शनिवार, १२ एप्रिल, २०२५

वाराणसी गँगरेप आणि 546 मुलींचे शोषण - धक्कादायक आणि भयंकर!

वाराणसी गँग रेपची न्यूज क्लिप इमेज  

वाराणसीमध्ये एकोणीस वर्षे वयाच्या मुलीवर सात दिवसांत 23 जणांनी बलात्कार केल्याची घटना समोर आलीय. या घटनेस अनेक पैलू आहेत. मुलीचीही एक महत्वाची चुक आहे. यातला एक पैलू केवळ उत्तर प्रदेश सरकारचा नसून उत्तरेकडील समग्र राज्यांचा आहे. कथित साधू संन्यासी जोगे फकीर ही मंडळी इकडे सर्रास चिलीम फुकताना दिसून येतात. यांच्या व्यसनांना आळा घालायचा म्हणजे धार्मिक भावना, अस्मिता आदींना तोंड द्यावे लागते. त्यामुळे सरकारची पंचाईत आहे.

वाराणसीमध्ये पिशाच्च मोचन नावाचा एक भाग आहे. इथे एक कुंड आहे जिथे काही विधी केले तर पिशाच्च बाधा दूर होते अशी धारणा आहे. इथे काही लोंक पिंपळाच्या झाडाला नाणी चिटकवतात आणि आपल्यात बाधा आहे की नाही हे जाणून घेतात. अर्थातच हा सगळा श्रद्धा अंधश्रद्धा यांचा बाजार. तर रात्री या भागात नशेडीच अधिक आढळतात. मुलीवर पहिला रेप याच भागात झालाय.  

इथून काही अंतर दक्षिणेकडे पुढे गेले की वाराणसीचे विख्यात घाट लागतात. यातील पवित्र मानल्या गेलेल्या अस्सी घाटावरही या मुलीवर रात्रीच्या वेळी बलात्कार झालाय. पिशाच्च मोचन कुंड हे वाराणसीच्या सिगरा भागात आहे. हा भाग कोथरूडसारखा आहे. वाराणसीचा शहरी तोंडवळा आणि काहीसा डिजिटलाइज्ड भाग. तर इथं पंचाईत अशी आहे की दर पंधरवडयाला इथे नवे हुक्का बार पोलिसी कारवाईत आढळून येतात. 

उत्तरप्रदेशमध्ये हुक्का पार्लर्सना बंदी आहे मात्र तिथल्या सर्व प्रमुख शहरात अगदी खुले आम हुक्का बार सुरु आहेत. हे पुरते बंद करणे सरकारच्या आवाक्याबाहेरचे नाही, चिलीम फुकत बसणाऱ्या जटाधारी मंडळींना आवरायचे की हे पार्लर बंद करायचे ही समस्या नसावी. कच्चा माल पुरवणारे एकच असतात ही समस्या असू शकते! त्यामुळे दंडुका कसा उगारणार? मात्र याचे गंभीर परिणाम अलीकडे समोर येताना दिसताहेत. या मुलीच्या बलात्काराची घटना त्यातलीच. 

पंतप्रधान मोदी यांचा हा मतदारसंघ असूनही इथे इतकी ढिलाई कशी काय असू शकते याचे उत्तर मिळत नाही. वाराणसीमधील लंका, रथयात्रा, भेलूपूर, गुरुधाम, सिगरा, लक्सा, सारनाथ आणि महमूरगंज या भागात कधीही गेलं तर हुक्का पार्लर नजरेस पडतात. जी गोष्ट रिक्षावाले, सायकलरिक्षा वाले, ओला उबेरच्या टॅक्सीवाल्यांना ठाऊक असते ती पोलिसांना ठाऊक नसेल यावर कुणीच विश्वास ठेवणार नाही. 

साधारण पाचेक वर्षांपूर्वी दिव्य मराठीमध्ये मंडूवाडीह या जुन्या वाराणसीबद्दल मी  एक लेख लिहिला होता त्यात व्यक्त केलेली भीती आता पुरती खरी झालीय. सिगरी भागातून ककरमतामार्गे गेलं की शिवदासपूर हा वाराणसीचा रेडलाइट एरिया लागतो. इथली अनेक नशेडी पोरं या बायकांकडे जाऊन त्यांनाच मारझोड करतात. असो.  

ज्या मुलीने बलात्काराची तक्रार दिली आहे ती 29 मार्च रोजी बेपत्ता झाली होती आणि 4 एप्रिलला तिच्या कुटुंबियानी तक्रार दिली. त्याच दिवशी मुलगी सापडली. यातले काही आरोपी तिच्या ओळखीचे आहेत. त्यात बहुधर्मीय पुरुष आहेत. या मुलांनी हुक्का पार्लरमध्ये नेताना तिने विरोध केला नव्हता. त्या नंतर सलग सात दिवस तिला नशेत ठेवलं गेलं आणि तिच्यावर जबरदस्ती केली गेली. यात काहीतरी चुकतंय असं वाटण्यास जागा आहे. 

या सर्व घटनाक्रमात सहज उपलब्ध होणाऱ्या नशेच्या गोळ्या, गांजा, अफू आणि हुक्का यांची मुबलकता कुठे तरी ट्रिगर होतेय. हे सर्व वाराणसीच्या प्रतिष्ठेस, लौकिकास साजेसे नाही. 

मागे काही केसेसमध्ये महाराष्ट्र पोलिसांना अशा काही अपहृत मुलींची माहिती पुरवल्यानंतर अवघ्या काही तासांत आरोपी जेरबंद झालेत, अनेकदा हुक्का पार्लरची माहिती दिली की पोलीस तिथे तत्काळ कारवाई करतात कारण या ठिकाणी गुन्ह्यांना प्रोत्साहन देणारी मानसिकता वाढते हे आपले पोलीस जाणून आहेत. 

देशातले प्रमुख धार्मिक स्थळ आणि पंतप्रधानांचा मतदारसंघ असूनही ही अनास्था असेल तर हे काही बरे चित्र नाही. इथे सर्वच अवैध धंद्यावर अत्यंत कठोर कारवाई अपेक्षित आहे. 

8 एप्रिलला व्यक्त केलेली भीती चार दिवसात वास्तवात समोर येईल असे वाटले नव्हते. असो. त्या पोस्टवर काहींनी असे काही घडलेलेच नसावे नाहक बदनामी केली जातेय अशा अर्थाचे शेरे मारले होते. आता त्याच्या पुढची अत्यंत धक्कादायक गोष्ट तपासात पुढे आलीय. 19 वर्षाच्या मुलीवर 23 जणांनी तब्बल आठवडाभर (29 मार्च ते 4 एप्रिल) बलात्कार केल्याची ती पोस्ट होती. या मुलीवर बलात्कार करणारे मुस्लिम हिंदु दोन्हीही होते. मुलीच्या परिचयातले तिघे होते. एक तिचा मित्रच होता. मुलगी ज्या दिवशी सापडली त्याच्या दुसऱ्याच दिवशी युपी पोलिसांनी सहा जणांना अटक केली होती. त्यानंतर राहीलेले आरोपीही पकडले गेले. पैकी बारा जणांच्या मोबाइलची तपासणी केली असता अख्खा देश हादरून जाईल अशी माहिती समोर आलीय.

या 12 आरोपींच्या मोबाइलमध्ये 546 मुलींचे नग्न व अश्लील व्हिडीओ आढळून आलेत. ज्या मोबाइलवर हे व्हिडीओ शेअर केले आहेत, त्यांचे लोकेशन उत्तर प्रदेशसह सहा राज्यांमध्ये आढळलेय. या घटनेतील प्रमुख सूत्रधार व काँटिनेटल कॅफेचा मालक अनमोल गुप्ता हा उत्तर प्रदेशसह महाराष्ट्र, दिल्ली, बिहार, पश्चिम बंगाल व तामिळनाडूत मुली पाठवत होता, अशी माहिती समोर आलीय. गुप्ताच्या आयफोनमध्येही मुलींचे अश्लील व्हिडीओ आढळलेत. यातील बहुतांश व्हिडीओ काँटिनेटल कॅफेमध्ये बनवण्यात आले आहेत.

आता ही केस वाराणसीमध्ये 23 नराधमांनी केलेल्या अत्याचारापुरती राहिली नसून देशव्यापी सेक्स रॅकेटच्या शोधात तबदील झालीय. या केसमध्ये काही मुलांकडे मुलींना संमतीने वा फसवून भुलवून आणण्याचे काम होते. मुली तिथं आणल्या गेल्या की त्यांच्या लैंगिक शोषणाचे व्हिडिओ बनवले जाते. हे व्हिडिओ देशभरात शेयर केले जात. वाराणसी गँगरेप मधील आरोपींनीही त्यांच्या मोबाइलमधून या क्लिप्स शेयर केल्याचे उघड झालेय. ज्या मोबाइलना हे व्हिडिओ शेयर केले गेलेत ते प्रामुख्याने युपी लगतच्या सहा राज्यातल्या विकृतांचे आहेत.

कोणताही सामुहिक स्वरूपाचा गुन्हा पुन्हा पुन्हा केला जात असेल तर त्याचा एक पॅटर्न असतो, एक मोडस ऑपरंडी असते आणि यात प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळी माणसं सक्रिय असतात. या संपूर्ण प्रकारावर देखरेख ठेवणारेही असतात आणि या सगळ्यामागे एक वा अनेक मास्टर माइंड्स असतात. वाराणसी सेक्स रॅकेटमागे काँटिनेटल कॅफेचा मालक अनमोल गुप्ता याचे विकृत डोके आहे!

अनमोल गुप्ता याला अटक करण्यात आलीय. त्याच्याकडून जप्त केलेल्या दोन मोबाईल फोनमध्ये मुलींचे सर्वात आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ आढळलेत. हे फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवरून डाउनलोड केलेले नसून त्याच्या काँटिनेटल कॅफेमध्ये बनवलेले आहेत. पोलिसांनी ते फॉरेन्सिक तपासणीसाठी आग्रा फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीमध्ये पाठवलेत. तो हे नग्न फोटो आणि व्हिडिओ त्याच्या ग्राहकांना पाठवत असे आणि जुन्या ग्राहकांपासून नवीन ग्राहक निर्माण करण्यासाठी एक वेल पॅटर्नड् चेन तो चालवायचा. त्याच्या एका मोबाईल फोनमध्ये एक मोठी डेटाशीट देखील सापडलीय.

माझ्या पोस्टमध्ये शिवदासपुरच्या बदनाम एरियाचा उल्लेख होता, तो देखील अचूक शाबित झालाय. कारण अनमोल गुप्ता याचा बाप शरद गुप्ता हा युपीमधला जुना एस्कॉर्टर आहे. तो भडवेगिरी करतो. 2022 मध्ये या बापलेकास सेक्स रॅकेट चालवल्याबद्दल अटक झाली होती हे विशेष!

'त्या' पोस्टमध्ये वाराणसीला नशामुक्त करायचे असेल तर कोणती आव्हाने पोलिसांच्या समोर आहेत हेही लिहिले होते यावर अनेक वाचकांनी ही वाराणसीची बदनामी करत असल्याची टीका माझ्यावर केली होती. 23 मार्च रोजी अपहरण झालेल्या मुलीच्या गँगरेप केसमधील सर्व 23 आरोपी ड्रग्जचे व्यसनी असल्याचे समोर आलेय. वाराणसीमध्येच नव्हे तर अख्खी युपीमध्ये कुठे कुठे हुक्का पार्लर्स आहेत आणि तिथे काय चालते हे पोलिसांनाही ठाऊक आहे. मीडिया मात्र तोंडात कबर धरून द्वेष पसरवण्याच्या एकमेव अजेंड्यावर रेकतोय! हे सर्व आरोपी अनमोल गुप्ताचे मित्र वा परिचित आहेत. पोलिसांनी आतापर्यंत अटक केलेले सर्व आरोपी नशेडी आहेत पैकी 12 जण ड्रग्जच्या आहारी गेलेत! अटक केलेले सर्व आरोपी या कॅफेशी संबंधित आहेत. आरोपींपैकी एक कोल्ड्रिंक्स एजन्सी चालवतो आणि दुसरा हर्धा येथील एका दुकानात काम करतो.

हे सर्व त्या मुलीमुळे उघडकीस आले नाहीतर हे असेच चालू राहिले असते! 29 मार्च रोजी बेपत्ता झालेली मुलगी 4 एप्रिल रोजी पोलिसांच्या हाती लागली तेव्हा तिची प्रकृती अत्यंत ढासळली होती, ती बेशुद्ध अवस्थेत आढळली. 48 तासांनंतर ती नॉर्मल झाली आणि पुढचे काही दिवस ती अत्यंत भेदरलेल्या अवस्थेत होती. तिला ड्रग्ज देऊन नशेत ठेवण्यात आले होते आणि तिच्यावर 6 दिवस सतत बलात्कार करण्यात आला. अनमोल गुप्ता याने त्याच्या कॉन्टिनेंटल कॅफेद्वारे 15 मुलांना त्याचे एजंट म्हणून नियुक्त केले होते जे मुलींशी मैत्री करायचे आणि त्यांना प्रेमात अडकवायचे. मग ते त्यांच्यावर बलात्कार करायचे आणि त्यांना ब्लॅकमेल करायचे.

पोलीस आता त्या 546 मुलींची ओळख पटवण्याच्या मागावर आहेत, हे शोधकार्य किमान शंभरेक पोलिसांनी टीमद्वारे करायचे काम आहे. याची व्याप्ती कदाचित आणखी मोठी असू शकते.

या पार्श्वभूमीवर मला आठवते की पिंपरी चिंचवड परिसरातील अशाच एका मुलीलासेम अशाच पद्धतीने दोन महीने ड्रग्ज देऊन तिचे अहोरात्र शोषण केले जायचे. तिच्या क्लिप्स बनवल्या जात. राज्यातल्या उच्च स्तरीय पोलीस अधिकारी असणाऱ्या तडफदार आणि कर्तबगार असामीना तिची टीप दिल्यानंतर अवघ्या काही तासात मुलीची सुटका झाली होती. केवळ सुटका होऊन गोष्ट थांबली नाही तर तो अड्डादेखील नष्ट करण्यात आला. आरोपी जेरबंद झाले. म्हणून सर्वांनी सजग असले पाहिजे.

महाराष्ट्र पोलिसांना माझे आवाहन आहे की राज्यातील मुंबई व उपनगरे, पुणे, जळगाव, ठाणे, नागपूर, पनवेल, संभाजीनगर, धुळे, नाशिक, नंदुरबार, सांगली, मिरज, सोलापूर, अहिल्यानगर, जालना, परभणी, अमरावती, बुलढाणा, लातूर, धाराशिव या शहरात एकाच दिवशी सर्व कॅफेवर वेळ न दवडता धाडी टाकण्यात याव्यात खूप अजस्त्र काही हाती लागेल!

पंतप्रधान मोदी ज्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात आणि जे देशाचे सर्वोच्च धार्मिक तीर्थक्षेत्र आहे तिथे हे कित्येक वर्षांपासून सुरळीत सुरू असावे ही अत्यंत लाजिरवाणी बाब होय! या प्रकरणाच्या खोलात गेलं तर अजून चिखल सापडेल! योगी आदित्यनाथ सरकारने या प्रकरणाचा तपास अत्यंत वेगाने आणि सक्षमतेने केल्याबद्दल त्यांचे कौतुक! हा तपास गुजरातमध्येही जाऊन केला पाहिजे कारण देशात सर्वाधिक ड्रग्ज तिथल्या मुंदरा पोर्टवरती जप्त केले गेलेय.

सर्व काही सरकार आणि व्यवस्थेवर ढकलून चालणार नाही! आपल्या परिसरात काय उद्योग चालले आहेत यावर समाजाचे लक्ष हवे नाहीतर 'त्या' 546 मुलींपैकी एक मुलगी आपल्या नात्यागोत्यातली निघू शकते!

संपूर्ण पुणे शहर आणि ग्रामीण भाग, विशेषतः गुंठा मंत्री भाग आणि पुणे जिल्ह्यातील तालुक्याची ठिकाणे या भागात एकाच दिवशी कॅफे आणि स्पा सेंटर्सवरती धाडी घातल्या गेल्या तर 546 हून मोठा आकडा केवळ एका जिल्ह्यात निघेल! ही पक्षीय वा राजकीय स्वरूपाची पोस्ट वा कमेंट नाही. यातले गांभीर्य ओळखून कारवाई व्हायला हवी.

आपल्या देशाच्या युवा पिढीला कोण व्यसनाधीन बनवू इच्छितेय हा प्रश्नही प्रत्येक भारतीयाने आपल्या अंतर्मनाला विचारला पाहिजे!

- समीर गायकवाड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा