गुरुवार, ८ मे, २०२५

कॉफी ब्लॅक - डॉन विल्यम्स

कॉफी ब्लॅक - डॉन विल्यम्स 

दरवर्षी सुट्ट्या लागल्या की त्या ब्रिटिश महिलेचा पती न चुकता भारतात यायचा. नंतरच्या काळात मात्र कैक वर्षे अंथरुणाला खिळून त्याचे देहावसान झाले. त्याच्या स्मृती जागवण्यासाठी ती वृद्धा गोव्यात टिटो बार्डेसला (दशकापूर्वी) आली होती. तिने डॉन विल्यम्सचं एक गाणं असं काही गायलं होतं की जमलेल्या तरुणाईला कावरंबावरं व्हायला झालं, ते गाणं होतं "कॉफी ब्लॅक.."

नॉर्थईस्टमधील डाऊन स्ट्रीट म्युझिक कॅफेज असोत की गोव्यातील फेरीबोट्स, वा मेट्रो सिटीमधली पंचतारांकित हॉटेल्स असोत, डॉन विल्यम्सची गाणी मंद स्वरांत कानी पडतात! 
विशेषतः केरळच्या बॅकवॉटर्समधील हाऊसबोट्स आणि गोव्यातले नाईट पब्ज रोज रात्रीस भरात येण्याआधी म्हणजे अंधार गडद होण्याआधी जी शांतशीतल  गाणी वाजवतात त्यात डॉनची गाणी आवर्जून असतात. 
गतपिढीतला कुणी दर्दी रसिक तिथं असला तर मग तो एखादा खंबा ज्यादा रिचवतो. एखाद्या कमनीय ललनेला जवळ बोलवून ओलेत्या डोळ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देतो, तिच्या कपाळाचे चुंबन घेऊन चिल्ड 'पॉल जॉन' वा  तत्सम स्कॉचचे सिप घेत राहतो! 
रम्य भूतकाळ त्याच्या भवती घुमू लागतो! 
हे गारुड विलक्षण असतं.

मुळात डॉन विल्यम्सची गाणी कंट्री म्युझिकची हाईट मानावी अशी आहेत. 
त्यातही ब्रेकअप आणि रोमान्सवर त्याचा भर अधिक होता.  
 
तीव्र आठवण येण्यासाठी कॉफी ब्लॅक आणि सिगारेट्स रिचवल्या की तिचं नसणं प्रकर्षाने जाणवतं. प्रत्येक सकाळी काय करावं तर तिला मिस करण्याची अनुभूती घ्यावी! काही तुटलेली मनं कधीच जुळत नाहीत, काही अश्रू कधीच सुकत नाहीत, काही आठवणींना कधीच अंत नसतो असं त्यानं 'कॉफी ब्लॅक..' या गीतात म्हटलंय!                                             
डॉनचं 'कॉफी ब्लॅक, सिगारेट्स, स्टार्ट धिस डे लाइक ऑल द रेस्ट..' हे गाणं खूप गाजलं. अजूनही दर्दी रसिक श्रोते त्याचा आनंद घेतात. अलीकडील काळात अमेरीका गॉट्स टॅलेन्ट, द व्हॉइस, ट्रिपल एक्स, बीजीटी अशा म्युझिक स्टेज शोमध्ये हे गाणं नव्याने गायलं जातंय. 

डॉनचा जन्म सामान्य कुटुंबात झालेला. त्याच्या जन्मानंतर काही वर्षांनी त्याचे पालक विभक्त झाले. 
त्याच्या आईने त्यानंतर दोन लग्ने केली तर वडिलांचे मानसिक स्वास्थ्य बिघडले. संवेदनशील डॉनच्या मनावर याचा खोलवर परिणाम झाला. 
27 मे 1939 रोजी जन्मलेला डॉन त्याच्या तिन्ही भावंडांत धाकटा होता. आईवडिलांचं विभक्त होणं आणि आईने संसार थाटत असताना वडिलांचं खचून जाणं त्याच्या मनावर आघात करून गेलं. 

1960 मध्ये त्याने जॉय बुशर हिच्याशी लग्न केलं तेव्हा ती वीस वर्षांची होती. १९६३ साली डॉनचा मोठा भाऊ केनेथ हा त्याच्या वयाच्या एकोणतिसाव्या वर्षी विजेच्या धक्क्याने मरण पावला. डॉनवर याचा मोठा आघात झाला. 
कुटुंबासाठी कमावण्याची, कर्ता पुरुष बनण्याची जबाबदारी त्याच्यावर आली होती. याच काळात त्याने गाणी लिहिली आणि तो गाऊ लागला. 
कोलंबिया रेकॉर्ड्ससाठी त्याने समूहात काम केलं. 
त्या आधी दोन वर्षे अमेरीकन सैन्याच्या सुरक्षा दलात काम केलं! 
गाण्यापेक्षा घरातली भुकेली पोटं त्याला महत्वाची होती. 
त्याचा पहिला अल्बम येण्यासाठी १९७६ चं साल उजाडावं लागलं.  

डॉनची अनेक गाणी गाजली, आताइतकी ती डोक्यावर घेतली गेली नाहीत मात्र त्याचा एक विशिष्ठ चाहता वर्ग होता. 
अजूनही आहे, कदाचित पुढेही राहील. 
२०१७ साली अलाबामामध्ये तो मरण पावला. 
त्याच्या मृत्यूनंतर दोनच वर्षांनी त्याची प्रिय पत्नी जिला तो प्रेमाने जीनी म्हणत असे,  तिचेही निधन झाले. 

डॉनला कायम असुरक्षित वाटायचं, आपल्यावर कुठली तरी आपत्ती येईल अशी धास्ती त्याच्या मनी असायची. त्याला धीर देण्याचे काम त्याच्या पत्नीने केले. 
तिने आयुष्यभर त्याला साथ दिली, संसार सुखाचा केला. 
टिम आणि गॅरी या दोन मुलांना जन्म दिला, त्यांना वाढवलं, चांगले संस्कार दिले. तिने अखेरपर्यंत घराची आणि डॉनची काळजी घेतली. 
डॉनने लिहिलेली रोमान्स सॉंग्ज त्याच्या पत्नीसाठीच लिहिली आहेत. 

'कॉफी ब्लॅक सिगारेट्स' हे गाणं मात्र डॉनने आईसाठी गायलंय. वडील  डिप्रेशनमध्ये गेल्यानंतर आईची आठवण रोज आल्याशिवाय आपला दिवस सुखाचा जाणार नाही या विचाराने त्याला ग्रासलं. आपल्या भावना त्याने वेलॅन्ड होलीफिल्ड या मित्रापाशी बोलून दाखवल्या. त्यातून हे गाणं जन्माला आलं! 

आपला जन्मही झालेला नव्हता तेव्हाच्या काळात लोक प्रेमभावात कसे व्यक्त होत असावेत आणि त्यात किती गंभीर आर्तता व्यापून राहिली असेल याची अनुभूती घ्यायची असेल तर हे गाणं ऐकायचं! 

आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या थोरामोठ्यांसमवेत कधी आपण 'बसलॊ' आणि त्यांना बोलतं करायचं असेल तर हे गाणं त्यांना अवश्य ऐकवायचं नि मग जादू अनुभवायची! सारा आसमंत प्रेमाची भाषा बोलू लागतो!! 

- समीर गायकवाड

गाण्याची लिंक  - https://www.youtube.com/watch?v=RqjDvEC1uVw&ab_channel=TomBaumruk

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा