ट्रूमन यांच्या डेस्कवर एक पाटी असायची, ज्यावर "The Buck Stops Here" लिहिले होते. याचा अर्थ असा की अंतिम जबाबदारी त्यांचीच आहे. हा वाक्प्रचार त्यांच्यामुळे प्रसिद्ध झाला. वास्तवात ते एक साधे व्यक्तिमत्त्व होते. त्यांचा जन्म मिसूरीतील एका शेतकरी कुटुंबात झालेला. त्यांनी लहानपणी शेतात काम केलेलं, औपचारिक कॉलेज शिक्षणही ते पूर्ण करू शकले नाहीत, तरीही ते राष्ट्राध्यक्षपदापर्यंत पोहोचले.
1947 मध्ये त्यांनी ट्रूमन डॉक्ट्रिन जाहीर केले, जे कम्युनिझमचा प्रसार रोखण्यासाठी अमेरिकेने इतर देशांना मदत करावी, असा विचार मांडते. यामुळे शीतयुद्धाला सुरुवात झाली. राष्ट्राध्यक्षपद सोडल्यानंतर ट्रूमन आपल्या मिसूरीतील घरी परतले आणि सामान्य जीवन जगले. त्यांच्याकडे फारशी संपत्ती नव्हती, आणि त्यांनी स्वतः आपली पेन्शन मिळावी यासाठी कायदा मंजूर करवला (!)
1948 च्या निवडणुकीत सर्व्हे एजन्सीज आणि माध्यमांनी त्यांचा पराभव होईल, असे भाकीत केले होते. पण ट्रूमन यांनी थॉमस ड्युई यांचा पराभव करून विजय मिळवला. "Chicago Daily Tribune" ने चुकून "Dewey Defeats Truman" असे वृत्त छापले, जे ट्रूमन यांनी हसत हसत लोकांसमोर दाखवले. अमेरिकन जनतेमधला युद्धज्वर त्यांच्या पथ्यावर पडला होता.
26 डिसेंबर 1972 रोजी मिसूरीतील कॅन्सस सिटी येथे वयाच्या 88 व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला. श्वसनासंबंधी गुंतागुंत आणि अनेक अवयव निकामी होण्यामुळे (मल्टि-ऑर्गन फेल्युअर) मृत्यू आला. बऱ्यापैकी हीच लक्षणे अणुबॉम्बच्या किरणोत्सर्गाने पिडीत व्यक्तीत आढळली होती.
ट्रूमन यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाने साधेपणाने जीवन जगणे पसंत केले. त्यांच्या पत्नी बेस ट्रूमन, आणि मुलगी मार्गारेट ट्रूमन यांनी त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांचा वारसा जपला.
ट्रूमन यांची एकुलती एक मुलगी मार्गारेट हिने 1956 मध्ये न्यूयॉर्क टाइम्सचे संपादक क्लिफ्टन डॅनियल यांच्याशी लग्न केले. तिने आपल्या वडिलांवरील आणि आईवरील चरित्रे लिहिली, तसेच "कॅपिटल क्राइम सीरिज" नावाची बुकसिरीज लिहिली. ही मालिका 1980 मध्ये "मर्डर इन द व्हाइट हाऊस" या पहिल्या पुस्तकाने सुरू झाली आणि आजपर्यंत एकूण 32 पुस्तके या मालिकेत प्रकाशित झाली आहेत. मार्गारेट यांच्या निधनानंतर ही मालिका डोनाल्ड बेन आणि नंतर जॉन लँड यांनी पुढे चालवली.
या मालिकेचे वैशिष्ट्य म्हणजे सरकारी इन्स्टिट्यूशनच्या गैरवापराचा भांडाफोड! राजकारण, भ्रष्टाचार, सत्तेचा गैरवापर आणि गुन्हेगारी यांचा शोध ही मालिकेची मुख्य थीम आहे. मार्गारेट यांनी वॉशिंग्टनच्या अंतर्गत राजकारणाची खोल माहिती आपल्या अनुभवातून या कथांमध्ये आणली. हॅरी ट्रुमन यांच्या काळातली व नंतरचीही काळी कृत्ये वेगळ्या नामाभिधानातून मांडली गेली.
ट्रूमन यांनी युद्ध संपवले परंतू जगाच्या इतिहासात त्यांची नोंद अणुबॉम्ब वापराचा आदेश देणारे विनाशक राष्ट्राध्यक्ष अशीच झाली. राहिलेली लक्तरे या बुकसिरिजमधून पुढे आली. भलेही त्या काळात ते अमेरिकेचा मानबिंदू राहिले असतील पण जगाच्या इतिहासात त्यांची नोंद तशी मुळीच दिसत नाही.
आज त्यांचा 141 वा जन्मदिवस आहे. पण जग त्यांचा गौरव करताना दिसत नाही. त्या त्या कालखंडात महान वाटणाऱ्या व्यक्ती व घटना नंतरच्या काळात घृणास्पदही वाटू शकतात याचे बोलके उदाहरण म्हणून याकडे पाहता येईल...
-समीर गायकवाड
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा