![]() |
तू रूह है तो मैं काया बनूँ |
प्रियदर्शिनी अकॅडमीच्या कार्यक्रमासाठी ट्रेनने मुंबईला गेलो होतो. ट्रेन पुण्यात थांबल्यानंतर एक अत्यंत तरुण उमदं कोवळं पोरगं ट्रेनमध्ये चढलेलं. त्याचं नेमकं माझ्या समोरचं बुकिंग होतं. रात्रीची वेळ होती. काही वेळात ट्रेन निघाली. त्याचे डबडबलेले डोळे एसी कोचच्या फिकट निळ्या उजेडात स्पष्ट दिसत होते. मधूनच तो ग्लासविंडो मधून बाहेर पाहत माझी नजर चुकवण्याचा प्रयत्न करत होता. थोड्या वेळाने मीच नजर हटवली. त्याच्या मोबाईलवर एकच गाणं शफल मोडमध्ये प्ले होत होतं.
तू रूह है तो मैं काया बनूँ
ता-उम्र मैं तेरा साया बनूँ
कह दे तो बन जाऊँ बैराग मैं
कह दे तो मैं तेरी माया बनूँ
तो पोरगा ते गाणं रिपीट मोडवर ऐकत होता आणि मोठ्या कष्टाने अश्रू अडवत होता, अगदी व्याकुळ झाला होता! काही तरी त्याच्या आयुष्यात घडलंय जे त्याला सहन होत नव्हतं हे एव्हाना लक्षात आलं होतं. ट्रेन कल्याणमध्ये पोहोचली तेव्हा बराच वेळ थांबली. तो खाली उतरला, खिशांतली सिगारेट पेटवून धुराची वलये हवेत उडवत त्याच्या आठवणींच्या धुक्यात पुन्हा गढून गेला. सवयीने मी ही उतरलो. मागचा पुढचा कसलाही विचार न करता थेट त्याच्या पाठीवरून हात फिरवला. नकळत माझे डोळेही भरून आले होते. त्यानं माझ्या डोळ्यात पाहिलं. मग तो मोकळा झाला. ती अंधारी रात्र. प्लॅटफॉर्मवरची कमी झालेली वर्दळ, अधून मधून येणारे आवाज, रेल्वे कँटिनवरची पेंगुळलेली माणसं, कोपऱ्यात लोळत पडलेले आजारी भिकारी, सर्द झालेला तो तरुण आणि त्याच्या काळीज वेदनांची सतार! मुंबई येईपर्यंत तो बोलत होता. त्याच्या आयुष्यातलं व्यथेचं, रितेपणाचं काठोकाठ भरलेलं तळं त्यानं माझ्यापाशी रितं केलं. काहीशा अंधारलेल्या सकाळीच आम्ही उतरलो. त्याला माझा मोबाइल नंबर दिला आणि दोघेही आपापल्या दिशांना रवाना झालो.
आजच त्याचा फोन आला होता. आता तो पुरता नॉर्मल झालाय. त्याच्या आठवणींचा कढ आता कमी झालाय. येत्या शैक्षणिक वर्षात तो पुन्हा कॉलेज जॉइन करणार आहे. तो मराठी आहे, इथे फेसबुकवर तो नाहीये मात्र इन्स्टावर आहे. त्याचं मन काहीसं शांत झालंय.
त्याचं ज्या मुलीवर प्रेम होतं ती कॉलेजवरून येताना रस्त्यावर बाईक अपघातात जागीच मरण पावली होती. ती बाईक याने पै पै साठवून घेऊन दिली होती. त्याच्या मनात त्याचं गिल्ट होतं की बाईक दिली नसती तर ती जिवंत असली असती! तेव्हापासून तो डिप्रेशनमध्येच होता. त्याला अनेकांनी समजून सांगितलं होतं. त्याला कौन्सिलिंगचा सल्ला दिला आणि त्याने तो ऐकला. तो बऱ्यापैकी सावरलाय. हेच सांगायसाठी त्याने फोन केलेला!
हे असे लोक मलाच कसे काय भेटतात याचे एक न सुटणारे कोडे माझ्या मनात पक्के होत चाललेय. आपण कुणाचा जीव परत आणू शकत नाही मात्र एक जीव वाचवू शकतो हे खरे! कदाचित आपल्यासाठीही कुणी अशी प्रार्थना केलेली असेल आणि काही अंशी त्या ताकदीच्या बळावर आपण सुखात असू! नियती गणितात फार पक्की असते!
- समीर गायकवाड
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा