गुरुवार, १३ मार्च, २०२५

ज्युलिअस सीझर - वासनांच्या मुळाशी जाणे कठीण नाही!

 

रोमन सम्राट ज्युलियस सीझरच्या काळात बलात्कार आणि सेक्स संबंधी गुन्हे इतके वाढले होते की तो हताश होऊन गेला होता. त्यात जबरी समलिंगी संभोगींचींही बरीच संख्या होती. यावर त्याने एक अभ्यासगट नेमला पण त्याच्या अहवालाची वाट पाहण्याइतका वेळ त्याच्याकडे नव्हता.

त्याने त्याच्या काही शहाण्या लोकांना निरीक्षणे नोंदवायला सांगितली. त्यात एक निरीक्षण होतं सिन्येडसबद्दलचे (cinaedus याचा उच्चार किनायडूस असाही करतात). पिळदार देहयष्टी असलेले पण शारीरिक ढब फेमिनाईन असलेले हे तरुण डफ वादक होते.



हे प्रामुख्याने नॉन रोमन होते. पूर्वेकडील देशातून यांना पाचारण केलेलं असायचं. त्यातही विशेष करून आशिया खंडातील ऍनाटोलिया द्विपकल्पातुन (आताच्या तुर्कस्थानमध्ये हा भाग येतो) त्यांना वादक म्हणून मोठी मागणी असे.

पण हे सगळे बहुत करून कॅटामाईट ( वयस्कर पुरुषाचा पौगंडावस्थेतला इंटीमेट पार्टनर) आणि सोडोमाईट (शारीरिक संबंध ठेवणारे समलिंगी पुरुष)असत. यात एकही एक्झोलिटस असू नये याची दक्षता घेतली जाई!

थाळी वा डफ वाजवत अत्यंत चित्ताकर्षक चाळे करत हे तरुण नाचत असत. मग त्यांच्यावर भाळलेला (?) पुरुष त्यांना बिदागी सोबत काही मोहरा देई आणि त्याच्या बदल्यात त्याच्याशी समागम करे. 'मामला' ऐच्छिक होता तोवर काहीच अडचण नसे पण जबरदस्ती होऊ लागली तेंव्हा बेभान झालेल्या पुरुषांचे खून पडू लागले.

बऱ्याचदा असेही व्हायचे की ही नर्तक मंडळी याचा फायदा घेऊन दोघा इच्छुकांत कलगीतुरा लावून रक्कम लंपास करून पसार होत असत. यामुळे संघर्ष आणखी टोकाला जाई. कधी कधी हे पिळदार तरुण आपल्या 'गिऱ्हाईका'चाच गेम करत!

या सगळ्या भानगडीमुळे ज्युलियस सीझर हैराण झाला होता. यामुळे काही काळ त्याने पुरुषांच्या मैफलीत डफ, थाळी वाजवायलाच बंदी घातली. पण त्याने काही साध्य झाले नाही. डफ, थाळी हे काही जबरी समलिंगी संभोगाच्या वादाचे मूळ नव्हते तरीही त्याने हे करून पाहिलं.

हे लिहिण्याचे कारण म्हणजे युपीमधील कासगंज येथे एका तरुण जोडप्यातील मुलीवर तिच्या भावी पतीसमोर आठ जणांनी निर्घृण बलात्कार केला आणि काहींच्या मते त्या मुलीने कपडे नीट घातले असते तर त्या मुलांची वासना चाळवली गेली नसती आणि त्यांनी बळजबरी केलीच नसती!
सात महिन्याची पळण्यातली पोर असो वा सत्तर वर्षांची जरठ वृद्धा असो तिलाही जिथे सोडले जात नाही तिथे अंगावरील कपड्यांची काय गोष्ट!

स्त्रीच्या वेशभूषेमुळे बलात्कार होताहेत हा युक्तिवादही बेंगरूळ आहे! मुळात पुरुषांचे मुलांचे वासनाशमनाचे प्रबोधन व्हायला हवे! त्यांच्या लैंगिक आणि सामाजिक जाणिवांचा परीघ रुंदावणं गरजेचा आहे. कासगंज घटनेविषयी माध्यमामध्ये फारशी चर्चा का नाहीये याचे उत्तर बहुतेकांना माहिती असेलच!

असो. ज्युलियस सीझरच्या लक्षात आले की मुद्दा वाद्य वाजवण्याचा वा वेशभूषा बदलण्याचा नसून वासना वृत्तीचा आहे तेव्हा त्याने फालतूचे उपाय करण्याऐवजी या सर्व गोष्टींवर कडक देखरेख ठेवली. आपल्याकडे कायद्याची अंमलबजावणी आणि कठोर कारवाई या गोष्टी जात, धर्म, पक्ष, विचारधारा, सपोर्ट सिस्टिम, कुवत आणि ऐपत आदी घटकांच्या सापेक्ष असतात त्यामुळे अपराधी मंडळींचे फावते! ते बलात्कारी असल्याचे दोषी सिद्ध झाले तरी काही मंडळी त्यांचा सत्कार करायला तयार असतात!

एक शिवबाराजे होते की ज्यांनी कोणताही मुलाहिजा न ठेवता रांझ्याच्या पाटलाचा चौरंगा केला होता आणि एक आताचे राज्यकर्ते आहेत जे सोयीस्कर भूमिकेनुसार कारवाई करतात!

पण इथे कुणालाच वासनांच्या मुळाशी जायचं नाहीये, जे काही करायचे आहे ते वरवरचे लिपापोतीचे उपाय आहेत! कारण मुळाशी जायचं ठरवलं तर पुरुषी वर्चस्ववादाचा चेहरा उघडा पडू शकतो, जे टाळून बायकांचे शोषण जारी ठेवायचे आहे!      

- समीर गायकवाड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा