सोमवार, ५ मे, २०२५

गुनाहों का देवता – त्यागाच्या मर्यादा सांगणारी गोष्ट..




त्याग करावा, मात्र त्याचा अतिरेक करू नये. काहींचा त्याग इतका मोठा असतो की त्यांचे अस्तित्व मिटून जाते. त्या त्यागाचीही किंमत राहत नाही आणि त्यांचे मूल्य तर त्यांनी स्वतःच गमावलेले असते. परिचयातील एका महिलेचे काही दिवसांपूर्वी युपीमधील वृंदावन इथे निधन झाल्याचं तिच्या घरच्या लोकांना आठवड्यापूर्वी कळलं. मला मात्र आज समजलं. तिच्या घरी तिची आठवण काढणारं मायेचं माणूस देवाघरी जाऊन तीन दशके लोटलीत. तिच्या असण्या नसण्याने कुणालाच काही फरक पडला नाही हे वास्तव आहे. त्यामुळे, ती गेली इतकाच त्रोटक निरोप मिळाला. एकांतातलं अतिशय रुक्ष मरण तिच्या वाट्याला आलं आणि तिच्या जाण्याचा तितकाच रुक्ष निरोप मिळाला. जीव हळहळला. तिच्या जाण्याने मला चंदर आठवला.

चंदर हा धर्मवीर भारती यांच्या गुनाहों का देवता या कादंबरीचा नायक. चंदर, एक हुशार, अभ्यासू आणि संवेदनशील तरुण. प्रयागराज येथे महाविद्यालयीन शिक्षण घेतो. तो जिथे शिक्षण घेतो त्या कॉलेजमधले प्राध्यापक डॉ. शुक्ल यांच्याच घरी तो राहतो. त्यांची विलक्षण देखणी मुलगी सुधा हिच्याशी त्याची जवळीक वाढते. सुधा ही सुसंस्कृत विचारांची, मृदु स्वभावाची आदर्शवादी मुलगी. चंदर आणि सुधा यांचे प्रेम नकळत बहरते, पण त्यांचे नाते सामाजिक नियम आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे अडचणीत येते.

डॉ. शुक्ल यांनी चंदरला आपला मुलगा मानलेलं असतं. सुधाचं लग्न दुसऱ्या मुलाशी ठरवले जातं. चंदर, सुधाच्या सुखासाठी स्वतःच्या प्रेमाचा त्याग करतो आणि तिचे लग्न होऊ देतो. सुधाचे लग्न कैलास सोबत होतं मात्र तिच्या आयुष्यातलं सुख कायमचं निघून जातं. तिच्या वैवाहिक आयुष्यातलं दुःख आणि तिचं अकाली निधन यामुळे चंदर अंतर्मुख होतो. कादंबरीच्या अखेरीस चंदर एकाकी आणि पश्चात्तापाने ग्रस्त जीवन जगतो. आपल्या प्रेमयुक्त त्यागाला तो गुन्हा मानतो! त्याचा गुन्हा खरा मानला तरीही तो इतका महान वाटतो की तोही एक देवताच वाटू लागतो!

हिंदी साहित्यातील एक अजरामर कथा म्हणून या कादंबरीकडे पाहिले जाते. जाती, धर्म आणि कौटुंबिक अपेक्षांचे ओझे याचे वेगळे कंगोरे यात समोर येतात. स्त्री पुरुष सहवासाच्या आणि मैत्रीच्या मर्यादांवर प्रश्नचिन्ह लावण्याचे काम, 'गुनाहों का देवता' करते. यातली पात्रे काव्यात्म भाषा बोलतात. ओघवती सुंदर भाषा हा अत्यंत मजबूत प्लसपॉइंट. अशी काव्यात्म भाषा बोलणारी स्वप्नाळू माणसं खूप लवकर फसली जातात अथवा बाजूला तरी फेकली जातात. नियती आणि व्यवहार दोन्हीकडे सपाटून मार खातात!

सुख, दुःख, त्याग आणि पश्चात्ताप यांचा अतिरेकी विचार करणारी माणसं व्यवहारात यशस्वी होत नाहीत कारण व्यवहारी जगात भावनांना शून्य स्थान असते. टोकाची त्यागभावना असणाऱ्या लोकांचं व्यवहाराशी कधीच जमत नाही. कथित सत्य वा द्वापार युगात यांची किंमत असेल मात्र आताच्या डिजिटल युगात अशा लोकांना जग वेड्यात मोजतं! या गोष्टी कुणी ठरवून करत नसतो हे जरी मान्य केले तरीही एक गोष्ट आवर्जून सांगावी वाटते, ती म्हणजे आपण ज्यांच्यासाठी त्याग करतो ते त्याच्या लायक आहेत का याचा तरी किमान विचार केला पाहिजे. असो. फेसबुक पोस्टने जग बदलत नसतं, व्यक्त होण्याचं आणि कुणाप्रती संवेदना व्यक्त करण्याचं समाधान इतके आऊटपुट पुरेसे वाटते. ..

- समीर गायकवाड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा