जगभरात मोठ्या प्रमाणात वाचल्या जात असलेल्या ‘द अटलांटीक’ या लोकप्रिय नियतकालिकाच्या १३ जुलै २०१८ च्या आवृत्तीत साराह झांग यांचा ‘द फार्सियल बॅटल ओव्हर व्हॉट टू कॉल लब ग्रोन मीट’ हा लेख प्रसिद्ध झाला आणि जगभरातील मीडियाने कान टवकारले. कारण आतापर्यंत जी गोष्ट कपोलकल्पित म्हणून दुर्लक्षिली गेली होती, त्याबाबतीतचा हा जगासाठीचा वेकअप कॉल होता. १२ जुलै रोजी अमेरिकन अन्न आणि औषध प्रशासनाने(FDA) एक लोकबैठक बोलावली होती. विषय होता, ‘प्रयोगशाळेत कृत्रिम रित्या वाढवल्या गेलेल्या टेस्ट-ट्यूब मांसाचा’. या बैठकीत FDAने उपस्थित लोकांना आणि संशोधकांना पृच्छा केली की, 'या मांसास काय संबोधायचे ?' क्लीन मीट (स्वच्छ मांस), कल्चर्ड मीट (प्रक्रियान्वित मांस), आर्टिफिशियल मीट (कृत्रिम मांस), इन व्हिट्रो मीट (बाह्यांगीकृत मांस), सेलकल्चर प्रॉडक्ट (कोशिकाप्रक्रियाधारित उत्पादन), कल्चर्ड टिश्यू (प्रक्रियाकृत उती-अमांस) अशी नावे यावेळी सुचवली गेली. खरे तर ही केवळ नामाभिधानाची प्रक्रिया नव्हती. हे उत्पादन स्वीकृत करून त्याला बाजारात आणण्याची परवानगी देत आहोत याची ही चाचणी होती.
प्रयोगशाळेत कृत्रिम रित्या निर्मिलेले मांस एक ना एक दिवस भोजनात सामील होणार अशा अटकळी मागील दोन दशकापासून बांधल्या जात होत्या पण त्यावर फारसं गांभीर्याने कुणीच बोलत नव्हतं. यावर संशोधन करणारे शास्त्रज्ञ आपल्या कामात व्यग्र होते, त्यांना पैसा पुरवणाऱ्या यंत्रणा त्याचा पाठपुरावा करत होत्या आणि संबंधित सरकारे त्यावर नजर ठेवून होती. सायन्स जर्नलमधून त्यावर दोनेक शोध निबंध प्रकाशित झाले होते. मिडियासह सामन्यांची यात रुची नव्हती. खरे तर ‘क्लोनिंग’च्या प्रयोगानंतर कृत्रिम अवयव बनवले जाऊ लागले, स्टेमसेल (कोशिका) हा बायोटेक्नोलॉजीचा मूलमंत्र झाला. कृत्रिम रक्तापासून ते मातीशिवाय चारा उगवण्यापर्यंत अनेक मौलिक शोध लावले गेले. नव्या जीवाच्या कृत्रिम निर्मितीचेच काम बाकी होते. अवकाशयानातील अंतरिक्ष चमूसाठी कॉम्पॅक्ट फूडची निर्मिती याच वेळी आकार घेत होती. किमान आकाराच्या आणि वजनाच्या अन्नात जास्तीत जास्त कॅलरीज आणि जास्तीचे प्रोटीन्स असणारया डाएटच्या निर्मितीस वेग आला होता. २००२ साली नासा आणि तुर्की सरकारच्या एका शोध प्रकल्पाच्या पुढाकाराने प्रयोगशाळेत निर्मिलेले मानवी आहारास योग्य पहिले सामिष भोजन आकारास आले. ती डिश होती, गोल्डफिशच्या स्टेमसेल्सपासून बनवलेल्या फिश फिलेटसची (माशाचे काप). याच वेळी दबक्या आवाजात कृत्रिम बीफची चर्चा सुरु झाली.
खरे तर या विषयावरची पहिली सार्वजनिक प्रतिक्रिया विन्स्टन चर्चिल यांनी १९३१ मध्ये दिली होती. ‘पॉप्युलर सायन्स’ या अमेरिकी नियतकालिकानं भविष्य काळाबद्दलच्या कल्पनांविषयी त्यांना विचारलं होतं. तेंव्हा विन्स्टन चर्चिल म्हणाले होते की, ‘कोंबडीची एक तंगडी किंवा तिच्या शरीराचा काही भाग खाण्यासाठी अख्खी कोंबडी मारण्यापेक्षा जर तेवढंच मांस जर आपण योग्य माध्यमात वाढवू शकलो तर अख्खी कोंबडी पोसायची गरज भासणार नाही’. याकडे एक कल्पनाविलास म्हणून तेंव्हा पाहिलं गेलं. १९७१ मध्ये रसेल रोस यांनी मसल फायबर बनवण्यात यश मिळवले होते. १९९८ मध्ये अमेरिकन शास्त्रज्ञ जॉन व्हेन यांनी प्राणिज पेशीपासून प्रयोगशाळेत निर्मिलेल्या आहारयोग्य मांसाच्या पेटंटसाठी अर्ज केला आणि चर्चेला उधाण आले. या पेटंटनुसार मांसात बाह्यवर्धित स्नायू आणि चरबीच्या समावेशास अनुमती होती. २००१ मध्ये हॉलंडचे त्वचाविकारअभ्यासक विल्यम व्हॅन एलेन यांनी मानवी आहारयोग्य कृत्रिम मांस बनवून प्रकियाजन्य पद्धतीने जागतिक स्तरावर विकण्यास अनुमतीचे पेटंट मिळवले. २००३ मध्ये हॉवर्ड मेडिकल स्कुलच्या ओरॉन कॅट्स आणि त्यांच्या सहकारयांनी काही सेंटीमीटर लांबीची मसल स्टिक निर्माण केली. २००५ टिश्यू इंजिनिअरिंगच्या सायन्स जर्नलमध्ये प्रयोगशाळेत कृत्रिम रित्या वाढवलेल्या मांसावरचा शोधनिबंध प्रकाशित केला तेंव्हा 'पेटा'चे याकडे लक्ष वेधले गेले. मग गुगलसह अनेकांनी याकडे ध्यान वळवले. जेंव्हा प्रत्यक्षात अशा प्रकारच्या अन्नाची चर्चा सुरु झाली तेंव्हा प्राणीरक्षण, भूतदयेसाठी काम करणाऱ्या 'पेटा' (PETA) या संस्थेचे कान टवकारले जाणं साहजिक होतं. ‘पेटा’ने २००८ साली कृत्रिम मांस बनविणाऱ्या व्यक्तीला किंवा कंपनीला १० लाख डॉलरचं बक्षीस देण्यात येईल असं जाहीर केलं. तेंव्हा बराच उहापोह झाला. लोकांनी हा पैशाचा अपव्यय असल्याचं म्हटलं तेंव्हा तासाला दहा लाख प्राणी मारले जातात त्यांच्या जीवासाठी दहा लाख डॉलरचा निधी वाया गेला तरी हरकत नाही अशी आग्रही भूमिका घेत पेटा आपल्या प्रस्तावावर ठाम राहिली. यापुढे जात नेदरलँड्सच्या शासनानं २०१२ मध्ये ४० लक्ष अमेरिकी डॉलर अनुदान प्रयोगशाळेत मांसनिर्मिती करण्याच्या संशोधनासाठी जाहीर केलं. पण त्याही आधी अशा प्रकल्पासाठी अमाप पैसा उपलब्ध होऊ लागला. याची योग्य ती परिणती होऊन आता हे मांस बाजारात येण्याची चिन्हे आहेत.
५ ऑगस्ट २०१३ रोजी नेदरलँडस्थित ‘मॅस्ट्रिश्ट युनिव्हर्सिटी’तील प्रा. मार्क पॉस्ट यांनी प्रयोगशाळेत निर्मिलेल्या बीफपासून तयार केलेल्या बर्गरला प्रेसपुढे सादर केले. या बीफपासून तयार केलेले बर्गर अत्यंत सुरक्षित आणि नेहमीच्या बर्गरइतकेच पौष्टिक असल्याचा त्यांचा दावा होता. असे कृत्रिम पदार्थ तयार करून जगभरातील कोट्यवधी कुपोषितग्रस्तांची तजवीज करता येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला . प्रयोगशाळेत केवळ १४० ग्रॅम वजनाचे (अंदाजे ५औंस) बीफ (गायीचे मांस) तयार करण्यासाठी अडीच लाख युरो (३,३० हजार डॉलर अर्थात १ कोटी ९९ लाख ८० हजार रुपये) खर्चण्यात आले होते. या बीफच्या निर्मितीसाठी जिवंत गायीच्या मांसपेशीच्या कोशिकांचा भाग वापरण्यात आला. या बीफ‘बर्गर’साठी बीफसह मीठ, अंड्याची पावडर ब्रेडक्रम्सबरोबरच चव आणि रंग बदलण्यासाठी केशर आणि बीटच्या रसाचे मिश्रण करण्यात आले. बर्गरच्या मूळ निर्मितीप्रक्रियेत बदल करूनही नव्या पदार्थाच्या चवीत तसूभरही फरक पडला नसल्याचा दावा या संशोधकांनी केला आहे. याचा निर्मिती खर्च हा अतर्क्य आणि अफाट वाटत असल्याने याच्या वास्तवातील वापरास कधीच मूर्त स्वरूप प्राप्त होणार नाही असा अनेकांचा होरा होता.
मात्र गुगलचे सहसंस्थापक सर्जी बेन यांनी एक दशलक्ष युरोचा निधी देऊ केलेल्या ‘मोसामीट’ या कंपनीने २०२१ पासून युरोपातील अनेक सामिषभोजन उत्पादक आस्थापनांना आपली कंपनी कृत्रिम मांस उपलब्ध करून देईल असे जाहीर केले आहे. एक डॉलरला मिळणारया लोकप्रिय बर्गरमध्ये याचा सहज वापर करता येईल आणि त्याचवेळी त्याच्या किंमतीत, दर्जात काही फरक पडणार नाही असं स्पष्ट करण्यात आलंय. गायीच्या मांसपेशींच्या एका कोशिकेच्या नमुन्यापासून ऐंशी हजार पाऊंडस बर्गरसाठीचं मांस बनवता येईल असा कंपनीचा दावा आहे. सीबीएस शिकागोला १८ जुलै रोजी 'मोसामीट'ने ही माहिती दिली आहे. 'बेल-फूड' या युरोपियन खाद्य कंपनीने २०२१ पासून स्वित्झर्लंडमधील रेस्टोरंटपासून कृत्रिम मांसाचा वापर सुरु होईल असे जाहीरही करून टाकलंय. दरम्यान युरोपमधील काही फूडचेन्सनी आपल्या दालनात प्रायोगिक तत्वावर या मांसखंडाच्या डिशेस उपलब्ध करून दिल्यावर त्याला लोकांचा प्रतिसाद चांगला मिळालाय. जगातील सर्व मांसाहारी खाद्यउत्पादक कंपन्यांनी डच संशॊधकांच्या दारात रांगा लावल्याचे चित्र येत्या काही महिन्यात दिसेल. अमेरिकन एफडीएने याचा अधिकृत व्यावसायिक वापर करण्याचा परवाना दिल्यानंतर अख्ख्या जगातील मांसाहाराचे स्वरूप बदलून गेल्याचे दिसल्यास नवल वाटू नये. १५ मार्च २०१८ रोजी 'द वेस्टर्न प्रोड्युसर' या नियतकालिकात सर्व्हेगो या कंपनीने अमेरिकन व ब्रिटिश खवैय्यांचा एक सर्व्हे प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार एक तृतीयांश लोकांनी कृत्रिम मांस खाण्यास आपले प्राधान्य असेल असे सांगितले आहे.
फूड इंडस्ट्री याला एक नव्या युगाची अभूतपूर्व संधी म्हणून पाहत आहे तर पशुपालन उद्योगाच्या मोठ्या समूहांना यावर काय भूमिका घ्यावी हे अजूनही उमगत नाहीये. जगभरातील जमिनीचा कस नष्ट होतो आहे, शेतीसाठीच्या जमिनीची टक्केवारी घटत चालली आहे. प्राण्यांना लागणाऱ्या चारयाची समस्या भेडसावते आहे, मांसाहाराकडे वळणारया लोकांचा ओघ कमी होत नाहीये, त्यासाठी कत्तल कराव्या लागणारया पशूंच्या समस्या निराळ्याच आहेत. मांसाहारापासून निर्माण होणारया आरोग्यसमस्या जोरावर आहेत, विविध रोग संसर्ग उद्भवत आहेत. मांसाहारामुळे निसर्गाचे संतुलन बिघडते आहे, हरितगृह वायू उत्सर्जनाचे प्रमाण वाढते आहे, पाण्याचा अपव्यय होतो आहे, उपयुक्त पशूंची संख्या घटत चालल्याने भविष्यातील जीवविविधता धोक्यात येईल अशा एक ना अनेक मुद्द्यांच्या आधारे मांसाहार टीकेचा धनी झाला होता. आता कृत्रिम मांसाच्या उत्पादनाने टीकाकारांची तोंडे बंद होतील. या मांसाच्या उत्पादनाने जीव संतुलन राखणे सोपे जाईल, पाण्याचा अपव्यय टळेल, प्रदुषणाच्या दृष्टीकोनातून तर अभूतपूर्व बदल समोर येतील. त्याच बरोबर काही समस्याही उद्भवतील. पशुपालन उद्योग मरणपंथास लागेल, प्राण्यांची कत्तल करण्यापासून ते त्याची पॅकींग करण्यापर्यंतच्या क्षेत्रात काम करणारया लोकांना याचा फटका बसेल. चामडयाच्या उद्योगावर प्रश्नचिन्ह लागेल. भारतासह सर्व मांसनिर्यातदार देशांना याचा जोरदार आर्थिक फटका बसेल. मांसाचे सर्वात मोठ्या आयातदार असलेल्या आखाती देशांनी हे तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी मोठा निधी राखीव ठेवला आहे हे विशेष. त्याचबरोबर प्राण्यांची कत्तल थांबल्यास त्यांचे मूल्य कमी होईल, त्यांच्यापासून मिळणाऱ्या अन्य प्राणिज उत्पादनापासून जमाखर्चाचे आर्थिक नियोजन तोट्यात जात असल्यास हा व्यवसायच मोडीत निघेल. एका अर्थाने मानवी उत्क्रांतीच्या एका महत्वाच्या टप्प्यावर आपण येणार आहोंत कारण मानवी इतिहासात हजारो वर्षे मागे जाऊन डोकावले तर आदिम काळातही मानवाने पशुपालन करून त्यापासून आहार आणि उदरनिर्वाह केला हे सिद्ध होते, त्याला आता तडा जाईल कारण पशुपालन न करता आणि पशूंची कत्तल न करता डुक्कर, गोवंश आणि इव्हन बेडकाच्या कोशिकापासून आता मुबलक मांसाहाराची सोय होणार आहे.
हे मांस चव, वास आणि स्वरूप या मुद्द्यांच्या कसोट्यावर सिद्ध झालेय. स्वच्छ, निर्जंतुक, समान चवीचे, समान रंगरूपाचे हे मांस वापरात आल्याने मांसाहारात मोठे बदल घडतील. तरीदेखील काही खवय्ये या मांसाला तुच्छतेने ‘फ्रँकेन मीट’ असं म्हणतात. शाकाहाराचे अतिरेकी पुरस्कर्ते मात्र या एकाएकी अवतीर्ण झालेल्या नव्या संशोधनामुळे गोंधळात पडले आहेत. त्यामुळे याचा निषेध करावा की याचे स्वागत करावे यावर त्यांच्यात एकमत झालेले नाही. हे मांस कृत्रिमरित्या निर्मिलेले असले तरी प्राण्यांच्या कोशिकेपासून ते बनले असल्याने त्याला मांसाहारच म्हणावे लागेल हे स्पष्ट आहे. जोपर्यंत खनिज तेलातून कार्बनी रेणू मिळवून त्यापासून मांसजन्य पदार्थ निर्माण केला जात नाही, तो पर्यंत त्या मांसाला शाकाहारी मांस म्हणता येणार नाही. या आहारास कोणी काही म्हणत असले तरी प्राण्यांच्या जीवावर न बेतता आणि पृथ्वीच्या संतुलनाच्या मुळावर न येता मांसाहारी खाद्य शौकीन येत्या काही वर्षात मनसोक्त मांसाहार करू शकतील हे नक्की. जगभरात होणारा हा बदल संथ पावलाने का होईना पण आपल्याही दारी येईल. दारातून ताटात येण्यास त्याला फारसा अवधी लागणार नाही. असा काही बदल आपल्याकडे झाल्यावर गायगुंड, गोरक्षक आणि त्यांच्या जीवावर जगणाऱ्या शासनकर्त्यांना नवे मुद्दे शोधावे लागतील. किमान तेंव्हा तरी आपल्या धार्मिक भावना दुखावत असल्याचे निरर्थक रडगाणे शाकाहाराचे अतिरेकी स्तोम माजवणारया कोणत्याही जातीधर्म समुदायास गाता येणार नाही.
- समीर गायकवाड

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा