गुरुवार, ३ एप्रिल, २०२५

भारतीय टॅटूचा जागतिक आविष्कार – बझ!


‘बझ’ हा भारतातील प्रसिद्ध टॅटू कलाकारांपैकी एक असलेल्या एरिक डिसूझा यांचा प्रवास दाखवणारा माहितीपट आहे. कला आणि व्यक्तीविकास यांच्यातले संबंध आणि त्याचे महत्त्व यात अधोरेखित झालेय. जिओ हॉटस्टार ओटीटी प्लॅटफॉर्मवर अठ्ठावीस फेब्रुवारीला ‘बझ’ प्रदर्शित झालाय. सामान्यत: ज्या कला लोकांच्या जाणिवांशी घट्ट निगडीत नसतात त्यांच्याविषयी समाजमनात फारसे आकर्षण नसते मात्र समाजाच्या विविध वयोगटापैकी तरुण पिढीशी कनेक्ट असणाऱ्या एखाद्या गोष्टीवर आधारलेला सिनेमा अथवा माहितीपट ट्रेंडमध्ये आला की त्यावर समाजमाध्यमात चर्चा सुरू होते. ‘बझ’ हा केवळ माहितीपट नाहीये, ती एक हृदयस्पर्शी कहाणी आहे जी हळूहळू उलगडत जाते. व्यक्तीच्या जडणघडणीची सालपटे निघत जावीत तसा हा घटनापट आहे. यातील मुद्दा केवळ टॅटू काढण्याचा वा त्याची माहिती देण्याचा नसून त्याआडच्या सामाजिक भावनांचा आहे. विविध वयातले लोक त्याकडे कसे पाहतात यावरही त्यात कटाक्ष आहे. पूर्वीच्या काळी शरीराच्या विविध भागात गोंदवलं जायचं त्यात आणि आताच्या लक्ष्यवेधी टॅटूमध्ये काय फरक आहे हे याचे मर्म माहितीपटात उत्तम उलगडलेय. नशेडी, क्रिंज, ठरकी, डोक्यात कुठला तरी नाद असणारे नादिष्ट, वाह्यात, लक्ष वेधून घेऊ इच्छिणारे, छंदीफंदी वा आकर्षणकेंद्री व्यक्तीच टॅटू काढतात असा समज रूढ आहे, तो कशामुळे रूढ आहे याचा वेधक शोध यात आहे. ‘बझ’ ही एरिक डिसुझा यांची जीवनकहाणी आहे!

मुंबईच्या रस्त्यांपासून ते आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धीपर्यंतचा एरिकचा प्रवास ‘बझ’मध्ये चित्रित झालाय. त्यांची टॅटूची कलाकृती एखाद्याच्या वैयक्तिक आवडनिवडीची, स्वभाव गुणवैशिष्ट्यांची माहिती देत व्यक्तीविशेषाच्या बाबतीतले छुपे सत्य कसे समोर आणते हे पाहण्यासारखे आहे. अंगावर गोंदलं जावं की नको याविषयी आपल्यात मतभेद असूनही आपल्या सर्वांच्या मनात तिचे स्वरूप एका हव्याहव्याशा अनुभूतीचे आहे. वास्तवात हा एक वैयक्तिक स्तरावरचा सर्वसामान्य मानवी अनुभव आहे मात्र तो दृश्य स्वरूपात इतरांच्या नजरेस पडत असल्याने ज्याने टॅटू काढून घेतलेला असतो त्याच्या मनातले त्याविषयीचे भाव आणि त्याच्या टॅटूकडे पाहणाऱ्या इतरेजनांचे भाव नक्कीच भिन्न असतात. यांची सांगड कशी घालणार याचे मजेदार उत्तर ‘बझ’ देतो! एरिक डिसूझा यांची या क्षेत्रातील कारकिर्द तब्बल वीस वर्षांची आहे यावरूनच बझमधली रंगीनियत लक्षात यावी! आपल्या टॅटू-प्रतिभेच्या बळावर आंतरराष्ट्रीय टॅटू कन्व्हेन्शनमध्ये पुरस्कार जिंकणारे एरिक हे पहिले भारतीय आहेत. त्यांनी कारकिर्दीत एकूण सोळा पुरस्कार जिंकले आहेत. आजच्या तरुणाईसाठी ते एक यशस्वी ट्रेंडसेटर, एनफ्लुएन्सर आहेत. ज्यांना त्यांच्या पावलावर पाऊल टाकून या क्षेत्रात पुढचा प्रवास करायचा आहे त्या अनेकांसाठी ते प्रेरणास्रोत आहेत.

एरिक डिसूझा एका रात्रीत सर्वोच्च स्थानी पोहोचले नाहीत. त्यासाठी त्यांनी जो संघर्ष केलाय तो स्क्रीनवरच पाहणे इष्ट! अनेक अडथळ्यांची शर्यत त्यांनी पार केलीय त्यात अनेकदा अपयशही आले मात्र खचून न जाता ते पुढे जात राहिले. ‘बझ’चे दिग्दर्शक माहिर खान यांनी केवळ याचे चित्रीकरण केलेय अशी गोष्ट नसून एरिकच्या कलाकृतींचा डिजिटल वारसा त्यांनी त्याद्वारे जतन केलाय. काहींना ही सर्व अतिशयोक्ति वाटू शकते मात्र ज्या वेगाने तरुणाई आणि नवी टिनएजर पिढी या कलेकडे आकृष्ट होतेय ते पाहू जाता काही वर्षांनी टॅटू हा बहुताशांच्या देहभागांचा घटक झालेला असेल. लोकांचे सामाजिक, लैंगिक, वैयक्तिक दृष्टिकोनही त्यावरूनही निश्चित केले जातील! ‘बझ’च्या काही सीन्समध्ये टॅटू कसा काढला जातो नि विविध अवयवांवर टॅटू काढला जाताना कोणती दक्षता घ्यावी लागते याची अतिशय रंजक माहिती समोर येते! टॅटूचे आरेखन कसे केले जाते, त्यात रंग कसे भरले जातात आणि त्याचे अंतिम टचअप कसे केले जाते याचे विश्लेषण रंजक आहे.

‘बझ’मध्ये एके ठिकाणी एरिक सांगतात की, टॅटू काढणं हे कलेच्या परिवर्तनशीलतेविषयी सकारात्मक असण्याचं लक्षण आहे. लोकांना मनोआघात आणि अव्यक्त वेदनांवर मात करण्यासाठी तसेच सामाजिक सीमा ओलांडण्यास टॅटू कामी येऊ शकतो. एरिकचे आतापर्यंतचे सर्वोत्तम काम म्हणजे त्याच्या पत्नीच्या हातावरचा अत्यंत आखीव रेखीव बोलका टॅटू, ज्याला आंतरराष्ट्रीय टॅटू अधिवेशनांमध्ये सहा पुरस्कार मिळाले आहेत. या टॅटूमध्ये टिपलेले तपशील आणि त्यातील गूढतेचे प्रमाण एरिकमधल्या कलाकाराच्या कौशल्याचा पुरावा आहे. एरिक वास्तववादी आणि ऑर्गनिक टॅटूमध्ये तरबेज आहेत याची साक्ष जागोजागी येते. फ्रीस्टाइल टॅटूवर त्यांचे हात सफाईदार काम करतात. मोठ्या प्रमाणात पूर्ण शरीरभरून काम करण्यासाठी केवळ अधिक शाई नि संयम लागतो अशातली बाब नसून त्या जटिल प्रक्रियेसाठी वचनबद्ध क्लायंटची आवश्यकता असते. त्याशिवाय टोटल बॉडी टॅटू काढता येत नाही. अर्ध्यात सोडून दिलेले टॅटू विद्रूपीकरणास हातभार लावतात .

‘बझ’मध्ये एरिक डिसूझा, रॉबिन बहल, जोसी पॅरिस रेंटली, सचिन आरोटे, दीप कुंडू आणि व्हायलेट डिसूझा यांची प्रमुख कामे आहेत. अनिल कपूर फिल्म अँड कम्युनिकेशन नेटवर्क अंतर्गत अन्य सहनिर्मात्यांनी याची निर्मिती केलीय. एका वेगळ्या विषयाच्या रंजक माहिती अनुभवासाठी ‘बझ’ लक्षात राहील!

- समीर गायकवाड 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा