सोमवार, ९ जुलै, २०१८

'त्या' फोटोच्या निषेधास असलेली इतिहासाची झालर...



काही दिवसांपूर्वी चित्रपट अभिनेते रितेश देशमुख यांनी चित्रपट दिग्दर्शक रवी जाधव आणि कादंबरीकार विश्वास पाटील यांच्यासह रायगडावरील मेघडंबरीत सिंहासनाधिष्टीत शिव छत्रपतींच्या मूर्तीसमोर बसून फोटो काढले आणि ते सोशल मिडियावर पोस्ट केले. यावरून त्याच्यावर प्रखर टीका झाली, कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजे यांनी देखील त्यांच्यावर टीका केली. रितेश देशमुख यांनी लोकांच्या नाराजीचे उग्र स्वरूप पाहून तत्काळ माफी मागत ते फोटो डिलीट करून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. खरे तर रायगडावरील मेघडंबरीच्या नजीक जाण्यास कुणालाही परवानगी नाही, दुरूनच दर्शन घेऊन लोक परत फिरतात. मग हे लोक तिथे आत कसे काय गेले, आत गेल्यानंतर मेघडंबरीवर चढताना त्यांना कुणीच कसे अडवले नाही, दडपणापायी अडवले नाही असे समजून घेतले तरी महाराजांच्या मूर्तीसमोर पाठमोरे बसण्यास तरी त्यांना मज्जाव का गेला नाही हा प्रश्नही अनुत्तरितच राहतो. याच्या चौकशा वगैरे होतील, पुढचे सोपस्कार पार पडतील. पण सोशल मिडीयावर सेलिब्रिटींचे तळवे चाटणारा एक वर्ग आहे, त्यातील काहींनी खोचक शब्दाआडून छुपा सवाल केला की, "हे सर्वजण बसलेलेच होते, उभे नव्हते ; शिवाय इतका गहजब करायचे काही कारण नव्हते कारण शिवछत्रपतींवरील चित्रपटाच्या होमवर्कसाठीच हे तिथे गेले होते.' अशी मल्लीनाथीही करण्यात आली. न जाणो असा विचार आणखी काहींच्या मनातही आला असेल, पण त्यांना या वर्तनाच्या निषेधामागील कारण माहिती नसेल यावर खरंच विश्वास बसत नाही.

इतिहासात केवळ शिवाजी राजेच नव्हे तर कोणत्याही राजाला कुणी पाठ दाखवली की तो अत्यंत घोर अपराध समजला जायचा. पाठ दाखवणे हा अवमान कोणताच राजा सहन करत नसे. युद्धात वार करणारा खरा वीर छातीवर वार करतो आणि पळून जाणारा रणांगणाला पाठ दाखवतो. तद्वत एखाद्या दरबारात, मैफलीत, बैठकीत कुणाला पाठ दाखवणे म्हणजे त्याला कमी लेखणे होय. आजही वर्तमानपत्रातून बातम्यांच्या मजकुरात वाचायला मिळते की 'अमुक अमुक नेत्यांनी अबक या नेत्याच्या आगमनप्रसंगी पाठ फिरवली आणि येणे टाळले.' या 'पाठ दाखवण्या'ला इतिहासात मानसन्मानाशी निगडीत केलं गेलं होतं, त्यामुळे त्याचे महत्व तेंव्हा अधिक होतं. 'पाठ दाखवण्या'वरून इतिहासात अनेक चकमकी झडल्या. दस्तूरखुद्द शिवाजीराजांच्या आयुष्यात पाठ दाखवण्याच्या कारणावरून मोठं वादळ आलं होतं जे त्यांच्या जीवावर बेतलं असतं पण त्यांच्या अंगच्या चातुर्य, धाडस आणि दूरदृष्टीमुळे ते या संकटातून तरले. या घटनेचा मागोवा घेण्यासाठी इतिहासात थोडं खोलवर मागे जावे लागेल.

मुघल सम्राट शाहजहां याला नऊ बायका होत्या आणि खंडीभर अपत्ये होती. परहेजबानू बेगम ही त्याच्या प्रथम पत्नी कंदहारी बेगमपासून झालेली एकमेव कन्या. त्याची दुसरी पत्नी मुमताजमहल हिच्यापासून झालेल्या अपत्यांना त्याने राजपुत्रांचा दर्जा दिला होता. औरंगजेब हा तिच्याच पोटी जन्माला आला होता. मुमताजमहल हिने चौदा अपत्यांना जन्म दिला. मुमताज महल पासून झालेली जहां आंरा, दारा शुकोह, शाह शुजा,रोशन आरा बेगम, औरंगजेब, मुरादबक्ष आणि गौहर बेगम ही अपत्ये जगली. इतर अपत्यांत काही जन्मतःच मरण पावली तर काही बालवयात मृत्यूमुखी पडली. १६३१ मध्ये मुमताज महलचा मृत्यू झाल्यावर शाहजहांने तिच्यापासून जन्मलेल्या ज्येष्ठ कन्येशी म्हणजेच जहां आराशी निकाह लावला. यावेळी तिचे वय अवघे सतरा वर्षे होतं तर दारा शुकोह १६ वर्षांचा होता आणि औरंगजेब होता १३ वर्षाचा. जहां आरा सम्राज्ञी बनताच तिच्या बहिणीने रोशन आराने तिचा प्रचंड दुस्वास सुरु केला. ती मत्सराने ग्रासली होती. दारा शुकोह हा थोरला असल्याने मुघल गादीचा राजवारसा त्यालाच होता. त्याचे आणि जहां आराचे खूप सख्य होते, याने रोशनआराला प्रचंड जळफळाट होत असे. यामुळे रोशन आराने औरंगजेबाच्या काळजात जहर ओतायला सुरुवात केली. सम्राट होण्याची लालसा त्याच्या रोम रोमात भिनवण्यात पुढे ती पुरती यशस्वी झाली. तर शाहजहांचा औरंगजेबाच्या महत्वाकांक्षा ठाऊक होत्या.

१६३४ मध्ये त्याने औरंगजेबाची नियुक्ती दख्खनच्या सुभेदारपदी केली. औरंगजेबाचे इथे अजिबात मन लागत नव्हते. प्रचंड भौगोलिक असमतोल असलेला प्रदेश, सातत्याने बदलत असणारे हवामान, उंचसखल डोंगर दऱ्या आणि बोडकी पठारे यावर राहणारे चिवट लोक यांना तो तोंड देऊ शकत नव्हता. शिवाय रोशनआरा जी काही माहिती पाठवत होती त्यामुळे तो अस्वस्थ होत होता. १६३७ मध्ये रबिया दुर्रानीसोबत त्याचा निकाह झाला. या दरम्यान शाहजहांने दरबारातील काही कामकाज आणि जबाबदाऱ्या एकेक करून दारा शुकोहकडे सोपवण्यास सुरुवात केली. मधल्या काळात १६४४ मध्ये जहां आराच्या रेशमी वस्त्रावर शिंपडलेल्या अत्तरास पलित्यामुळे आग लागली आणि ती आगीत बऱ्यापैकी होरपळली. या दुर्दैवी घटनेनंतर राजघराण्यातील सगळे आप्तेष्ट सत्वर गोळा झाले, परंतु औरंगजेब घटनेनंतर तीन आठवड्यांनी तिथे आला. याचा शाहजहांला अत्यंत संताप आला. रागाच्या भरात त्याने औरंगजेबाला दख्खनच्या सुभेदारपदावरून काढून टाकले. शाहजहां इतका नाराज झाला होता की त्याने औरंगजेबास सात महिने दरबारात येऊ दिले नव्हते. नंतर त्याला गुजरातची सुभेदारी दिली. तिथे त्याने चांगला कारभार करत वचक बसवला. दरम्यान शाहजहांचा क्रोधाग्नीही निमाला होता. त्याने त्याच्या कारभारावर खुश होत बाल्ख (अफगाण - उज्बेक) आणि बदख़्शान (उत्तर अफगाणीस्तान) या प्रांतांची सुभेदारी दिली. तिथे त्याने मुघल सत्ता कायम करताच बादशहाने त्याला मुलतान आणि सिंधची जबाबदारीही दिली. येथे इराणी राजवंशाचे मूळ असणाऱ्या सफ्वेदांकडून त्याने सातत्याने पराभव स्वीकारले. शियांकडून कंदहारच्या सीमेवर औरंगजेब सातत्याने पराभूत होत असल्याने मुघल बादशहा शाहजहांचा तीळपापड होत गेला. त्याने औरंगजेबाला शासन देण्यासाठी आधीच्या सर्व सुभेदाऱ्या रद्द करत १६५२ मध्ये पुन्हा दख्खनचा सुभेदार बनवले. या वेळी शिवराय २२ वर्षांचे होते. त्यांनी गनिमी काव्याद्वारे आदिलशाही आणि निजामशाहीस पुरते भंडावून सोडले होते. अधून मधून मुघली मुलुखात देखील ते शिरकाव करत. औरंगजेबाचे मात्र यावर विशेष लक्ष नव्हते. त्याचे सारे ध्यान दिल्लीच्या तख्तावर होते. तरीही त्याने आदिलशाही आणि कुतुबशाही विरुद्ध युद्ध पुकारले. या वेळी शाहजहांने त्याच्या दिमतीस असलेल्या मुघल सेनेस माघारी बोलवले. औरंगजेब यामुळे संतापला. याच दरम्यान शाहजहां आजारी पडला. औरंगजेबाला वाटले आता आपला बाप मरणार आणि दारा शुकोह सम्राटपदी बसणार, या विद्वेषी विचारातून तो उत्तरेस परतला. त्याने आधी दारा शुकोह, दारा शुजा यांचे काटे काढले, शाहजहांस कैदेत टाकले आणि ३१ जुलै १६५८ रोजी स्वतःला बादशहा घोषित केले. १३ जून १६५९ ला दिल्लीच्या शालीमार बागेतील महालात त्याची तख्तपोशी झाली. या नंतर सलग कित्येक दिवस सम्राटपदी विराजमान झाल्याप्रित्यर्थ त्याने दिल्लीत अनेक कार्यक्रम केले. पुढील काळात दक्षिण वगळता त्रिदिशेने त्याने मुघल साम्राज्याचा विस्तार केला. त्याच्या काळात मुघल साम्राज्य सर्वात बलशाली आणि विशालकाय झाले होते, तरीही त्याला दक्षिणेत शिवाजींच्या रूपाने अत्यंत टोकदार संघर्षास तोंड द्यावे लागत होते. २२ जानेवारी १६६६ रोजी शाहजहांचा मृत्यू झाला आणि औरंगजेब सुखावला. इतके दिवस सर्व सोहळे दिल्लीत साजरे करणाऱ्या औरंगजेबाने आपल्या बादशाही तख्तपोशीनिमित्तचा एक मोठा सोहळा आग्र्याच्या शाही किल्ल्यात ठेवला. या साठी त्याच्या सर्व सरदार, सुभेदार, मनसबदार, जहागिरदार आणि वतनदारांना आमंत्रण दिले. याचा न्यौता मिर्झाराजे जयसिंगास देखील होता.

शाहजहां अखरेच्या काळात मुघल युवराजांत संघर्ष सुरु झाला तेंव्हा मिर्झाराजे हे शाहजहांने जाहीर केलेल्या युवराजासोबत म्हणजे दारा शुकोहसोबत होते. औरंगजेब जेंव्हा कंदहारच्या लढाईत इराणी सफ्वेदांच्या हातून पराभूत झाला होता तेंव्हा तीच मोहीम शाहजहांने दारावर सोपवली होती. मिर्झाराजे जयसिंग दारासोबत असूनही इराणी आक्रमकांसमोर त्यांचा निभाव लागला नाही आणि मुघलांनी कंदहारचा नाद कायमचा सोडून दिला. मूर्ख लोकांच्या चौकडीत वावरणाऱ्या दाराने त्याच्या सरदारांचा नेहमी पाणउतारा केला. तरीही ते सरदार मुघल सल्तनतीचे निष्ठावंत पायिक असल्याने त्याला दुखावत नव्हते. आपल्या अपयशाचा राग तो मिर्झाराजांवर काढत असे. त्यांचा अपमान करत असे. दरम्यान दारा शुकोहला देखील सम्राट होण्याचे वेध लागले होते. त्यामुळे तो परत फिरला. मात्र तोवर इकडे बंगालमध्ये शाह शुजाने आणि मुरादबक्षने गुजरातेत स्वतःला राजा घोषित केले होते. तर औरंगजेबाने वेगळाच डाव टाकला होता. 'दारा हा काफिरांचा दोस्त आहे, तो सच्चा इस्लामी नाही, तेंव्हा आपल्या सल्तनतीचा आणि वडीलांचा इस्लामी वारसा चालवण्यासाठी आपण कटीबद्ध आहोत बाकी राजपाट वगैरेशी आपल्याला घेणेदेणे नाही' अशी हूल औरंगजेबाने उठवून दिली होती. या तिघांना टक्कर देताना दारा शुकोहला मिर्झाराजांची आठवण झाली. त्याने मिर्झाराजांना ६००० स्वारांची मनसब दिली आणि आपला मुलगा सुलेमान आणि अफगाणी सरदार दिलेरखान यांच्या सोबत औरंगजेबाचा बिमोड करण्यासाठी पाठवून दिले. बहादूरपूरची लढाई त्यांनी फेब्रुवारी १६५८ च्या सुमारास जिंकली.

दिल्लीच्या सल्तनतीसाठी औरंगजेब चालून येतोय हे कळल्यावर शाही फौजांचे नेतृत्व करत मिर्झाराजे जयसिंग आणि कासीम अली यांच्या जोरावर १५ एप्रिल १६५८ ला इंदौरपासून १४ मैल दूर अंतरावरील धर्मत या ठिकाणी औरंगजेबाशी युद्ध केले. यावेळी दुसरा युवराज मुरादबक्ष हा औरंगजेबासोबत होता, या युद्धात मिर्झाराजासारखा पराक्रमी वीर असूनही शाही सैन्याचा पराभव झाला. औरंगजेबाने तिथून दिल्लीकडे कूच केले. पण चंबळ पार करताच आग्र्याच्या अलीकडे ८ मैल अंतरावर सामूगडजवळ शाही फौजांनी त्याच्याविरुद्ध पुन्हा युद्ध पुकारले, यातही औरंगजेबच विजयी झाला. या नंतर मिर्झाराजांनी थेट बंगालपर्यंत आपली समशेर चालवली पण तोवर इकडे जून १६५८ मध्ये औरंगजेबाने आग्रा ताब्यात घेऊन शाहजहांस नजरकैदेत टाकले. पुढे स्वतःला राजा घोषित केले. या सर्व युद्धादरम्यान मिर्झाराजे जयसिंग त्याच्या लक्षात राहिले. औरंगजेबाने स्वतःला बादशहा घोषित करूनही त्याला हिंदू, राजपूत आणि काही मुस्लीम सरदार म्हणावं तसं स्वीकारत नव्हते याचा होरा ओळखून मिर्झाराजे जयसिंगास ७००० स्वारांची मनसबदारी देत एका दगडात अनेक पक्षी मारले. असे असले तरी इतर सरदारांवर होता जसा जीव होता तसा मिर्झाराजांवर नव्हता.

बादशहाची आपल्यावर मर्जी व्हावी असं काहीतरी आपल्या हातून घडावं या प्रयत्नात मिर्झाराजे होते. या दरम्यान १६५९ मध्ये शिवाजी राजांनी अफझलखानाचा वध केला होता, १६६३ मध्ये औरंगजेबाचा मामा शाहिस्तेखान याची बोटे छाटत त्याला पळता भुई थोडी केली होती. नंतर सुरतेवर हल्ला चढवून लुट केली होती, एकंदर चारही पातशाह्यांना शिवरायांनी आव्हान दिले होते. यामुळे काट्याने काटा काढण्याचा डाव आखत औरंगजेबाने ४४००० शस्त्रसज्ज सैनिक देऊन मिर्झाराजांना दाख्खनेवर स्वारी करून शिवाजी राजांचा बंदोबस्त करण्यास पाठवले. मिर्झाराजांनी ताकद आणि चातुर्य यांचा वापर करत महाराजांना पुरंदरचा तह करण्यास भाग पाडले. काही किल्ले देऊन स्वराज्य वाचवणे कधीही योग्य हा विचार करत शिवरायांनी ११ जून १६६५ रोजी पुरंदरचा तह केला. मिर्झाराजे खुश झाले पण औरंगजेबास म्हणावा तसा आनंद झाला नाही. आपल्या सम्राटाची मर्जी कशी संपादन करायची या विवंचनेत असणाऱ्या मिर्झाराजांनी शिवाजी राजांना औरंगजेबाच्या भेटीस आग्रा येथे नेण्याचे पक्के केले. या भेटीत जे झाले तो मराठ्यांचा सोनेरी इतिहास आहे, शिवइतिहासातला तो एक उत्तुंग क्षण आहे.

छत्रपती शिवाजी राजांच्या जीवनातील सर्वात रोमांचक घटनेपैकी एक म्हणजे आग्रा येथे मुघल बादशहा औरंगजेब याच्याशी झालेली भेट होय. या भेटीत उडालेली चकमक, औरंगजेबाच्या दरबारातील राजांचा बाणेदारपणा, त्यांना झालेली नजरकैद आणि त्यातून महाराजांनी करून घेतलेली सुटका हा सर्व घटनाक्रम इतका तेजस्वी आणि दैदीप्यमान आहे की वाचणाऱ्याची छाती अभिमानाने भरून यावी. वास्तवात पाहता औरंगजेबाइतका क्रूर, कठोर आणि उलट्या काळजाचा बादशहा मुघलांच्या राजवटीत झाला नाही. त्याने आपल्या जन्मदात्या बापास कैदेत ठेवलं, त्याला खंगत झिजत मरायला भाग पाडलं. आपल्या सख्ख्या भावंडांची अत्यंत निर्घृण हत्या केली. शाहजहांनंतर मुघल सत्तेचा वारसा आपल्याला मिळावा म्हणून त्याने मानवतेच्या सर्व सीमा लांघल्या. त्याच्या भेटीसाठी शिवाजीराजे तयार झाले तेंव्हा स्वराज्य गहिवरून गेले होते, सह्याद्रीचा कंठ दाटून आला होता आणि आऊसाहेबांच्या डोळ्यात एक अनामिक भीती गोठून गेली होती !

मजल दरमजल करत शंभूराजांसह निघालेले शिवराय आग्र्यास पोहोचले. महाराजांच्या मुक्कामाची वार्ता समजताच मिर्झाराजांचा मुलगा रामसिंग याने आपला गिरधरलाल या नावाचा मुन्शी यास पाठवून त्याच्या सोबत महाराजांसाठी पोषाख आणि दागिने मढवलेला एक घोडा नजराणा म्हणून पाठवला आणि महाराजांना वंदन कळवले. त्यानुसार गिरधरलाल ३५ ते ४० लोकांना घेऊन महाराजांच्या मुक्कामी दाखल झाला आणि त्याने नजराणा महाराजांना सादर केला सोबत रामसिंग याचा निरोप पण महाराजांना दिला. इथंपर्यंतचा प्रवास नेटका आणि ठीकठाक झालेल्या महाराजांना आग्र्यात आल्यापासून दुजाभाव अनुभवास येत होता. शेकडो मैलाचा प्रवास करून आलेल्या महाराजांचे स्वागत एका मुन्शी कडून झाले. हा अपमान त्यांनी सहन केला. उलट महाराजांनी मनाचा मोठेपणा दाखवून गिरीधरलाल यास पोषाख आणि २०० रुपये देऊन त्याचा सन्मान केला. 'दख्खनेत ज्याने सर्वांच्या नाकी नऊ आणले आणि मामूसाहिब यांना परास्त केले ते शिवाजी राजे येणार' म्हणून त्यांचा कायम द्वेष करणारी मंडळी औरंगजेबाच्या दरबारात एकत्र झाली. त्यांनी डोके लढवले. महाराजांना आदरसन्मानाने वागवण्याची जबाबदारी रामसिंग याची होती. पण या मंडळीनी अचूक वेळ साधली होती आणि महाराज येण्याच्या दिवशीच या मंडळीनी रामसिंगास राजवाड्याभोवती गस्त घालण्याची जबाबदारी दिली. जेणेकरून तो महाराजांच्या स्वागतास जाता कामा नये. सकाळी १० च्या सुमारास महाराजांची भेट ठरली होती. पण रामसिंग राजवाड्याभोवती गस्त घालण्यात अडकला होता त्यामुळे त्यास शक्य झाले नाही. रामसिंग याने गिरीधरलाल यास पुन्हा महाराजांकडे त्यांना घ्यावयास पाठवले. यावेळी देखील रामसिंग न आल्यामुळे महाराज काही बोलले नाहीत असे अपेक्षाभंगाचे धक्के महाराज निघाल्यापासून घेत होते. सरते शेवटी महाराज आणि रामसिंगाची भेट नुरगंज बागेजवळ झाली. गिरीधरलाल यांनी एकमेकांची ओळख करून दिली, भेट झाल्यानंतर आलिंगन देण्याची प्रथा होती. महाराजांना वाटले रामसिंग पुढे येईल रामसिंगास देखील तसेच वाटले की महाराज पुढे येतील पण महाराज पुढे गेले नाहीत. रामसिंग तसाच घोड्यावरून पुढे आला आणि भेट दिली. त्याच्या सोबत मुखलीसखान पण होता तो देखील महाराजांना भेटला. वेळ बरीच निघून गेली होती दिवाणे-इ-आम चा दरबार संपला होता. त्यानंतर दिवाणे-इ-खास च्या दरबारात देखील महाराज पोहचू शकले नाहीत.

औरंगजेब यावेळी दोन्ही दरबारातील कार्यक्रम आटोपून गेला होता. पुढचा दरबार घुसलखान्यात भरला होता. तो संपण्या अगोदर रामसिंगास महाराजांना तिथे घेऊन जाणे क्रमप्राप्त होते. रामसिंग महाराजांना घेऊन आल्याचे कळताच औरंगजेबाने बक्षी असदखानास पाठवले. असदखान महाराजांना घेऊन औरंगजेबासमोर आला. इच्छा नसूनही भेटीचा डावपेच म्हणून महाराजांनी औरंगजेबाला कुर्निसात केला. यावेळी महाराजांनी औरंगजेबास १००० मोहरा, २००० रु नजर, ५०० रु निसार केले. संभाजी महाराजांनी देखील ५०० मोहरा, १००० रु नजर. २००० रु निसार केले. यावेळी औरंगजेबाने महाराजांची साधी विचारपूस देखील न करता पूर्णपणे दुर्लक्षच केले. हा अपमान देखील महाराजांनी निमूटपणे सहन केला. यानंतर महाराजांना ताहरखानच्या जागेवर उभे करण्यात आले. आता महाराजांचा संताप अनावर होत चालला होता. एवढ्या दूरवर मिर्झा राजांच्या शब्दामुळे आलो पण औरंगजेबाने साधी दखल देखील घेतली नाही. आपण येऊन फसलो याची पक्की खात्री महाराजांना झाली होती. दरबारात मानाचे पानविडे वाटले जात होते. सोबत मानाची वस्त्रे देखील दिली जात होती. इथे देखील औरंगजेबाने महाराजांचा सोयीस्कररित्या अपमान करण्याच्या हेतूने मानाची वस्त्रे, शहजादा, जाफरखान, आणि जसवंतसिंह यांनाच दिली.

वस्त्रे घेऊन जसवंतसिंह महाराजांच्या पुढल्या रांगेमध्ये येऊन उभा राहिला. आपल्या पुढच्या रांगेत आपल्याला पाठमोरा असणारा दुसरा तिसरा कुणी नसून युद्धात आपल्याला पाठ दाखवून पळून गेलेला मारवाडचा राजा जसवंत सिंग आहे हे लक्षात येताच महाराजांच्या तळपायाची आग मस्तकी गेली. त्यांचा संताप अनावर झाला. महाराज अस्वस्थ झाल्याचे औरंगजेबाने ताडले, त्याने रामसिंगास सूचित केले की शिवाजीस मानाची वस्त्रे (खिलअत) देऊन समजवावे. शिवाजी राजांनी खिलअत नाकारली आणि त्यांना समजवण्यासाठी नजीक आलेल्या रामसिंगाचा हात जोरात झटकला. राजगडाहून निघाल्यापासून सफशिकनखान, रामसिंग, गिरधरलाल, जसवंतसिंह असे एकावर एक अपमान सहन करीत महाराजंच्या उरात धगधगणा-या ज्वालामुखीचा उद्रेक हा औरंगजेबाच्या दरबारातच झाला. अत्यंत आवेशाने चढ्या आवाजात महाराज रामसिंगास बोलले – "तू पाहिलेस, तुझ्या बापाने पहिले आणि तुझ्या बादशाहने ने पण पहिले आहे मी कोण आहे आणि काय करू शकतो. तरी देखील मला मुद्दाम मान-सन्मानातून वगळण्यात आले………. अरे नको तुमची मनसब………..!!!!!! मला उभे करायचे होते तर माझ्या दर्जा नुसार उभे करायचे होते. माझा मृत्यूच जवळ आला आहे. तुम्हीच मला ठार मारून टाका नाहीतर मीच मला ठार करतो. माझे मस्तक कापून न्यायचे असेल तर खुशाल न्या पण मी बादशहाची हुजरी करण्यासाठी येणार नाही." याचा मूळ राजस्थानी दस्तऐवजपत्रातील उल्लेख – " तुम देखो, तुम्हारा बाप देख्या, तुम्हारा पातशहा देख्या | मी ऐसा आदमी हो जू मुझे गोर करने खडा रखो | मे तुम्हारा मनसबी छोड्या | मुझे खडा तो करीना सीर राख्या होता | म्हारो मरण आयो येतो | तुम मुझे मारोगे या मी अपघात कर मरोंगा | मेरा सीर काटकर ले जावो तो ले जावो | मी पातशहा जी की हुजारी नाही चलता" असा आढळतो.

जिथे फक्त कुर्निसात चालत (कुर्निसात करणे म्हणजे मस्तक पुढे झुकवून उजव्या हाताचा तळवा कपाळाला लावणे. आपलं मस्तक आता राजदरबारी आधीन केलं असून आता तिथे दिल्या जाणाऱ्या हुकुमासाठी सज्ज आहोत असा याचा मतितार्थ) त्या दरबारात कुणी नजर वर करून बघण्याची अनुमती नव्हती, तिथे शिवाजी राजांनी चढ्या आवाजात जसवंतसिंगावरून रामसिंगास खडे बोल सुनवले. ही खरे तर बादशहाचीच तौहीन झाली होती. बादशहाने शिवाजी राजांना अपमानित करण्यास दरबारी बोलवले आणि इथे त्याचाच अपमान झाला. तो बेचैन झाला. "क्या गुस्ताखी हैं" असे त्याने पुकारेपर्यंत आणि त्याच्या सन्मुख होण्यास हजर फर्मावूनही शिवाजी राजे दरबाराकडे पाठ दाखवून बाहेर पडले देखील ! हा अपमान औरंगजेबाच्या जिव्हारी लागला. पुढे त्याने राजांना नजरकैद केले आणि राजे त्यातून सही सलामत निसटले हा इतिहास सर्वश्रुत आहे.

आग्र्याच्या घटनेत जसवंत सिंगासारख्या दुय्यम आणि पळपुटया सरदाराची पाठ पहावी लागल्याने राजे संतप्त झाले आणि शिवाजी राजे पाठ मुघलांच्या तख्तास पाठ दाखवून निघून गेल्याने औरंगजेबाच्या मस्तकात आग लागली. वास्तवात एखाद्या राजाच्या दरबारात मुजरा, कुर्निसात करून येण्याची परंपरा जशी होती तशीच तिथून निघतानाचाही एक रिवाज असे. राजाच्या दरबारात येणारे सरदार, अधिकारी, दरबारी आणि मानकरी यांना दरबारात प्रत्यक्ष राजाच्या पुढ्यात येण्याची परवानगी असे. दरबार आधी लागलेला असे आणि सम्राट / राजा दरबारात आला की त्याला लवून कुर्निसात केला जाई. जर भरलेल्या दरबारात कुणी मानकरी दरबारी दाखल झाला तर त्याला राजाच्या दिशेने मान तुकवून गर्दन झुकवत तीन वेळा कुर्निसात करत त्याच्यासाठी नियुक्त केलेल्या जागी जावे लागे. दरबार संपेपर्यंत कुणालाही जाण्याची परवानगी नसे. जर कुणा एका दरबाऱ्यास राजाने काही काम देऊन दरबाराबाहेर जाण्यास फर्मावले तर त्याला निघताना उलट पावलीचा कुर्निसात करावा लागे, पाच पावले उलट चालल्यावर राजाला पाठ न दाखवता दरबारातून बाहेर यावे लागे. मुजरा, कुर्निसात आणि विदा ह्या दरबारी परंपरांच्या मानसन्मानाची लक्षणे होत. त्यामुळे राजास पाठ दाखवणे हा कोणत्याही राजाचा उपमर्द समजला जाई. याच कारणामुळे जसवंतसिंगास आपल्यापुढे पाठमोरा पाहून राजे कमालीचे प्रक्षुब्ध झाले होते. औरंगजेबाने हे जाणीवपूर्वक केले होते, महाराज यावर असे काही उसळून येतील आणि त्यालाच पाठ दाखवून निघून जातील असं त्याला स्वप्नातही वाटले नव्हते. पण जे अशक्य ते शक्य करून दाखवणारे आणि अतर्क्य ते कृतीत आणणारे असे ते शिवाजी राजे होते.

छत्रपती शिवाजी राजे हे डोक्यावर घेऊन नाचायचा वा मिरवायचा विषय नसून डोक्यात घेऊन रोमरोमात भिनवायचा जाज्वल्य इतिहास आहे आणि एक उत्तुंग विचारधारा आहे. भविष्यात उथळ घटना घडू नयेत याची योग्य ती खबरदारी घेतलीच पाहिजे, ही जबाबदारी आपल्या सर्वांचीच आहे... 


-  समीर गायकवाड 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा