बुधवार, १७ जून, २०१५

नको नको रे पावसा - इंदिरा संत..


नको नको रे पावसा, असा धिंगाणा अवेळी
 घर माझे चंद्रमौळी, आणि दारात सायली
 नको नाचू तडातडा, अस्सा कौलारावरून
 तांबे सतेली पातेली, आणू भांडी मी कोठून
 नको करू झोंबाझोंबी, माझी नाजूक वेलण
 नको टाकू फूलमाळ, अशी मातीत लोटून
 आडदांडा नको येऊ, झेपावत दारांतून
माझं नेसूचं जुनेर, नको टाकू भिजवून
 किती सोसले मी तुझे, माझे एवढे ऐकना
 वाटेवरी माझा सखा, त्याला माघारी आणा ना
 वेशीपुढे आठ कोस, जा रे आडवा धावत
 विजेबाई कडाकडून मागे फिरव पांथस्थ
 आणि पावसा, राजसा, नीट आणि सांभाळून
 घाल कितीही धिंगाणा, मग मुळी न बोलेन
 पितळेची लोटीवाटी, तुझ्यासाठी मी मांडीन
 माझ्या सख्याच्या डोळ्यांत तुझ्या विजेला पूजीन..

पावसाला केलेली ही आर्त विनवणी मनाला भिडते. आपला सखा नुकताच घराबाहेर पडला आहे, त्याची कामाची वेळ आहे. घरात ती एकटी आहे, अशा वेळेला गच्च दाटून आलेले मेघ बरसायला सुरु झाले तर त्या गृहिणीच्या मनात विचारांचे वारे कसे थैमान घालतील याचे सुंदर शब्दचित्र या कवितेत चितारलेले आहे. 'माझे घर फाटक्या छप्पराचे आहे. आणि जर का तू असा अवेळी आलास तर माझी काय अवस्था होईल, तू असा तडातडा पडायला लागला तर माझ्या छपराचे आणि दारातल्या नाजूक सायलीचे कसे निभावणार ? साहजिकच छप्पर गळेल आणि घरात पाण्याच्या संततधारा लागतील मग ते पावसाचे पाणी घरभर होईल, हे पाणी गोळा करावे इतकी भांडी देखील माझ्या घरी नाहीत तेंव्हा हे वरूणराजा तू असा अवेळी बरसू नकोस' असं लाघवी आर्जव कवितेत आहे.
 
 दारातल्या अंगणातल्या कोवळ्या वेलींशी पावसाने अशी धटिंगणासारखी झोंबाझोंबी केली तर या वेलींची पाने फुले गळून पडतील मग ती वेल मातीशी मिळून जाईल. तिचे अस्तित्वच मिटून जाईल. या वेली, ही फुले मला परमप्रिय आहेत तेंव्हा पावसाने अशी आगळीक करू नये. माझ्याकडे जास्तीची साडी-चोळी देखील नाहीये, खेरीज अंगावरचे नेसूचे जे लुगडे आहे ते जीर्ण झले आहे. ते जर का ओले झाले तर मग मला ओलेत्यानेच राहावे लागेल याचा तरी विचार पावसाने करावा. मी आयुष्यभर नानाविध दुःखे सोसली आहेत. संसार कसाबसा पुढे रेटला आहे तेंव्हा हे पावसा तू एक साधे आर्जव का साहवत नाहीस ? तू माझे ऐकायला पाहिजेस, अशी कैफियत कवितेते पुढे मांडलेली आहे.
 
 त्यापेक्षा त्याने (पावसाने) वेशीबाहेर आठेक कोस अंतरापर्यंत आडवे जोराने वाहत जावे, ह्या मेघासोबत असणाऱ्या दामिनींनी तिथे कडाडून चमकावे जेणेकरून घराबाहेर पडलेला माझा प्राणसखा माघारी फिरेल. पावसाच्या भीतीने तो पुढे जाण्याचा बेत रद्द करेन. त्यामुळे त्याचे पुढचे हाल टळतील. पावसाने माझे इतर काही ऐकले नाही तरी चालेल मात्र त्याने इतके नक्की करावे असं तिचं त्याच्याकडे मागणं आहे. आधी तिने आर्जवे करून बघितली, त्याला प्रश्न करून बघितले, त्याला आडवं लावण्याचा प्रयत्न तिने करून बघितला पण त्यात यश येत नाही असं वाटल्यावर ती युक्तिवाद करते, 'पावसाने किमान तिच्या सख्याला घरी तरी परतू द्यावे कारण तोच तिचे सर्वस्व आहे, जीवन आहे आणि त्याच्या जीवाचे ह्या मोकाट पावसामुळे काही बरेवाईट झाले तर ते तिला सहन होणार नाही. त्यामुळे किमान इतके तरी पावसाने केले पाहिजे !!’
 
 आपल्या राजसाला पावसाने त्याच्या प्रवासाच्या मार्गाहून परत फिरवावे ही विनंती करताना ती त्याला अशीही गळ घालते की, 'पावसाने माझ्या सख्याला माघारी फिरवण्यासाठी तिथे वीजांची मदत जरूर घ्यावी पण थोडी काळजीही घ्यावी !' ;
आपल्या सख्याला सांभाळून घरी परतू द्यावे तोवर पावसाने रौद्र रूप धारण करू नये, त्याने नुसती भीती घालावी आणि त्याला सुखरूप घरी परत आणावे अशी कळकळीची विनंती ती त्याला करते.
पावसाने तिचे हे म्हणणे ऐकावे म्हणून ती त्याला थोडे आमिषही दाखवते. ती म्हणते, 'एकदा का माझा सखा घरी परत आला कि माझ्या जीवात जीव येईल मग मला कशाचीही तमा नाही. मग तू या भुईवर पडायला मोकळा आहेस, मग मी तुला अडवणार नाही !'
 
 कवितेच्या शेवटी ती त्याला अगदी प्रेमाने, एखाद्या सासुरवाशीन बहिणीच्या मायेने भावाला समजून सांगावे तसे सांगते की, 'माझा सखा परत आल्यावर तुला काय धिंगाणा घालायचा आहे तो तू घाल मी अडवणार नाहीच उलट तुझा मी पाहुणचार करीन, आदरातिथ्य करेन, त्यासाठी पितळेची ताटवाटी मांडून ठेवीन. माझा साजन घरी येताच त्याच्या ओलेत्या डोळ्यातल्या लकाकणाऱ्या वीजात मी माझ्या प्राणांचे निरंजन पाहून तुझे पूजन करेन ! इतका मी तुला मानसन्मान देतेय, इतकी मी तुझी कदर करत्येय तेंव्हा तुला हात जोडून विनंती आहे की तू आता माझे ऐकावेस !'
किती मधाळ आर्जव आहे हे ! वाचणाऱ्याच्या मनाची शेवरी अलगद हवेत उडावी ! 
 
 आपला पती कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर चंद्रमौळी घरापाशी जेंव्हा काळेकभिन्न मेघ दाटून येतात, वीजा चमकू लागतात, मोठा पाऊस येण्याची चिन्हे दिसू लागतात तेंव्हा त्या घरात राहणाऱ्या विवाहितेस आधी पतीची, घराची काळजी वाटू लागते मग ती पावसाला विविध मिनतवाऱ्या करून आपलं गाऱ्हाणे त्याच्याजवळ मांडते. इंदिरा संत यांची ही कविता अगदी साधीसोपी, प्रवाही, हळवी आणि आशयघन अशी आहे. त्यांच्या लोकप्रिय कवितांपैकी या रचनेला वरचे स्थान आहे.
'आभाळासाठी पाखरू हवे,
पाखरासाठी झाड हवे,
झाडासाठी अंगण हवे,
घराला दोन डोळे हवे,
एका डोळ्यांत आनंदाचे पाणी हवे,
एका डोळ्यात जिव्हाळ्याचे दाणे हवे,
दोन्ही डोळ्यांत आभाळासकट,
सगळें सगळें मावायला हवे..'
असे म्हणत निसर्गाशी एकरूप होणाऱ्या, निसर्गाच्या विविध रंगरूपाशी तादात्म्य पावत प्रतिभेचा तरल अविष्कार आपल्या कवितांतून घडवणाऱ्या श्रेष्ठ कवयित्री इंदिरा संत यांच्या कावितेने मराठी काव्याच्या वैभवास अलौकिक झळाळी प्राप्त करून दिली आहे. त्यांच्या कवितेने साहित्यशारदेच्या दरबारास इंद्रधनुष्यी रंग लाभले आणि समृद्धीही वाढली.
 
 प्रेम, जीवनातील व्यथा, संघर्षातून आलेले अनुभव, निसर्ग, भक्तीभाव, स्त्रीत्वाच्या वेदना, मानवी नाती असे नानाविध विषय त्यांच्या काव्यातून बहरत जातात. कधी ओठावर हसू आणतात तर कधी डोळ्यात पाणी ! त्यांच्या आयुष्याच्या विविध वळणावर आलेली संकटे आणि त्यावर त्यांनी केलेली मात याचे ठसे त्यांच्या कवितात जागोजागी आढळतात.
इंदिरा नारायण संत या पूर्वाश्रमीच्या इंदिरा गोपाळराव दीक्षित. विजापूर जिल्ह्यातील इंडी हे त्यांचे जन्मगाव. त्यांचे वडील मामलेदार होते. वडिलांची गावोगावी बदली होत असल्यामुळे त्यांनी घरीच कानडी मुळाक्षरे गिरवली आणि थोडेसे लेखन-वाचन केले. तवंदी हे त्यांच्या वडिलांचे मूळ गाव. घरच्या वाङ्मयीन वातावरणामुळे आणि ग्रंथवाचनामुळे त्यांच्यावर साहित्यिक संस्कार होत गेले. त्यातून त्यांना कवितालेखनाचा छंद जडला. 'फुलांची परडी' या नावाची त्यांची स्वरचित कवितेची वही शालेय जीवनातच तयार झाली. त्या सात वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले आणि त्यांच्या वाट्याला पोरकेपण आले. काकांच्या धाकात वाढत असताना त्यांच्या रागीट स्वभावामुळे, काव्यविरोधामुळे त्यांना कवितेची वही लपवून ठेवावी लागली.
 
 भवतालच्या निसर्गसौंदर्याचा खरा आस्वाद इंदिराबाईंनी बालवयातच घेतला आणि त्या निसर्गाची वेधक रूपे त्यांच्या कवितेतून उमटू लागली. दहावीपर्यंतचे शिक्षण बेळगावात घेतल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी त्या पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात आल्या. 'ज्योत्स्ना', 'संजीवनी'सारख्या संकलन नियतकालिकातून त्यांच्या कविता प्रसिद्ध झाल्या. लघुनिबंधकार नारायण माधव संत यांच्याशी त्यांचा परिचय झाला. या परिचयातून स्नेह, प्रेम वाढत गेला. आपसातील काव्यात्मकता हा दोघांचा समान धागा होता. त्यातून त्यांनी लग्न करायचे ठरवले. दोघांच्याही घरातून लग्नाला विरोध होता. तो स्वीकारून १९३५ साली ते विवाहबद्ध झाले. १९४० साली कवी ना. मा. संत आणि कवयित्री इंदिरा संत या पती-पत्नींचा मिळून 'सहवास' हा कवितासंग्रह प्रसिद्ध झाला. या संग्रहात इंदिराबाईंच्या सदतीस आणि ना. मा. संतांच्या पंचवीस कवितांचा समावेश होता. यातल्या बहुतांश रचना प्रीतकविता आहेत.
 
 विवाहबद्ध झाल्यानंतर संसार, मुले आणि नोकरी यांत रममाण होताना त्यांचे कवितेकडे लक्ष नव्हते. १९४६ साली ना. मा. संतांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर इंदिराबाईंच्या आयुष्यात दुःखपर्व सुरू झाले. या काळात कवितेने सखीची भूमिका निभावली. कविता आणि कथा असं दोन्ही प्रकारचं लेखन त्यांनी सुरु ठेवलं. त्याला मनाचा आधार बनवलं. शिक्षिका असतान त्यांनी बालकथा लिहून गद्यलेखनास सुरुवात केली. १९५०च्या दशकात त्यांनी स्त्रीवादी कविता लिहण्यावर आपले लक्ष केंद्रित केले. आयुष्यात जसजसे वळण येत गेले, जसे संकट येत गेले तसे त्यांचे विषय, आशय बदलत गेले. एका भारतीय स्त्रीच्या जीवनात येणाऱ्या आई, पत्नी, मुलगी या नात्यांतून त्यांनी स्त्रीत्वाच्या जाणीवा आणि वेदना त्यांच्या काव्यात शब्दबद्ध केल्या. स्पष्ट आशय, सोपी रचना यांच्या जोडीला समृद्ध शब्दभांडारातून त्यांच्या कवितेने सकसपणे वाचकाच्या मनाचा वेध घेतला. त्यांची कविता रसिकांनी आपलीशी केली. तिला लोकप्रियतेचा राजाश्रय दिला. इंदिरा संत यांची सुमारे पंचवीस पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. या व्यतिरिक्त रमेश तेंडुलकर यांनी इंदिरा संत यांच्या निवडक कविता 'मृण्मयी' नावाने १९८२ साली संपादित करून प्रसिद्ध केल्या आहेत. 'इंदिरा संत यांच्या समग्र कविता' या पुस्तकात त्यांच्या सर्व कविता आहेत, याला अरुणा ढेरे यांनी प्रस्तावना दिलेली आहे. जीवनातील वैविध्याच्या तरल वेध घेत जाणारया या कवितांचा प्रवास रसिकांसाठी रमणीय असेल पण इंदिराबाईंसाठी तो काटेरीच होता.
 
 वडिलांच्या अकाली जाण्यानंतर आईच्या प्रती जे भाव त्यांच्या ठायी होते ते त्यांच्या काव्यातून तन्मयतेने प्रकटले. त्यात त्यांच्या वेदनांना त्यांनी कशी वाट करून दिली आहे हे वाचण्यासारखे आहे. 
 आई-
'कळ्या माझ्या आनंदाच्या
 साठवील्या माझ्याकडे,
 फुलवाया तुझ्यापुढे.
 आसवे मी साठवली
 पापणीच्या काठोकाठ,
 तुझ्यापाशी देण्या वाट.'
 
 बालपण कसेबसे पार पडले, जवळची माणसे देवाघरी गेली म्हणून का जगणे थांबते का ?
आयुष्य नुसते पुढे रेटूनही चालत नाही.
त्याला दिशा ही द्यावीच लागते,
स्वप्ने बघावी लागतात, ती साकार करावी लागतात.
या स्वप्नांचे झुले जितके उंच तितकी भरारी मोठी जाते.
पण ह्या उंच झोक्यावर झुलताना पाय मातीशीच असावे लागतात या आशयाची ही एक सुंदर कविता त्यांनी लिहिली आहे.
'उंच उंच माझा झोका,
झोका बांधला आकाशाला
 झोका चढता-उतरता झाला पदर वारा वारा
 झोक्याला देते वेग पाय टेकून धरणीला
 लाल मातीच्या परागाचा रंग चढतो पावलाला....'
 
 इंदिराबाईंचे पती वैवाहिक जीवनाच्या सारीपाटाचा खेळ अर्ध्यात टाकून निघून गेले. पण त्यांचे निघून जाणे त्या कधीच विसरू शकल्या नाहीत, किंबहुना त्या ध्यासाला त्यांनी कानोसा घ्यायला सांगितले आणि त्यातून जन्माला आली त्यांची 'ऐक जरा ना' ही कविता. एका हळव्या मनाच्या स्त्रीची नितळ ठसठसणारी विरहभावना या कवितेत खोलवर रुजली आहे. आठवणींचा हा खोपा त्यांनी वेदनांच्या शब्दातून असा काही विणला आहे की त्याला तोड नाही. 
“ऐक जरा ना ”
 कौलारांतुन थेंब ठिबकला
 ऒठांवरती.
“ऐक ना जरा….एक आठवण.
 ज्येष्ठामधल्या – त्या रात्रीच्या
 पहिल्या प्रहरी,
 अनपेक्षित से
 तया कोंडले जलधारांनी
 तुझ्याच पाशी.…. '
 
 आपल्याला सोडून गेलेल्या जिवलगास जरी विसरायचे म्हटले तरी विरंगुळ्याचा काहीएक बहाणा करावा लागतो. मात्र आपल्या विरह जाणीवा इतक्या खोलवर असतात की आपल्यामुळे आपल्या भवतालच्या सजीव निर्जीव घटकांना देखील त्याची अनुभूती येते. कदाचित यामुळेच त्या लिहितात की, त्या विसरण्याच्या दुःखाची प्रचीती इतकी तीव्र असते की त्यासाठी (विसरण्यासाठी) खेळायला घेतलेल्या पटासच घेरी येते ! 
'तुला विसरण्यासाठी
 पट सोंगट्या खेळते;
 आकांताने घेता दान
 पटालाही घेरी येते!
 असे कसे एकाएकी
 फासे जळले मुठीत
 कशा तुझ्या आठवणी
 उभ्या कट्टीत.. कट्टीत!'
 
 जीवन विस्कटले जाण्यापूर्वी आपलेही एक स्वप्न होते. त्या स्वप्नात भौतिक सुखाच्या, नात्यागोत्यांच्या गुजगोष्टी होत्या पण ते स्वप्न पडण्याआधीच जाग आली. वास्तवाच्या निखाऱ्यात आयुष्य असे रखरखीत होते की स्वप्न सोडा उलट साधी सुखाची झोप देखील लागणे दुरापास्त होते. याचे मार्मिक वर्णन ‘स्वप्न’ या कवितेत केले आहे - 
'तिचे स्वप्न दहा जणींसारखे
 चविष्ट भरल्या ताटाचे. दोन वेळच्या बेतांचे.
 इस्त्रीच्या कपड्यांचे. सजलेल्या घराचे.
 कधी नाटक, कधी मैफिलीचे– शेवटच्या रांगेचे.
 थट्टामस्करीचे. गप्पा गोष्टींचे.
 तिचे स्वप्न दहा जणींसारखें.
 पण ते पडण्यापूर्वीच तिला जाग आली
 आणि मग कधी झोप लागलीच नाही....'
 
 जर ह्या वेदनाना आपलं जिणं समजून त्यांना कवटाळायचे ठरवले तर त्या वेदनेला आपली दया येण्याऐवजी उधाण येते आणि ती अधिकच बेभान होऊन छळू लागते मग तिचे काय करायचे, ती आपला एक भाग होऊन नसानसातून समरसून जाते असं त्या लिहितात. 
'इथे वेदना लालतांबडी;
 इथे बधिरता संगमरवरी;
 इथे उकळते रक्त तापुनी,
 बेहोषी अन येथे काळी.
 दुखणे बसले चिंध्या फाडित.
 गर गर फिरती त्याचे डोळे
 नसांनसातुन.…'
 
 ही सर्व दुःखे आपलीशी करून भवसागरातील आपली जगण्याची लढाई चालू ठेवण्यासाठी एका असहाय स्त्रीला काय दिव्ये करावी लागतात याचे अत्यंत टोकदार अन नेमक्या शब्दात, जड भाषा न वापरता सूचकतेने जी व्यथा मांडली आहे त्या शैलींपुढे रसिक नकळत नतमस्तक होतो. हा त्यांनी सोसलेल्या वेदनांचा विजय म्हणावा की त्यांनी प्रकट केलेल्या जाणिवांचा विजय म्हणावा ते मात्र समाजत नाही. -
'कुणी निंदावे त्यालाही
 करावा मी नमस्कार,
 कुणी धरावा दुरावा
 त्याचा करावा सत्कार,
 काही वागावे कुणीही
 मीच वागावे जपून,
 सांभाळण्यासाठी मने
 माझे गिळावे मीपण,
 कित्येकांना दिला आहे
 माझ्या ताटातील घास,
 कितिकांच्या डोळ्यातील
 पाणी माझ्या पदरास!
 आज माझ्या आसवांना
 एक साक्षी ते आभाळ,
 मनातील कढासाठी
 एक अंधार प्रेमळ....'
 
 नातीगोती, व्यथा, विरह, प्रेम याही पलीकडे जाऊन त्यांची कविता निसर्गाचे जे मनोरम्य वर्णन करते ते केवळ विलोभनीय आहे ! 
'प्रभातीच्या केशराची कुणि उधळली रास
 आणि वाऱ्यावर रंगला असा केशरी उल्हास !
 रंगा गंधाने माखून झाला सुखद शितळ
 आणि ठुमकत चालला शीळ घालीत मंजुळ !'
 
 आसमंतात फुललेला बहर अन वातावरणातले सोज्वळ ताल यांचा सुरेख मेळ त्या आपल्या कवितेत घालतात, या कवितेत वापरलेले शब्दालंकार अत्यंत देखणे आहेत. ‘चांदण्यांचे चाळ’ हा शब्दालंकार त्यांच्या प्रतिभाशक्तीची श्रीमंती दाखवतो !
'आली बघ गाई गाई शेजारच्या अंगणात
 फुललासे निशिगंध, घोटळली ताटव्यांत
 आली बघ गाई गाई, चांदण्यांचे पायी चाळ
 लाविले का अवधान ऐकावया त्यांचा ताल ?...'
 
 निसर्गाच्या सान्निध्यात राहताना देखील त्यांना आपल्यापासून हिरावल्या गेलेल्या माणसांचे आभास होत राहतात. आपल्या वेदनेचे वर्णन ' दचकला निळा पारवा, डोळ्यांच्या गुंजा टपोरल्या' अशा मनमोहक शब्दात करतात. त्यांनी भरभरून अनुभवलेला निसर्ग किती रसरशीत होता याचे प्रतिबिंब या कवितेत उमटले आहे. 
'वसुंधरेच्या माथ्यावरती
 घुमतो आहे
 आभाळाचा निळा पारवा.
 डोळ्यावरती राखी ढापण,
 लक्ष सदाचें धनिणीपाशी
 अन धनिणीच्या पायामधल्या
 रुणझुणणाऱ्या नादापाशी.
-अवचित काही घडलें
 आणि दचकला निळा पारवा;
 टपोरल्या डोळ्याच्या गुंजा.'
 
'बाहुली' ही त्यांची प्रसिद्ध कविता. इथे बाहुली हे इच्छांचे प्रतिक आहे, एक इच्छा पुरी झाली वा निसटून गेली तर दुसरी इच्छा तयार असते.कधी इच्छापूर्तीचे आनंद होतात तर कधी पदरी निराशा पडते. ह्या अशा कितीएक इच्छा जीवनात येऊन गेल्या याचा काहीच अर्थ नाही असं सूचक वक्तव्य त्या इथं 
 बाहुली -
'एक बाहुली हरवते तेव्हा
 दुसरी साठी हटुन बसते;
 नवी मिळता,नाचतं नाचतां
 ती ही कुठे हरवून जाते.
 किती किती नि कसल्या कसल्या
 बाहुल्या माझ्या हरवुन बसल्या;'
 
 भाषेची श्रीमंती अन शब्दांची देखणी आरास हे त्यांच्या पत्र या कवितेचं मर्म आहे, शब्दांची विलक्षण निवड अन त्यातून साधलेला आशय हे या कवितेत पत्राच्या मूर्त स्वरुपात एकजीव झालेत - 
'पत्र लिही पण नको पाठवू शाई मधूनी काजळ गहिरे
 लिपीरेशान्च्या जाळीमधूनी नको पाठवू हसू लाजरे.
 चढण लाडकी भूवई मधली नको पाठवू वेलान्टीतून
 नको पाठवू तीळ गालीचा पूर्णविरामाच्या बिन्दूतून....'
 
 इंदिराबाईंविषयी अनेक जुन्या नव्या साहित्यप्रेमींनी लिहिलं आहे. इंदिराबाईंच्या  काव्यलेखन काळाची साहित्यिक पार्श्वभूमी लक्षात घेतली तर त्यांच्या कवितेचे वेगळेपण आणि श्रेष्ठत्व दिसून येते. वयाच्या सोळाव्या-सतराव्या वर्षी म्हणजे १९३०-३१ साली इंदिराबाईंच्या कवितालेखनाची सुरुवात झाली. तेव्हापासून ‘शेला’ हा त्यांचा पहिला स्वतंत्र काव्यसंग्रह प्रसिद्ध होईपर्यंतचा काळ हा मराठी कवितेतले जुने नामवंत अस्तंगत होण्याचा आणि नवे कवी उदयाला येण्याचा मोठा गजबजता काळ होता. ज्येष्ठ कवी एकापाठोपाठ एक दृष्टिआड होत होते आणि याच दोन दशकांत आधुनिक मराठी कवितेचे सामर्थ्य आणि सौंदर्य प्रकट करणारी विविधगुणी कविता घेऊन अनेक नवे प्रतिभावंत कवीही पुढे आले. ‘प्रतिभा’, ‘जीवनसंगीत’ आणि ‘दूधसागर’ हे बा. भ. बोरकरांचे तीन संग्रह या काळात प्रसिद्ध झाले. पु. शि. रेगे (‘फुलोरा’ आणि ‘दोला’), संजीवनी (‘संजीवनी’) आणि बा. सी. मर्ढेकर (‘शिशिरागम’) या कवींचे पहिलेवहिले संग्रह याच काळात प्रसिद्ध झाले. नव्या कवितेची सृजनशील गजबज हे या काळाचे वैशिष्टय़च म्हटले पाहिजे.
 
 कवी यशवंत आणि माधव जूलियन हे इंदिराबाईंचे आवडते कवी होते. आणि ‘सहवास’ला प्रस्तावना आहे तीही यशवंतांचीच आहे. ‘शेला’ सर्वस्वी इंदिराबाईंचा असा पहिला संग्रह. स्वतंत्र असा बासष्ट कवितांचा संग्रह.....‘शेला’मधल्या त्यांच्या वेदनांच्या अनुभवाचा विस्तार अधिक उचंबळून ‘मेंदी’त आणि त्याहीपेक्षा जास्त उसळीने ‘मृगजळ’मध्ये झाला आहे. इंदिराबाईंच्या एकूण कवितेत सर्वात उंच चढलेली कविता याच दोन संग्रहांमधली आहे. निसर्ग, प्रेम, विरह, दुख आणि एकाकीपण हे इंदिराबाईंच्या कवितेचे पंचप्राण आहेत असे म्हटले गेले आहे. पण ‘शेला’, ‘मेंदी’ आणि ‘मृगजळ’ या तीनही संग्रहांतल्या (आणि खरे तर पुढच्या सहा संग्रहांतल्याही) एकूण कवितांचे स्वरूप उलगडताना ही पंचप्राणांची कल्पना दूरच सारावी लागते. कारण यांपकी कोणताही एक भावघटक स्वतंत्रपणे इंदिराबाईंच्या कवितेत येत नाहीच. त्यांचे प्रेम म्हणजेच दुख आहे. दुखाच्या गाभ्यातच विरह आहे. विरहाची मिठी एकाकीपणाला आहे. आणि या सगळ्यात निसर्ग विरघळून एकजीव झालेला आहे."
इंदिरा संत यांच्या कवितेबद्दल हे उत्कट मत नोंदवले आहे अरुणा ढेरे यांनी. 'इंदिरा संत यांच्या समग्र कविता' या पुस्तकाच्या प्रस्तावनेत त्यांनी इंदिराजींच्या कवितांचा परामर्श करताना हे मत मांडले आहे.
‘शुद्ध भावकवितेचे विलोभनीय शिखर’ या लेखात प्रा. मिलिंद जोशी यांनी इंदिराबाईंच्या कवितांचा कसदार धांडोळा घेतला आहे. ते म्हणतात की, “मराठी भावकवितेतील खरीखुरी जिवंत प्रेमकविता ही इंदिरा संतांचीच आहे. तिच्यात भडकपणाचा लवलेशही नाही. खऱ्या अर्थाने ती भावकविता आहे. शुद्ध कलानिर्मिती करणे हे विशुद्ध भावकवितेचे कार्य इंदिराबाईंच्या प्रेमकवितेने केले आहे. प्रेम आणि विरह यांची ही एकच वाट आहे. एकाच आशयाभोवती फिरणारी असूनही त्यांची कविता विलक्षण सामर्थ्यवान आणि उत्कट आहे, याची साक्ष 'गर्भरेशीम' आणि 'चित्कळा' या काव्यसंग्रहामधल्या अनेक कविता देतात. समाजविन्मुख असणाऱ्या त्यांच्या कवितेने आपली वाट स्वतःच्या पद्धतीने शोधली.
इंदिराबाई माधव ज्युलियनांच्या संपर्कात आल्या होत्या. कवी यशवंतांच्या कविता त्यांना आवडत होत्या. तरीही पूर्वसुरींच्या आणि रविकिरण मंडळाच्या प्रभावाखाली न येता त्यांच्या कवितेने आपला स्वतंत्र बाणा जपला. दुसऱ्या महायुद्धानंतर सुरू झालेल्या आधुनिक मराठी कवितेच्या युगाचे प्रणेते बा. सी. मर्ढेकर यांनी कवितेची नवीन वाट तयार केली. इंदिराबाईंनी ही वाट पूर्णतः स्वीकारलेली नसली, तरी मर्ढेकरांच्या नवकाव्याचे संस्कारही त्याच्या काही कवितांवर दिसतात. मराठीतल्या सर्व महत्त्वाच्या समीक्षकांनी त्यांच्या कवितेची दखल घेतली. ज्येष्ठ समीक्षक माधव आचवल इंदिराबाईंच्या कवितांचा गौरव करताना लिहितात, 'इंदिराबाईंच्या कविता वाचताना वाटत राहतं, काळाची अशी जाणीव पूर्वी कधी झाली नव्हती. आकाश इतक्या निकटतेनं कधी जवळ आलं नव्हतं आणि दोन अनादी अनंत परिमाणांच्या कैचीत सापडलेल्या जिवांचं असं एकाकीपण पूर्वी कुठं बघितलं नव्हतं. वेदनेला अशी वाचा कधी मिळाली नव्हती. केवळ अस्तित्वाचाच असा भयंकर थकवा कधी आढळला नव्हता आणि या साऱ्यांनाच पोटात घेऊन पसरलेला असा भयाण काळोख पूर्वी कधी पाहिला नव्हता. इंदिराबाईंच्या कवितेनं हे सारं दिलं.
 
 मराठी कवितेस आपल्या शब्दलालित्याने सजवून १३ जुलै २००० ला इंदिरा संत आपल्या अनंताच्या प्रवासात जिवलगांच्या शोधात निघून गेल्या. त्यांच्या जाण्यानंतर त्यांच्या मानसकन्या प्रख्यात लेखिका,  चित्रकर्त्या आणि इंदिराबाईंच्या मानसकन्या वासंती मुजुमदार यांनी त्यांच्या लाडक्या आक्कांवर 'ललित' मासिकात एक स्मृतिलेख लिहिला होता. त्याचा हा अंश खूप काही सांगून जातो - "'शतपावली'सारख्या साध्याशा विषयावर लिहितानाही त्यांच्या मनाची ही स्वागतशील वृत्ती प्रकट होते. सामान्यांच्या जीवनातही शतपावलीला महत्त्व असतंच. काळजीचा बुक्का आणि आनंदाचा गुलाल त्या पावलांतून उमटत जाताना त्या व्यक्तिला किती हलकं वाटत असेल! दिवस-रात्रींनी सीमित झालेलं आपलं जीवन म्हणजे आक्कांना शतपावल्यांचा उत्सवच वाटतो. कधी काही कर्तव्यं बोटाशी धरलेली, स्वप्नं छातीशी सांभाळलेली, कधी कुणाची ओझी आपल्या खांद्यावर घेतलेली...पावलापावलांतून सुखदु:खाची, उन्हा-सावलीची जाळी पसरणारी. आपल्याबरोबरच दुसर्‍यालाही समाधान देणारी ही जीवनाची शतपावली किती रम्य असते... पण ती आपल्याला जाणवायला हवी..."
 
 रक्तामध्ये ओढ मातीची
 मनास मातीचे ताजेपण
 मातीतून मी आले वरती
 मातीचे मम अधुरे जीवन
 कोसळताना वर्षा अविरत
 स्नानसमाधी मध्ये डुबावे
 दवांत भिजल्या प्राजक्तापरि
 ओल्या शरदामधी निथळावे
 आणिक तुझिया लाख स्मृतींचे
 खेळवीत पदरात काजवे
 उभे राहुनी असे अधांतरी
 तुजला ध्यावे, तुजला ध्यावे
 
 संघर्षमय जीवन जगून मराठी कवितेला समृद्ध करून गेलेल्या इंदिरा संत ह्या केवळ एक श्रेष्ठ विदुषीच नव्हत्या तर बहुआयामी जीवन यशस्वीरीत्या जगलेल्या, स्त्रीत्वाला अभिमान वाटावा अशा व्यक्तिमत्वाच्या एक परिपूर्ण कवयित्री अन लेखिका होत्या असं अभिमानाने नमूद करावे वाटते.
 
- समीर गायकवाड

साभार संदर्भ नोंद –
‘शुद्ध भावकवितेचे विलोभनीय शिखर’ - प्रा. मिलिंद जोशी
जीवनविषयक ओल्या उमाळ्याची कविता – कवयित्री अरुणा ढेरे

४ टिप्पण्या:

  1. खूप मस्त ब्लॉग लिहिलाय सर, thank you, मला आवडला,
    त्यांची वाट पहाते तुझी अशी मी ही कविता जर तुमच्याकडे संग्रहित असेल तर प्लीज पाठवा

    उत्तर द्याहटवा