऱ्यांच्या चेहऱ्यांवर सुरकुत्यांची नक्षी होती, भाळीच्या आठ्यांचं जाळे कोरीव झालेलं. काहींच्या डोईची चांदी विरळ होऊ लागलेली तर काहींची नजर क्षीण झालेली तर काहींची नजर पैलतीरी लागलेली स्पष्ट दिसत होती. तर काहींची देहबोली अजूनही आव्हानांना छातीवर झेलणारी! काही कंबरेत वाकलेले तर काहींना पाठीवर पोक आलेला! अंगी जुनेच तरीही स्वच्छ कपडे. परिसरातही काटेकोर स्वच्छता आणि सेवाभावी कर्मचारी वर्ग.

बसण्याची व्यवस्था उत्तम होती. वृद्धांसोबत आधी रंग खेळून मग एकत्र जेवणाचा बेत होता. हे जेवण म्हणजे सोपस्कार म्हणून केलं जातं त्यातलं नव्हतं. निगुतीने आस्थेने बनवलेलं भोजन होतं ते! मेनू फारसा पंचपक्वांन्नाचा नव्हता कारण त्या वृद्ध मंडळींना पचेल आणि रुचेल असाच बेत होता. छान जेवण झालं. जेवणानंतर काहींनी नकला सादर केल्या तर काहींनी गाणी गायली. तर काही ज्येष्ठांनीही सक्रिय सहभाग नोंदवला. काही जोडप्यांच्या सोबत त्यांची मुलेही आली होती. मुलांच्या जोडीने फेर धरून नाचही केला. काही वृद्धांनीही गाणं सादर केलं. काहींनी त्यांच्या काळातल्या होळी धुलीवंदनाच्या आठवणी शेयर केल्या.

यात काही वृद्ध थोड्याश्या अंतरावर बसून आनंद घेत होते तर काही प्रत्यक्ष सामील झाले होते. तर काहींनी कोंडाळे केलेलं. हॉलच्या कोपऱ्यात एक आज्जीबाई बसून होत्या. शून्यात नजर लावून होत्या. वास्तवात त्या सारं काही निरखित होत्या पण देहाने त्या तिथे असूनही मनाने तिथे नव्हत्या हे त्यांचा चेहरा स्पष्ट सांगत होता. मध्येच त्या सैरभैर होऊन इकडे तिकडे पाहत तर मध्येच त्या स्थितप्रज्ञ होऊन जात. चांगल्या घरच्या असाव्यात असं त्यांच्या चेहऱ्यावरून नि राहणीमानावरून जाणवत होतं. सत्तरीच्या आसपास त्यांचं वय असावं. बारीक देहकाठी. चंदेरी केसांची महिरप कपाळावर. भाळावर मधोमध गोंदलेलं. त्यावर गोल गरगरीत काळा बुक्का. आज्जी विधवा असाव्यात. गळ्यात काळ्या मण्यांची सर होती. हातात पायात कोणतीच आभूषणे नव्हती. प्लॅस्टिकच्या चप्पला पायात होत्या. खुर्चीशेजारीच वेताची काठी होती जिची मूठ अगदी मऊ नि गुळगुळीत असल्याचं दुरूनही लक्षात येत होतं. गतपिढीतल्या बायका घालतात तशा अंबर, बंगाल हॅन्डलूम वा नलिनी सारीजच्या ब्रँडची वाटावी अशापैकीच सुती साडी नेसलेली. फिकट अंजिरी रंगाची साडी आज्जीबाईंना अगदी शोभून दिसत होती. तशा अवस्थेतही त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज होतं. त्या एका कोपऱ्यात बसून न्याहाळत होत्या. साऱ्या लोकांपैकी एक चुणचुणीत चिमुरडा त्यांच्याजवळ जायचा. त्या अगदी हळुवारपणे त्याला जवळ घेत. त्याच्या गालावरून हात फिरवत. त्याच्या कुरळ्या कोवळ्या केसांतून आपला सायमाखला हात फिरवत. त्यांच्या तळहाताची मखमल त्याच्या मृदू मुलायम गालांवर पसरवत. तो मुलगाही त्यांना लाडाने बिलगे! आणि कुणी तरी हाक मारली की तो निघून जायचा! त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहताना त्यांचे डोळे का कुणास ठाऊक आसवलेले वाटत. त्या मान वेळावून पुन्हा इकडे तिकडे पाहताना पदराचे टोक चष्म्याआड नेत, डोळ्यांना लावत! असं बऱ्याचदा झालं.

दिवस मावळायला आला तसे तिथून निघण्याची वेळ झाली. आजवर जेव्हाही वृद्धाश्रमात भेटीसाठी बोलण्यासाठी गेलोय तेव्हा तेव्हा तिथून निघताना पायांचे ओझे पेलवत नाही! मणामणाचे ओझे लादल्यासारखे वाटते, एका विलक्षण अपराधाची बोच घेऊन तिथून निघावे लागते. मागे पाहू वाटत नाही. थकलेले हात सायोनारा करत असतात, आपण नजर चुकवून निघून येतो. ते तिथेच राहतात. या जगातून निघून जाण्यासाठी ते आसूसलेले असतात. आपलं मरण यातनांचे नसावे आणि आपला कमीत कमी त्रास इतरांना व्हावा हीच त्यांची अंतिम इच्छा! त्यांच्या नजरेस नजर मिळवून निरोप घेण्याचे काम संवेदनशील माणसं करू शकत नाहीत.

गेटजवळ आलो असताना लक्षात आले. आज्जीबाईंकडे जात असणाऱ्या मुलाचे आईबाबा पुन्हा मागे वळले होते. ते आश्रमाच्या ऑफिसमध्ये गेले. तिथे त्यांनी ती घटना सांगितली. ऑफिसमधला सहायक त्या आज्जींपाशी गेला. थोड्या वेळाने त्या आज्जीबाई तिथे काठी टेकवत टेकवत आल्या. त्यांचे डोळे भेदरले होते. अंगाला कंप सुटला होता. हात थरथरत होते. लोंबकळणारी हनुवटी वरखाली होत होती. भीतीने छातीचा भाता वेगाने खाली होत होता. आश्रमाचे व्यवस्थापक सरळमार्गी एकदम भला माणूस. त्यांनी आधी आज्जीबाईंना आश्वस्त केलं. त्यांची काही तरी चर्चा झाली. आज्जींचा चेहरा उजळून उठला. तो पोरगा पुन्हा त्यांना बिलगला. निघताना ते जोडपं पुन्हा त्यांच्या पायाशी वाकलं. त्यांनी त्यांच्या पाठीवर प्रेमाने हात ठेवला. काही क्षणात अश्रूंचा बांध फुटण्याआधी वेगाने काठी टेकवत टेकवत त्या तिथून निघून गेल्या. मावळतीच्या सूर्यास्ताच्या फिकट केशरी बिंबात त्यांची देहाकृती एकजीव झाली. दिवसभर रखरखीत उन्हं होती, निघताना मात्र कोठून तरी वाऱ्याची आल्हाददायक झुळूक आली. जिवाला हायसे वाटले. आम्ही सारेच आपापल्या वाहनांतुन निघालो. घराकडे परतीच्या रस्त्याने मार्गी लागल्यावर त्या जोडप्याने काय घडले होते याचा खुलासा केला नि सारेच स्तब्ध झालो!

झाले असे होते की त्यांच्या मुलाला त्या आज्जीबाई सारख्या सारख्या जवळ बोलवत होत्या नि त्याच्यावर मायेचा वर्षाव करत होत्या. त्यालाही त्या आवडल्या होत्या. त्यांनी तिथे स्वावलंबन भाजी पिकवणे आदी उपक्रमात भाग घेऊन कमावलेले काही रुपये त्या मुलाच्या हाती बळेच टेकवले होते. नंतर आपल्याच हातांनी त्याच्या खिशात ठेवले होते. त्या दोघांची चांगलीच गट्टी जमली होती. निघायची वेळ झाल्यावर त्या चिमुकल्याने आज्जींनी दिलेल्या पैशाविषयी त्याच्या आईबाबांना सांगितलं. त्यांना कळलेच नाही कि नेमका काय प्रकार आहे! मग ते आश्रमाच्या ऑफिसमध्ये गेले. आज्जींना बोलवलं गेलं. त्या मुलाला पाहून त्यांना त्यांच्या नातवाची आठवण येत होती जो आता विदेशात शिक्षणास गेला आहे! मुलगा आणि सून इथेच महाराष्ट्रात ** शहरातआहे मात्र त्यांनीच त्यांना इथे आणलेलं! नातवाशी बोलणं होऊन काही वर्षे उलटलीत. उरलेल्या आयुष्यात त्याच्याशी भेटायचं त्यांचं स्वप्न होतं. काल या मुलाला पाहून त्यांचा भूतकाळ सर्रकन नजरेसमोर आलेला. साऱ्या आठवणींनी डोळ्यापुढे फेर धरलेला! त्यामुळेच त्यांनी कष्टाने जमा केलेली पुंजी त्या मुलाला भेट म्हणून दिली होती!

वृद्धाश्रमाला भेट देताना नव्याने आकळतं की आजच्या काळात लोक कसे वागताहेत. प्रेमासाठी तरसत असलेल्या सकल जिवांची स्वप्ने पुरी होवोत!

- समीर गायकवाड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा