रविवार, २८ जून, २०१५

बैलाचे ऋण - श्री.दि.इनामदार



तुझ्या शेतात राबून माझी सरली हयात,
नको करू हेटाळणी आता उतार वयात
नाही राजा ओढवत चार पाऊल नांगर, 
नको बोलूस वंगाळ नको म्हणूस डंगर !

माझ्या ऐन उमेदीत माझी गाईलीस ओवी, 
नको चाबकासारखी आता फटकारू शिवी
माझा घालवाया शीण तेव्हा चारलास गूळ, 
कधी घातलीस झूल कधी घातलीस माळ

अशा गोड आठवणी त्यांचे करीत रवंथ, 
मला मरण येऊ दे तुझे कुशल चिंतीत
मेल्यावर तुझे ठायी पुन्हा ए कदा रुजू दे, 
माझ्या कातड्याचे जोडे तुझ्या पायात वाजू दे ....

सहावीच्या गतपाठ्यपुस्तकातील श्री.दि.इनामदार यांची ही कविता शेतात राबून म्हातारा झालेल्या बैलाची व्यथा यात रेखाट्लेली आहे.मला भावली म्हणून तुमच्या समोर आणली.
चंद्र तारयांची तकलादू प्रेमगाथा अन खोट्या उपमांच्या आड दडलेले खोट्या कहाण्या यांना काव्यात गुंफणारया कवितांपेक्षा वास्तवाचे सार्थ वर्णन करणाऱ्या कविता अधिक भावतात.
ही कविता अशांपैकीच एक ...

आपल्या शेतात सारी हयात घालवून, आयुष्यभर प्रचंड पहाडओझे उचलून राबराबून थकून गेलेल्या बैलाची ही कैफियत आहे असे म्हटले तरी चालेल वा त्याची विवंचना आहे असे म्हटले तरी चालेल. सारी उमर त्याने शेतात आपल्या धन्यासाठी कष्ट करण्यात घालवली आहे आता त्याच्याकडून काम होत नाही तेंव्हा त्याची हेटाळणी होऊ नये असे त्याला मनोमन वाटणे साहजिकच आहे.

आता बैलाला चार पाऊले नांगर ओढणे झेपत नाही इतका तो थकून गेलाय, इतके त्याने काम केलेय म्हणून त्याला लगेच नावे ठेवणे योग्य नव्हे कारण त्याने इतकी वर्षे ऊन वारा पाऊस यांची तमा न करता कामाचा डोंगर ओढलेला आहे !

बैलाचे असेही सांगणे आहे की, 'त्याच्या ऐन उमेदीत जेंव्हा त्याच्या अंगी दहा हत्तीचे बळ होते अन प्रचंड कष्ट करण्याची क्षमता होती तेंव्हा त्याचा धनी त्याची अपार स्तुती करत होता. तेंव्हा काह्रे तर स्तुतीपायी काम केलेले नव्हते पण धन्याचा आनंद गगनात मावत नव्हता म्हणून तो स्तुती करायचा मग आता त्याचा देह थकल्यावर धन्याने त्याला चाबूक हासडतात तशा शिव्या हासडू नयेत !'

एक काळ होता जेब्व्हा बैल धडधाकट होता, सगळं ओझं घुंगरमाळांच्या आवाजात सहज ओढत होता तेंव्हा त्याचा धनी खुश होऊन त्याला सणावाराला सोडून गुळ चारायचा. खरे तर हे लाडाने खाऊ घालणे बैलावरची माया होती की त्याने केलेल्या कामाची पावती होती माहिती नाही. त्याच बरोबर बैलाला त्याच्या उमेदीच्या काळात धन्याने हौसेने - अभिमानाने मिरवले आहे, त्याच्या अंगावर झुली पांघरल्या होत्या तर कधी त्याच्या गळा माळा घातल्या होत्या ..

आता बैल थकून गेलाय त्याला कष्ट होत नाहीयेत अन उरले सुरले आयुष्य त्याला इथेच धन्याच्या समोर शीण घालवत काढावेसे वाटते. या उतरत्या काळात त्याला वैरण पोटभर मिळाली नाही तरी त्याचे भागू शकते कारण त्याच्या उमेदीच्या काळातल्या गोड आठवणींवर त्याचे भागू शकते ! बैल म्हणतो की, "अशा गोड आठवणींची मी रवंथ करीन आणि तुझी खुशाली चिंतताना मला मरण येऊ दे !"

माणसाच्या मनीही आजकाल एकमेकाप्रती ऋणानुबंधाच्या स्नेहभावना उरल्या नाहीत असं जेंव्हा जाणवत असते तेंव्हा बैलाच्या मनातली त्याची मृत्यूची आस्थेने भरलेली ही अभिलाषा हेलावणारी वाटू लागते.


शेवटची विनवणी करताना बैलाच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा ओघळू लागतात, तो एक मागणं त्याच्या धन्याकडे आणि परमेश्वराकडे एकाच वेळी मागतो. इतके कष्ट करूनही त्याची त्याच्या जन्माबद्दल तक्रार नाहीये उलट त्याच्या धन्याने त्याच्यावर केलेल्या मायेने तो गहिवरून गेलाय अन आपल्या धान्याच्या मायेचे ऋण चुकवण्यासाठी त्याला पुन्हा बैलाचाच जन्म हवा आहे आणि तोही याच धन्याच्या शिवारात हवा आहे ! इतके विनवून तो थांबत नाही त्याची अखेरची इच्छा व्यक्त करताना तो म्हणतो की, " मी मेलो तर मला त्याचे दुःख नाही मात्र माझ्या कातड्याची इतस्ततः विल्हेवाट न लावता त्याचे जोडे करून धन्याने ते पायी घालावेत, तेव्हढीच धन्याची पायधूळ कातडीस लागेल अन धन्याची सच्च्ची सेवा बजावल्याचे समाधान मिळेल !"

स्नेह, माया, आस्था आणि सच्चे प्रेम यांचा ऋणानुबंध काळजाला भिडेल अशा शैलीची ही प्रवाही कविता बधीर झालेल्या माणसांना बरेच काही सुचवून जाते ! जगण्याचे आणि मरण्याचे इप्सित काय असू शकते याचे हळुवार कथन ही कविता करते ...

मातीत रमलेला आणि मुक्या प्राण्यांचे जीव जाणणारा संवेदनशील माणूस या कवितेतले आर्त भाव सहज उमजून घेतो, ज्यांची मनेच बधीर झालीत अन संवेदना बोथट झाल्यात त्यांच्या मनात इथे केवळ 'एक कविता' याहून अधिक संदर्भ उरत नाहीत....

- समीर गायकवाड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा